रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

स्फुर्तीगीतामागच्या स्फुर्तीतून...


पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचा तो अखेरचा टप्पा होता. आभार प्रदर्शन अगदी नुकतंच झालं होतं. ललित कला केंद्राच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या सुरेल स्वरामध्ये पसायदानही म्हणून झालं होतं. ते संपलं नी वंदे मातरम् साठी सगळ्यांनी उभं राहाण्याची घोषणा सभामंडपात घुमली. तिथं उपस्थित सगळेच यंत्रवत उभे राहिले. वंदे मातरम् ला सुरुवात झाली. नकळतच मीही वंदे मातरम् म्हणायला सुरुवात केली. ललित कला वाल्यांच्या सूरात सूर मिसळत होते की नाही ते कळत नसलं, तरी शब्द मात्र अचूक येत होते हे निश्चित. 
त्यावेळी आजूबाजूला किती जणांच्या बाबत असं घडत होतं ते माहिती नाही, पण मला त्यावेळी त्या वंदे मातरम्च्या सोबतीने माझे शाळेतले दिवसही आठवायला लागले होते. आणि त्याच आठवणींच्या सोबतीनं असेल कदाचित, पण मला आतून काहीतरी वेगळंच जाणवतंय, सर्वांगातून अचानक शहारे उमटतायेत असं वाटलं. हे पहिल्यांदाच घडतंय असंही काही नव्हतं. फक्त याच वेळेला नाही, तर ज्या ज्या वेळी मी वंदे मातरम् किंवा राष्ट्रगीत म्हणायला उभं राहातोय त्या त्या वेळी माझ्या सिस्टिममध्ये अशीच काहीशी गडबड होताना मी गेल्या एक-दोन वर्षांमध्ये अनुभवली आहे.

आजही थोडं तसंच होतंय असं जाणवत होतं. मी जवळपास एक तप मागे जात विचार करतोय असं भासत होतं. भुसावळमधल्या माझ्या शाळेचं, भुसावळ हायस्कूल, भुसावळचं ते गेट... गेटसमोरचा रस्ता ओलांडल्यावर सुरू होणाऱ्या ते भलं मोठ्ठं ग्राउंड... ग्राउंडवर एकीकडं रांगेनं उभी असलेली, पांढरा शर्ट आणि खाकी पँटी घातलेली पोरं... समोरच्या कट्ट्यावर उभे असलेले शिक्षक... गडद निळ्या रंगाचे फ्रॉक घातलेल्या, वेण्या बांधलेल्या पोरी... शिक्षकांमधून कुणीतरी एक साथ राष्ट्रगीत शुरू कर, म्हणत दिलेली ऑर्डर... आणि मग सुरू झालेलं ते राष्ट्रगीत... कधी वंदे मातरम् आणि कधी प्रतिज्ञा... असं सगळं सगळं आठवून अगदी काही क्षणात डोळ्यासमोरून गेलं. तोपर्यंत इकडं वंदे मातरम् संपतही आलं होतं. ते संपल्यावर अंगावरचे शहारे थांबले. यापूर्वीच्या अनुभवांनुसार यावेळीही मी विचार करत होतो, अरेच्चा सिस्टिमची गडबड झाली आणि पुन्हा थांबलीसुद्धा. पुढच्या वेळी शोधूत नेमकं काय होतंय ते. 
खरं तर, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् या दोन बाबी मला न टाळता येणाऱ्या गोष्टींमध्ये मोडतात. एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलोय आणि तिथं शेवटी यापैकी एक होणार आहे, असं लक्षात आलं की एक वेगळाच उत्साह मला जाणवतो. हा उत्साह मला का जाणवतो, याचं एक कारण या शाळेच्या आठवणी असाव्यात कदाचित या एका निष्कर्षापर्यंत मी आज येऊन पोहोचलोय. गेल्या काही वर्षांमध्ये नित्याने राष्ट्रगीत वा वंदे मातरम् म्हणायला मिळत नसलं, तरी ज्या ज्या वेळी ते मिळतं त्या त्या वेळी शाळेमध्ये ही दोन गीतं म्हणताना जो उत्साह जाणवायचा, तसाच काहीसा उत्साह आता जाणवतो. फरक फक्त एवढाच असावा, की त्यावेळी तो उत्साह रोजचाच नित्यनेमाचा एक भाग होता. त्यावेळी त्याचं काय ते नवल. आता तसं नाही.

शाळा सोडल्यानंतर रोजचं राष्ट्रगीत वा वंदे मातरम् तसं बंदच झालंय. कॉलेजमध्ये कधीतरी, अगदीच स्पेसिफिक सांगायचं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमांमध्येच ते व्हायचं. व्हायचं म्हणजे मीही ते म्हणण्यात सामील असायचोय. त्यानंतर मात्र त्यासाठीचे मुहुर्त मिळेनासे झालेत. त्यामुळेच आता जेव्हा केव्हा चान्स मिळेल, तेव्हा तो सोडायचा नाही असं कदाचित आपोआपच ठरलं असावं. त्यामुळेच ते टाळता येत नसावं. मी अगदी कट्टर देशभक्त आहे की नाही, ते मला माहिती नाही, पण खरंच ज्यावेळी मला कळत असतं की आपल्याकडून देशाच्या या प्रतिकांचा अपमान होतोयं, त्यावेळी लाज वाटते. अगदी यंदाही प्रजासत्ताक दिनी घरी बसून आपला तो 26 जानेवारीच्या संचलनाचा कार्यक्रम पाहात होतो. त्यातही एकदा बहुतेक राष्ट्रगीत वाजलं. पण ते वाजताना मी काहीतरी वेगळंच करत होतो. ते जाणवून थोडं ओशाळल्यागत झालं. लाज वाटली. पण पुन्हा नेहमीसारखंच फक्त ऐकलं आणि नंतर पुन्हा कार्यक्रम पाहाण्यात गुंतलो.

तसं बघायला गेलं, तर अगदी दोन परस्पर विरोधी बाबी आहेत. विशेष म्हणजे त्या अगदी व्यवस्थित जाणवताहेत. या बाबतीत मला चुकीचं समर्थनही करायचं नाहीये आणि बरोबर असल्याविषयी कौतुकही नकोये. कदाचित राष्ट्रगीत वा वंदे मातरम्सारख्या स्फुर्तीगीतांमधून मिळालेल्या स्फुर्तीचा हा परिणाम असावा. त्यामागे असलेल्या भावनांचा हा कल्लोळ असावा. आणि विशेष म्हणजे मला तो अजूनही हवाहवासाच वाटतोय. कारण त्या मागचं एक कारण कदाचित मला आत्ताशी सापडलंय असं जाणवतंय. त्यापेक्षाही एखादं वेगळं कारण असू शकतयंच की. ते शोधण्यासाठी पुढच्या दोन-चार वर्षांचा अनुभव लागेल कदाचित, पण शोधू नक्की.

1 टिप्पणी: