रविवार, ९ एप्रिल, २०१७

गोंधळ... सिग्नलचा... आपला



नदीपात्रातला रस्ता सोडून राजाराम पुलाकडे वळलो, की समोर सिंहगड रोडवरचा तो चौक दिसला. सिंहगड रोडने पुण्याकडे नी पुण्याकडून सिंहगडाकडे ये- जा करणारी वाहनं दिसली. सिग्नल लाल झाल्यानं पुलाच्या मध्यावर आल्यानंतर गाडी हळू केली. चौकाच्या अलिकडे येऊन थांबलो. हेडफोनवर मंद आवाजात गाणं सुरू होतं, 'तुमने जो ना कहा मैं वो सुनता गया...'

 
सिग्नल नुकताच लाल झाला होता. त्यामुळं आजूबाजूची वाहनंही हळूहळू येऊन थांबली. गाड्या थांबलेल्या पाहून चौकात भीक मागणारी उघडी मुलं या गाड्यांकडे सरकली. एकेक करत गाडीपुढे जाऊन पैसे मागू लागली. माझ्या डाव्या बाजूला एका बाईकवर एक जोडपं होतं. मागे बसलेल्या मुलीच्या पायातल्या सँडलला हात लावत भीक मागणाऱ्या त्या मुलाने पैशांसाठी हात पसरले. माझ्या उजव्या बाजूच्या कारच्या काचा तोपर्यंत वर सरकलेल्या होत्या.

हवेत जाणवण्याइतपत उकाडा असल्यानं पाठीवरची सॅक थोडी मोकळी करायचा प्रयत्न केला. मोकळ्या हवेचा अंदाज घेत- घेत गाणं ऐकत राहिलो. कारच्या आत सुरू असलेल्या गाण्यांचा आवाज बाहेरही जाणवत होता. कारच्या डावीकडच्या सीटवर बसलेल्या मुलीच्या हातातल्या मोबाइलवर, त्या गाण्यांच्या तालावरच बोटं चॅटिंग सुरू असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. तोपर्यंत त्या बाईकवाल्या पोरीने सँडल झटकला होता. तिच्या पुढच्या दोस्तानं दोन्ही पायांवर ती बाईक सांभाळत पाकीट काढलेलं दिसलं. पाकीटातनं सरळ दहाची नोट बाहेर आली. ती नोट त्या उघड्या पोरानं घेतली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. माझं लक्ष आहे हे जाणवताच, तो आनंद दिसू नये असा प्रयत्न करत गाडीकडे सरकला. मी आपलं गाण्याच्या ओळी गुणगुणल्या, 'तुमने जो न कहा मैं वो सुनता गया...'

या सिग्नलवरच्या वाहनांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणेच सिग्नल सुटायच्या आधीच गाड्या पुढे सरकल्या. मागचे हॉर्न ऐकून नाईलाजाने गाडीला स्टार्टर दिला. सिग्नल तसा नव्हताच. पुन्हा थांबलो. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठीचा सिग्नल अजून सुरू होता. तो पिवळा होण्याची मी वाट बघत होतो. नेहमीच्या अनुभवानुसार, हा सिग्नल पिवळा झाला की राजाराम पुलाकडून पुण्याकडे वा सिंहगडाकडे जाणाऱ्या वाहनांचा सिग्नल काही सेकंदांमध्ये हिरवा होतो. त्या तयारीत मी होतो. माझ्या सिग्नलवर लक्ष होतं. सिंहगडाकडे जाण्यासाठीचा सिग्नल हिरवा झाला. गाडीचा गिअर टाकला. तोच सिंहगडाकडून पुण्याकडे जाण्यासाठी एक खासगी बस खूपच जोरात येताना दिसली. 

