गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०

हा ब्लॉग कशासाठी...

रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे धडे गिरवताना समाजामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाणारे काम आणि त्याविषयी वर्गामध्ये शिकवले जाणारे पाठ यांमध्ये बराच फरक असल्याचे मला आढळून येत आहे. ध्येयवादी किंवा तत्वनिष्ठ पत्रकारिता आणि आम्ही जी पत्रकारिता सध्या शिकत आहोत यातही बराच फरक असल्याचे जाणवले आहे. मला जे या क्षेत्रामध्ये येऊन करायचे आहे, ते आता करता येईलच असेही मी ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळेच माझे जे काही अनुभव असतील, ते थोड्या जबाबदार पद्धतीने इतरांसमोर मांडायचे या उद्देशाने मी हा ब्लॉग लिहिण्याचे ठरविले आहे.

इतरांनी ते वाचावे किंवा वाचू नये यावर माझे नियंत्रण नक्कीच नाही, मात्र इतरांपर्यंत काय पोहचवावे यावर मात्र माझे नक्कीच नियंत्रण असणार आहे. हाच विचार डोक्यात ठेवून हा ब्लॉग लिहिणार आहे. आमच्या माणदेशामध्ये दुष्काळाचे सावट कायम असले, तरी माणुसकीचा झरा अजूनही जीवंत आहे. माणगंगेला पाणी नसले, तरी तिच्या काठा-काठांवरून वाहणाऱ्या माणुसकीच्या अशाच झऱ्यांचा आपण नक्कीच अनुभव त्या ठिकाणी घेऊ शकतो. तश्याच मतांचे झरे या ब्लॉगच्या माध्यमातून सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल. मत आणि विचार यामध्ये बराच मोठा फरक असतो. माझी मतं विचारांमध्ये बदलतानाचा हा एक प्रवाह असेल. हे मतांचे झरे कधीतरी विचारांमध्ये बदलतील आणि कुठेतरी समाजरुपी सागरामध्ये मिसळतील याची खात्री वाटते.

यात माझे वैयक्तिक अनुभव, काम करताना आलेले अनुभव किंवा अशाच अनुभवातून शिकल्यानंतर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची घातलेली सांगड या विषयीची माझी मते समाविष्ट असतील.