मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

फिलिंग ब्लेस्ड...

 आज वाढदिवस होता. तिशीत पदार्पण केलं. त्यामुळे आपसुकचं वाढदिवसाचं नवल वाटणं बिटणं तसं नव्हतंच. तरीही यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी खास बनला. बोले तो फिलिंग ब्लेस्ड नावाचं ते स्टेटस असतंय ना, आपण कधीतरी एफबीवर त्या स्माइलीसह वापरतो, तसं. त्याला कारणही तसंच खास होतं. आमच्या आज्जीबाईंच्या खास बड्डे विशेश. 'यौग्येस, वाडदिवसाच्या शुभेच्चा रं.'

माझ्या दोन आज्ज्या, आक्का नी गंगाआज्जी, दोन्हीही माझ्यासाठी तितक्याच खास आहेत. आक्का म्हणजे वडिलांची आई नी गंगाआज्जी म्हणजे आईची आई. आक्का तिकडे मलवडीला, तर गंगाआज्जी फलटणला रहायला. गेले काही दिवस आम्ही सगळेच कौटुंबिक कार्यक्रमानिमित्ताने एकत्रच आहोत. आक्का नुकतीच मलवडीला गेली असली, तरी गंगाआज्जी पुण्यातच आहे. काल रात्री झोपायला तसा उशीरंच झाल्यानं नी आज सुट्टीच असल्यानं, मी सकाळी थोडं निवांत उठायचाच प्लॅन केला होता. त्यातच बड्डे बॉय म्हटल्यावर तसा कोणी त्रास द्यायचाही काही संबंध नव्हता. त्यामुळंच अगदी निवांत झोपलो होतो. पण वाढदिवसा दिवशीही मी असं उशीरापर्यंत लोळत पडणं बहुतेक आज्जीला रुचलेलं नसावं. पण म्हणून तिनं मला ओरडून उठवलं नाही, की गदागदा हलवून जागंही केलं नाही. एक छान हाक मारली, नी माझ्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच अशा अगदी औपचारिक शुभेच्छाही दिल्या.

आज्जीनं मला कधीही 'योगेश' असं म्हटलेलं आठवत नाही. ती 'यौग्येस' असाच माझ्या नावाचा उच्चार करते. मलाही ते खूप आवडतं. आज्जी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जसं व्यक्तिमत्त्व उभं राहिल ना, तशीच ती आहे. पाणीदार डोळे, चेहेऱ्यावर वयोमानाने आलेल्या सुरकुत्या, तरीही एखाद्या सुंदर पोरीला लाजविल अशी तुकतुकीत नी एव्हर ग्रीन म्हणावी अशी कांती, काष्टा काढून नेसलेलं लुगडं नी चोळी, कंबरेत वयोमानानेच आलेला बाक, नी वय सगळीकडे आड येत असलं, तरी एखाद्या तरण्याताट्यालाही लाजवेल अशी काम करण्याची क्षमता. एसटीचा प्रवास अजिबातही सहन होत नसल्यानं, निव्वळ एसटी नको म्हणून पुण्याहून फलटणपर्यंतचा प्रवास टू-व्हिलरवरून करायची तिची तयारी याही वयात तिच्या मानसिकतेची झलक दाखवते.

आक्काचंही काहीसं असंच. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कोणत्याही विषयावर
बोलण्यात तिचा हातखंड. वयोमानाने शरीर थकलेलं असलं, तरी तिची इच्छाशक्ती तो थकवा दूर करते बहुदा. घरातलं एखादं कार्य म्हणजे तिचा उत्साह आमच्याही पुढे. लेक-सुना- नातवंडं कमी पडली, तर आमची ही आज्जी स्वतः पुढे होऊन सगळं करते अजूनही. गावच्या राजकारणात काही काळ सक्रीय असल्यानं गावातल्यांची प्रत्येकाची नावं, त्यांचे इकडचे तिकडचे नातेवाईक, त्यांच्या नातेवाईकांचे नातेवाईक सगळे तोंडपाठ. त्यामुळे मग एखादा नवा माणूस समोर आला, की त्याला अशा माणसांचे, लागले तर गावांचे, गाव नाहीच जुळलं तर मग त्या त्या भागाचे संदर्भ देऊन आक्का आपली गप्पा करायला मोकळी. बोलता बोलता दोन- चार म्हणी यू समोर टाकते. या म्हणी इतक्या चपखलपणे बसतात, की त्या ज्या कोणाविषयी असतील, तो लाजलाच म्हणून समजायचं. त्यामुळेच तिचा असा संवाद केवळ दोन व्यक्तींपुरताच मर्यादीत न राहता, तो इतरांनाही सामावून घेतो. इतका की एखाद्यावेळी तिची नुसता विषय जरी निघाला, तरी तिच्या गप्पांमधील किश्श्यांनी हसून हसून पुरेवाट होते.