बसने त्या चौकातली पांढरी रेषाही ओलांडली होती. माझ्या समोरच्या दोन गाड्या त्या बसच्या अगदी टप्प्यात गेलेल्या होत्या. माझ्या गाडीचा गिअर बदलला असला, तरी दोन-चार फुटांपलीकडे मी सरकलो नव्हतो. बसच्या ड्रायव्हरने करकच्चून ब्रेक दाबला. नी त्या दोन गाडीवाल्यांना त्याचा सिग्नल दाखवत डोळे वटारले. त्याचाही सिग्नल हिरवाच होता. आमचा सिग्नल पिवळा होण्यापूर्वीच हिरवा झाला होता. चुकलं कोणीच नव्हतं. दोन्ही सिग्नल हिरवेच होते. दोन्ही रस्त्यांवरचे गाड्यांवाले नियम पाळून गाडी चालवत होते. मी दोन्हीकडचे सिग्नल बघितले. समोरच्या त्या दोन गाडीवाल्यांपैकी एका काकांनी बस ड्रायव्हरला आमचा हिरवा सिग्नल दाखवला, नी आता जाऊदे म्हणत त्याला थांबवून गाडी पुढे घेतली. त्यांच्यामागोमाग बाकीच्यांसोबत मीही निघालो. मनात म्हटलं सगळे तसे बरोबरच आहोत, सिग्नलच फक्त गोंधळलाय. गाणं अजून सुरूच होतं. 'तुमने जो ना कहा...'

सिंहगड रोडला लागण्यासाठी चौकाच्या मध्यापर्यंत येते तोच पुढच्या बाजूने एक काका रस्ता ओलांडायला आले. हात दाखवत, आपला सिग्नल बघत पुढे गेले. बाकीच्या गाड्या तो हात बघून हळू झाल्या होत्या, काही थांबल्या होत्या. एक मोठा ट्रकवाला मात्र ट्रक पुढे रेटतच होता. काकांना अगदी घासून पुढे आला. काका थबकले. हातवारे करत ओरडले. तोपर्यंत बाकीच्यांचा धीर सुटला होता, गाड्यांनी गिअर बदलले होते. त्यांच्या सर्वांच्याच लेखी सिग्नल सुटला होता. काका फक्त मागे सरकले होते. बाकीचे सगळे पुढे निघाले होते. मागे होता फक्त गोंधळ. सिग्नलचा. असे कितीतरी सिग्नल आपल्याला गोंधळात टाकतात ना. आपल्याला वाटतं आपण बरोबर, समोरच्याला वाटतं समोरचा बरोबर. दोघंही भिडतो एकमेकांना. त्यावेळचे असे गोंधळून टाकणारे सिग्नल कधी शोधत नाही ना. सिग्नल कळतच नसावेत, गोंधळ कधी कळायचे. गाणं थांबलं होतं. सिग्नलचा नी मनाचा असा गोंधळ करून.
  

मंगळवार, ४ एप्रिल, २०१७

प्ले- लिस्टचा खेळ

गाणं, संगीत तसं सगळ्यांनाच आवडतं. खूप कमी लोकं अशी असतात की ज्यांना गाणी अजिबातच आवडत नाहीत. मी अशा लोकांपैकी नक्कीच नाही. गाणी ऐकायला, जमेल तशी वाजवायला नी शेवटी त्याचा मनसोक्त आनंद घ्यायला जाम आवडतं. गाण्यांविषयी, संगीताविषयी लिहिलेलं वाचायलाही आवडतं. त्यामुळेच की काय, कंटाळवाणे प्रसंग, उदास वातावरण किंवा अगदीच निराश झाल्यानंतर गाणी ऐकणं- गुणगुणनं आवडत असावं. साधारण एक- दोन आठवड्यांपूर्वी आपण कोणती गाणी गुणगणतो या विषयीचा एक लेख वाचनात आला. तिकडे फॉरेनमध्ये त्या विषयीचं संशोधन झालं होतं म्हणे. ते आपल्याकडे झालं असतं, तर आपल्याकडेही कदाचित तसेच निष्कर्ष पुढे आले असते, असं तो लेख वाचल्यानंतर वाटलं. दिवसभरात एखादं गाणं डोक्यात बसलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण तेच गाणं मधूनच आपोआप कसं गुणगुणत बसतो, या विषयीचं ते लेखन मस्तच वाटलं. मीही अनेकदा अशीच गाणी गुणगुणत राहतो. विचार करतो, कुठं ऐकली, उत्तर सापडतं, आपल्या प्ले-लिस्टमध्ये.

मोबाईलमुळं गड्या एक भारी सोय झालीये आपल्यासारख्याची, असं उगाचंच वाटतं त्यामुळे. मोबाईलमध्ये भारंभार गाणी भरून ठेवायला मिळाल्याल्यापासून तर कुठल्याशा आरतीपासून ते एन्रिकच्या ह्रिदम डिव्हाइनपर्यंतची वेगवेगळ्या जॉनरची गाणी एकत्र ठेवाणारे अनेकजण माहितीचे झालेत. सुरुवातीला कुठल्याशा दुकानात मेमरी कार्डमध्ये शेकडो गाणी भरून देतात, हे समजलं की मोठं अप्रूप वाटायचं. घरात मोठ्याशा टेपरेकॉर्डरवर साईड ए आणि साइड बी करून एक वीसेक गाणी ऐकायला मिळायची. लयंच लय म्हणाल तर थर्टीएट नॉनस्टॉप मराठी कोळीगीतांचा तो जमाना. कॅसेट अडकलीच तर रेकॉर्डरचे खटके दाबून कॅसेट बाहेर काढणं, त्या छोट्या बारीक फिल्मचा गुंता सोडवणं, पेन वा पेन्सिलला कॅसेट अडकवून ती फिल्म पुन्हा कॅसेटमध्ये अडकवण्याची कसरत करण्याचा तो काळ. त्यावेळी मुळात मोबाईल ही चैनीची बाब. त्यात मेमरी कार्ड असणारा नी गाणी वाजवणारा मोबाईल म्हटलं की अजूनच हाय-फाय ट्रिटमेंट. त्यामुळं ते अप्रूप होतं. नंतर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. आता कुणाच्याही मोबाईलमध्ये कुठुनही गाणी वाजू शकतात, डाऊनलोड होऊ शकतात अशी परिस्थिती आलीये. त्यामुळं ते अप्रूप वाटणं बंद झालंय. त्याची जागा आता सिलेक्टिव्हिटीने घेतलीये. गाणीसुद्धा आपली निवडून निवडून ऐकायची. तेवढंच बरं असतंय. डोक्याला शॉट लागला असं वाटलं, की लावायची मोबाईलवर गाणी. आपली आवडती गाणी, आपल्या प्ले-लिस्टमधून.

माझी प्ले-लिस्ट म्हटलं की खूप सारी गाणी अशी सहजच कानावर पडायला सुरुवात होते. किशोर कुमारच्या आनेवाला पल, जिंदगी आ रहा हूँ मैं सारख्या हिंदी गाण्यांपासून ते ब्रायन अॅडम्सच्या एटीन टिल आय डायपर्यंत... पंकज उधासच्या चिठ्ठी आयी है पासून ते आतिफ अस्लमच्या दूरी वा इंडियन ओशनच्या माँ रेवा तेरा पाणी निर्मळ पर्यंत... मराठी म्हणायचं तर मिलिंद इंगळेंच्या गारवापासून ते अवधूत गुप्तेंच्या फुलपाखरूपर्यंत... माऊली माऊली, झिंगाट, वेड लागलं तर आहेच नी अगदी चिन्मया सकल हृदयाही आहे... इन्स्ट्रुमेंटल म्हणायची तर झाकीर हुसैन- आनिंदो चॅटर्जींच्या तबल्यापासून ते यानीच्या अफलातून ऑर्केस्ट्रॉ रेकॉर्डिंगपर्यंतचं सगळं काही ही प्ले- लिस्ट आठवायला भाग पाडते. एक दिन बिक जायेगाची दोन्ही- तिन्ही व्हर्जन्स, केकेचं यारों..., इन्क्बाल सिनेमातलं आशायें..., बर्फीमधलं इत्तीसी हसी... गुलाल मधलं आरंभ है प्रचंड... रेहमाननं संगीत दिलेलं रुबरू नी ताल, स्ट्रिंग्सचं तितलियाँ, सदमा मधलं ए जिंदगी गले लगालें, कैलाश खेरचं अल्लाह के बंदे, अरजित सिंग- तोची रैना- रेखा भारद्वाजवालं कबिरा, अरजित सिंगचं महोब्बत बरसा देना तू... असं खास कलेक्शन ही प्ले-लिस्ट माझ्यासमोर ठेवत असते.

गाण्यांसोबत काही खास जिंगल्सही तितक्याच भारी असतात. ती हिरोच्या जाहिरातीत वापरलेली ख्वाबोंसे है इश्क इश्क, मार्केटिंगचा अफलातून फंडा सांगणारी अनबॉक्स जिंदगी अशा जिंगल्सची प्ले- लिस्ट सजवत चालल्यात. आत्ताही ती प्ले-लिस्ट आपलं काम बजावतेय. नो डिस्टर्बन्स अॅट ऑल. क्या हुआ तेरा वादा... तेरा मुझसे है पहले का नाता कोई... सारखी गाणी तर ड्रायव्हिंगची मजा वाढवणारीही ठरतात. गिटारवर वाजलेलं कॉलेज डेज, कुमार विश्वासचं कोई दिवाना कहता है..., संदीप- सलिलचं आयुष्यावर बोलू काहीचं कलेक्शन, अच्युतम् केशवम् कृष्ण दामोदरम् सारखी एखादी शांत पण सुरावटींनी नटलेली प्रार्थना या प्ले-लिस्टमध्ये आहे. मी अनेकदा विचार करत राहतो, ही प्ले-लिस्ट कधीही लावा, आपल्याला ऐकाविशी का वाटत असेल. वेगवेगळ्या संगीतकारांचं हे संगीत आहे. वेगवेगळ्या भाषांमधलं ते आहे. अजय- अतुलनं तिकडं दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी दिलेलं ते इक्की की काय उच्चार असलेलं गाणंही या प्ले- लिस्टमध्ये आहे नी इंडियन ओशनवालं कंदिसाही या प्ले-लिस्टमध्ये आहे. असल्या गाण्यांचे अर्थ आपल्याला काय डोंबल्याचे समजतायेत, तरी ते भारी वाटतात, ऐकावेसे वाटतात म्हणून प्ले-लिस्टमध्ये आहेत.

अर्थपूर्ण गाण्यांपासून ते काहीही अर्थबोध न होणाऱ्या शब्दांचा समावेश असणाऱ्या गाण्यांपर्यंतचं सगळं काही ही प्ले-लिस्ट मला ऐकवत राहते. तरीही ती आवडते. आमचं सायन्स आम्हाला रेझोनन्स शिकवून गेलंय. माणसाचं मन ही एक सिस्टिम नी वाजणारं गाणं ही दुसरी एक बाहेरची सिस्टिम आपण मानली, तर माणसाला गाणं आवडणं ही प्रक्रिया रेझोनन्स म्हणून विचारात घेतली जाऊ शकते का, असा प्रश्न मला पडलाय. एखाद्या माणसाचं मन ज्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होत असेल, त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीमध्ये वाजणारं गाणं लागलं की ते त्याला आवडत असावं का, असा प्रश्नही कधीकधी पडतो. हे सूत्र माझं मलाच लागू करून पाहिलं, तर किमान स्वतःला स्वतःच्या मनाची फ्रिक्वेन्सी तरी समजू शकेल ना? हे चूक की बरोबर ते माहिती नाही राव. बी. एस्सी. नंतर सायन्स सोडलेलं नी संगीताचं शास्र समजून न घेताच ते ऐकायला -वाजवायला घेतलेलं. त्यामुळे असले फालतू प्रश्न पडत असावेत. पण, आपल्या आवडत्या प्ले-लिस्टमधलं संगीत असा रेझोनन्स साधत असेल काय, असा प्रश्न मला अनेकदा पडलाय. कदाचित या भानगडीचं उत्तर आपल्याला आपल्या मनापर्यंत घेऊन जाऊ शकतं. मन असंही कोणाला सापडलंय का, ते आपल्याला सापडेल. पण किमान त्याची फ्रिक्वेन्सी तरी कळेल या खेळातून. आपली ही प्ले-लिस्ट आपल्याच मनाशी असा एवढा सगळा खेळ खेळत असेल, म्हणूनच ती आपल्याला आवडत असेल का ?