सोमवार, १० सप्टेंबर, २०१२

ए खुदा मुझको बता...

तसा हा विषय माझ्या डोक्यामध्ये फार दिवसांपासून आहे. आज तो लिहावासा वाटला, याचं कारण म्हणजे हे गाणं - 'ए खुदा, मुझको बता, तू रहता कहा है क्या तेरा पता...' माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. मोबाईलमध्ये असलेलं हे गाणं ऐकत - ऐकतच आज घरी आलो. जेवता- जेवताही त्या गाण्याच्या सुरुवातीच्या दोन ओळी सारखं खुणावत होत्या. तसा तो प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. देव आहे कुठे... त्याचं उत्तर सापडलेलं माझ्या माहितीत तरी कोणी नाही. मी खूप कमी वेळा ते शोधायचा प्रयत्न करतो. कारण मी देवाच्या बाबतीत अगदी प्रॅक्टिकल विचार करणाऱ्यांमधला. म्हणजे लोकांमध्ये असताना देव आहे म्हणून एखाद्याला जर बरं वाटत असेल तर तसं. नाहीतर तो नाही म्हणून एखाद्याला बरं वाटत असेल, तर तसं. समोरच्याला बरं वाटण्यामध्ये माझं बरं वाटणं. पण ज्यावेळी मी एकटा असतो, त्यावेळी मला कसं बरं वाटतं, हा मुद्दा मला जरा जास्तच महत्वाचा वाटतो. आणि का वाटू नये, प्रत्येकाने कधीतरी स्वतःसाठी विचार करायलाच हवा की.

या विचाराचा आढावा घेण्यासाठी मी माझ्या लहानपणापासूनचा थोडा विचार करतोय. मला आठवतंय तसं, मला लहानपणापासूनच देवळातला घंटानाद खुणवायचा. देवळात जायला त्यामुळंच जास्त आवडायचं. जितक्या जास्त वेळा घंटा वाजवायला मिळायची तेवढ्या जास्त वेळा आनंद व्हायचा. खूप उड्याही मारता यायच्या. त्यामुळं अर्थातच देवळात जायला आवडायचं. भुसावळला योगायोगानं दोन्ही घरांच्या परिसरामध्ये महादेवाची देवळं होती. घरातनं बाहेर पाहिलं की देऊळचं दिसायचं. देवळात जाता जाता मग हळूहळू टाळ, मृदुंग, कधी खंजीरी, कधी ढोलक- ढोलकी असा सगळाच नाद लागला. भजनी मंडळांमध्ये सहजतेने वावरायला लागलो. भजनंही पाठ व्हायला लागली. त्या नादात देवदेवही करायचो. आता सगळं सुटलं. पुण्यात राहायला आल्यापासून यातली एकही गोष्ट करत नाही. पण अजूनही जेव्हा केव्हा मी काहीतरी वाजवतो, अगदी मग ते माझा लाडका माउथऑर्गन किंवा मग गिटार का नसोत, त्या- त्या वेळी तोच आनंद मिळतो, जो कोणे एके काळी मी देवळात जाऊन मिळवायचा प्रयत्न करत होतो.

आता मोठा झालोय असं वाटतं. (वाटतं असं म्हणायचं कारण तसं लोकं म्हणतात. मी स्वतःला अजूनही खूप लहानच मानतो. खूप मोठा माणूस होण्याची स्वप्न बघतो, वयानं किंवा शरीरानं मोठं होण्यापेक्षा विचारांनी आणि लौकीकानी मोठं व्हायचंय म्हणून.) देवळात गेल्यावर घंटा वाजवण्यासाठी उड्या मारत नाही. माराव्याही लागत नाहीत. घंटा सहज हाताला येते. पण शिष्टाचार पाळायचे असतात, म्हणून मग एकदाच तो नाद देवळाच्या गाभाऱ्यामध्ये घुमवायचा आणि तोच नाद कानामध्ये साठवायचा. त्यानंतर त्या देवळातल्या देवाच्या आणि माझ्या अध्यात-मध्यात मी कुणालाच घेत नसतो. म्हणजे त्या दरम्यानच्या काळामध्ये माझा जो काही डायलॉग मनातल्या मनामध्ये सुरू असतो, तोच मुळी या पद्धतीने सुरू होतो की, (देऊळ कोणतंही असो, देवापुढे गेलो की डोळे मिटलेले असोत वा उघडे असोत) 'हे बघ बाबा लोकं म्हणतात की तू आहेस. तू अस्सील तर तुलाही माझ्या मनात आत्ता काय सुरुए अन मला काय म्हणायचंय ते समजत असणार. मला जे हवंय ते मिळालं तर तुला एक भक्त वाढीव मिळणार. ते नाही मिळालं तर मी समजेन की...' वगैरे वगैरे.

दरम्यानच्या काळामध्ये मी त्याला भीत नाही, कुठलंही आमिष दाखवणार नाही, कुठलाही नवस फेडणार नाही इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी बोलून जातो. नंतर स्वतःचं स्वतःलाच हसायला येतं. वाटतं, आपण खूप बोललो का राव, हा नसेल तर सगळं ठिक आहे, पण असला तर व्हायची ना पंचायत. उगाच कोपला-बिपला तर काय करायचं. त्याच्या त्या असण्या आणि नसण्याच्या कल्पनांच्या दरम्यानचा हा खेळ मी अनेकदा अनुभवला आहे. 'तू देव मानतोस का,' या प्रश्नाचं उत्तर देणं कदाचित आजपर्यंत याच अशा कन्फ्युजनमुळे टाळलं आहे. अजूनही त्या एका अनोख्या कल्पनेवर कितपत विश्वास ठेवावा, या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये.

लोकांचं राव नवल वाटतं मला. देव आहे म्हणायचं. तो कशात आहे म्हटलं, तर तो माणसात आहे म्हणायंच. माणसांची उदाहरणं दिली, तर कित्येकांना देवमाणूस ठरवायचं आणि मग एका देवमाणसाला चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्याला वाईट म्हणायचं. म्हणजे मग एक देव चांगला आणि दुसरा वाईट म्हणायचं. मी जर एखाद्यासमोर असं चुकून त्यांना सांगितलं, तर तो म्हणणार अरे आम्ही माणसाला वाईट म्हणतोय, देवाला नाही नावं ठेवत. देवाच्या बाबतीत माझं कन्फ्युजन मी मान्यच करतो, पण जे लोक असं करतात ना ते लोक त्यांचं कन्फ्युजन किंवा ते त्या संकल्पनेचा त्यांच्या सोयीने- मतलबाने अर्थ काढतायेत हे कबुल करायचा मोठेपणा दाखवत नाहीत. हसायला येतं. कारण त्यावेळी तोच विचार पुन्हा येतो जो मी देवळात उभं राहून करतो.- देव नसेल तर ठिक आहे, पण असेल तर काय होणार यांचं. देवाच्या भक्तिभावानं त्याच्याविषयी बोलण्यापेक्षा त्याच्या भीतीपोटी किंवा मग शेवटी मतलबाने त्याच्याविषयी बोलण्याने काय साध्य होणार आहे यांना. आणि देवाकडे त्याच्या भीतीपोटी किंवा मतलबाने आलेले भक्तगण कदाचित देवालाही आवडत नसतील ना, कारण माणसालाही तशी माणसं आवडतंच नाहीत.

बाकी काही असलं, तरी शेवटी मी समाधान या एका गोष्टीवर येऊन थांबतो. देवाच्या विचारांच्या बाबतीत ते मिळवायचा माझा एक मार्ग म्हणजे विज्ञानातलं एक तत्व. आमच्या एका सरांनी ते शिकवताना, देव म्हणजे ऊर्जेचे एक रूप या अंगाने सांगितलं होतं. ते असं, की ऊर्जा ही कधीही संपत नसते वा निर्माण होत नसते, ती केवळ एका रुपातून दुसऱ्या रुपामध्ये रुपांतरीत होत असते. मग या प्रवासामध्ये सुरुवातीच्या ऊर्जा आली कुठून, तर ती देवामधून. आणि मग या विषयी एक फुल्ल लेक्चर दिलं होतं. आता ते पूर्ण आठवत नाही, पण त्यावेळी त्यांनी देव कदाचित असावा, आणि आपण विज्ञानाचे विद्यार्थी, श्रद्धा-अंधश्रद्धांच्या फेऱ्यात अडकू नका, पण हा नियम कधी विसरू नका. निदान परीक्षा पास होताना कधीकधी तो नियम देवासारखा धावून येतो, असं सांगितलं होतं. परीक्षेच्या बाबतीत तसं कधी झालेलं आठवत नाही, पण आता जेव्हा केव्हा अशा विचारांमधून सुटका मिळवायचा विचार येतो, तेव्हा मात्र तो विचार खरंच धावून येतो. तो देवासारखा की कुठल्या वेगळ्या पद्धतीने हे मात्र अजूनही कळायचं आहे. ते अजूनही कळलेलं नाही. कारण देव कसा धावतो, हेच मी पाहिलेलं नाही. ते पहायला मला नक्की आवडेल. आणि जर देव असेल, तर कदाचित त्यालाही ते आवडेल. कारण त्यामुळे त्याच्या भक्तांच्या संख्येमध्ये नक्कीच एका संख्येने वाढ होईल. म्हणूनच कदाचित ते गाणंही मला तितकंच आवडत असावं -
'ए खुदा मुझको बता, तू रेहता कहा क्या तेरा पता...'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा