मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

हॅरिसची खिचडी...



फर्ग्युसन कॉलेज रोडवर डेक्कनकडून शिवाजीनगरकडे जाताना वाडेश्वरच्या समोरच रानडे इन्स्टिट्यूटचा कँपस आहे. आत्ताच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा, त्यावेळच्या पुणे विद्यापीठाचा जर्नलिझमचा विभागही तिथेच आहे. वाडेश्वर म्हणा, रुपाली म्हणा, की वैशाली म्हणा अगदी हाकेच्या अंतरावर आहे या कँपसपासून. पण या सगळ्यांना तोडीस तोड एक कट्टा या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये आहे. रमेशचं कँटिन. म्हटलं तर कँटिन. बाह्यरुपाची ओढ असणाऱ्यांसाठी म्हटलं तर एक झोपडीवजा हॉटेल. पैशांचा विचार करणाऱ्यांसाठी म्हटलं, तर फर्ग्युसन रोडसारख्या भागात किमान खर्चात, त्या खर्चाचं चीज झालं वाटेल अशा पद्धतीने आणि तुमचं किमान कन्फ्युजन करतील एवढेच पदार्थ यादीमध्ये असणारं ठिकाण. चहा- कॉफी -बिस्किटं, पोहे, वडा-पाव, मॅगी हे तिथे हमखास मिळणारे पदार्थ. यादीत वाढलंच, तर चुकून कधीतरी इडली- चटणी, कधी वडा- सांबर. इथंच हॅरिसची अर्थात हरीशची नी माझी पहिल्यांदा ओळख झाली. 

त्याचं नाव हरीश होतं. होतं म्हणायला कारण, मागच्याच महिन्यात तो गेला. मी त्याला हॅरिस म्हणायचो, कधीकधी हरीश भाय किंवा नुसतं हॅरी. तो कोणी फार ग्रेट माणूस होता, असं नाही. तो तिथं पडेल ते काम करायचा. मी त्याला चहा बनवताना पाहिलाय, मॅगी टाकताना पाहिलाय, वडे तळताना पाहिलाय, चहाचे ग्लास धुणे वगैरे तर आलंच. फार फार तर सव्वा पाच वगैरे हाइट आणि अगदीच शिडशिडीत अशा हरीशला मी रमेशभय्याच्या हॉटेलसाठी किराण्याची ओझी आणतानाही पाहिलाय नी त्याच्यासोबत राहणाऱ्या सगळ्यांसाठी खिचडी करतानाही पाहिलाय. थोडक्यात काय, तर आपल्या भाषेत, ग्लोबलाइज्ड टर्मिनॉलॉजी वापरायची, तर हरिश मल्टिटास्कर होता. तो सगळ्यांना चहाही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सर्व्ह करायचा. सगळ्यांना तो चहा देणारा पोऱ्या म्हणूनच माहिती होता. माझ्यासाठी त्याची अॅडिशनल ओळख म्हणजे मला अत्यंत आवडीची अशी तांदळाची खिचडी तिथं, रानडेमध्ये, खाऊ घालणारा माझा दोस्त. त्याची हिच ओळख मला त्याच्याविषयी असं लिहायला भाग पाडतेय.

हॉस्टेलवर राहणाऱ्यांसाठी घरच्यासारखा एखादा पदार्थ अचानक बाहेर खायला मिळणं किती सुखावह असतं, याची जाणीव हरीशने मला पहिल्यांदा करून दिली होती. रानडेच्या पहिल्याच वर्षात असताना, एकदा मी अकराच्या सुमाराला नेहमीसारखा तिथं चहा घ्यायला गेलो होतो. कँटिनच्या अगदी समोरच्या बाकावर बसलं, की कँटिनच्या मागच्या खोलीत नेमकं काय चाललंय याचा अंदाज येतो. मी समोरच्या बाकावर बसून चहा घेत घेत त्या खोलीत पाहिलं. हरीश छोटा स्टोव्ह घेऊन बसला होता. त्याला विचारलं, तू आत काय करतोयेस. त्यानी सांगितलं, दुपारच्या जेवणाची तयारी. विचारलं, काय करणारेस. त्याने उत्तर दिलं, खिचडी

मी तसाच चहा घेत घेत आत गेलो. त्याला म्हटलं, मलाही पाहिजे. तो हसला फक्त. विचारलं, हे आमचं खाणं आहे, तुम्हाला चालेल का,’. मी विचारलं, का नाही चालणार. मला खिचडी खूप आवडते. मला हवीये. तो म्हणाला, तुम्ही जाऊन या, तोपर्यंत शिजेल. दुपारी देतो. मी त्याला म्हटलं, वाटलं तर पैसे घे, पण खिचडी दे. त्याने रमेशभय्यालाही सांगितलं, की मी खिचडी मागतोय म्हणून. तेही म्हणाले, परत ये, देतो. आमचा त्यावेळचा हा संवाद पूर्ण हिंदीत झाला होता. मला आत्ता त्याची अशी सगळी आउटलाइन जरी आठवत असली, तरी त्यावेळी मी जेवढा एक्सायटेड होतो, तेवढाच आत्ताही तो प्रसंग आठवून झालोय. मी खुषीतच वर्गाकडे गेलो.

दुपारी डबा खायच्या वेळी मागे गेलो. त्याच्याकडे फक्त पाहिलं. त्याने हातानेच इशारा करून टेबलकडे बोलवलं. त्याचं ते खिचडी करायचं जर्मलचं पातेलं दाखवलं. थोडीशी खिचडी शिल्लक होती. म्हणाला, ही शिल्लक ठेवली आहे. तुम्ही खरंच खाणार का,’ मी खिचडी पाहिली की लगेचच म्हणालो, दे चल प्लेटमध्ये.’ मग पुन्हा त्याने रमेशभय्याकडे पाहिलं. त्यांनीही दे असा इशारा केल्यावर एका डिशमध्ये, जवळपास पूर्ण डिशला शिग लागेल, अशा पद्धतीने त्याने ती खिचडी मला दिली. 

बाकी सगळं साइडला ठेऊन मी ती खिचडीच खायला घेतली. टिपिकल राजस्थानी खिचडी होती. हरीश, रमेशभय्या नी त्यांचं ते सगळं कुटुंब राजस्थानचंच होतं. त्यामुळं आपसूकच तो टच होता. भुसावळला टाक बाईंकडे राजस्थानी माल-मसाला असलेली तशीच खिचडी खायला मिळायची. खूप दिवसांनी आणि तेही पुण्यात अगदी तशीच टेस्ट असलेली खिचडी मिळाली. बेतच झाला त्या दिवशी. खिचडीचे पैसे द्यायला गेलो, तो ना हरीशने, ना रमेश भय्याने ते घेतले. हरीश म्हणाला, खिचडी का कायका पैसा.
 
त्यानंतर अनेकदा खिचडी केल्यानंतर मला हरीशकडून आमंत्रण असायचं. योगेस भाय, आज खिचडी है... कधी शंतनु तसंच सांगायचा, कधी हरीश खिचडी खायला बोलवायचा. त्यानंतर एक-दोनदा आमचा असाच बेत जमला असेल. मजा यायची. मला खिचडी खायला मिळतेय, याची मजा वाटायची. तर त्यांना मी त्यांनी त्यांच्यासाठीच म्हणून केलेल्यातलं काहीतरी अगदी आवडीनं खातोय याची मजा वाटायची. खिचडी, डाल-बाटी हे त्यांचे राजस्थानी प्रकार, तिकडं खानदेशात कसे करतात, कसे खातात याची माहिती त्यांनी माझ्याकडूनही घेतली होती. रेल्वेने गेल्यावर भुसावळ, त्यांच्या भाषेत भुसावल स्टेशन लागतं हे त्यांना कळायचं. त्यांना पुण्याच्या तुलनेत ते त्यांच्या गावाच्या जवळ वाटायचं. त्यामुळं कधीकधी तिकडच्याही गप्पा व्हायच्या. हे सगळं जुळून यायचं ते केवळ नी केवळ खिचडीमुळे.

रानडेत असताना नी आता रानडेबाहेर पडल्यानंतरही हरीश नी माझी जुळलेली ही खिचडीची केमिस्ट्री कायम राहिली होती. त्यामुळंच त्याच्या कँटिनकडे कधीही गेलं, तरी हरीश स्वतः पुढे यायचा. चहा सांगायचीही गरज पडायची नाही. तो चहा घेऊन हजर असायचा. बिस्किट मागायचं अवकाश, की तो सोबत खिशामध्येच आणलेला ट्वेंटी-20 चा पुडा पुढे करायचा. साबजी तुम बोलो, तुमको मिल जाऐंगा,’ वगैरे वगैरे डायलॉग टाकायचा. मी थँक्यू म्हटलं तरी त्याला खूप काही मिळाल्याचं समाधान असायचं. हसत हसत परत जायचा. त्याचे रंगबेरंगी कपडे बघून, त्याचं कौतुक केलं की लाजल्यासारखं करायचा. कधी गळ्यात रुमाल अडकवायचा. कधी भडक रंगाचं टी-शर्ट –जीन्स घालायचा, सगळं एकदम कसं फॅशनेबल असायचं त्याचं. एकूणच थोडं वेगळं रसायन होतं ते.

आत्ता महाबळेश्वरला गेलो असताना, त्याची व्हिकेट पडल्याचा मेसेज फेसबुकवर वाचला. चुकचुकलोच. हे सगळं वर जे लिहिलंय ना, ते सगळं असं सर्रर्रकन डोळ्यासमोरनं गेलं. मनात म्हटलं, राव एक चांगला दोस्त गमावलास यौग्या. दोस्तीची काही लिमिट नसते. कोणीही आपलं दोस्त असू शकतं. लहान-मोठं, गरीब-श्रीमंत, सगळ्याच्या पार जाउन जी टिकते ती दोस्ती. हरीशचं नी माझं तसंच जमलं होतं काहीसं. पावसाळ्यात चहाची तल्लफ भागवायला त्याच्या गळक्या कँटीनमध्ये उभं राहून चहा पिताना माझ्या अंगावर पाणी गळू नये म्हणून धडपडणारा, कँटिनकडे येणारा रस्ता सगळा पाण्यात गेलेला रस्ता पाहून मी थबकलोय असं दिसलं, की साबजी इधरसे आओ,’ असं म्हणत लगबगीनं दोन-चार विटांची खांडं पुढं भिरकावून रस्ता करणारा हरीश, त्याच्या त्या खिचडीसारखीच माझ्या या विचारांची खिचडी करून गेलाय. हिच ती हॅरिसची खिचडी.
... 
#Pune #RanadeInstitute #Pune