बुधवार, १९ जून, २०१३

सोबनी...


सोबनी... म्हटलं तर तसा निरर्थकच शब्द, पण आमच्या दादांच्या लेखी या शब्दाला खूप महत्त्व आहे. महत्त्व यासाठी, की सोबनी बनवणं हा त्यांचा छंद आहे. सोबनी म्हणजे जेवताना ताटाला लावण्यासाठीचं वटकन. अजून थोडा विस्तृत अर्थ सांगायचा तर, ताटामध्ये वाटी नसताना पातळ भाजी घ्यायची असली, तर त्या भाजीमुळे चपाती वा भाकरी भिजू नये म्हणून भाकरीच्या बाजूनं ताटाखाली जी वस्तू ठेवतात, ती भानगड. सोबनी आणि वटकन हे दोन्ही शब्द तसे गांवढळचं. इथं पुण्यात एक - दोघांना तुम्हाला हा शब्द माहिती आहे का, असं विचारून पाहिलं, पण त्यांना काहीच कल्पना आहे असं दिसलं नाही. त्यामुळे या दोन्ही शब्दांचा, त्यातून निघणाऱ्या अर्थाचा आणि पुन्हा त्यातूनच अशी भन्नाट वस्तू तयार करण्याच्या आमच्या दादांकडे असणाऱ्या कलेचा युनिकनेस समोर आला. माझ्यासाठी तो नक्कीच महत्त्वाचा आहे.

सोबनी आठवायचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आक्का-दादांनी मलवडीवरून पुण्याला येताना एका पिशवीमध्ये आठवणीने पाच-सहा सोबन्या भरून आणल्या होत्या. मागे एकदा मलवडीला गेलो, त्यावेळी दादा नेहमी सोबन्या ज्या ठिकाणी ठेवतात, त्या ठिकाणी त्या शोधण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच त्या सापडल्या नाहीत. मी काहीतरी शोधतोये हे लक्षात आल्यावर दादांनी, काय शोधतोयेस,’ म्हणून विचारलं होतं. तसं विचारल्या विचारल्या मी सोबनी असं उत्तर दिलं होतं. त्यावेळी त्यांनी आत्ता कुटल्या रं आल्या, नेल्या असत्याल कुनीतरी,’ म्हणून सांगितलं होतं. त्यालाही दोन-चार महिने उलटून गेले. पण आता येताना ते आठवणीने त्या तयार करून घेऊन आले होते. म्हटलं तर माझ्यासाठी एक स्पेशल गिफ्टच आहे ते. भुसावळलाही अश्या एक-दोन सोबन्या मी घेऊन गेलो होतो. पुण्यात घरी अशा सोबन्या आणायच्या माझ्या मनात होतंच. कारण इथं पातळ भाजी असली, की ताटाखाली घ्यायला काहीतरी शोधावं लागायचं. मग कधी सांडशी, कधी मिठाच्या डबीचं छाकण, तर कधी तसंच काहीतरी. आता अशी शोधाशोध करावी लागणार नाही.


सोबन्यांसोबत आमच्या लहानपणीच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. सोबनी, मोठ्या दगडी गोट्या, विटी-दांडू वगैरे वगैरे. उन्हाळ्याच्या सुट्टीत भुसावळहून मलवडीला गेलं, की दादा यापैकी काहीतरी तयार करत बसलेले मी तरी अनेकदा पाहिलं आहे. कधी आम्हा पोरांपैकी कुणीतरी मागितलं म्हणून, तर कधी निवांतपणात हाताला काही तरी काम हवं म्हणून ते असं काही तयार करायचे. त्यातल्या त्यात सोबनी मला जास्तच आवडते. त्याचं कारणही तसंच आहे. दादा लाकडाच्या फळ्यांच्या छोट्याश्या तुकड्यापासूनही अशी सोबनी बनवतात, तुकडा वाया जाऊ न देता. बोले तो टाकाऊतून टिकाऊ. आणि तरीही या सोबन्या दिसायला एवढ्या आकर्षक आणि सुबक दिसतात, की ताटाला लावायला म्हणून जर ती आपल्यापुढे सरकवली, तर ती ताटाखाली लावण्याअगोदर आपण ती निरखून नक्कीच पाहणार.

दादांची सोबनी तयार करण्याची प्रोसेस अगदी साधी-सोप्पी होती. म्हशीसाठी वैरणीचे बिंडे तयार करून झाल्यावर दादा शक्यतो त्या वैरणीच्या पाटीजवळून उठत नसत. पाटी म्हणजे मोठ्या आकाराचं टोपलं. हातातली कुऱ्हाडही शक्यतो खाली ठेवण्याच्या फंदात पडत नसत. तसंच जवळ पडलेल्या लाकडांच्या तुकड्यापैकी एखादा उचलायला आणि करायची सुरुवात. दादांच्या सोबन्यांना आकार आणि त्यांच्या कडा मशिनवर लाकडू कट करून आणल्यावर जश्या दिसतील तश्या दिसतात. वैरण तोडताना लांब धरलेली कुऱ्हाडीच्या दांड्यावरची त्यांची पकड, हा लाकडाचा तुकडा उचलतानाच त्या कुऱ्हाडीच्या लोखंडी पात्याच्या अगदी जवळ आलेली असायची. त्यातूनच मग लाकूड अगदी बेतानी तोडनं, त्याला हवा तसा आकार देणं, गरज पडली, तर ते कोपऱ्या-कोपऱ्यानी तासनं असं सगळंच मग जमायला सुरुवात व्हायची. अगोदर स्लोप दिलेला लांबट उभट चौकनी तुकडा पाडायचा. नंतर त्याच्या कडा तासायच्या. निमुळत्या बाजूवर मध्येच त्रिकोणी काप पाडायचे की झाली सोबनी तयार. या सोबन्या तारेमध्ये गुंफून ठेवण्यासाठी गरज पडलीच तर कुठेतरी एका बाजूने त्याला छिद्र पाडायचं. दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या बंडीच्या बटव्यामधून किमान एखाद-दोनदातरी तंबाखू खाल्लेली असणार.

दादा बसल्या बसल्या अशा अनेक सोबन्या बनवतात. आता वय झाल्यामुळं सोबन्या बनवायचं प्रकरण बरंच कमी झालंय. त्यामुळेच मलवडीला घरी गेल्यावर आता सोबन्या शोधाव्या लागतात. नाही तर अगोदर घरात अनेक ठिकाणी सोबन्या पडलेल्या दिसायच्या. कुणी बाहेरचं आलं आणि त्यांनी सोबन्या निऊ का,’ म्हणून विचारलं तरी आक्का-दादा कुणाला नको,’ म्हटल्याचंही मला आठवत नाही. दादा म्हणणार, न्ह्या की. त्यात काय एवढं, पुन्हा करीन. त्याला किस्ता एळ लागतो. आता तसं नाही. मध्यंतरी त्यांची लाडकी म्हसही विकून टाकली, त्यामुळे तिच्यासाठी वैरण-बैरणही तोडायची गरज नाही आता. एकंदरीतच, त्यांचा कुऱ्हाडीवरचा हातही हलका झाला असणारे. पण तरीही त्यांनी इकडं येताना या सोबन्या आणल्या. मी मागितल्या होत्या, हे आठवणीत ठेऊन आणल्या. माझ्यासाठी हिच खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी आणलेल्या त्या सोबन्या सध्या आम्ही घरात वापरायला काढल्या आहेत. त्या पाहिल्या-पाहिल्या त्यांचा आखीव-रेखीवपणा आणि त्यातूनच दिसणारी दादांची कलाकुसर समोर आल्यावाचून राहत नाही आणि मग आपसूकच आक्का-दादांची आठवणही थांबत नाही. थांबवावी असं वाटतही नाही...  

२ टिप्पण्या: