रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

एकटेपणाच्या अंतराळातून...मी योगेश. कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा नवरा, कुणाचा मित्र, अजून कुणाचा कोण, तर कुणाचा कोण. पण मी स्वतः स्वतःचा कोण? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत. मी माझा कुणीच नाही... अजब वाटतं थोडं हे. आपल्याकडे कुणाचं कुणीच नसलं, तर त्याला एकटा वा एकटी असं म्हणतात. ही बाब आता स्वतःविषयी लागू केली, तर मी एकटा, असंच आपण म्हणू शकतो. उगाच कशाला सांगायचं मग, की मी अमक्याचा अमूक अन तमक्याचा तमूक. मी एकटा ही आपली स्वतःची स्वतःला पटणारी ओळख पुरी होत नसते का आपल्याला. नसावी. म्हणूनच तर कुणी कधी लवकर तसं सांगत नाही एखाद्याला, मी एकटाच म्हणून.

तरीही का कोण जाणे, एकटेपणाची जाणीव सगळ्यांनाच छळत असावी, असं मला नेहमीच वाटत आलंय. कदाचित, मी एकटा आहे असं मला वाटतं, असं आपल्यापैकी अनेकजण अनेकदा एकमेकांना सांगत असतो म्हणून ते असेल. त्या शब्दांपाठीमागे त्या-त्या स्थळ-काळाचं बंधन असतं. त्यानंतरच्या काळामध्ये आपण समाजामध्ये सामावलेलेच असतो. त्यावेळी अगोदरच्या एकटेपणाचा संदर्भ ध्यानी घेतला, तर समाजामध्ये असतानाही आपण अनेक एकट्यांमध्ये एकेकट्याने मिसळल्यासारखेच असतो. त्यावेळीही एकटेपणाची जाणीव आपल्यासोबतच असते, फक्त ती जाणवण्याचा अवकाश असतो. त्या-त्या वेळच्या समाजानुरुप, व्यक्तिनुरुप आपलं एकटेपण कमी अथवा जास्ती जाणवतं असावं.

एकटेपणाच्या बाबतीत ते जाणवणं महत्वाचं असलं, तरी एकटेपणाचंही एक स्पेशल अंतराळ असावं. त्या अंतराळामध्ये आपण शिरलो, की एकटेपणाची ती जाणीव प्रत्येकालाच होत असावी. मग तुम्ही घरात असा की कुठे गर्दीत असा, मित्रांमध्ये बसा की मग कुटुंबियांमध्ये गप्पा मारा. एकटेपणाच्या त्या अंतराळाचा तुमच्या मन नावाच्या अशाच कुठल्यातरी अंतराळाशी संयोग झाला, की मग एकटेपणाचे योग सुरू होत असावेत. चल अकेला, चल अकेला... किंवा मग दिवस असे की, कोणी माझा नाही…’ सारखी दोन चार गाणी सुचत असावीत, उगाचच सगळे सोबत असतानाही आपल्या सोबत कोणीच नसल्याचे भास होत असावेत. इ. इ.

अंतराळावरून आठवलं, आपली पृथ्वी अंतराळामध्ये एकटीच आहे. तो एकटेपणा घालवण्यासाठी आपण नव्या जीवसृष्टीचा शोध घेतोय. तो शोध कधी संपेल ते माहिती नाही. आता ही बाब खूप मोठ्या पातळीवर होती. तिच अतीसूक्ष्म पातळीवर आणायची म्हटली, की ती एखाद्या माणसासाठी आपण लागू करू शकतो. माणसंही आपला एकटेपणा घालवण्यासाठी असंच करतात. कोणी तरी दुसरं एकटं शोधतात, ज्याच्याशी त्यांचं थोडं जुळून येईल. आपल्या पृथ्वीच्या बाबतीत आपण दुसरा एखादा सजीव ग्रह शोधायच्या मागे लागलोय. माणसांच्या बाबतीत विचार केला, तर आपण त्या एकट्यासारखाच दुसरा वा दुसरी एकटी शोधतो. त्या दोघांना एकमेकांच्या एकटेपणाची जाणीव झाली तर ठिक. नाहीतर पुन्हा ते एकत्र असूनही एकटेच ठरतात. 
 
गम्मतचं आहे राव या एकटेपणाची. एकटेपणामध्ये आपण इतके एकटे असतो, याचा साक्षात्कार मला आजपर्यंत कधीही झाला नव्हता. आज झाला याला कारण झोप लागत नसल्याने आलेला एकटेपणा. आता तसं पाहिलं, तर मी एकटा नाहीये. भाऊ, बायको, अजून म्हणायंच, तर आमचं कुत्रं माझ्या सभोवतालच्या अंतराळामध्ये आहे. पण कदाचित वर म्हटलंय तसं माझ्या मनातल्या अंतराळात ते एकटेपणाचं अंतराळ गुरफटलं असावं कुठतरी. म्हणूनच ते जाणवलं.  
 
आपल्या या असल्या एकटेपणाचा माणूस नावाच्या, समाजप्रिय म्हणवल्या जाणाऱ्या प्राण्याला तिटकारा वाटत असावा. आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच समाजप्रिय प्राण्यांच्या गटात मोडणारा. त्यामुळे जरी प्रत्येकजण ती एकटेपणाची ओळख स्वतः सोबत कायमच घेऊन फिरत असला, तरी ती तशी ओळख कुणी सांगत नसावं. त्या ऐवजी आपण आपली थोडी सोपेस्टिकेटेड ओळख एकमेकांना दाखवत बसतो. आपलं स्टेटस वाढवणारी ओळख एकमेकांना करून देत असतो. अमक्याचा अमूक, तमक्याचा तमूक, त्यामुळे मग तुमचा अमूक-तमूक. या अमूक-तमूकच्या भानगडीत आपली खरी ओळख राहाते बाजूला, आणि त्यांना वेगळीच ओळख होते. पुढे हिच ओळख इतरांपर्यंतही पोचते. त्यातूनच मग पुन्हा दोन वेगवेगळ्या ओळख्यांच्या म्हणा किंवा आजकालच्या भाषेत सांगायचं तर आयडेंटिटी म्हणा, त्यात आपण अडकतो. या दोन आयडेंटिटीच्या दरम्यान पुन्हा एक अंतराळ आपल्याला सापडतं. त्यात राहाणं आपल्याला त्रासदायक वाटतं. तरीही त्या तसल्या आयडेंटिटीपेक्षा तेच बरं वाटत असावं. तेच असावं हे एकटेपणाचं अंतराळ.

सोमवार, १० सप्टेंबर, २०१२

ए खुदा मुझको बता...

तसा हा विषय माझ्या डोक्यामध्ये फार दिवसांपासून आहे. आज तो लिहावासा वाटला, याचं कारण म्हणजे हे गाणं - 'ए खुदा, मुझको बता, तू रहता कहा है क्या तेरा पता...' माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक. मोबाईलमध्ये असलेलं हे गाणं ऐकत - ऐकतच आज घरी आलो. जेवता- जेवताही त्या गाण्याच्या सुरुवातीच्या दोन ओळी सारखं खुणावत होत्या. तसा तो प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. देव आहे कुठे... त्याचं उत्तर सापडलेलं माझ्या माहितीत तरी कोणी नाही. मी खूप कमी वेळा ते शोधायचा प्रयत्न करतो. कारण मी देवाच्या बाबतीत अगदी प्रॅक्टिकल विचार करणाऱ्यांमधला. म्हणजे लोकांमध्ये असताना देव आहे म्हणून एखाद्याला जर बरं वाटत असेल तर तसं. नाहीतर तो नाही म्हणून एखाद्याला बरं वाटत असेल, तर तसं. समोरच्याला बरं वाटण्यामध्ये माझं बरं वाटणं. पण ज्यावेळी मी एकटा असतो, त्यावेळी मला कसं बरं वाटतं, हा मुद्दा मला जरा जास्तच महत्वाचा वाटतो. आणि का वाटू नये, प्रत्येकाने कधीतरी स्वतःसाठी विचार करायलाच हवा की.

या विचाराचा आढावा घेण्यासाठी मी माझ्या लहानपणापासूनचा थोडा विचार करतोय. मला आठवतंय तसं, मला लहानपणापासूनच देवळातला घंटानाद खुणवायचा. देवळात जायला त्यामुळंच जास्त आवडायचं. जितक्या जास्त वेळा घंटा वाजवायला मिळायची तेवढ्या जास्त वेळा आनंद व्हायचा. खूप उड्याही मारता यायच्या. त्यामुळं अर्थातच देवळात जायला आवडायचं. भुसावळला योगायोगानं दोन्ही घरांच्या परिसरामध्ये महादेवाची देवळं होती. घरातनं बाहेर पाहिलं की देऊळचं दिसायचं. देवळात जाता जाता मग हळूहळू टाळ, मृदुंग, कधी खंजीरी, कधी ढोलक- ढोलकी असा सगळाच नाद लागला. भजनी मंडळांमध्ये सहजतेने वावरायला लागलो. भजनंही पाठ व्हायला लागली. त्या नादात देवदेवही करायचो. आता सगळं सुटलं. पुण्यात राहायला आल्यापासून यातली एकही गोष्ट करत नाही. पण अजूनही जेव्हा केव्हा मी काहीतरी वाजवतो, अगदी मग ते माझा लाडका माउथऑर्गन किंवा मग गिटार का नसोत, त्या- त्या वेळी तोच आनंद मिळतो, जो कोणे एके काळी मी देवळात जाऊन मिळवायचा प्रयत्न करत होतो.

आता मोठा झालोय असं वाटतं. (वाटतं असं म्हणायचं कारण तसं लोकं म्हणतात. मी स्वतःला अजूनही खूप लहानच मानतो. खूप मोठा माणूस होण्याची स्वप्न बघतो, वयानं किंवा शरीरानं मोठं होण्यापेक्षा विचारांनी आणि लौकीकानी मोठं व्हायचंय म्हणून.) देवळात गेल्यावर घंटा वाजवण्यासाठी उड्या मारत नाही. माराव्याही लागत नाहीत. घंटा सहज हाताला येते. पण शिष्टाचार पाळायचे असतात, म्हणून मग एकदाच तो नाद देवळाच्या गाभाऱ्यामध्ये घुमवायचा आणि तोच नाद कानामध्ये साठवायचा. त्यानंतर त्या देवळातल्या देवाच्या आणि माझ्या अध्यात-मध्यात मी कुणालाच घेत नसतो. म्हणजे त्या दरम्यानच्या काळामध्ये माझा जो काही डायलॉग मनातल्या मनामध्ये सुरू असतो, तोच मुळी या पद्धतीने सुरू होतो की, (देऊळ कोणतंही असो, देवापुढे गेलो की डोळे मिटलेले असोत वा उघडे असोत) 'हे बघ बाबा लोकं म्हणतात की तू आहेस. तू अस्सील तर तुलाही माझ्या मनात आत्ता काय सुरुए अन मला काय म्हणायचंय ते समजत असणार. मला जे हवंय ते मिळालं तर तुला एक भक्त वाढीव मिळणार. ते नाही मिळालं तर मी समजेन की...' वगैरे वगैरे.

दरम्यानच्या काळामध्ये मी त्याला भीत नाही, कुठलंही आमिष दाखवणार नाही, कुठलाही नवस फेडणार नाही इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी बोलून जातो. नंतर स्वतःचं स्वतःलाच हसायला येतं. वाटतं, आपण खूप बोललो का राव, हा नसेल तर सगळं ठिक आहे, पण असला तर व्हायची ना पंचायत. उगाच कोपला-बिपला तर काय करायचं. त्याच्या त्या असण्या आणि नसण्याच्या कल्पनांच्या दरम्यानचा हा खेळ मी अनेकदा अनुभवला आहे. 'तू देव मानतोस का,' या प्रश्नाचं उत्तर देणं कदाचित आजपर्यंत याच अशा कन्फ्युजनमुळे टाळलं आहे. अजूनही त्या एका अनोख्या कल्पनेवर कितपत विश्वास ठेवावा, या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये.

लोकांचं राव नवल वाटतं मला. देव आहे म्हणायचं. तो कशात आहे म्हटलं, तर तो माणसात आहे म्हणायंच. माणसांची उदाहरणं दिली, तर कित्येकांना देवमाणूस ठरवायचं आणि मग एका देवमाणसाला चांगलं म्हणायचं आणि दुसऱ्याला वाईट म्हणायचं. म्हणजे मग एक देव चांगला आणि दुसरा वाईट म्हणायचं. मी जर एखाद्यासमोर असं चुकून त्यांना सांगितलं, तर तो म्हणणार अरे आम्ही माणसाला वाईट म्हणतोय, देवाला नाही नावं ठेवत. देवाच्या बाबतीत माझं कन्फ्युजन मी मान्यच करतो, पण जे लोक असं करतात ना ते लोक त्यांचं कन्फ्युजन किंवा ते त्या संकल्पनेचा त्यांच्या सोयीने- मतलबाने अर्थ काढतायेत हे कबुल करायचा मोठेपणा दाखवत नाहीत. हसायला येतं. कारण त्यावेळी तोच विचार पुन्हा येतो जो मी देवळात उभं राहून करतो.- देव नसेल तर ठिक आहे, पण असेल तर काय होणार यांचं. देवाच्या भक्तिभावानं त्याच्याविषयी बोलण्यापेक्षा त्याच्या भीतीपोटी किंवा मग शेवटी मतलबाने त्याच्याविषयी बोलण्याने काय साध्य होणार आहे यांना. आणि देवाकडे त्याच्या भीतीपोटी किंवा मतलबाने आलेले भक्तगण कदाचित देवालाही आवडत नसतील ना, कारण माणसालाही तशी माणसं आवडतंच नाहीत.

बाकी काही असलं, तरी शेवटी मी समाधान या एका गोष्टीवर येऊन थांबतो. देवाच्या विचारांच्या बाबतीत ते मिळवायचा माझा एक मार्ग म्हणजे विज्ञानातलं एक तत्व. आमच्या एका सरांनी ते शिकवताना, देव म्हणजे ऊर्जेचे एक रूप या अंगाने सांगितलं होतं. ते असं, की ऊर्जा ही कधीही संपत नसते वा निर्माण होत नसते, ती केवळ एका रुपातून दुसऱ्या रुपामध्ये रुपांतरीत होत असते. मग या प्रवासामध्ये सुरुवातीच्या ऊर्जा आली कुठून, तर ती देवामधून. आणि मग या विषयी एक फुल्ल लेक्चर दिलं होतं. आता ते पूर्ण आठवत नाही, पण त्यावेळी त्यांनी देव कदाचित असावा, आणि आपण विज्ञानाचे विद्यार्थी, श्रद्धा-अंधश्रद्धांच्या फेऱ्यात अडकू नका, पण हा नियम कधी विसरू नका. निदान परीक्षा पास होताना कधीकधी तो नियम देवासारखा धावून येतो, असं सांगितलं होतं. परीक्षेच्या बाबतीत तसं कधी झालेलं आठवत नाही, पण आता जेव्हा केव्हा अशा विचारांमधून सुटका मिळवायचा विचार येतो, तेव्हा मात्र तो विचार खरंच धावून येतो. तो देवासारखा की कुठल्या वेगळ्या पद्धतीने हे मात्र अजूनही कळायचं आहे. ते अजूनही कळलेलं नाही. कारण देव कसा धावतो, हेच मी पाहिलेलं नाही. ते पहायला मला नक्की आवडेल. आणि जर देव असेल, तर कदाचित त्यालाही ते आवडेल. कारण त्यामुळे त्याच्या भक्तांच्या संख्येमध्ये नक्कीच एका संख्येने वाढ होईल. म्हणूनच कदाचित ते गाणंही मला तितकंच आवडत असावं -
'ए खुदा मुझको बता, तू रेहता कहा क्या तेरा पता...'

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

बडा नटखट है, किशन कन्हैया...

मयुरला सोडायला एअरपोर्टवर जायचं होतं. तो यूएसला निघाला होता. तिकडे जाण्यासाठीची गाडी खाली येऊन थांबल्यावर, मी जाऊन गाडीमध्ये किती माणसं बसतील याचा अंदाज घेऊन आलो होतो. गाडीमध्ये ड्रायव्हरसह सहा जण बसू शकणार होते. ते बसायच्या आधी गाडीत त्याच्या दोन बॅगा टाकल्या आणि मग आम्ही सगळे गाडीत बसलो. तिसरी बॅग खालीच राहिली होती. ती मग गाडीमध्ये बसल्यावर मांडीवर घेऊन मयुर, आप्पा, काकी, मी, सोनाली, आत्या आणि ड्रायव्हर मुंबईकडे निघालो. गाडीने औंधसोडून हिंजवडीचा रस्ता पकडला. डांगे चौक ओलांडून गाडी एक्सप्रेस वे कडे सुसाट सुटली. दरम्यानच्या काळात ड्रायव्हरने गाडीमधला एफएम सुरू केला. पहिलंच गाणं लागलं- बडा नटखट है, किशन कन्हैया, क्या करे यशोदा मैया...

औंधला घरी चाकचाकी गाडी असली, तरी त्यातला एफएम आम्ही शक्यतो आप्पा नसतानाच लावायचो. आप्पा गाडीमध्ये सोबत असताना तो बंदच असायचा. पण या प्रसंगी गाडी दुसऱ्याची होती. ड्रायव्हरही तिसराच होता. आणि आम्ही एका वेगळ्याच वातावरणामध्ये मुंबईकडे निघालो होतो. त्यामुळे गाडीमध्ये आप्पा असले, तरी एफएमवर गाणी अगदी व्यवस्थित सुरू करण्याचा डाव ड्रायव्हरने साधला होता. एरवी मी शांत किंवा त्यातल्या त्यात अगदी थोडसंही उदास गाणं असेल, तर ते बदलवणाऱ्यांच्या गटातला. पण का कोण जाणे, त्या दिवशी मला ते गाणं ऐकू वाटलं. कारण गाण्याच्या पहिल्या ओळी नंतरच मी त्या गाण्यात सांगितलेल्या कृष्णासारखाचं नटखटपणा करणारा मयुर आणि त्याच्या त्या खट्याळपणाने हैराण झालेली, पण त्याच्यावर तितकीच माया करणारी यशोदा काकींच्या रुपात आठवत बसलो होतो म्हणून. त्या गाण्याचा रोख एका वेगळ्या परिस्थितीकडे नेणारा आहे, ही परिस्थिती तशी वेगळीच आहे, पण तरीही ते गाणं या वेळीही तितकंच लागू आहे, असं मला त्यावेळी वाटू लागलं.

एव्हाना, गाडीने हायवे गाठला होता. बाहेर रिमझिम पाऊसही सुरू झाला होता. सगळं अगदी हिरवंगार दिसत होतं. निसर्गाच्या कृपेनी त्या हिरवळीवर मध्येच एखाद्या डोंगरावरून-टेकडीवरून येणारा शुभ्र पाण्याचा धबधबाही ठळकपणे दिसत होता. आणि तितक्याच ठळकपणे मयुरविषयीच्या आठवणी माझ्या मनामध्ये उमटून येत होत्या. मयुरचं हसणं, त्यांच आम्हा सगळ्यांनाच चिडवणं, आम्ही तिघं, मी-किरण-मयुर असताना आमचं पर्सनल लेव्हलवरचं बोलणं, त्याचे शाळा-कॉलेजातले किस्से, त्याचं आणि आप्पांचं एक वडील-मुलगा या पलिकडचं असणारं नातं, चेष्टेने त्यांना छळणं आणि हे सगळं कायमचं ज्यांच्या समोर व्हायचं त्या काकींचं त्या विषयीचं मत. वेळ पडली तर कौतूक, नाहीतर मग अगदी त्याची होणारी शाळा.

तो तसा माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान. पण तो आणि किरण, कधीही ते माझ्यापेक्षा लहान आहेत या हिशेबानी माझ्यासमोर वावरलेच नाहीत. नावाला मी त्यांचा दादा आहे. मानही देतात, पण खरी दादागिरी चालते ती त्या दोघांचीच. म्हणा मलाही त्याचं कौतुकच आहे. माझ्यावर हक्कानी दादागिरी करण्याची तशी परवानगी मी आधीपासूनच या दोघांनाच दिलीये. त्यांनी ती माझ्याकडे कधी मागितली नाही तरी. त्याच दादागिरीच्या नात्याने त्याने माझं लग्न झाल्यावरही मला एक सज्जड दम भरलाय, सोनालीला त्रास दिलास तर बघ. असा दम देणारा एक मयुर, मलवडीला गेल्यावर रस्त्यानं पळायची शर्यत लावल्यानंतर अगदी सुसाट पळत सुटणारा, अन नंतर मागे मी पळालोच नाही, हे पाहून चिडणारा हाफचड्डीतला मयुर आठवला की हसायला येतं. आम्हा तिघांनाही नोकऱ्या लागल्यानंतर आता ही परिस्थिती राहिलीच नाही. आणि आता तर तो तिकडे निघालाय म्हटल्यावर तो परत आल्यानंतरच असलं काहीतरी अनुभवायला मिळणार.

माझ्या डोक्यात हे चक्र सुरूच होतं. पण काकींच काय, मी आणि तो तसं सुट्टीलाच भेटणारे, जमलं तर गावी एकत्र किंवा मग मी पुण्याला वा तो भुसावळला आलो, तरच होणारी भेट. मागच्या तीन वर्षापासून, मी पुण्यातच राहायला आल्यापासून नियमित भेटी झाल्या, तरी माझ्या मनात इतक्या आठवणी येत होत्या. काकींचं काय होत असणार, त्यांनीही ते गाणं इतकंच लक्ष देऊन ऐकलं का, त्यांच्याही मनात त्याच्या अशाच आठवणी दाटून आल्या का, नक्कीच आल्या असणार, असाच विचार त्यावेळी डोक्यात सुरू होता. त्यावेळी त्यांना ते दाखवता येत नसावं आणि तशी गरजही नव्हती. शेवटी आईची मायाच ती.

मध्यरात्रीच्या सुमाराला एअरपोर्टवर पोचलो. त्याला सोडायला आम्हाला त्या टर्मिनलच्या गेटपर्यंत जाता आलं. त्यानंतर पुढे जाणं शक्य नव्हतं. तिथेच थांबलो. त्याला बाय केलं. पुन्हा लक्षात आलं, की
 आत जाता येतंय. तिकिट काढून लगबगीने सगळेच आत गेलो. तो वेटिंग रुमसारखा परिसर होता. मयुर पलिकडे दिसत होता. तो त्या चेकिंगच्या लाईनमधून पुढे जात होता. सामान देत होता. बॅगमधून काहीतरी हातात काढून घेऊन पुन्हा पुढे जात होता. मध्यरात्रीच्या सुमाराला आपण एअरपोर्टवर आहोत आणि आपल्याला पुण्याला परत जायचे आहे, हे कदाचित काकींना मध्येच आठवलं. मयुरकडे  बघत-बघतच त्या मध्येच म्हणाल्या, आता काय, काचेच्या भींतीपलिकडे तो आहे. दिसतोय तोपर्यंत थांबू आणि मग निघू...मला पुन्हा त्याच गाण्याच्या ओळी आठवल्या- बडा नटखट है, किशन कन्हैया, क्या करे यशोदा मैया... त्यावेळीही अशीच अगतीकता असावी, तीच गाणं लिहिताना त्या गीतकारानं शब्दबद्ध केली असावी आणि त्यावेळी मी तीच अगतीकता त्या ठिकाणी अनुभवत होतो. शेवटी अगतीकताच ती. तिन्ही प्रसंग वेगळे, पण तिन्ही ठिकाणी त्या मागची भावना मात्र कायम एकच होती. प्रेमाची, त्याच प्रेमाखातर केलेल्या त्यागाची.

शुक्रवार, १५ जून, २०१२

वाकळ...मायेच एक रूप

एका कौटुंबिक कामानिमित्त गावाकडे यावं लागलं. त्यातून पुढे ओघाओघानेच मलवडीला जाणं ही येतंच. मलवडी म्हणजे माझं गाव. मुंबइकडची लोकं सातारा जिल्ह्यातल्या या गावाला 'खंडोबाची मलवडी' म्हणूनही ओळखतात. आम्ही आपलं 'आंधळी-मलवडी'च म्हणतो. मी शक्यतो इकडे यायची एकही संधी चुकवत नाही. सगळा डोंगराळ भाग आणि जिथं मोकळी जागा तिथं ऐसपैस माळरान. गावापासून साधारण दोन-एक किलोमीटरवर अशाच मोकळ्या माळावर आमचं घर आहे. आज याच घरासमोर माळावरची मोकळी हवा खात पडलोय. खाली मुरमाड जमीन आहे, अन वर सगळं मोकळं आभाळ दिसतंय. नेहमी अगदी सपाट फरशीवर झोपणार्या माझ्यासारख्याला खालची
भरपूर दगडं असलेली मुरमाड जमीन अजीबातही रुतंत  नाहीये. कारण आहे ती मी
खाली अंथरलेली वाकळ!

'वाकळ' हा शब्द तसा गांवढळच, पण ज्यांना या शब्दापाठची मेहनत अन महती आहे,
त्यांना तो शब्द तितकीच मायेची उब देणारा वाटतो. मलाही तो तसाच वाटतो. आमच्या या शब्दाला पर्यायी शब्द सांगायचा, तर गोधडी. आणखी असेल तर मला माहिती नाही. मी खाली अंथरलेली वाकळ माझ्या आक्कानी, माझ्या आज्जीने शिवलेली आहे. अन ती  एवढी मोठी आहे की एकावेळी चार-पाच जणं तरी त्यावर आरामात लोळू शकतात. मला आठवतंय तसं, जोपर्यंत सगळं ठिकठाक होतं तसं आक्का दर उन्हाळ्याला तिच्या दोन-चार मैत्रीणींना गोळा करून अशी निदान एखादीतरी वाकळ शिवून पूर्ण करायची. आता त्यातल्याच वाकळी साठून साठून त्यांची मस्त थप्पी लागते  घरात. त्यातलीच एक वाकळ मी पुण्यात होस्टेलवर राहायला आल्यानंतर तिनं मला दिली होती. त्यामुळेच मला अजूनही गादी घ्यायची गरज पडली नाही. आता तश्याच वाकळीपैकी एक मी खाली अंथरलीये आणि एक पांघरायला घेतलीये.

सहसा अंथरायची वाकळ पांघरायला अन पांघरायची अंथरायला केलेली आक्काला अजिबातही चालत नाही. त्याला कारणही तसंच आहे. पांघरायची वाकळ त्यातल्या त्यात जरा नाजूक अन दिसायला तेवढीच मस्त. अंथरायची वाकळ खूप मोठी अन खास अंथरायला शिवलेली. त्यामुळे ती तशी दणकटच. दोन्ही प्रकारच्या वाकळी शिवायला घरातलीच वर्षभर साठलेली अन टाकून देण्याची लायकीची कापडं, लुगडी अन त्यांच्या चिंध्या वापरलेल्या. वाकळी शिवायला मजबूत धागा, धागा नाही दोराच. तसं बघायला गेलं तर 'टाकाउतून टिकाउ' चा संदेशही या वाकळा देतात. फक्त त्याची तशी जाहिरात होत नाही येवढच. येवढ सगळं टाकाउ अन जाडं-भरड सामान असलं, तरी या वाकळी बघितल्यावर एखाद्या डिझायनरालाही कौतुक वाटेल इतक्या त्या सुंदर अन व्यवस्थित असतात. चौकोनी त्या चौकोनीच अन आयताकृती त्या आयताकृतीच. अगदी आतल्या चिंधी पासून बाहेरच्या कडेपर्यंतकोपरापर्यंत सगळं अगदी जागच्या जागीच. कुठेच गोळा होण्याचा प्रकार नाही. अन या प्रत्येक वाकळी वरची प्रत्येक सुरकुती म्हणजे आपल्या आज्जांच्याच चेहेर्यावरच्या सुरकुत्यांसारखी. जेवढ्या सुरकुत्या तेवढ वय जास्त, अन तितकीच ती सुंदर!

कुतूहलापोटी राहावून मी एकदा आक्कालाच विचारलं- या वाकळा कश्या शिवता गं तुम्ही? तिन सांगितलेलं आता पुसटस आठवतंय. 'लुगडी, फाटकी कापडं, जमलं तर चिंध्या वर्षभर जमा करायच्या. उंदरानी कुरतडू नयेत म्हणून जपून ठेवायच्या. उन्हाळा आला की त्या चिंध्यांच भलं मोठ्ठ गाठोडं होतं. ते न्यायचं विहिरीवर नाहीतर नदीवर. सगळ्या चिंध्या धुवायच्या. त्या उन्हात चांगल्या कडक, अगदी इस्त्री केल्यासारख्या वाळवायच्या. मग उन्हाळ्यात दुपारी घरची काम आवरली की बसायचं या चिंध्या घिऊन घराजवळच्या मैतरनीसोबत. महिनाभरात एक वाकाळ करायची की झालं. दोघींनी दुबाजूनी नाईतर चौघींनी चार बाजूनी सुरवात करायची. महिनाभर लावून धरलं की झालं.'

महिनाभराच्या या त्यांच्या एक कलमी कार्यक्रमामध्ये सुनांच्या, नातवंडांच्या चौकश्या, भरपूर गप्पा, अन तंबाखूच्या मिसरीच्या अनेक डब्या कधी संपतात ते कुणाच्याच लक्षात येत नाही. त्या नातवंडांच्याच प्रेमापोटी त्यांच्या आज्ज्या अशा वाकळी शिवतात. वाकळी शिवून झाल्या, की त्या ज्यांच्यासाठी शिवल्यात त्यांची वाट बघत बसतात. नातवंड आली, तर या वाकळीच्याच अंथरुणांवर त्यांना झोपवत त्याचं कौतुक करायचं, त्यांचे लाड करायचे, गावाकडच्या गोष्टी सांगायच्या, जास्तच धिंगाणा केला कुणी तर 'मुडदा बशीवला तुजा... ' म्हणत दोन-चार धपाटे घालत, अशाच एखाद्या वाकळीवर झोपवायचं. अन कुणीच नाही आलं, तर वाकळी जश्याच्या तश्या पुढच्या वर्षीसाठी ठेवायच्या. व्यवस्थित झाकून. शेवटी आज्जीची मायाच ती. त्याच आज्जीच्या मायेच हे एक रूप असावं. वाकळ.

अजूनही त्या वाकळीची ओढ कमी होत नाही. काही असलं तरी या वाकळीवर जशी शांत झोप लागते न, तशी शांत झोप कुठ लागायचीच नाही. फोमच्या मउ मउ गाद्या असूदेत, वा मग त्या आयत्या स्प्रिंगच्या गाद्या. सगळं असलं तरी आपल्याला काहीतरी रुतनारच. काय रुततय हे शोधायचा प्रयत्न केला, तरी आपल्याला काहीच सापडत नाही. त्याचं कारण हीच माया असावी. त्या आयत्या गाद्यांमध्ये ती नसते, म्हणूनच आपल्याला काहीतरी बोचत. काय ते दिसत नाही. माया कशी दिसणार ना? ते बोचण थांबवायचं असेल, तर अशीच एखादी वाकाळ शोधा, अशीच आपल्या आज्जीन कुठंतरी थप्पीवर रचून ठेवलेली मायेची अंथरूण-पांघरूनं देणारी एक मायेची वाकाळ!

गुरुवार, ३१ मे, २०१२

रक्ताचं नातं...


