बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

नजरच वाईट...

रानडेमध्ये असताना एकदा अनिल अवचटांचं उर्फ बाबांचं लेक्चर अटेंड करायला मिळालं होतं. त्याला आता जवळपास दोन वर्ष होऊन गेली असतील. रानडेमध्यल्या आमच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळातच त्यांचं ते व्याख्यान होतं. बाबा अगदी साध्या, सोप्या आणि तितक्याच हृदयस्पर्शी भाषेत समोरच्यापर्यंत त्यांच्या भावना पोचवण्याबद्दल जाणले जातात. त्यांच्या त्या लेक्चरमध्ये मला तोच अनुभव आला. वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांसाठीच्या सेवाभावी कार्याविषयी त्यांनी आम्हाला माहिती सांगितली होती. ‘तशा’ महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, समाजाच्या रोखलेल्या नजरा आणि समाज भावनांविषयी बाबा त्यावेळी बोलले होते. काल दुपारी लक्ष्मी रोडच्या बुधवारातून जाणार्‍या भागामध्ये फिरताना अचानक हे सगळ्ं आठवलं. कदाचित माझ्याही नजरेत त्याच भावनांपैकी एक, तसलीच किळस माझी मलाच जाणवली म्हणून...

तसं त्या भागातून मी पहिल्यांदाच जात नव्हतो. माझा दोस्त आरके आणि मी, आम्ही दोघेही त्या रस्त्याने लोकसत्ताच्या अरोरा टॉवरमध्यल्या ऑफिसकडे जायचो-यायचो. लोकसत्तामधला ट्रेनी पिरिअड होता. बरेचदा रात्री उशीरा हॉस्टेलवर परतायचो. तेव्हाही त्या भागातलं वास्तव सहज समजून यायचं; पण त्यावेळी अशा कोणत्या किळसवाण्या नजरेपेक्षा थोडी भीती असायची मनात. कोणी अचानक अडवलं तर...इथंच काही झालं गाडीला म्हणजे... आरके मराठी लिटरेचरचा विद्यार्थी. एम.ए. मराठी नंतर त्याने रानडेमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. माझ्यापेक्षा दोन वर्ष अगोदर पुण्यात आलेला. त्यामुळं बुधवारातल्या वास्तवाशी निगडीत बर्‍याच ऐकिव गोष्टी तो सांगायचा. त्या कायमच भितीदायक वाटायच्या. ‘आपला इथल्या लोकांविषयीचा विचार चुकीचा असू शकतो,’ असं मनोमन वाटायचं त्यावेळी. पण स्वत:ला एक सभ्य, सुसंस्कृत म्हणवून घ्यायला आवडणार्‍या माझ्यासारख्याला तिथल्या वातावरणामधली असभ्यता किंवा व्यक्तीला अगदीच खालच्या पातळीवर नेऊन ठेवणारी एक ‘तसली’ आयडेंटी पुन्हा-पुन्हा थांबवायची. पुन्हा तीच नजर तिथली असहायता पाहू शकत असली, तरी!

रानडेमधल्या एका असाईनमेंटच्या निमित्ताने बुधवारात घडलेल्या घटनेवर अभ्यास करायचा चान्स मिळाला होता. त्यासाठी लोकसत्तामधल्याच कडुसकर सरांची मुलाखत घेतली होती. त्यांनीच तो प्रकार समोर आणला होता. त्या वेळीही कडुसकर सरांनी त्या भागात राहाणार्‍या महिलांच्या परिस्थितीविषयी पुसटशी कल्पना दिली होती. रंगरंगोटीच्या आड लपलेल्या दु:खाविषयी पहिल्यांदाच माहिती मिळाली होती. स्वत:चा चेहरा लपवून रंगवलेले चेहरे शोधणार्‍यांच्या ‘तसल्या’ नजरांना ते दु:ख कसं जाणवत नसेल हेच समजत नव्हतं. हा सगळा घटनाक्रम अगदी मोजक्या मिनिटांमध्ये नजरेसमोरून गेला. गाडी चालवत ऑफिसमध्ये येईपर्यंत डोक्यात आलेले सगळे विचार ‘मी चुकलो’ हेच सांगणारे होते. सुसंस्कृतपणाच्या आड मी झापडं लावूनच जगतोय असंच वाटायला लागलं होतं.

