बुधवार, १३ मार्च, २०१३

विस्तवापलिकडलं वास्तव


रात्रीच्या साडेअकरा झाल्या असतील. नदीकडं जाणाऱ्या रस्त्यावर त्यावेळी तसं कोणीच नव्हतं. अपवाद होता तो नदीच्या दिशेने निघालेल्या त्या एका गाडीच्या मागनं जाणाऱ्या अनेक गाड्यांचा. नदी जवळ आल्यावर एका ठिकाणी ती पुढची गाडी अचानक थांबली. त्या गाडीच्या मागोमाग माझी गाडीही मी थांबवली. रस्त्याची अवस्था तशी खराबच होती. बरं, रस्त्यावर लाइटही नव्हते. अचानक काही अडचण नको म्हणून मी गाडीची लाईट सुरूच ठेवली. माझ्या शेजारी थांबलेल्या गाडीवाल्यानंही त्याच्या गाडीची लाईट सुरूच ठेवली. समोरचं दृष्य मी त्या उजेडातच पाहात होतो. पाच- दहा लोकं समोर आली. त्या दोघांसोबत अजून तिघा-चौघांनी खांदा देत गाडीतील निर्जीव देह खाली आणला. रस्त्यावर ठेवला. एक – दोन मिनिटं थांबल्यावर पुन्हा राम बोलो भाई राम म्हणत उचलला. गाडीत ठेवला. गाड्या निघू लागताच मी शेजारच्या गाडीवाल्याला विचारलं, हे काय होतं,’ तो म्हणाला, शेवटचा इसावा दिला ना भो. आता चाला डायरेक नदीवर.
 
माझ्यासाठी हा नवा अनुभव होता. मी त्या दिवसापर्यंत कधीही कुणाच्या अंत्ययात्रेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत गेलो नव्हतो. त्या दिवशी गेल्यावर शेवटच्या विसाव्याची ही नवी गोष्ट समजली. जिथं हा विसावा दिला, तिथून गजानन महाराजांचं मंदिर अगदी स्पष्ट दिसण्यासारखं होतं. म्हणूनच बहुतेक त्या ठिकाणीच असा विसावा देत असतील. गाड्या पुढे निघाल्या. त्यांच्याच सोबतीनं नदीवर गेलो. तसा नदीचा हा भाग माझ्यासाठी नवा नव्हता. दोस्तमंडळींसोबत अनेकदा त्या भागातून नदीवर जायचो- यायचो. सहजच. तसं काही खास कारण नसायचं. अनेकदा सकाळी फिरायला म्हणून, कधीतरी संध्याकाळीसुद्धा टाईमपास करायला म्हणून जायचो. घरापासून हा स्पॉट तसा इतर ठिकाणांपेक्षा खूप जवळ होता आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं तुम्हाला सतवायला कोणी यायचा प्रश्न नसायचा. अशुभ ठिकाण होतं ना ते, म्हणून. पण तिथली शांतता आणि मोकळी हवा मला खूप आवडायची. म्हणून मी आपला जायचो चक्कर मारायला. 

तिथं एक तर कुणालातरी अगोदरच जाळलेलं असायचं, किंवा नंतर तरी आणायचे. पण, मी असा थेट एखाद्याच्या अंत्ययात्रेत जाण्याचा तसा संबंध आला नव्हता. या वेळी तो ही आला. ज्या ओट्याच्या कट्ट्यावर मी अनेकदा बसलो होतो त्या कट्ट्याच्या परिसरामध्ये सगळे जमा झाले. लाकडं रचायची तयारी सुरू झाली. पाणी आणण्यासाठी एकाने त्याच्याकडे मडकं दिलं. नदीवर जाऊन आंघोळ करून ते मडकं भरून पाणी आणायला सांगितलं. एवढ्या थंडीचं नदीचं पाणी अंगाला लावून घेण्याच्या विचारानंच माझ्या अंगावर शहारे आले. तो शांत होता. हो म्हणाला आणि निघाला. त्याच्यासोबत जायचं म्हणून मीही निघालो. त्याच्यासोबत चालता-चालता तो नेमका काय विचार करत असेल त्यावेळी, याचा अंदाज लावत होतो. अंदाज लागत नव्हता. एका बॅटरीच्या प्रकाशात त्याला त्याच विचारांमध्ये रस्ता दाखवत दाखवत नदीच्या मध्यापर्यंत पोहोचलो.

नदीचं पात्र तसं कोरडंच होतं. त्यामुळं बऱ्याच आत गेल्यावर एका ठिकाणी साठलेल्या पाण्याचं एक डबकं लागलं. डबकं मोठ्ठ होतं. त्यामुळे त्याला मडकं भरून घेण्याएवढं पाणी मिळालं. त्याला आंघोळ करायची होती. सोबतच्यांनी त्याला अंग ओलं करून घेण्याचा सल्ला दिला. त्याला सुचेना काय करावं नेमकं ते. सोबतच्यांनीच मग त्याच्या अंगावर तो पूर्ण भिजलेला दिसेइतपत पाणी टाकलं. डोकं ओलं केलं. पाण्यानी भरलेलं मडकं परत त्याच्याकडे दिलं. आम्ही सगळे परत त्या कट्ट्याच्या दिशेने निघालो. त्या दिशेनं पाहिलं, तर काठावरच्या लोकांच्या काळ्या प्रतिमा अन त्यांच्या पाठीमागे लख्ख प्रकाशामध्ये लाकडं रचण्याची सुरू असलेली लगबग जाणवत होती. त्याच्यासोबत आलेलो आम्ही सगळे त्याला घेऊन त्या लगबगीच्या दिशेने निघालो.

आम्ही पोहोचेपर्यंत निम्म्याच्या वर लाकडं रचून झाली होती. गेल्या – गेल्या त्याने ते मडकं तिथं जवळच ठेवलं नी तिथंच उभा राहून ते सगळं बघू लागला. कुठूनतरी उसउस ऐकू येत होतीच. किती चांगला- किती वाईट, कसा गेला, काय राहिलं- काय पाहिलं याचा सगळा लेखाजोखाही मांडला जात होता. मडक ठेवल्यानंतर काही काळाने तो कुडकुडायला लागला. मी आणि माझ्यासोबतच्या आणखी एका मित्रानी त्याला चितेच्या थोडं जवळ नेलं. आम्ही ज्या चितेसाठी आलो होतं, ती रचताना मदत करणं तिथून शक्य होतं आणि त्याच्या अलिकडची जी चिता जळून झाली होती, तिच्या उरल्या-सुरल्या विस्तवाची उबही त्या ठिकाणी जाणवत होती. त्याला तिथं उभं केल्यावर त्याचं कुडकुडणं जरासं कमी झालं. गेल्यापासून त्याला धीर देण्याची इच्छा अनेकदा झाली होती, पण मलाच धीर एकवटता येत नव्हता. त्या विस्तवाची थोडी उब मिळाल्यावर मीही तो एकवटून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानं माझ्याकडे पाहिलं. नजरेला नजर देण्याची माझी हिम्मत झाली नाही. बोलणं तर शक्यच नव्हतं. शांतपणे चितेकडे पाहात राहिलो. 

चिता रचून झाली होती. शेवटची लाकडं त्या दोघांच्या हातात देण्यात आली. त्या दोघांनीही ती नीट मांडली. बाकीचे सगळे दूर हटले. ते दोघं तिथंच होते. त्यांचे हुंदके अनावर होत होते. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. माझ्या मनातल्या आठवणीही काही केल्या थांबत नव्हत्या. चितेला अग्नी देण्याच्या बरोबरीनेच त्या आठवणींच्या वणव्यानेही पेट घेतला. आग भडकली. मध्येच ती तडतडत होती. कुणीतरी आगीत मीठ टाकत होतं. ते टाकल्यानंतर आग कशी भडकते, ते समोर दिसतं होतं. आगीत मीठ टाकण्याचं काम सुरू होतं. पण त्याला या वेळी कोणीच थांबवत नव्हतं. एरवी तसं कोणी केलं, तर मध्येच ते थांबवू वाटणाऱ्या माझ्यासारख्याच अनेकांनी त्यावेळी तशीच भूमिका घेतली होती. मीठामुळे भडकलेली आग, आगीच्या धुरासोबतच उंच उंच उडणाऱ्या ठिणग्या हवेत विरून चालल्या होत्या. त्या आगीचाही पुन्हा थोड्या वेळाने विस्तव होणार होता, याची जाणीव होत होती. विस्तवातून आग... आगीचा पुन्हा विस्तव... जगण्या मरण्याचं वास्तव पटवून देत होती. शेवटच्या विसाव्यानंतर विस्तावातून जाणवलेलं हे वास्तव भयाण करत होतं त्यावेळी. त्यानंतही आणि कदाचित यापुढेही...