हॉस्पिटलमध्ये बसलोय. दादा ऍडमिट आहेत, म्हणून सध्या इकडची चक्कर सुरू आहे. दादा म्हणजे माझे आजोबा. वय झालंय त्यांच. जरा चक्कर येतेय, अशी तक्रार सुरू झाल्याने त्यांना पुन्हा एकदा ऍडमिट करावं लागलं इथं. त्या सोबतच आमचा इथला मुक्कामही आलाच. मागच्या वेळी त्यांना दोन रात्री आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्यावेळीही आम्ही आयसीयूच्या बाहेर असेच थांबलो होतो. या वेळी निदान हे बरं की त्यांच्या जवळ थांबलोय. आताही त्यांना रक्ताची एक पिशवी लावलीये. रक्ताचा एकेक थेंब हळूहळू त्या पिशवीतून त्यांच्या शरीराकडे निघालाय आणि त्यासोबत मा़झं मनही मला माझ्या गावाकडे घेऊन चाललंय, अशाच रक्ताच्या नात्यांच्या ओढीने आणि त्या विषयीच्या आठवणींसोबत...

माझं गाव तसं मलवडी. आक्का- दादा मलवडीलाच असतात. सातारा जिल्ह्यामधलं हे एक खेडेगाव. माण नदीच्या काठावर वसलेलं हे गाव तसं खूपच छोटं. माण तालुक्यात असल्याने माडगुळकरांच्या ‘माणदेशी माणसं’ वाचलेल्यांना तिकडच्या भागाचा तसा संदर्भ लक्षात येतो. येरवी तो संदर्भ जोडला जातो दुष्काळाशी. माण-खटाव हे दुष्काळी तालुके. म्हणून मग त्या भागाची जगाला असणारी ओळखही तशीच. त्याच भागातला मी. माणदेशी असलो तरी शिक्षणासाठी वडिलांच्या नोकरीमुळे थेट तिकडं भुसावळ, खानदेशच गाठला. त्यामुळे आमचा प्रवास तसा माणदेश ते खानदेश असाच. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्‌ट्यांमध्ये आमचा खानदेश ते माणदेश आणि पुन्हा खानदेश असा प्रवास व्हायचा. निमित्त असायचं ते आमच्या याच आक्का- दादांना भेटायचं.

एक लेंगा-पायजमा आणि दंडकी, वाटलं तर पांढरा शर्ट. डोक्यावर गांधी टोपी. हा दादांचा कायमचा युनिफॉर्म. त्यातली युनिफॉर्म्यालिटी विस्कळीत झाल्यांच मला तरी आठवत नाही. दादांचं वय आता नव्वदीच्या आसपास आहे. हे शारीरिक बरं का. मनानं ते माझ्याहीपेक्षा  प्रचंड खंबीर आहेत. आताही, मला कसलाच त्रास होत नाहीये, या आविर्भावामध्ये ते कॉटवर आहेत. मगाशी मी त्यांना जरा लोळा म्हणालो, तर कितीक वेळ पडून राहाणार, पडून पडूनच कटाळा येतो...असं काहीसं ऐकवलं. मी पुन्हा शांत झालो. बसलोय आता लॅपटॉप काढून.

मागच्या वेळी त्यांना ऍडमिट केल्यानंतर त्यांनी एक भारीच किस्सा केला होता. तो आठवला की अजूनही हसू येतं. त्यांच्या हृदयाची एक झडप काम करत नसल्यानी, त्यांना मागच्या वेळी तातडीने पुण्यात ऍडमिट केलं होतं. मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर. असेच एकजण आले रात्री राउंड घ्यायला. दादांची तब्बेत कशी आहे, अंगात किती जीव आहे, हे तपासण्यासाठी त्यांनी दादांच्या हातात हात दिला आणि म्हणाले, बाबा दाबा बरं जरा. दादांनीही घेतला त्यांचा हात हातात. आधी हळूच दाबला. मग डॉक्टर म्हणाले दाबा अजून. दादा मग आमच्याशी ज्या टोनमध्ये बोलतात, त्याच टोनमध्ये म्हणाले, दमं जरा, अन थोडे मागे सरले, डॉक्टरांचा हात पुन्हा नीट धरला अन असा काही दाबला की डॉक्टर आपोआप असे पाय उंचवायला लागले अन म्हणाले, बाबा बास बास. मग दादांनीही हात सोडला अन त्यांनाच म्हणाले, मंग तुमाला काय वाटलं, मी काय मागं हटतूय व्हयं... ते त्यावेळी अगदी मिश्किलपणे हसत होते. बहुतेक म्हणत असावेत, कशी खोड मोडली आ...

दादा म्हणजे कायम फिजिकली फिट असणारं तितकंच वल्ली कॅरेक्टर. तरुणपणी हमालीची कामंही केलेली. गावी गेलो की ते आम्हाला दगडी गोट्या, फळ्यांपासून बॅट, विटी-दांडू असलं बरंच काही करून द्यायचे. सोबन्या म्हणजे आपण जेवताना जे ताटाला लावायला घेतो ना, ते तयार करण्यात तर त्यांचा खास हातखंड. त्यांना गावच्या म्हशीचा फार लळा. मागच्या वेळी ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तरी त्यांना गावच्या म्हशीचीच फार आठवण यायची. रात्री झोपेतचं कधीतरी बरळायचे, धारंची येळ झाली. जायाला पायजे, म्हणत ते कॉटवरून उठायचा प्रयत्नही करायचे. मला या गोष्टीचं फार नवल वाटायचं. आम्ही सगळे ह्यांची काळजी करतोय, अन हे त्या गावच्या म्हशीची. तो लळा काही वेगळाच होता. आमची आक्का सांगते, हे सुतारकीतल्या हिरीजवळ आले कीच म्हस हांबारती. मग वळकायचं की आलं, मालकं आलं हिजं. असा हा लळा.

दादा म्हशीला घेऊन डोंगराला जातात. तिकडंच म्हशीला भरपूर चाराही मिळतो. दादाही परत येताना चार्याचा एखादा भारा डोक्यावर घेऊन यायचे. त्यांना आसूड बनवायलाही जाम आवडतं. कुणाचा ना कुणाचा आसूड तयार करायला असायचाच. चेष्टाही जाम करतात. गावी ते आणि आक्का असे दोघेच राहायला. बरं, आक्का एकदा का घराबाहेर पडली, की ती परत कधी घरी येईल याचा कधीच अंदाज लागत नसे. कारण ती दादांना अगदी आले जरा दहीवडीला जाऊन म्हणायची, अन थेट भुसावळलाही यायची. दादांचं तसं कधीच नव्हतं. ते घर, त्यांची म्हस, अन मलवडी सहसा सोडत नाहीत. त्यांना करमतंच नाही. इथं हॉस्पिटलमध्येही पडून राहणं त्यांना आवडत नाही. मलवडीमध्ये त्यांच्या भोवती कायम पोरांची टोळी असते. त्यांच्यासोबतही ते जणू त्यांच्याच वयाचे असल्यासारख्या गप्पा मारतात. चिक्कार चेष्टा अन तेवढंच चिक्कार कामही. त्यामुळे त्यांनी   हाक मारली की कोणीतरी त्यांच्यासाठी हजर असतंच. तसंच दादाही त्यांच्यासाठी वेळ पडेल तेव्हा कामासाठी जातात. त्यांचं हे मॅनेजमेंट काही अफलातूनच आहे, कोणत्याही शिक्षणाविना.

दादांनी आम्हालाही अनेक गोष्टी अशाच अगदी सहस शिकवल्या होत्या. डोंगराला भटकणं, रात्रीची दारी धरणं, वैरण कापणं, धार लावणं, अन एक भन्नाट गोष्ट म्हणजे झेल्यानी आंबा झेलणं. यातल्या सर्व गोष्टी मी पुन्हा प्रॅक्टिस करून बघण्याचा संबंधच आला नाही. अन त्या मी विसरलो म्हणून ते कधीच माझ्यावर रागावलेत असं झालं नाही. त्यांना त्यांच्या सर्व नातवंडांच फार कौतुक आहे. अन ते तसं कधीतरी बोलूनही दाखवतात. का नाही बोलायंच, शेवटी त्यांच्याच रक्ताची माणसं आहोत ना,
दादा माझ्याकडे पाठ करून झोपलेत. त्यांची रक्ताच्या सलाइनची नळी जराशी ताणली गेलीये. पिशवीतलं रक्तही संपत आलंय. ती संपायच्या आधी सिस्टरला बोलवायचंय. हे थांबवतोय, रक्त थांबण्यापूर्वी लिखाण थांबतंच. आताही काहीसं तसंच होणार आहे. शेवटी तेच विश्‍वातलं एकमेव सत्य असावं...    

मंगळवार, २२ मे, २०१२

गोष्ट एका उंदराची ...

सोमवारचा दिवस तसा माझ्यासाठी अविस्मरणीयच म्हणायला हवा. एक तर पुण्यात घरच्यांनी घेतलेल्या घरामध्ये शिफ्ट होण्यामुळे, दिवसभर फ्लॅट साफ करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे , श्रमपरिहारासाठी खडकवासल्या धरणाच्या परिसरात घालवलेल्या रम्य संध्येमुळे, अन आयुष्यात पहिल्यांदाच फ्लॅटचे दरवाजे आतून बंद झाल्याने फ्लॅटच्या ग्यालरीत अडकून पडण्यामुळे, अन पहिल्यांदाच चोरट्यासारख आपल्याच घरातून शिडीच्या सहाय्याने खाली उतरल्यामुळे अन फ्लॅटचा कोणताही दरवाजा न तोडता परत चोरट्यासारखच खिडकीतून फ्लॅटमध्ये घुसल्यामुळे, अन हे सगळे पहिले-वहिले अनुभव आयुष्यात घ्यावे लागण्याचे कारण ठरलेल्या एका उंदरामुळे!

तर त्याच झालं असं की दिवसभराची मेहनत सत्कारणी लावण्यासाठी मी आणि भैया (आमच्या फैजपूरच्या जाधव काकांचा मुलगा. त्याच तसं नाव सूरज ) आणि मी दोघेही बाहेरच भरपेट जेवलो. सुस्तावलेल्या मूडमध्येच फ्लॅटवर परत आलो. भैयाचा फ्लॅट पहिल्या, तर आमचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर. सध्या सामान भैयाच्याच फ्लॅटमध्ये ठेवल्याने आम्ही दोघेही रात्री त्याच्याच फ्लॅटमध्ये आलो. घरात घुसलो, की तमाम फ्लॅटवासीयांच्या नेहेमीच्या सवयीप्रमाने दाराला लगेच आतून कडी लावली. नंतर दिवसभर राब राब राबून चकचकीत केलेला फ्लॅट न्याहाळला. सारं काही अलबेल असल्याचं बघत-बघतच मग कपडे बदलले. घरात दोघंच. त्यात फ्लॅटवर पंखाही नसल्यानी टिपीकल बॅचलर सारखं आपलं बर्मुडे चढवून बसलो. उकडत असल्यानी टी शर्ट घालण्याचा मोह वेळीच आवरला. गॅलरीचं स्ल्यायडींगचं दार उघडून आमच्या प्रॉपर्टीची मापं घेत निवांत हवा खात उभा राहिलो. रात्री जवळपास अकरा वाजल्याने आजूबाजूला सगळा अंधारच होता. मुंबई बेंगलोर हायवेच्या पलीकडच्या बाजूच्या काही इमारातींमधले बल्ब अन हायवेवरून जाणार्या गाड्यांचे बुईन्गचे आवाज...फ्लॅटवरचा पहिलाच दिवस असल्याने हे जरा बरं वाटत होतं. निवांत बघत बसलो होतो सगळं.