काहीही असो; पण काल माझ्या नजरेतली किळस आवडली नाही मला. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. आपल्याला जर त्यांच्यासाठी काही करता येणार नाहीये; तर मग त्यांचा तिरस्कार किंवा किळस करणं तरी आपण थांबवलं पाहिजे असं वाटतंय. ते त्यांच्या पद्धतीने जगतायेत; आपण आपल्या. आपल्याला त्यांच्या विषयी चांगले विचार करता येणार नसतील; तर वाईटही करू नयेत. आणि त्यांच्याविषयी करुणा किंवा सिंपथी तर अजिबातही नसावी...मलाच आवडत नाही कोणी माझ्याविषयी दया दाखवली तर, तसंच कदाचित त्यांनाही वाटत असेल. शेवटी माणसं आहेत ना यार तीही. पण त्यांच्यातंल माणुसपण दिसतचं नाहीए. नजरच वाईट आहे बहुतेक...
...

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

मनासाठी हवंय काहीतरी...

आजारी असल्यामुळे कामावरून सुट्टी मिळाली होती आज. त्यामुळे घरी आराम करणं आणि जमलं तर थोडं छोटं-मोठं काम विरंगुळा म्हणून करण्याचा ठराव मी सकाळीच मनातल्या मनात पास केला होता. त्या हिशेबानं दिवसभर स्वत:ला गुंतवून ठेवण्याचा विचार होता. बाहेर भरपूर पाऊस सुरू होता. त्यामुळं बाहेर जाणं तर शक्यच नव्हतं आणि तसं निमित्तही नव्हतं. सकाळी पेपर वाचून झाल्यावर जरा निवांत झालो होतो. घरच्याच एका कामामुळ्ं अचानक बाहेर जाण्याचं ठरलं. घरची चारचाकी असल्यानं पावसात भिजायचा मुद्दा नव्हता. त्यामुळ्ं चुलत भावासोबत निघालो.

गाडीत बसलो. बाहेर जोरात पाऊस सुरूच होता. भावानं गाडी पार्किंगमधून काढली आणि अगदी काही क्षणातचं गाडीचे वायपर सुरू केले. पावसाचे थेंब गाडीच्या काचेवर पडत होते. एकेक थेंब हळूहळू मोठा-मोठा होत होता आणि अचानक वायपरच्या सपक्याने एकदम गायब होत होता. काच अगदी स्वच्छ दिसत होती. वायपरचा वेग वाढवला की पाणी काढून टाकण्याचा वेगही वाढत होता. मग समोरचा रस्ताही तसाच पटकन मोकळा झालेला दिसत होता. काचेतून पलिकडचं अगदी स्वच्छ आणि ठळकपणे दिसेइतपत पाणी काचेवरून काढून टाकण्याचं काम वायपर करत होते. ओलावा मात्र तसाच राहात होता. गाडीसोबत सुरू होता फक्त वायपर!

एका ठिकाणी काही कारणामुळं थांबावं लागलं. भावानं गाडी रस्त्याच्या थोडी बाजूला घेतली. आम्ही गाडीतच बसून होतो. गाडी बंद केली. काचा बंदच होत्या. गाडीतल्या गाडीतच गप्पा सुरू होत्या आमच्या. बाहेर पाऊस पडतच होता. गाडीच्या टपावरच्या थेंबांच्या वेगाचा आणि आवाजाचा अंदाज घेत पाऊस किती जोरात सुरू आहे याची चर्चा सुरू होती. अचानक आजूबाजूच्या काचांवर लक्ष गेलं. काचांवर धुकं साचलं होतं. धुक्यावर रेघोट्या मारत थोडावेळ् टाईमपास केला. एक ऑबझर्व्हेशनही केलं. अगदी सुरूवातीला जे लिहिलं ते कायम राहातं. त्याच्यावर काही वेळानं धुकं साचलं तरी ते मिटत नाही. धुक्याचा थर त्याच्यावर साचतो. इतर ठिकाणी धुकं गडद दिसतं, जिथं लिहिलयं तिथं जरा फिकं पडतं, लिहिलेलं मात्र पुसलं जात नाही. भावानं गाडीतला एसी सुरू केला. धुक काही क्षणात विरून गेलं. हवेतला गारवा आणि आर्द्रता मात्र जाणवत होतीच. एसी बंद केला की पुन्हा तसंच धुकं साचायला लागलं.

बाहेर पाऊस आणि आत धुकं. बाहेर वायपर आणि आत एसी. साम्य एकच- एक सुरू केलं की दुसरं बाजूला जात होतं आणि सुरू असलेलं बंद केलं की बाजूला गेलेलं पुन्हा परत येत होतं. दरम्यानच्या काळात गाडीतून रस्ता आणि बाहेरचं जग मात्र जसं आहे तसंच दिसत होतं. स्वत:च्या अस्त्वित्त्वाची जाणीव करून देत होतं. मलाही माझ्या विचारचक्रापासून बाहेर ओढत होतं. कल्पनेच्या जगातून वास्तवात ये, असं सांगत होतं. ते पावसाचे थेंब, वायपर, ते गाडीच्या काचेवर साचलेलं धुकं, एसी या सगळ्या गोष्टी सहजच मनाशी-भावनांशी जोडून पाहिल्या.

वाटलं, असा वायपर किंवा तसाच एक एसी मनामध्येही हवा कुठंतरी. पावसात गाडीत बसल्यानंतर रस्त्याचं भान तो एसी किंवा तो वायपर देत होता. पावसाच्या वा धुक्याच्या रुपानं आलेलं साचलेपण बाजूला सारत वास्तवाचं भान देत होता. आयुष्याचंसुद्धा असंच असेल ना? सुख-दु:ख येतच राहातात. त्याच्यातच गुरफटत राहिलो तर आपल्यालाही साचलेपण येतं ना? जास्त सुखही बोचतं आणि दु:ख तर सारखंच टोचतं. परिस्थिती बदलली तरी आठवणी तशाच राहातात. त्याच आठवणी पुन्हापुन्हा आपल्याला जाणीव करून देत राहातात. आठवणी आनंद देणार्‍या असल्या तर हरकत नसते; पण वेदना देणार्‍या असल्या तर...
म्हणूनच आज मनापासून वाटलं, एक वायपर नाहीतर एक तसाच एसी मनात हवा. आठवणींवर फिरला किंवा तो नुसता सुरू केला तरी आजूबाजूच्या परिस्थितीची जाणिव होईल. आठवणींचं अस्तित्त्व त्या ओलाव्यासारखं किंवा त्या आर्द्रतेसारखं कायम असेलच. वाटलं तर मारायच्या रेघोट्या. काही काळ त्या तग धरून असतातच की; पण स्वत:च्या कोशातच अडकल्यासारखं व्हायला लागलं, गुरफटल्यासारखं वाटायला लागलं तर करायचा सुरू तो वायपर नाहीतर एसी. थोड्याच वेळात पुन्हा नॉर्मल. किती बरं होईल ना असं झालं तर...
२९/८/२०११
....



रविवार, २८ ऑगस्ट, २०११

हसरी...

हसरी...तसं नावही आहे एक आणि व्यक्तिविशेषणही. मला इथं हा शब्द दोन्ही अर्थांनी वापरायचा आहे. हसरीची आणि माझी ओळख तशी अलीकडचीच, साधारण दोन वर्षांपूर्वीची. हसण्याच्या आवडीमुळेच आमची चांगली गट्टी जमली. काही दिवसांमध्येच आमची अशी खात्री झाली होती; की आम्ही म्हणजे जत्रेत हरवलेले बहिण-भाऊच! बर्‍याच काही बाबतीत साम्य होतं. धिंगाणा-मस्ती मलाही आवडायची अन तिलाही. हसायलाही भरपूर आवडत असे. तसं अजूनही आवडते; पण आता बंधनं आली. लोकं म्हणतात आता मोठे झालोय आम्ही. त्यामुळे नो धिंगाणा... अगदी हसायलाही बंदी! वर्गातही सोबतच असायचो. शक्यतो एकमेका शेजारच्या खुर्च्यांवर बसायचो, सर रागवत नाहीत तोवर. सर रागवले की जबरदस्ती मग हसरी एका कोपर्‍यात आणि मी दुसर्‍या असं बसायचो. आता वर्गही नाही राहिला आणि तिचं हसणंही नाही राहिलं...

एक प्रसंग आठवतोय. दिल्लीला ट्रिपसाठी जायचे होते. रात्री अडीचच्या आसपासची गाडी होती. आम्ही सगळेच नऊ-साडेनऊपासूनच स्टेशनवर जमायला सुरुवात केली होती. हॉस्टेलवरून आम्हा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप निघाला होता. आम्ही स्टेशनवर पोहोचल्यावर काही वेळातच हसरीही आली. काकांसोबत आली होती तिच्या. आम्ही सगळेच मग निवांत गप्पा मारत बसलो. गाडीची वाट पहायचीच होती. पर्यायच नव्हता. पण आम्हा सगळ्यांपेक्षा तिला जास्त आतुरता होती.

तिचा भाऊ येणार होता. ‘तो कुठेतरी दुसरीकडेच असतो. तो परत तिसरीकडेच जाणार होता. मध्येच रस्त्यात पुणं लागतं आणि हसरीही पुण्यातच असते म्हणून येणार होता. निरोप द्यायला घरचं, जवळचं कोणी माणूस असावं, म्हणून दादा येणार आहे,’ असं ती सांगत होती. याच दादानं तिचं नाव ठेवलं होतं म्हणून जास्तच कौतुक होतं त्याचं. नावही तिच्या स्वभावासारखंच ठेवलं आहे. हसरी!

थोडा वेळ गेला. दादा स्टेशनवर आला हे आम्हा कोणालाच कळलं नव्हतं तसं. अचानक आमची ही हसरी स्वारी अचानक उड्या मारतच स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पळाली आणि साधारण तिच्याच उंचीच्या, कदाचित थोडं जास्तच, अशा आमच्यासाठी अनोळखी माणसाला जाऊन बिलगली. ‘हा माझा दादा.’ आम्ही काही विचारायच्या आतच आमची ओळख परेड झाली. काका, दादा आणि हसरी मग ट्रेन निघेस्तोवर गप्पा मारत असावेत बहुतेक.

त्यानंतर ट्रिप झाली...पुन्हा पुण्यात आलो...अशा खूपसार्‍या आठवणी आहेत. आता तर कॉलेजही संपलं आणि जो तो ज्याच्या त्याच्या उद्योगालाही लागला; पण ती त्या रात्री स्टेशनवर दादाला जाऊन बिलगणारी हसरी...वर्गामध्ये दिलखुलासपणे हसणारी हसरी...‘तू माझा भ्भो किन्नी, मग मला आत्ताच्या आत्ता चॉकलेट दे’ असं हक्काने सांगणारी हसरी...तितकीच चटकन रागावणारी, संताप करणारी; पण मनातून अगदी स्वच्छ हसरी...टप्पोर्‍या डोळ्यातून तितकेच टप्पोरे, मोत्यांसारखे अश्रू ढाळणारी अन तेही लपवत ‘काहीच झालं नाही मला,’ सांगत पुन्हा एकदा हसणारी हसरी हरवली ती हरवलीच.

माणसं अचानक अशी का बदलतात याचं उत्तर सापडतंच नाहीए मला. कारणं माहिती असली तरी काही बंधनं पाळावी लागतात म्हणून बोलताही येत नाही. बोलू वाटतं, सांगू वाटतं खूप काही; पण आता कळतं फायदा नाही ते. पण तरीही मनापासून असंच वाटतं हसरी हसरीच राहावी. हसरीला अजूनही जगाचे नियम-अटी समजायचेत. मला अगदीच सगळे समजलेत असं नाही; पण तिच्यापेक्षा वयानं मोठा म्हणून तरी जास्त माहितीयेत. म्हणूनच पुन्हा-पुन्हा वाटतं- हसरी हसरीच राहावी!
...