दोन्ही आज्जांना माझं नी बायकोचं कौतुकही खूप. गंगाआज्जी तिला सोनलंच म्हणते. सोनाली नोकरी करते त्यामुळं तिला खूप भारी वाटतं. नोकरी करते, मग घरी किती वाजता येते, आल्यावर स्वैपाक करते का, मग जेवते कधी, झोपते कधी, गाडी कशी चालवते अशा सगळ्या गोष्टींची ती तिच्याकडूनच माहिती करून घेते. सोनालीला ज्या गोष्टी येत नाहीत, त्या स्वतः शिकवते. न रागवता, न चिडता, आणि कोणताही बडेजाव न करता. पुण्यात रहा म्हटलं, की 'तुम्ही सगळे जानार, मग मी बाबा एकटी ऱ्हाऊन काय करणार दिवसभर. मपला जाती फलटणला. मला निऊन घालीव,' असं तिचं पालूपद एकदा का सुरू झालं, की मग मात्र तिला फलटणला परत पाठविण्याशिवाय पर्याय नसतोय. आक्काचंही तसंच. माझं लग्न रजिस्टर पद्धतीनं झालं होतं. लग्नानंतर आम्ही दोघंही पहिल्यांदाच गावी गेलो. त्यावेळी नातसून घरी आली, म्हणून आक्काने जे काही कौतुक केलं होतं, त्याने मी खरंच भारावून गेलो होतो. सोनालीला साडी, मला टॉवेल-टोपी देऊन, 'मी नाय करनार तर कोण करनार असाच,' प्रश्न तिनं मला विचारला होता. त्यावेळी मी अनुभवलेले आक्का- दादा त्यापूर्वी नी त्यानंतरही कधीही अनुभवले नाहीत.

फलटणचे नाना गेलेल्याला बरीच वर्षे झाली. दादा गेलेल्याही आता दोन वर्षे होत आली. त्यानंतरच्या काळात दोन्ही आज्जांचं करारीपण काहीसं कमी झालंय. पण म्हणून त्या खचल्यात असं अजिबातही नाही. गंगाआज्जी अजूनही तिच्या लेकांच्या मदतीला हॉटेलवर धावून जाते, पडेल ती सगळी कामं करते. आक्का अजूनही गावच्या जमिनींवर बांधाला जाऊन स्वतः उभी राहते, पाण्याची मोटर सुरू करायला घरातलं कोणी हललं नाही, तर स्वतः शेताच्या दिशेने निघते. दोन्ही आज्ज्यांच हे वागणं त्यांच्यामधलं वेगळेपण पुन्हा पुन्हा आमच्यासमोर आणून ठेवतं. आज सकाळीही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, आपल्या नातवाला तो शहरात राहतोय म्हटल्यावर मोडक्या तोडक्या का होईना पण शहरी भाषेतल्या शुभेच्छा द्यायचा प्रयत्न तिनं केला. नाहीतर तिला तशी कोणतीही गरज नव्हती. त्यामुळेच आज दिवसभरात मला वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छांमध्ये माझ्या आज्जीनं दिलेल्या शुभेच्छाच खूप आवडल्या. दिवसाची सुरुवातच त्या शुभेच्छांनी झाली. त्यामुळं दिवसही खूप छान गेला. दिवसभर तोच आवाज कानात घुमत होता. 'यौग्येस, वाडदिवसाच्या शुभेच्चा रं...' 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा