शुक्रवार, १५ जून, २०१२

वाकळ...मायेच एक रूप

एका कौटुंबिक कामानिमित्त गावाकडे यावं लागलं. त्यातून पुढे ओघाओघानेच मलवडीला जाणं ही येतंच. मलवडी म्हणजे माझं गाव. मुंबइकडची लोकं सातारा जिल्ह्यातल्या या गावाला 'खंडोबाची मलवडी' म्हणूनही ओळखतात. आम्ही आपलं 'आंधळी-मलवडी'च म्हणतो. मी शक्यतो इकडे यायची एकही संधी चुकवत नाही. सगळा डोंगराळ भाग आणि जिथं मोकळी जागा तिथं ऐसपैस माळरान. गावापासून साधारण दोन-एक किलोमीटरवर अशाच मोकळ्या माळावर आमचं घर आहे. आज याच घरासमोर माळावरची मोकळी हवा खात पडलोय. खाली मुरमाड जमीन आहे, अन वर सगळं मोकळं आभाळ दिसतंय. नेहमी अगदी सपाट फरशीवर झोपणार्या माझ्यासारख्याला खालची
भरपूर दगडं असलेली मुरमाड जमीन अजीबातही रुतंत  नाहीये. कारण आहे ती मी
खाली अंथरलेली वाकळ!

'वाकळ' हा शब्द तसा गांवढळच, पण ज्यांना या शब्दापाठची मेहनत अन महती आहे,
त्यांना तो शब्द तितकीच मायेची उब देणारा वाटतो. मलाही तो तसाच वाटतो. आमच्या या शब्दाला पर्यायी शब्द सांगायचा, तर गोधडी. आणखी असेल तर मला माहिती नाही. मी खाली अंथरलेली वाकळ माझ्या आक्कानी, माझ्या आज्जीने शिवलेली आहे. अन ती  एवढी मोठी आहे की एकावेळी चार-पाच जणं तरी त्यावर आरामात लोळू शकतात. मला आठवतंय तसं, जोपर्यंत सगळं ठिकठाक होतं तसं आक्का दर उन्हाळ्याला तिच्या दोन-चार मैत्रीणींना गोळा करून अशी निदान एखादीतरी वाकळ शिवून पूर्ण करायची. आता त्यातल्याच वाकळी साठून साठून त्यांची मस्त थप्पी लागते  घरात. त्यातलीच एक वाकळ मी पुण्यात होस्टेलवर राहायला आल्यानंतर तिनं मला दिली होती. त्यामुळेच मला अजूनही गादी घ्यायची गरज पडली नाही. आता तश्याच वाकळीपैकी एक मी खाली अंथरलीये आणि एक पांघरायला घेतलीये.

सहसा अंथरायची वाकळ पांघरायला अन पांघरायची अंथरायला केलेली आक्काला अजिबातही चालत नाही. त्याला कारणही तसंच आहे. पांघरायची वाकळ त्यातल्या त्यात जरा नाजूक अन दिसायला तेवढीच मस्त. अंथरायची वाकळ खूप मोठी अन खास अंथरायला शिवलेली. त्यामुळे ती तशी दणकटच. दोन्ही प्रकारच्या वाकळी शिवायला घरातलीच वर्षभर साठलेली अन टाकून देण्याची लायकीची कापडं, लुगडी अन त्यांच्या चिंध्या वापरलेल्या. वाकळी शिवायला मजबूत धागा, धागा नाही दोराच. तसं बघायला गेलं तर 'टाकाउतून टिकाउ' चा संदेशही या वाकळा देतात. फक्त त्याची तशी जाहिरात होत नाही येवढच. येवढ सगळं टाकाउ अन जाडं-भरड सामान असलं, तरी या वाकळी बघितल्यावर एखाद्या डिझायनरालाही कौतुक वाटेल इतक्या त्या सुंदर अन व्यवस्थित असतात. चौकोनी त्या चौकोनीच अन आयताकृती त्या आयताकृतीच. अगदी आतल्या चिंधी पासून बाहेरच्या कडेपर्यंतकोपरापर्यंत सगळं अगदी जागच्या जागीच. कुठेच गोळा होण्याचा प्रकार नाही. अन या प्रत्येक वाकळी वरची प्रत्येक सुरकुती म्हणजे आपल्या आज्जांच्याच चेहेर्यावरच्या सुरकुत्यांसारखी. जेवढ्या सुरकुत्या तेवढ वय जास्त, अन तितकीच ती सुंदर!

कुतूहलापोटी राहावून मी एकदा आक्कालाच विचारलं- या वाकळा कश्या शिवता गं तुम्ही? तिन सांगितलेलं आता पुसटस आठवतंय. 'लुगडी, फाटकी कापडं, जमलं तर चिंध्या वर्षभर जमा करायच्या. उंदरानी कुरतडू नयेत म्हणून जपून ठेवायच्या. उन्हाळा आला की त्या चिंध्यांच भलं मोठ्ठ गाठोडं होतं. ते न्यायचं विहिरीवर नाहीतर नदीवर. सगळ्या चिंध्या धुवायच्या. त्या उन्हात चांगल्या कडक, अगदी इस्त्री केल्यासारख्या वाळवायच्या. मग उन्हाळ्यात दुपारी घरची काम आवरली की बसायचं या चिंध्या घिऊन घराजवळच्या मैतरनीसोबत. महिनाभरात एक वाकाळ करायची की झालं. दोघींनी दुबाजूनी नाईतर चौघींनी चार बाजूनी सुरवात करायची. महिनाभर लावून धरलं की झालं.'

महिनाभराच्या या त्यांच्या एक कलमी कार्यक्रमामध्ये सुनांच्या, नातवंडांच्या चौकश्या, भरपूर गप्पा, अन तंबाखूच्या मिसरीच्या अनेक डब्या कधी संपतात ते कुणाच्याच लक्षात येत नाही. त्या नातवंडांच्याच प्रेमापोटी त्यांच्या आज्ज्या अशा वाकळी शिवतात. वाकळी शिवून झाल्या, की त्या ज्यांच्यासाठी शिवल्यात त्यांची वाट बघत बसतात. नातवंड आली, तर या वाकळीच्याच अंथरुणांवर त्यांना झोपवत त्याचं कौतुक करायचं, त्यांचे लाड करायचे, गावाकडच्या गोष्टी सांगायच्या, जास्तच धिंगाणा केला कुणी तर 'मुडदा बशीवला तुजा... ' म्हणत दोन-चार धपाटे घालत, अशाच एखाद्या वाकळीवर झोपवायचं. अन कुणीच नाही आलं, तर वाकळी जश्याच्या तश्या पुढच्या वर्षीसाठी ठेवायच्या. व्यवस्थित झाकून. शेवटी आज्जीची मायाच ती. त्याच आज्जीच्या मायेच हे एक रूप असावं. वाकळ.

अजूनही त्या वाकळीची ओढ कमी होत नाही. काही असलं तरी या वाकळीवर जशी शांत झोप लागते न, तशी शांत झोप कुठ लागायचीच नाही. फोमच्या मउ मउ गाद्या असूदेत, वा मग त्या आयत्या स्प्रिंगच्या गाद्या. सगळं असलं तरी आपल्याला काहीतरी रुतनारच. काय रुततय हे शोधायचा प्रयत्न केला, तरी आपल्याला काहीच सापडत नाही. त्याचं कारण हीच माया असावी. त्या आयत्या गाद्यांमध्ये ती नसते, म्हणूनच आपल्याला काहीतरी बोचत. काय ते दिसत नाही. माया कशी दिसणार ना? ते बोचण थांबवायचं असेल, तर अशीच एखादी वाकाळ शोधा, अशीच आपल्या आज्जीन कुठंतरी थप्पीवर रचून ठेवलेली मायेची अंथरूण-पांघरूनं देणारी एक मायेची वाकाळ!