स्वत:ला शोधताना...

परवा डॉक्टरांकडे गेलो होतो. माझ्यासाठी ते फॅमिली डॉक्टरच्याही पलिकडेच. आमच्या फॅमिलीपैकी त्यांच्याकडे जाणारा मी एकटाच; पण तरीही माझ्यासाठी ते डॉक्टरांपेक्षाही वेगळे. काही दिवस रूम पार्टनर म्हणून सोबत राहिलो असल्याने ते एखाद्या पेशंटपेक्षाही जास्त जवळून ओळखतात मला. त्याचा फायदाही होतो अन तोटाही. गेलो, चेकअप झालं, औषधं घेतली, निघालो. निघता निघताच गणेशचा विषय निघाला.

गणेश. माझा भुसावळचा मित्र. मी डॉक्टरांसाठी फ्रेंड कम पेशंट; तर गणू पेशंट कम फ्रेंड. त्याचा हात फ्रॅक्चर झाल्यापासून तो डॉक्टरांकडे यायला लागलाय. डॉक्टर म्हणाले, ‘गणेशला काही प्रॉब्लेम आहे का रे? खूपच शांत वाटला.’ मी म्हणालो, ‘नाही. तो मुळातच खूप शांत आहे. हळवाही आहे तितकाच. अशा स्वभावामुळेच त्याचं आणि माझं छान जमतं आधीपासुन. आता मी पुण्याला आल्यापासून थोडा धीट व्हायला लागलो. बुजरेपणा सुटला. हळवेपणा कधीकधीच जाणवतो. गणेश शिकतोय अजून.’ माझं वाक्य पुर्ण व्हायच्या आतचं डॉक्टर हसले. म्हणाले, ‘बेटा पांघरून घ्यावं लागतं कधीकधी; पण पांघरून घेतलं तरी माणसं बदलत नसतात.’या वाक्याचा रोख माझ्याकडे होता हे लक्षात यायला वेळ लागला नव्हता; पण त्यावेळी डॉक्टरांचे इतर पेशंट्‌स थांबून होते; त्यामुळे निघणे भाग होतं. नाहीतर गप्पा रंगल्याच असत्या त्या विषयावर.

तिथून निघालो खरा; पण डॉक्टरांच्या त्या वाक्यामुळे काहे चैन पडेना. पांघरून घ्यावं लागतं....माणसं बदलत नसतात...त्यांचं हे बोलणं अगदी सहज होतं. त्यामागे कुठलाच हेतू नव्हता; पण तरीही ते वाक्य मला पुन्हापुन्हा विचार करायला लावत आहे. मी नक्की कसा आहे? सध्या पांघरून घेऊन जगतोय का? माझ्या मते मी म्हणजे एक शांत, आगाऊ, शॉर्ट टेम्पर्ड पण संयमी, हळवा पण तितकाच जिद्दी अशी स्वभाव गुणधर्मांची खिचडी असणारा आहे. आता यातला परिस्थितीनुरूप वेगळा मी माझ्या आणि इतरांसमोर येत राहतोय. परिस्थिती बदलली की ‘मी’ बदलतोय; मग नेमका मी कसा आहे?

माझी एक मैत्रिण मला नेहमी बरेचदा सांगायची, ‘शांत माणसं खूप तापट असतात आणि जी माणसं खूप तापट असतात ती खूप हळवीही असतात. त्यांच्या चेहर्‍यावरच्या रागीटपणा इतकच त्यांचं मन हळवं असतं,’ हे तिचं आमच्या मित्रांपैकी एकाविषयीचं ऑब्झर्व्हेशन होतं. आता हे ऑब्झर्व्हेशन माझ्याबाबतीतही लागू आहे का, याचा मी विचार करतो कधीकधी. उत्तरच सापडत नाहीये. माझ्यातलाच मी मलाच सापडत नसला तरी सध्या मला माझ्यातल्याच अनेक ‘मी’पैकी प्रगतीकडे धावणरा ‘मी’ बाहेर आलेला पाहायचयं...स्वत:ला मागे खेचणार्‍या हळव्या ‘मी’पेक्षा...
२७/११/२०११