सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

मनासाठी हवंय काहीतरी...

आजारी असल्यामुळे कामावरून सुट्टी मिळाली होती आज. त्यामुळे घरी आराम करणं आणि जमलं तर थोडं छोटं-मोठं काम विरंगुळा म्हणून करण्याचा ठराव मी सकाळीच मनातल्या मनात पास केला होता. त्या हिशेबानं दिवसभर स्वत:ला गुंतवून ठेवण्याचा विचार होता. बाहेर भरपूर पाऊस सुरू होता. त्यामुळं बाहेर जाणं तर शक्यच नव्हतं आणि तसं निमित्तही नव्हतं. सकाळी पेपर वाचून झाल्यावर जरा निवांत झालो होतो. घरच्याच एका कामामुळ्ं अचानक बाहेर जाण्याचं ठरलं. घरची चारचाकी असल्यानं पावसात भिजायचा मुद्दा नव्हता. त्यामुळ्ं चुलत भावासोबत निघालो.

गाडीत बसलो. बाहेर जोरात पाऊस सुरूच होता. भावानं गाडी पार्किंगमधून काढली आणि अगदी काही क्षणातचं गाडीचे वायपर सुरू केले. पावसाचे थेंब गाडीच्या काचेवर पडत होते. एकेक थेंब हळूहळू मोठा-मोठा होत होता आणि अचानक वायपरच्या सपक्याने एकदम गायब होत होता. काच अगदी स्वच्छ दिसत होती. वायपरचा वेग वाढवला की पाणी काढून टाकण्याचा वेगही वाढत होता. मग समोरचा रस्ताही तसाच पटकन मोकळा झालेला दिसत होता. काचेतून पलिकडचं अगदी स्वच्छ आणि ठळकपणे दिसेइतपत पाणी काचेवरून काढून टाकण्याचं काम वायपर करत होते. ओलावा मात्र तसाच राहात होता. गाडीसोबत सुरू होता फक्त वायपर!

एका ठिकाणी काही कारणामुळं थांबावं लागलं. भावानं गाडी रस्त्याच्या थोडी बाजूला घेतली. आम्ही गाडीतच बसून होतो. गाडी बंद केली. काचा बंदच होत्या. गाडीतल्या गाडीतच गप्पा सुरू होत्या आमच्या. बाहेर पाऊस पडतच होता. गाडीच्या टपावरच्या थेंबांच्या वेगाचा आणि आवाजाचा अंदाज घेत पाऊस किती जोरात सुरू आहे याची चर्चा सुरू होती. अचानक आजूबाजूच्या काचांवर लक्ष गेलं. काचांवर धुकं साचलं होतं. धुक्यावर रेघोट्या मारत थोडावेळ् टाईमपास केला. एक ऑबझर्व्हेशनही केलं. अगदी सुरूवातीला जे लिहिलं ते कायम राहातं. त्याच्यावर काही वेळानं धुकं साचलं तरी ते मिटत नाही. धुक्याचा थर त्याच्यावर साचतो. इतर ठिकाणी धुकं गडद दिसतं, जिथं लिहिलयं तिथं जरा फिकं पडतं, लिहिलेलं मात्र पुसलं जात नाही. भावानं गाडीतला एसी सुरू केला. धुक काही क्षणात विरून गेलं. हवेतला गारवा आणि आर्द्रता मात्र जाणवत होतीच. एसी बंद केला की पुन्हा तसंच धुकं साचायला लागलं.

बाहेर पाऊस आणि आत धुकं. बाहेर वायपर आणि आत एसी. साम्य एकच- एक सुरू केलं की दुसरं बाजूला जात होतं आणि सुरू असलेलं बंद केलं की बाजूला गेलेलं पुन्हा परत येत होतं. दरम्यानच्या काळात गाडीतून रस्ता आणि बाहेरचं जग मात्र जसं आहे तसंच दिसत होतं. स्वत:च्या अस्त्वित्त्वाची जाणीव करून देत होतं. मलाही माझ्या विचारचक्रापासून बाहेर ओढत होतं. कल्पनेच्या जगातून वास्तवात ये, असं सांगत होतं. ते पावसाचे थेंब, वायपर, ते गाडीच्या काचेवर साचलेलं धुकं, एसी या सगळ्या गोष्टी सहजच मनाशी-भावनांशी जोडून पाहिल्या.

वाटलं, असा वायपर किंवा तसाच एक एसी मनामध्येही हवा कुठंतरी. पावसात गाडीत बसल्यानंतर रस्त्याचं भान तो एसी किंवा तो वायपर देत होता. पावसाच्या वा धुक्याच्या रुपानं आलेलं साचलेपण बाजूला सारत वास्तवाचं भान देत होता. आयुष्याचंसुद्धा असंच असेल ना? सुख-दु:ख येतच राहातात. त्याच्यातच गुरफटत राहिलो तर आपल्यालाही साचलेपण येतं ना? जास्त सुखही बोचतं आणि दु:ख तर सारखंच टोचतं. परिस्थिती बदलली तरी आठवणी तशाच राहातात. त्याच आठवणी पुन्हापुन्हा आपल्याला जाणीव करून देत राहातात. आठवणी आनंद देणार्‍या असल्या तर हरकत नसते; पण वेदना देणार्‍या असल्या तर...
म्हणूनच आज मनापासून वाटलं, एक वायपर नाहीतर एक तसाच एसी मनात हवा. आठवणींवर फिरला किंवा तो नुसता सुरू केला तरी आजूबाजूच्या परिस्थितीची जाणिव होईल. आठवणींचं अस्तित्त्व त्या ओलाव्यासारखं किंवा त्या आर्द्रतेसारखं कायम असेलच. वाटलं तर मारायच्या रेघोट्या. काही काळ त्या तग धरून असतातच की; पण स्वत:च्या कोशातच अडकल्यासारखं व्हायला लागलं, गुरफटल्यासारखं वाटायला लागलं तर करायचा सुरू तो वायपर नाहीतर एसी. थोड्याच वेळात पुन्हा नॉर्मल. किती बरं होईल ना असं झालं तर...
२९/८/२०११
....



1 टिप्पणी: