रविवार, २ ऑगस्ट, २०१५

माय एल्डेस्ट गर्लफ्रेंड. ओल्डेस्ट टू...

आख्ख्या जगाने काल फ्रेंडशिप डे साजरा केला. त्या फ्रेंडशिप डेचे बँड्स बांधले, हातात हात गुंतवून आइस्क्रिम्स खाल्ले, चॉकलेट्स दिले वगैरे वगैरे. मी मात्र तसा निवांतच होतो. विश केल्यावरच मैत्री दिसते, असलं काही नसतं असं वाटणाऱ्यांच्या गटातला मी. इतर कोणत्याही दिवशी, त्या त्या दिवसाचे तिथ- वार- मुहुर्तानुसार महत्त्व असेल कदाचित. पण सालं, या फ्रेंडशिप डेचं तसं काही नाही. मित्र काल होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील ही गॅरंटी आहे मला. नातंच तसं आहे ना. कोणी शक्यतो नाकारू शकत नाही. हमम, विश केलं नाही म्हणून कोणी रुसलं फुगलं असेल, तर माहिती नाही. ऑफिसमधून थोडा वेळ मिळाल्यावर खाली, फर्ग्युसन रोडवर नेहमीसारखी चक्कर टाकून आल्यानंतरही तसा फारसा फरक पडला नव्हता. असं एकदम वेगळंच वाटण्यामागचं कारण शोधत होतो. विचार करत करत एका व्यक्तीपर्यंत मी जाऊन पोहोचलो. माय एल्डेस्ट गर्लफ्रेंड. ओल्डेस्ट टू...

फ्रेंडशिप डेच्या आदल्याच दिवशी मी त्यांना भेटायला गेलो होतो. भेटायला जायच्या आधी पुण्यातल्या रिती- रिवाजाप्रमाणे फोन केला. त्या फोन उचलतील अशी अपेक्षा नव्हती. गेल्या काही वर्षांमध्ये त्या नेहमी आजारी पडतायेत. त्यामुळे त्यांची नात वा मुलगी फोन उचलेल म्हणून आपलं बेतानंच हॅलो म्हटलं. पलिकडनं अनपेक्षितपणे त्यांचाच आवाज आला. मी त्याच आहेत का म्हणून विचारलं, त्यांनी तू ओळखलं नाहीस का मला,’ म्हणून मलाच प्रतिप्रश्न केला. थोडा गडबडलो, नंतर सरळ म्हटलं, भेटायला यायचंय, येऊ का.’ त्या म्हणाल्या, कोण- कोण येताय, मी सांगितलं, मी नी सोनाली येतोय,’ खळखळून हसल्या, म्हणाल्या, बघत होते, बायकोचं नाव थेट घेतोस की नाही ते. या तुम्ही, मी आहे घरीच. जवळपास दोन वर्षांनी भेटणार होतो. फोनवरचा आवाज टवटवीत होता. हसणंही तसंच होतं. त्यामुळे आपसुकच तिकडे जाताना डोक्यात त्यांची ती जुनीच प्रतिमा होती. तिथे गेल्यावर ती एका क्षणात बदलली. हॉस्पिटलमध्ये असतो, तशा बेडवर त्या बसल्या होत्या. पांढरेशुभ्र केस. चालण्यासाठी वापरतात तो चार पायांचा वॉकर आणि सोबत एक मदतनीस. मला हे तसं अपेक्षित नव्हतं.    

त्यांची- माझी ओळख तशी माझ्यासाठी कोणी मैत्रिण नावाची चीज अस्तित्त्वात नसतानापासूनची. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मैत्रिणी मिळाल्या. भुसावळला आमचे फ्लॅट एकमेकांच्या अगदी समोर होते. दार उघडली, की समोरचं घर दिसायचं ते त्यांचंच. त्या एका इंग्रजी शाळेत मराठी विषय शिकवायच्या. मी त्या वेळी नुकताच कॉलेजला जायला लागलो होतो. त्यांचे मिस्टर एमएसईबीचे रिटायर्ड इंजिनीअर होते. दोघे मिळून एकदम आयडियल कपल. माझ्या या दोघांशीही अगदी निवांत गप्पा चालायच्या. माझ्या सगळ्या आवडी-निवडी त्या दोघांनाही व्यवस्थित माहिती झाल्या होत्या. कॉलेजला जाताना दार उघडलं, की मी आई येतो म्हणायला,’ नी मॅडम समोर यायला बरेचदा एकच वेळ व्हायची. अंगावर घातलेले कपडे कसे आहेत, याच्या विषयीचा एक शेरा त्यांच्याकडून आपसूकच मिळायला. कधी तरी नेहमीचा गबाळा अवतार सोडून थोडा ठिकठाक निघालो असलो, तर काय हिरो, आज नटलायस अगदी, काय स्पेशल, असं त्या विचारायच्या. अजून कोणा गर्लफ्रेंडची भानगड सांगत नाहीस, पण या गर्लफ्रेंडचं तुझ्यावर लक्षयं बर का, असं म्हणत हसायच्या. घरात, इकडे तिकडे फिरताना, जिना उतरताना, शक्यतो एकटा असताना मला शिट्टी मारायची सवय होती. शिट्ट्यांमध्ये मग एखाद-दुसरं गाणंही व्हायचं. जिना उतरताना नी जिना चढताना ही शिट्टी ठरल्याप्रमाणे वाजायची. तीन जिने चढून शिट्टी वाजवत वर आलो की, आज हे गाणं वाजवत होतास का रे, असा प्रश्न व्हायचा. मग थोड्या गप्पा की पुन्हा रुटीन सुरू. शिट्टी वाजवणं वा शिळ घालणं म्हणा हवं तर, त्या सवयीवरून मला खूप जण ओरडलेत. आता हळू हळू ते प्रमाण कमी झालंय. पण मॅडम तशा कधीही ओरडल्या नाहीत. त्या ओरडणाऱ्या पिढीच्याच त्या प्रतिनिधी आहेत, तरीही. त्यांना कौतुक होतं. आताही आहेच. माउथऑर्गन वाजवायला लागल्यावर तर अनेकदा त्यांना आवडणारी गाणी त्यांच्याच घरात बसून वाजवायचो. खूप साऱ्या गप्पा, खूप सारी गाणी.

शनिवारी त्यांच्यासमोर बसलो. त्यांनी आमची दोघांचीही चौकशी केली. दोघंही काम कसं करतो, ऑफिसला कसं जातो- येतो, सगळं कसं मॅनेज करतो विचारून घेतलं. मागच्या दोन वर्षांमध्ये त्यांच्यावर एक- दोन मेजर ऑपरेशन्स झालीत. वयोमानानुसार डॉक्टरांनी या ऑपरेशन्सचा फायदा होण्याविषयी साशंकता व्यक्त केली होती. मात्र त्या मनाने खंबिर असल्याने त्या अजूनही ओके आहेत. त्यांचं तितकंच बिझी रुटीन त्यांनी आम्हाला सांगितलं. मी थक्क होतो. वय आणि शरीर साथ देत नसलं, तरी त्यांचं मन तितकंच खंबिर आहे, हे पाहून थक्क होण्यासारखंच होतं. साध्या- साध्या गोष्टींनी निराश होणारी लोकं एकीकडे नी ही अशी माणसं एकीकडे. पुन्हा आमच्या निवांत गप्पा झाल्या. जुन्या आठवणी निघाल्या. माऊथऑर्गन वाजवायला वेळ मिळतो की नाही, हे त्यांनी आठवणीने विचारलं. गप्पा झाल्या, भेट झाली म्हणून त्यांनाही खूप आनंद झाला होता. अधूनमधून येत जा, भेटत जा,’ असा निरोप दिला. वेळ मिळाला, की पुन्हा नक्की चक्कर मारेन,’ म्हणत मीही निरोप घेतला.
माझ्या या गर्लफ्रेंडचं वय झालेलं त्यांच्या केसांवरून जरी दिसत असलं, तरी त्यांचा मेंदू मात्र अजूनही तितकाच तल्लखपणे काम करतोय. सगळं असं लख्खं आठवतंय हे त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय. आत्ताचा फ्रेंडशिप डे त्यांच्या भेटीनेच सुरू झाला. पुढचे सगळे फ्रेंडशिप डेसुध्या अशाच गप्पा, अशाच भेटी नी अशाच आठवणींनी भरलेले असोत, एवढीच इच्छा. फ्रेंडशिप डेला अशा भेटी-गाठींनाच जास्त महत्त्व असावं ना. थँक्स फॉर बिइंग माय एल्डेस्ट गर्लफ्रेंड. ओल्डेस्ट टू.    

रविवार, २८ जून, २०१५

फॉर्मली इन्फॉर्मल

फॉर्मली इन्फॉर्मल... वाचायला- म्हणायलाही थोडं वेगळं वाटतं ना. हा विषय तसा खूप महिन्यांपासून, महिन्यांपासून नव्हे अगदी मागच्या वर्षभरापासून डोक्यात घोळतोय. या वेळी नाही, तर पुढच्या वेळी लिहू म्हणून मागे पडला होता. विषयाच्या बाबतीतही तशीच फॉर्मली इन्फॉर्मेलिटी जपत तो विषय सोडून देत होतो. भुसावळच्या एका मित्राबरोबर गप्पा मारता मारता पुन्हा त्याच्यासोबतचं माझं फॉर्मली इन्फॉर्मल वागणं- बोलणं लक्षात आलं. मग म्हटलं लिहायलाच हवं एकदा हे अधिकृतपणे.
फॉर्मेलिटी पाळणं हा तसा सभ्यतेचा एक भाग. ती पाळत नाही म्हणजे आपण असभ्य, असं ठरत नसावं लगेचच, पण जाणवेल अशा पद्धतीने ते समोर मांडलं जातं एवढंच. काही गोष्टी लिखित- अलिखित प्रकारात कुठेतरी बसतात. तशीच ही फॉर्मेलिटी. मला त्या फॉर्मेलिटीच्या भानगडी उगाच कधी आवडल्याच नाहीत. वाटलं तर मनापासून करायचं, नाहीतर नाहीच करायचं हे साधं तत्त्व पाळायचं. त्यामुळे आपसूकच इन्फॉर्मल वागणं- बोलणं जोडीनेच आलं. हं, पण प्रत्येक ठिकाणी तसं वागता येईलच असं नाही. थोडक्यात जीभेला जड वाटणारा सापेक्षता नावाचा एक जड शब्द इथं वापरावा लागतो.
आपलं एखाद्यासोबतचं फॉर्मल- इन्फॉर्मल वागणं हे व्यक्तिसापेक्ष असतंय. एखादी व्यक्ती आपल्या जितकी जवळ, तितकं आपलं त्यांच्यासोबतचं वागणं- बोलणं इन्फॉर्मल. फॉर्मेलिटीच्या बाबतीत याच्या अगदी उलट, हे माझं निरीक्षण आहे. प्रत्येकाला ही बाब लागू असेलच असं नाही. पण सर्वसामान्यपणे सर्व जण असंच वागतात असं एकंदरीत दिसतं. त्यामुळेच कदाचित एखादा नेहमीचा इन्फॉर्मल वागणारा आपल्याशी एकदम फॉर्मल टर्ममध्ये बोलायला लागला, की मी सावध होतो. दाल में कुछ काला है, हे जाणवतं. दोन घ्या- दोन द्या या ट्रॅकवरून गाडी घसरलेली दिसली की ही परिस्थिती जाणवते. अर्थात आपल्या अगदी जवळचे लोक जेव्हा फॉर्मेलिटी जपण्याचा प्रयत्न करतात, किंवा तसं दाखवू लागतात, तेव्हा ते आपल्यापासून दूर जाण्याचाही प्रयत्न करतात की काय अशी शंकाही येते मला. अर्थात हेही पुन्हा व्यक्तिसापेक्षचं.
पत्रकारितेचे धडे गिरवताना रानडेमध्ये वर्गात काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या एकमेकांच्या नात्यांमध्येही एक राजकारण असतं. एकमेकांशी संवाद साधायची भाषा याच राजकारणावर अवलंबून असतं. एखाद्याला मान देणं, एखाद्यासमोर नमतं घेणं, एखाद्याला चार गोष्टी समजावून सांगणं- बोलणं हे सगळं या राजकारणावर अवलंबून असतं, अशा आशयाच्या होत्या त्या गोष्टी. अर्थात या शिक्षणाचा सारा संदर्भ संवाद आणि संवादशास्त्र हा होता. इथंही मी संवादशास्त्राच्या (दैनंदिन हं, रोजच्या जगण्यातलं, अजिबात थेरॉटिकल नाही. नो फॉर्मेलिटी अॅट ऑल) पातळीवरंच त्याचा विचार करतोय. राजकारणाच्या जागी फक्त मैत्री ही गोष्ट विचारात घेतलीये एवढंच. अर्थात मैत्रीमध्येही पुन्हा राजकारण आलंच. कारण एखाद्याला मी जवळचा मानत असलो, तरी त्याच्या लेखी मी त्याच्या जवळचा असेलंच असं नाही. कारण पुन्हा तिच गोष्ट व्यक्तिसापेक्षता.
तर निख्खळ मैत्री हा पॅरामीटर कॉन्सन्ट म्हणून गृहित धरला, तर ही मैत्री जेवढी घट्ट तेवढा आपला एकमेकांसोबतचा संवाद अधिकाधिक फॉर्मली इन्फॉर्मल होत जातो, हे माझं एक असंच केलेलं इक्वेशन आहे. जोपर्यंत मी सायन्सचा विद्यार्थी होतो, तोपर्यंत इक्वेशन्स, त्यासाठीची डेरिव्हेशन्स ही पाठ करून, रट्टा मारून लिहिण्यावर भर होता. सायन्समधून सोशल सायन्सेसकडे वळालो की जाणवलं ते किती फालतू होतं ते. आता आपली इक्वेशन्स आपणच मांडतोय, नी त्याची डेरिव्हेशन्सही आपणंच लिहितोय. वाटलं तर स्वीकारा, नाही तर व्यक्तिसापेक्षतेची चौकट विचारात घ्या. मी म्हणेन द्या सोडून. इतकं साधं आणि सरळ आहे हे. खरं तर व्यक्तिसापेक्षता काय नी सापेक्षता काय, अनुभवल्यानंतरच समजते.
विज्ञानाच्या नियमांमध्ये पहिल्यांदा जेव्हा कधी सापेक्षता हा शब्द ऐकला- वाचला होता, तेव्हा नक्कीच अंगावर काटा आला असणारे. त्यावेळी गतीचे नियम आणि त्याच्याशी जोडून आलेली सापेक्षता असलं काहीतरी आठवतंय मला. एका गाडीचा दुसऱ्या गाडीच्या सापेक्ष असणारा वेग अमूक ढमूक टमूक होता, तर दुसरी गाडी पहिलीच्या आधी किती वेळ पोहोचेल असली गणितं होती त्यावेळी. जड वळणाचा शब्द बघूनच मी आपलं तसली गणितं एकतर उशीराने सोडवायचो किंवा सोडूनच द्यायचो. विज्ञानाकडून समाजविज्ञानाकडे वळालोय, तर सापेक्षतेची गणितं आणखीचं अवघड होऊन बसलीत. जवळचा कोण नी लांबचा कोण, जवळच्याच्या लेखी जवळचा कोण नी जवळच्याच्या लेखी लांबचा कोण, माझा एखादा जवळचा त्याच्या एखाद्या जवळच्याविषयी काही वेगळा विचार करत असेल तर मग तो लांबचा कसा नी जवळचा कसा.... सतराशे साठ भानगडी. माणसं बदलली तरी सापेक्षता कायम. त्याच्यावर रामबाण उपाय म्हणून मी या इन्फॉर्मेलिटीचा विचार करतो. कोणाला काय विचार करायचाय तो करूदेत, मी मला वाटतंय ते करणार. सोप्पं आहे हे.
पत्रकारितेच्या व्यावसायिक जगातही हे फॉर्मली इन्फॉर्मल वागणं एक वेगळं औषध वाटतं. माणसं जोडायची, माणसांमध्ये मिसळून बोला-चालायचं म्हटलं की त्या फॉर्मल भिंती नको वाटतात. अर्थात ते समोरच्यावरही अवलंबून असतंच, पण आपण प्रयत्न केला तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्याला इन्फॉर्मल वागता- बोलता येतं येवढं नक्की अनुभवलंय मी. मोजकी लोकं अशी आहेत की त्यांच्यासोबत बोलताना या सगळ्या भिंती आपोआप बाजूला होतात. वय, हुद्दा अशा बाबींचा काहीएक फरक पडत नाही. त्यानंतर जे काही मिळतं, ते निश्चितच आनंददायी आणि समाधानकारक असंच असतं. मोजके मित्र असे आहेत की बोलायची सुरुवात शिव्यांनीच करणार. मोजकी लोकं अशी आहेत की जी नावाचा प्रेमळ अपभ्रंश करूनच हाक मारणार. हे त्यांचं आपल्यासोबतचं फॉर्मल वागणंच झालंय की. कोणतीही फॉर्मेलिटी न पाळणं हिच तिथे फॉर्मेलिटी बनते. हिच तर गम्मत आहे ना फॉर्मली इन्फॉर्मल वागण्यातली. 

रविवार, २६ एप्रिल, २०१५

वो कागझ की कश्ती...मित्राच्या दुकानात उभा होतो. गप्पा- गप्पांच्या ओघात त्याच्या ट्रिपचा विषय निघाला. तो म्हणाला, लय धम्माल केली आम्ही त्या ट्रिपला. सगळे मित्र मित्र मिळून गेलो होतो. तिथं गेल्यावर तुम्हाला नवल वाटंल, पण आम्ही अगदी लपाछिपीसुदा खेळलो. ल्हानपणी खेळायचो तशी. आता तसं काय करता येत नाय म्हणून त्या धिंगान्याच्या आठवनींनीच ट्रिपवरनं येताना लय रडलो. पण लय मजा आली.... ल्हानपनचे दिवस लय न्यारे व्होते. ल्हानपनी लय धमाल केली, आता तसं काही करता येत नाही...

त्याच्यासोबतच्या त्या गप्पांमध्ये आमच्या लहाणपणींच्या आठवणींनाही ओझरता उजाळा मिळाला. मागे एकदा एका सरांच्या एफबी स्टेटसवर वो कागझ की कश्ती वा बारिश का पानी... या गझलचा उल्लेख होता. त्यावेळीही असंच झालं होतं. ओझरता का होईना, पण लहानपणी काय काय केलंय, याचा आढावा घेतला होता. मित्राच्या दुकानावरून घराकडे परत येताना, तिच गझल डोक्यात सुरू होती. मला तशी खूप शांत अशी गाणी फारशी आवडत नाहीत. सालं जमान्याभरचं दुःख त्या शांत चालींमध्ये भरून, सेंटी व्हायला कोण सांगतं, त्यापेक्षा उडत्या चालीची गाणी ऐका नी मस्त मूड बनवा ही माझी त्या मागची फिलॉसॉफी. ही गझल त्याला तशी अपवादच.

शाळेत असताना बापाच्या वा आजोबांच्या नावावरून मित्रांना चिडवणं, मुद्दाम घरच्यांसमोर भाऊ कुटं गेला, सांगू का भाऊला असं म्हणणं, शाळेच्या बाहेर गोळ्या विकणाऱ्या आजोबांजवळ मिळणारे ते चाराण्याचे छोटे समोसे, बोरकुटच्या पुड्या शेअर करून खाणं, त्यावेळी अगदी नव्या नव्या आलेल्या ल्पेनलिबेच्या अटीवर वेगवेगळ्या बेट लावणं सगळं सगळं असं डोळ्यासमोरून गेलं. दोन गोष्टी तर कायम लक्षात असतात, एक म्हणजे ते पारलेचं चॉकलेट आणि दुसरी म्हणजे बॉबी. पारलेच्या त्या चॉकलेटची चव आत्ताच्या कॅडबरीलाही लाजवले अशीच भासते. त्या पिवळ्या पिवळ्या बॉब्या हाताच्या पाचही बोटात घालून, बोटं नाचवत नाचवत खाण्यातील मजाही काही वेगळीच होती. आता ते सगळं संपलं असं म्हणता येत नाही, पण तसं करायला आता लाज वाटते. 

मित्राच्या बोलण्यातून अशाच सर्व गोष्टींचा रेफ्रन्स आला. आमचा एक कॉमन दोस्त आणि हा पठ्ठा दुकानात फावल्या वेळेत पेप्सी कांड्या चोखत बसल्याची आठवण त्याने काढली. उन्हाळ्याच्या सुट्टीत फलटणला गेल्यावर गारेगारवाल्याकडून ते गारेगार आइस्क्रीम, पेप्सीच्या कांड्या घेऊन भर उन्हात ते खाण्यात मिळणारा गारवा एसीमध्ये बसून आइस्क्रीम खाण्यातही नाही जाणवत कधी. आत्ताच्या लहान पोरांना पेप्सी म्हणजे कॅनवाली किंवा बाटलीवाली पेप्सीच आठवते. फॅन्ड्री बघायला थेटरमध्ये गेलो होतो. पिक्चरमध्ये एक- दोन ठिकाणी तशाच पेप्सीचा उल्लेख आहे. ते पेप्सी ऐकल्यावर आमच्या समोरच्या लाइनीत बसलेल्या एका लहान पोराना चुळबुळ सुरू केली होती. त्याच्या पप्पाला विचारत होता, पप्पा पेप्सी म्हणतायेत, पण दिसत तर कुटं नाही. त्याचा पप्पा त्याला काहीच सांगू शकत नव्हता. बाहेर गेल्यावर घेऊ, आता पिक्चर बघ असं सांगून त्याने आपल्या कार्यकर्त्याला शांत केलं. ना पप्पाची चुकी ना त्याच्या कार्यकर्त्याची. जमानाच बदलतोय तर काय.

आपण आता मोठ्ठे झाल्यासारखे वागायला लागलो, म्हणजे काय लय शाणे झालो का. आनंद मिळवायच्या ल्हानपणीच्या पद्धती लय सोप्या होत्या. मोठं व्हायला लागलो, तशा त्या पद्धती अवघड करत चाललोय. ल्हानपणी एखाद्याची चप्पल उलटी करून ठेवली, तरी काय आनंद व्हायचा. आता पायात वूडलँड, नायके, अदिदासचा घातला तरी आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. आनंदच नसतो ना, पैशाचं मोल तपासतो आपण. पैशाचं मोल तपासायला गेलं की मग आनंद महाग होतो. आपण जेवढं मोठं होणार तेवढा महाग आनंद आपल्याला हवाहवासा वाटायला लागतो. पळतोय आपण त्या महाग आनंदामागं. जगणं विसरून...
गप्पा- गप्पांच्या ओघात असलं काही तरी भन्नाट चर्चेला आलं. डोक्यात ते सगळं घोळ घोळ घोळलं. बॅकग्राउंडला वो कागझ की कश्ती होतंच. ते असंच सुरू राहणार आहे असं दिसतंय. निरागसता संपून मतलबीपणा सुरू झाला की सालं हे असंच व्हायला लागतं. छोट्या, साध्या गोष्टींमधून मिळणारा आनंद आपल्याला नकोस वाटायला लागतो. आपण मोठे व्हायला लागतो. छोट्या गोष्टींची जागा ब्रँड घेतात. मग ब्रँड्स नी त्यांच्यामुळे मिळणारे एक्स्पिरिअन्स यांची तुलना करायला लागतो, पुन्हा तो आधीचा आनंद महाग करत जातो. थोडक्यात काय तर मोठ्ठं व्हायचंय तर महाग आनंद निवडा. छ्या. नाही पटत राव. पुढच्या वेळी दोस्ताच्या दुकानावर गेलो ना की मीही त्या पॅप्स्या चोखून खाणारच आहे. वो मजा कुछ और ही है. वो कागझ की कश्ती, वो बारिश का पानी...   

मंगळवार, १४ एप्रिल, २०१५

फिलिंग ब्लेस्ड...

 आज वाढदिवस होता. तिशीत पदार्पण केलं. त्यामुळे आपसुकचं वाढदिवसाचं नवल वाटणं बिटणं तसं नव्हतंच. तरीही यंदाचा वाढदिवस माझ्यासाठी खास बनला. बोले तो फिलिंग ब्लेस्ड नावाचं ते स्टेटस असतंय ना, आपण कधीतरी एफबीवर त्या स्माइलीसह वापरतो, तसं. त्याला कारणही तसंच खास होतं. आमच्या आज्जीबाईंच्या खास बड्डे विशेश. 'यौग्येस, वाडदिवसाच्या शुभेच्चा रं.'

माझ्या दोन आज्ज्या, आक्का नी गंगाआज्जी, दोन्हीही माझ्यासाठी तितक्याच खास आहेत. आक्का म्हणजे वडिलांची आई नी गंगाआज्जी म्हणजे आईची आई. आक्का तिकडे मलवडीला, तर गंगाआज्जी फलटणला रहायला. गेले काही दिवस आम्ही सगळेच कौटुंबिक कार्यक्रमानिमित्ताने एकत्रच आहोत. आक्का नुकतीच मलवडीला गेली असली, तरी गंगाआज्जी पुण्यातच आहे. काल रात्री झोपायला तसा उशीरंच झाल्यानं नी आज सुट्टीच असल्यानं, मी सकाळी थोडं निवांत उठायचाच प्लॅन केला होता. त्यातच बड्डे बॉय म्हटल्यावर तसा कोणी त्रास द्यायचाही काही संबंध नव्हता. त्यामुळंच अगदी निवांत झोपलो होतो. पण वाढदिवसा दिवशीही मी असं उशीरापर्यंत लोळत पडणं बहुतेक आज्जीला रुचलेलं नसावं. पण म्हणून तिनं मला ओरडून उठवलं नाही, की गदागदा हलवून जागंही केलं नाही. एक छान हाक मारली, नी माझ्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच अशा अगदी औपचारिक शुभेच्छाही दिल्या.

आज्जीनं मला कधीही 'योगेश' असं म्हटलेलं आठवत नाही. ती 'यौग्येस' असाच माझ्या नावाचा उच्चार करते. मलाही ते खूप आवडतं. आज्जी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जसं व्यक्तिमत्त्व उभं राहिल ना, तशीच ती आहे. पाणीदार डोळे, चेहेऱ्यावर वयोमानाने आलेल्या सुरकुत्या, तरीही एखाद्या सुंदर पोरीला लाजविल अशी तुकतुकीत नी एव्हर ग्रीन म्हणावी अशी कांती, काष्टा काढून नेसलेलं लुगडं नी चोळी, कंबरेत वयोमानानेच आलेला बाक, नी वय सगळीकडे आड येत असलं, तरी एखाद्या तरण्याताट्यालाही लाजवेल अशी काम करण्याची क्षमता. एसटीचा प्रवास अजिबातही सहन होत नसल्यानं, निव्वळ एसटी नको म्हणून पुण्याहून फलटणपर्यंतचा प्रवास टू-व्हिलरवरून करायची तिची तयारी याही वयात तिच्या मानसिकतेची झलक दाखवते.

आक्काचंही काहीसं असंच. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या कोणत्याही विषयावर
बोलण्यात तिचा हातखंड. वयोमानाने शरीर थकलेलं असलं, तरी तिची इच्छाशक्ती तो थकवा दूर करते बहुदा. घरातलं एखादं कार्य म्हणजे तिचा उत्साह आमच्याही पुढे. लेक-सुना- नातवंडं कमी पडली, तर आमची ही आज्जी स्वतः पुढे होऊन सगळं करते अजूनही. गावच्या राजकारणात काही काळ सक्रीय असल्यानं गावातल्यांची प्रत्येकाची नावं, त्यांचे इकडचे तिकडचे नातेवाईक, त्यांच्या नातेवाईकांचे नातेवाईक सगळे तोंडपाठ. त्यामुळे मग एखादा नवा माणूस समोर आला, की त्याला अशा माणसांचे, लागले तर गावांचे, गाव नाहीच जुळलं तर मग त्या त्या भागाचे संदर्भ देऊन आक्का आपली गप्पा करायला मोकळी. बोलता बोलता दोन- चार म्हणी यू समोर टाकते. या म्हणी इतक्या चपखलपणे बसतात, की त्या ज्या कोणाविषयी असतील, तो लाजलाच म्हणून समजायचं. त्यामुळेच तिचा असा संवाद केवळ दोन व्यक्तींपुरताच मर्यादीत न राहता, तो इतरांनाही सामावून घेतो. इतका की एखाद्यावेळी तिची नुसता विषय जरी निघाला, तरी तिच्या गप्पांमधील किश्श्यांनी हसून हसून पुरेवाट होते.

