रविवार, २ ऑगस्ट, २०१५

माय एल्डेस्ट गर्लफ्रेंड. ओल्डेस्ट टू...

आख्ख्या जगाने काल फ्रेंडशिप डे साजरा केला. त्या फ्रेंडशिप डेचे बँड्स बांधले, हातात हात गुंतवून आइस्क्रिम्स खाल्ले, चॉकलेट्स दिले वगैरे वगैरे. मी मात्र तसा निवांतच होतो. विश केल्यावरच मैत्री दिसते, असलं काही नसतं असं वाटणाऱ्यांच्या गटातला मी. इतर कोणत्याही दिवशी, त्या त्या दिवसाचे तिथ- वार- मुहुर्तानुसार महत्त्व असेल कदाचित. पण सालं, या फ्रेंडशिप डेचं तसं काही नाही. मित्र काल होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील ही गॅरंटी आहे मला. नातंच तसं आहे ना. कोणी शक्यतो नाकारू शकत नाही. हमम, विश केलं नाही म्हणून कोणी रुसलं फुगलं असेल, तर माहिती नाही. ऑफिसमधून थोडा वेळ मिळाल्यावर खाली, फर्ग्युसन रोडवर नेहमीसारखी चक्कर टाकून आल्यानंतरही तसा फारसा फरक पडला नव्हता. असं एकदम वेगळंच वाटण्यामागचं कारण शोधत होतो. विचार करत करत एका व्यक्तीपर्यंत मी जाऊन पोहोचलो. माय एल्डेस्ट गर्लफ्रेंड. ओल्डेस्ट टू...

फ्रेंडशिप डेच्या आदल्याच दिवशी मी त्यांना भेटायला गेलो होतो. भेटायला जायच्या आधी पुण्यातल्या रिती- रिवाजाप्रमाणे फोन केला. त्या फोन उचलतील अशी अपेक्षा नव्हती. गेल्या काही वर्षांमध्ये त्या नेहमी आजारी पडतायेत. त्यामुळे त्यांची नात वा मुलगी फोन उचलेल म्हणून आपलं बेतानंच हॅलो म्हटलं. पलिकडनं अनपेक्षितपणे त्यांचाच आवाज आला. मी त्याच आहेत का म्हणून विचारलं, त्यांनी तू ओळखलं नाहीस का मला,’ म्हणून मलाच प्रतिप्रश्न केला. थोडा गडबडलो, नंतर सरळ म्हटलं, भेटायला यायचंय, येऊ का.’ त्या म्हणाल्या, कोण- कोण येताय, मी सांगितलं, मी नी सोनाली येतोय,’ खळखळून हसल्या, म्हणाल्या, बघत होते, बायकोचं नाव थेट घेतोस की नाही ते. या तुम्ही, मी आहे घरीच. जवळपास दोन वर्षांनी भेटणार होतो. फोनवरचा आवाज टवटवीत होता. हसणंही तसंच होतं. त्यामुळे आपसुकच तिकडे जाताना डोक्यात त्यांची ती जुनीच प्रतिमा होती. तिथे गेल्यावर ती एका क्षणात बदलली. हॉस्पिटलमध्ये असतो, तशा बेडवर त्या बसल्या होत्या. पांढरेशुभ्र केस. चालण्यासाठी वापरतात तो चार पायांचा वॉकर आणि सोबत एक मदतनीस. मला हे तसं अपेक्षित नव्हतं.    

त्यांची- माझी ओळख तशी माझ्यासाठी कोणी मैत्रिण नावाची चीज अस्तित्त्वात नसतानापासूनची. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मैत्रिणी मिळाल्या. भुसावळला आमचे फ्लॅट एकमेकांच्या अगदी समोर होते. दार उघडली, की समोरचं घर दिसायचं ते त्यांचंच. त्या एका इंग्रजी शाळेत मराठी विषय शिकवायच्या. मी त्या वेळी नुकताच कॉलेजला जायला लागलो होतो. त्यांचे मिस्टर एमएसईबीचे रिटायर्ड इंजिनीअर होते. दोघे मिळून एकदम आयडियल कपल. माझ्या या दोघांशीही अगदी निवांत गप्पा चालायच्या. माझ्या सगळ्या आवडी-निवडी त्या दोघांनाही व्यवस्थित माहिती झाल्या होत्या. कॉलेजला जाताना दार उघडलं, की मी आई येतो म्हणायला,’ नी मॅडम समोर यायला बरेचदा एकच वेळ व्हायची. अंगावर घातलेले कपडे कसे आहेत, याच्या विषयीचा एक शेरा त्यांच्याकडून आपसूकच मिळायला. कधी तरी नेहमीचा गबाळा अवतार सोडून थोडा ठिकठाक निघालो असलो, तर काय हिरो, आज नटलायस अगदी, काय स्पेशल, असं त्या विचारायच्या. अजून कोणा गर्लफ्रेंडची भानगड सांगत नाहीस, पण या गर्लफ्रेंडचं तुझ्यावर लक्षयं बर का, असं म्हणत हसायच्या. घरात, इकडे तिकडे फिरताना, जिना उतरताना, शक्यतो एकटा असताना मला शिट्टी मारायची सवय होती. शिट्ट्यांमध्ये मग एखाद-दुसरं गाणंही व्हायचं. जिना उतरताना नी जिना चढताना ही शिट्टी ठरल्याप्रमाणे वाजायची. तीन जिने चढून शिट्टी वाजवत वर आलो की, आज हे गाणं वाजवत होतास का रे, असा प्रश्न व्हायचा. मग थोड्या गप्पा की पुन्हा रुटीन सुरू. शिट्टी वाजवणं वा शिळ घालणं म्हणा हवं तर, त्या सवयीवरून मला खूप जण ओरडलेत. आता हळू हळू ते प्रमाण कमी झालंय. पण मॅडम तशा कधीही ओरडल्या नाहीत. त्या ओरडणाऱ्या पिढीच्याच त्या प्रतिनिधी आहेत, तरीही. त्यांना कौतुक होतं. आताही आहेच. माउथऑर्गन वाजवायला लागल्यावर तर अनेकदा त्यांना आवडणारी गाणी त्यांच्याच घरात बसून वाजवायचो. खूप साऱ्या गप्पा, खूप सारी गाणी.

शनिवारी त्यांच्यासमोर बसलो. त्यांनी आमची दोघांचीही चौकशी केली. दोघंही काम कसं करतो, ऑफिसला कसं जातो- येतो, सगळं कसं मॅनेज करतो विचारून घेतलं. मागच्या दोन वर्षांमध्ये त्यांच्यावर एक- दोन मेजर ऑपरेशन्स झालीत. वयोमानानुसार डॉक्टरांनी या ऑपरेशन्सचा फायदा होण्याविषयी साशंकता व्यक्त केली होती. मात्र त्या मनाने खंबिर असल्याने त्या अजूनही ओके आहेत. त्यांचं तितकंच बिझी रुटीन त्यांनी आम्हाला सांगितलं. मी थक्क होतो. वय आणि शरीर साथ देत नसलं, तरी त्यांचं मन तितकंच खंबिर आहे, हे पाहून थक्क होण्यासारखंच होतं. साध्या- साध्या गोष्टींनी निराश होणारी लोकं एकीकडे नी ही अशी माणसं एकीकडे. पुन्हा आमच्या निवांत गप्पा झाल्या. जुन्या आठवणी निघाल्या. माऊथऑर्गन वाजवायला वेळ मिळतो की नाही, हे त्यांनी आठवणीने विचारलं. गप्पा झाल्या, भेट झाली म्हणून त्यांनाही खूप आनंद झाला होता. अधूनमधून येत जा, भेटत जा,’ असा निरोप दिला. वेळ मिळाला, की पुन्हा नक्की चक्कर मारेन,’ म्हणत मीही निरोप घेतला.
माझ्या या गर्लफ्रेंडचं वय झालेलं त्यांच्या केसांवरून जरी दिसत असलं, तरी त्यांचा मेंदू मात्र अजूनही तितकाच तल्लखपणे काम करतोय. सगळं असं लख्खं आठवतंय हे त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय. आत्ताचा फ्रेंडशिप डे त्यांच्या भेटीनेच सुरू झाला. पुढचे सगळे फ्रेंडशिप डेसुध्या अशाच गप्पा, अशाच भेटी नी अशाच आठवणींनी भरलेले असोत, एवढीच इच्छा. फ्रेंडशिप डेला अशा भेटी-गाठींनाच जास्त महत्त्व असावं ना. थँक्स फॉर बिइंग माय एल्डेस्ट गर्लफ्रेंड. ओल्डेस्ट टू.