बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

नजरच वाईट...

रानडेमध्ये असताना एकदा अनिल अवचटांचं उर्फ बाबांचं लेक्चर अटेंड करायला मिळालं होतं. त्याला आता जवळपास दोन वर्ष होऊन गेली असतील. रानडेमध्यल्या आमच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळातच त्यांचं ते व्याख्यान होतं. बाबा अगदी साध्या, सोप्या आणि तितक्याच हृदयस्पर्शी भाषेत समोरच्यापर्यंत त्यांच्या भावना पोचवण्याबद्दल जाणले जातात. त्यांच्या त्या लेक्चरमध्ये मला तोच अनुभव आला. वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांसाठीच्या सेवाभावी कार्याविषयी त्यांनी आम्हाला माहिती सांगितली होती. ‘तशा’ महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, समाजाच्या रोखलेल्या नजरा आणि समाज भावनांविषयी बाबा त्यावेळी बोलले होते. काल दुपारी लक्ष्मी रोडच्या बुधवारातून जाणार्‍या भागामध्ये फिरताना अचानक हे सगळ्ं आठवलं. कदाचित माझ्याही नजरेत त्याच भावनांपैकी एक, तसलीच किळस माझी मलाच जाणवली म्हणून...

तसं त्या भागातून मी पहिल्यांदाच जात नव्हतो. माझा दोस्त आरके आणि मी, आम्ही दोघेही त्या रस्त्याने लोकसत्ताच्या अरोरा टॉवरमध्यल्या ऑफिसकडे जायचो-यायचो. लोकसत्तामधला ट्रेनी पिरिअड होता. बरेचदा रात्री उशीरा हॉस्टेलवर परतायचो. तेव्हाही त्या भागातलं वास्तव सहज समजून यायचं; पण त्यावेळी अशा कोणत्या किळसवाण्या नजरेपेक्षा थोडी भीती असायची मनात. कोणी अचानक अडवलं तर...इथंच काही झालं गाडीला म्हणजे... आरके मराठी लिटरेचरचा विद्यार्थी. एम.ए. मराठी नंतर त्याने रानडेमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. माझ्यापेक्षा दोन वर्ष अगोदर पुण्यात आलेला. त्यामुळं बुधवारातल्या वास्तवाशी निगडीत बर्‍याच ऐकिव गोष्टी तो सांगायचा. त्या कायमच भितीदायक वाटायच्या. ‘आपला इथल्या लोकांविषयीचा विचार चुकीचा असू शकतो,’ असं मनोमन वाटायचं त्यावेळी. पण स्वत:ला एक सभ्य, सुसंस्कृत म्हणवून घ्यायला आवडणार्‍या माझ्यासारख्याला तिथल्या वातावरणामधली असभ्यता किंवा व्यक्तीला अगदीच खालच्या पातळीवर नेऊन ठेवणारी एक ‘तसली’ आयडेंटी पुन्हा-पुन्हा थांबवायची. पुन्हा तीच नजर तिथली असहायता पाहू शकत असली, तरी!

रानडेमधल्या एका असाईनमेंटच्या निमित्ताने बुधवारात घडलेल्या घटनेवर अभ्यास करायचा चान्स मिळाला होता. त्यासाठी लोकसत्तामधल्याच कडुसकर सरांची मुलाखत घेतली होती. त्यांनीच तो प्रकार समोर आणला होता. त्या वेळीही कडुसकर सरांनी त्या भागात राहाणार्‍या महिलांच्या परिस्थितीविषयी पुसटशी कल्पना दिली होती. रंगरंगोटीच्या आड लपलेल्या दु:खाविषयी पहिल्यांदाच माहिती मिळाली होती. स्वत:चा चेहरा लपवून रंगवलेले चेहरे शोधणार्‍यांच्या ‘तसल्या’ नजरांना ते दु:ख कसं जाणवत नसेल हेच समजत नव्हतं. हा सगळा घटनाक्रम अगदी मोजक्या मिनिटांमध्ये नजरेसमोरून गेला. गाडी चालवत ऑफिसमध्ये येईपर्यंत डोक्यात आलेले सगळे विचार ‘मी चुकलो’ हेच सांगणारे होते. सुसंस्कृतपणाच्या आड मी झापडं लावूनच जगतोय असंच वाटायला लागलं होतं.

काहीही असो; पण काल माझ्या नजरेतली किळस आवडली नाही मला. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. आपल्याला जर त्यांच्यासाठी काही करता येणार नाहीये; तर मग त्यांचा तिरस्कार किंवा किळस करणं तरी आपण थांबवलं पाहिजे असं वाटतंय. ते त्यांच्या पद्धतीने जगतायेत; आपण आपल्या. आपल्याला त्यांच्या विषयी चांगले विचार करता येणार नसतील; तर वाईटही करू नयेत. आणि त्यांच्याविषयी करुणा किंवा सिंपथी तर अजिबातही नसावी...मलाच आवडत नाही कोणी माझ्याविषयी दया दाखवली तर, तसंच कदाचित त्यांनाही वाटत असेल. शेवटी माणसं आहेत ना यार तीही. पण त्यांच्यातंल माणुसपण दिसतचं नाहीए. नजरच वाईट आहे बहुतेक...
...

1 टिप्पणी:

  1. जर्नालिझममध्ये सुरुवातीच्या काळात आलेला एक अनुभव आहे. 93 च्या राखी पोर्णिमेला कोल्हापूरच्या अशाच एका वस्तीत रिपोर्टिंगच्या निमित्तानं आलेला. तोपर्यंत 'डोंबारवाडा' म्हणून त्या वस्तीकडं पाहायचो. राखी बांधणाऱया त्याच बाया होत्या. फक्त उपचार म्हणून किंवा एनजीओच्या प्रोफाईलसाठी म्हणून तो कार्यक्रम नव्हता; त्यामुळं असेल कदाचित; पण कार्यक्रमात खूप आत्मियता होती. त्यानंतर जेव्हा जेव्हा तिथून गेलो; तेव्हा तेव्हा नजर बदलली होती. मग तिथल्या लहान मुलांपासून बाप्यांपर्यंतची ओळख झाली आणि नजर एकदम साफ झाली. कोणाचीही झुल न पांघरता त्या वस्तीतल्या लहान मुलांच्या विकासासाठी झटणारी 'बातम्यां'च्या पलिकडंची माणसंही भेटत गेली.

    पोस्ट छान. आवडली. म्हणून हे आठवलं. त्याबद्दल थॅंक्स :)

    उत्तर द्याहटवा