दोन्ही आज्जांना माझं नी बायकोचं कौतुकही खूप. गंगाआज्जी तिला सोनलंच म्हणते. सोनाली नोकरी करते त्यामुळं तिला खूप भारी वाटतं. नोकरी करते, मग घरी किती वाजता येते, आल्यावर स्वैपाक करते का, मग जेवते कधी, झोपते कधी, गाडी कशी चालवते अशा सगळ्या गोष्टींची ती तिच्याकडूनच माहिती करून घेते. सोनालीला ज्या गोष्टी येत नाहीत, त्या स्वतः शिकवते. न रागवता, न चिडता, आणि कोणताही बडेजाव न करता. पुण्यात रहा म्हटलं, की 'तुम्ही सगळे जानार, मग मी बाबा एकटी ऱ्हाऊन काय करणार दिवसभर. मपला जाती फलटणला. मला निऊन घालीव,' असं तिचं पालूपद एकदा का सुरू झालं, की मग मात्र तिला फलटणला परत पाठविण्याशिवाय पर्याय नसतोय. आक्काचंही तसंच. माझं लग्न रजिस्टर पद्धतीनं झालं होतं. लग्नानंतर आम्ही दोघंही पहिल्यांदाच गावी गेलो. त्यावेळी नातसून घरी आली, म्हणून आक्काने जे काही कौतुक केलं होतं, त्याने मी खरंच भारावून गेलो होतो. सोनालीला साडी, मला टॉवेल-टोपी देऊन, 'मी नाय करनार तर कोण करनार असाच,' प्रश्न तिनं मला विचारला होता. त्यावेळी मी अनुभवलेले आक्का- दादा त्यापूर्वी नी त्यानंतरही कधीही अनुभवले नाहीत.

फलटणचे नाना गेलेल्याला बरीच वर्षे झाली. दादा गेलेल्याही आता दोन वर्षे होत आली. त्यानंतरच्या काळात दोन्ही आज्जांचं करारीपण काहीसं कमी झालंय. पण म्हणून त्या खचल्यात असं अजिबातही नाही. गंगाआज्जी अजूनही तिच्या लेकांच्या मदतीला हॉटेलवर धावून जाते, पडेल ती सगळी कामं करते. आक्का अजूनही गावच्या जमिनींवर बांधाला जाऊन स्वतः उभी राहते, पाण्याची मोटर सुरू करायला घरातलं कोणी हललं नाही, तर स्वतः शेताच्या दिशेने निघते. दोन्ही आज्ज्यांच हे वागणं त्यांच्यामधलं वेगळेपण पुन्हा पुन्हा आमच्यासमोर आणून ठेवतं. आज सकाळीही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, आपल्या नातवाला तो शहरात राहतोय म्हटल्यावर मोडक्या तोडक्या का होईना पण शहरी भाषेतल्या शुभेच्छा द्यायचा प्रयत्न तिनं केला. नाहीतर तिला तशी कोणतीही गरज नव्हती. त्यामुळेच आज दिवसभरात मला वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छांमध्ये माझ्या आज्जीनं दिलेल्या शुभेच्छाच खूप आवडल्या. दिवसाची सुरुवातच त्या शुभेच्छांनी झाली. त्यामुळं दिवसही खूप छान गेला. दिवसभर तोच आवाज कानात घुमत होता. 'यौग्येस, वाडदिवसाच्या शुभेच्चा रं...'