रविवार, १५ जानेवारी, २०१७

ऐवज

बातमीदारी सुरू असताना या वह्या, नोटबुकं, डायऱ्या तशा साठतच गेल्या. भरलेली वही परत उघडून बघायची वेळ फार कमी वेळा आली. जेव्हा केव्हा तसा प्रसंग आलाच, तेव्हा आपलं तेवढ्यापुरतं तेवढं थांबून काम आवरतं घेत होतो. रविवारचा निवांतपणा असल्यानं  आज या वह्या, नोटबुकं, डायऱ्यांकडं जरा शांतपणे पाहता आलं. साधारण सहा वर्षांच्या भटकेपणातली अनेक गुपितं या डायऱ्यांमधून नोंदवलेली सापडली. बातमीदारीच्या सुरुवातीच्या काळापासूनच्या त्या नोंदी चाळताना त्या त्या वेळचे संदर्भ उगाचच तपासून पाहायला लागलो. काय
लिहिलंय, कसं लिहिलंय, त्या वेळी घाई-गडबडीत नोंदवलं असेल का ते वहीत, की फोनवर बोलून ते लिहिलेलं असावं, की प्रत्यक्ष भेटीत समोरासमोर बसून लिहिलेलं असावं, वगैरे वगैरे. त्या त्या कार्यक्रमांच्या, ठिकाणांच्या, व्यक्तींविषयीच्या, काही छापण्यासाठीच्या, काही न छापण्यासाठीच्या अशा सगळ्याच त्या नोंदींमुळे दुपार कधी संपून गेली तेच समजलं नाही. लक्षात आलं या वह्या- डायऱ्या म्हणजे निव्वळ नोंदी नाहीत, ऐवजच आहे. तसंही बातमीदारांकडे दुसरं असतं तरी काय. या अशा नोंदी नी जोडलेली माणसं, हाच काय तो ठेवा. म्हटलं तर काहीच नाही, नी म्हटलं तर सारं काही.

विद्यार्थीदशेमधून बातमीदारीकडे प्रवास करतानाचा काळ आठवत बसलो. कॉलेजमध्ये असताना लिहायला वह्या नी रजिस्टरंच. पुठ्ठ्याच्या वह्या, फ्लेक्जिबल रजिस्टरं... छोट्या वह्या हाताळायला सोयीस्कर, रजिस्टरांमध्ये लिहायला भरपूर जागा. शाळेमधून कॉलेजला गेलो ते वह्यांमधून रजिस्टरांकडे असा प्रवास करून. कॉलेज पूर्ण करून बातमीदारीकडे वळू लागलो, तसा एक असाच हवाहवासा बदल करावासा वाटे. रजिस्टरांकडून छानशा दिसणाऱ्या डायऱ्यांपर्यंतचा तो बदल असे. दोन- तिनदा प्रयत्नही करून पाहिला, पण प्रत्यक्षात तसा बदल नंतर कधी केला नाही. त्यातल्या प्रॅक्टिकल अडचणी लवकरच समजल्या. त्या ऐवजी फिल्डवर असताना अगदी फ्लेक्सिजबल, वेळप्रसंगी खिशात बसेल, नाहीतर फारतर पाठीमागे कमरेभोवतीच्या पट्ट्यामध्ये सहज अडकवता येईल, किंवा गाडीच्या हेडलाईटजवळच्या जागेत अडकतील अशा वह्या वा डायऱ्या हातात खेळू लागल्या. बड्या बातमीदारांचे, त्यांच्या स्टाइलचे काही किस्सेही ऐकायला मिळालेले होते. कोणी काहीही न टिपून घेताही कशी हेडलाइन लिहून जायचे, अगदी बसच्या तिकिटाएवढ्याच जागेत कोणी महत्त्वाची बातमी कशी टिपून घ्यायचे, कोणाचं अक्षर किती भयंकर तरी बातमी किती भारी असले ते किस्से असत. असलं काही ऐकल्यावर आपल्यालाही डेरिंग करू वाटे, पण पुन्हा आपल्याच डायरीवर विश्वास ठेवायच्या सवयीमुळं पेन आपसूकचं हातात धरला जाई. तळहातावर दोन बसतील अशा छोट्या डायऱ्यांपासून ते मग लेटरपॅडच्या आकारापर्यंतच्या या डायऱ्या आता माझ्याकडच्या ऐवजात ठळकपणे दिसतायेत. कॉलमांचं गणित अनुभवायला मिळाल्यानं, लिहितानाही दोन कॉलमात पानं लिहियाची सवय जडली नसती, तरच काय ते नवल होतं. या डायऱ्या नी वह्यांमध्ये एका पानावर दोन कॉलमात लिहिलेला मॅटर दिसतोय. नेहमीच्या प्लॅनिंगसाठी वापरलेल्या दोन-चार मोठ्या डायऱ्या आणि इतर पाच-पन्नास वह्या असलेला हा ऐवज हॉलमधल्या बॉक्समध्ये अलगदच बसला.

वह्यांमध्ये लिहिताना नोंदवून घेतलेले मोबाईल वा टेलिफोन नंबर, ते लगेच लक्षात यावेत म्हणून मुद्दाम समासामध्ये लिहायची लावलेली सवय, फोन नंबरच्या यादीत असे नंबर नोंदवलं की त्या नंबरवर बरोबरची खूण करून, त्या त्या डायरीच्या कव्हरवर 'कॉन्टॅक्ट्स अपडेटेड'चा मारलेला शेरा असं सारं काही दिसायला लागलं. या नंबरांच्याच जोडीने पुढे आलेली व्हिजिटिंग कार्ड्सही आपसूकच आठवली. या ऐवजामध्ये दोन मोठ्ठ्या व्हिजिटिंग कार्ड होल्डर्सचीही भर पडली. टस्किगी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, ब्रिटिश कौन्सिलवाली मंडळी, काही बडे वैज्ञानिक, विद्यापीठांचे कुलगुरू, कंपन्यांचे सीईओ, मंदिराचे पुजारी, कुठले कुठले एजंट, नवउद्योजक, 'समाजसेवक' असं कार्डवर लिहिलेले राजकारणी अशा सगळ्याच प्रकारच्या व्यक्तींची ही कार्ड तो तो माणूस आठवायला भाग पाडत होती. ही कार्ड नेमकी कधी घेतली, कोणत्या कार्यक्रमांमध्ये आपण यांना भेटलो असू वगैरेचाही विचार झाला. आठवून भारी वाटलं. त्यांच्यासोबत झालेल्या गप्पा, त्या संदर्भाने डायऱ्यांमध्ये सापडलेल्या काही नोंदी आणि त्या अनुषंगानेच त्या त्या वेळी लिहिलेल्या बातम्याही आठवल्या. डायऱ्यांवर लिहिलेल्या तारखा नी ही व्हिजिटिंग कार्ड होल्डर्स भूतकाळामध्ये नेण्याच्या ताकदीची आहेत हे लक्षात आलं. बॉक्स भरल्यावर त्याच्यावर झाकण टाकलं. कुशन बसवून पुन्हा पूर्वीसारखा केला. व्यवस्थित लावण्यासाठी म्हणून तो ढकलायचा प्रयत्न केला. त्याचं वजन सहजच जाणवलं. आपलं आपल्यालाच पुन्हा समाधान. आपला ऐवज वजनदार आहे, बर कां. उगा काय केलं पाच वर्षात म्हणायला नको कोणी. म्हटलंच तर आता 'हा बॉक्स दाखवून, थोडं ढकलून बघा.' म्हणायचं. कल्पनेनेच हसायला आलं.

पंढरपूरची वारी, मुंबईतली सायन्स काँग्रेस, विद्यापीठातले 'आविष्कार', सिनेट नी मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठका, 'एनडीए'च्या पीओपी, थर्टी फर्स्टच्या रात्री, शाळांचे पहिले दिवस, कोणाकोणावरचे भानगडींचे आरोप, विद्यार्थी संघटनांची आंदोलनं, मागच्या महापालिका निवडणुका असलं लयं काय-बाय पुन्हा एकदा आठवायला मिळालं. असाइन्मेंटच्या निमित्ताने पुण्याबाहेर गेल्यावर त्या त्या ठिकाणच्या कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या वेगळ्या नोंदीही पाहायला मिळाल्या. बरं वाटलं. बातमीदारीचा हा ऐवज फुकटात फ्लॅशबॅकचा सिनेमा दाखवणारा ठेवा ठरतोय. जाम आवडला आपल्याला. शेवटी मनातल्या मनात स्वतःच स्वतःच्या पाठीवर थाप मारून घेतली. ऐवज गोळा करून ठेवण्याची एक चांगली सवय लावल्याबद्दल. सेव्हिंगच ते. एका वेगळ्या अर्थानं. आठवणी जतन करून ठेवणारं.