 तेवढ्यात भैयांनी बाथरूममधून हाक मारली... दादा उंदीर! मी तिकडं जाईपर्यन्त उंदराने भैयाला एक प्रदक्षिणा घालून मधल्या कॉरिडॉराकडे धाव घेतली होती. समोरचं चित्र होतं - फ्लॅटची अगदी स्वच्छ धुतलेली चकाकणारी फरशी अन त्यावर उड्या मारणारा काळा कुळकुळीत उंदीर. क्रिकेटच्या स्टेडीअमवर साईड स्क्रीन अगदी व्यवस्थित अॅडजस्ट केल्यानंतर बॅट्समनला बॉलरनी टाकलेला बॉल जितका क्लीअर दिसत नसेल ना, तितका क्लिअर तो उंदीर मला त्या फरशीवर दिसत होता! एट ए ग्लान्स अन, विदाउट एनी स्पेशल कान्सनट्रेशन!. चेष्टा नाही, पण त्या उंदराच्या शेपटाचा टोकदार कोपराही त्या फरशीवर नीट दिसला. पहिला विचार आला तोच मुळी तो शेपटाचा कोपरा पकडून, उंदराला फ्लॅटच्या बाउन्ड्रीच्या बाहेर भिरकावण्याचा. पण तोपर्यंत उंदीरमामा थेट बेडरूमकडे धावले. पर्यायाने मी आणि भैयाही हातात झाडू घेऊन तिकडे गेलो. तोपर्यंत उंदीर पुन्हा मोकळ्या कॉरीडॉरमधून हॉलमध्ये आला. हॉल मोकळाच होता अन गॅलरी त्याला लागूनच, त्यामुळे दोघांनीही उंदाराला गॅलारीतून बाहेर सोडायचं असं ठरवला. त्या हिशेबानी सगळी नाकाबंदी केली. मग उंदीरमामाही आमच्या इच्छेनुसार गॅलरीत गेले. भैया गॅलरीत अन मी हॉलमध्येच होतो. उंदीर हॉलमध्ये परत येउ नये, म्हणून मी स्लायडीन्गचा दरवाजा ऑपरेट करत होतो. शेवटी उंदीर त्या गॅलरीच्या भिंतीवर चढला. मीपण गॅलरीत गेलो. स्लायडीन्गचा दरवाजा ओढून घेतला, अन उंदराला खाली टाकायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्या नादात इकडे स्लायडीन्गचा दरवाजा आतून लॉक झालेलं दोघांच्याही लक्षात आलं नाही. उंदीर खाली उतरायच्या ऐवजी गॅलरीच्या ग्रीलवर चढला. तो ग्रीलवरून पाळायला लागल्याच पाहून मला त्याचे फोटो काढायचा मोह झाला. कॅमेरा घ्यायला मागे फिरलो, अन तसाच थांबलो. गॅलारीच स्लायडीन्गचं दार आतून लॉक!

आत जाण्याचा प्रश्नच नाही. बर बाहेरून कोणी येउन दार उघडायचं, तर फ्लॅटचा मेन दरवाजाही आम्हीच आतून लावलेला. घरात आमच्या दोघान्व्यातीरिक्त तिसरंही कोणी नाही, की जो आतून दरवाजा उघडेल. भैयाला हे सांगितल्यावर उंदरासोबतचं आमचेही फोटो काढावेत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. उंदराचा विसर पडला नी गॅलरीतून खाली बघायला लागलो. खाली उंदीर मस्त उड्या मारत पळताना दिसला. कदाचित तो म्हणत असावा, आता या माझ्या मागे, बघतोच कसे येताय ते!
दोघीही एकमेकांकडे बघत होतो. मोबाईल आतच, कपडेही आतचं. शेवटी दोघांनाही हसायला आलं. तसच खाली बसलो. आता गॅलरीच्या दरवाज्याची काच तोडायची किंवा मेन दरवाज्याची कडी तोडायची असे दोनच पर्याय आमच्या लक्षात आले. काच फोडणं थोडं महागात जाणार हे लक्षात आल्यावर मेन दरवाजा पुढून जाउन तोडायचा असं ठरलं. कोणी दिसतयं का खाली म्हणून बघायला सुरुवात केली. समोरच्या बाजूला चाललेल्या बांधकामावरच्या एका काकांना हाक मारली. त्यांना सांगून आमच्या सोसायटीच्या रखावालादारांना सांगावा धाडला. रखवालदार आले की त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी शिडीची व्यवस्था केली. मग खाली उतरायचं तर निदान कपडेतरी हवेत म्हणून मग मी बर्मुड्यावर मी एक गॅलरीत वाळत घातलेला टी शर्ट चढवला. त्याच टी शर्टनी आम्ही दिवसभर फ्लॅट पुसून काढला होता. पर्यायाच नव्हता. नाहीतर नुसता बर्मुडा घातलेला कुणीतरी अनोळखी व्यक्ती एका फ्लॅटमधून खाली उतरतोय बघून सोसायटीवाल्यांनी पोलीस बोलवायलाही कमी केलं नसतं. त्यांच्यासाठी आम्ही पहिलाच दिवस असल्याने अनोळखीच ठरलो असतो ना.

 शेवटी दोघेही गॅलरीतून शिडीवरून खाली आलो. एक काम झालं होतं, दुसरं करायचं होतं. ते म्हणजे दार तोडायचं. परत रखवालदाराला घेउन वर गेलो. आळी पाळीनं मी, भैय्या अन रखवालदारानी दार तोडायचा प्रयत्न करून बघितला, पण दार ढिम्म हलत नव्हतं. आमच्या प्रयत्नांनी ते एक सेंटीमीटरही हललं नाही. पुन्हा तिथंच बसलो. आतली कोणकोणती दारं उघडी आहेत हे बघायचा प्रयत्न केला. बाथरूमचं एक दार सोडलं तर बाकी सगळे बंद होते. त्या दारातून येणारा उजेडही दिसत होता. शेवटी तिसरा पर्याय सापडला. शिडी लावून बाथरूमच्या खिडकीतून आत जाण्याचा शेवटचा पर्याय. काचा व्यवस्थित निघाल्या तर कोणत्याही खर्चाविना पुन्हा घरात. थोडं बरं वाटलं. तिघंही खाली उतरलो. शिडी खिडकीशी लावली. ती थोडी कमकुवत होती. जास्त वजन पेलेल की नाही यात शंकाच होती. माझी प्रॉपर्टी भैयापेक्ष्या जास्तच आहे. या अनाठायी श्रीमंतीचे शिडीवर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेत, भैयाला म्हटलं आगे बढो. भैयाही मग मागे हाटला नाही. माझ्यापेक्षा वयानी साधारण १० वर्ष लहान असल्यानी त्याच्यात चांगलीच चपळता आहे. पठ्ठा सरसर-सरसर शिडीवरून वर गेला. उंच असल्यानी खिडकीच्या सगळ्या काचा त्याच्या हाताला व्यवस्थित आल्या. मी असतो तर एखादीच काच हाती लागली असती. त्यांनी हळूहळू सगळ्या काचा काढल्या. त्या जिन्यावर थांबलेल्या रखवालदाराकडे दिल्या. काचा काढून झाल्यावर खिडकीतून आत गेला. झालं. मोहीम फत्ते.

त्याने पुढून येउन दार उघडलं. शिडी जागेवर ठेउन रखवालदार न मी दोघेही घरात शिरलो. खिडकीच्या काढलेल्या काचा पुन्हा लावल्या. मस्त वाटलं. पुन्हा त्या गॅलरीच्या स्लायडीन्गच्या दरवाज्याकडे एक नजर टाकली. तो तसाच लागलेला होता. उठलो अन घरात पडलेली एक काठी उचलली. गावाकडे कसं खुंटी लावतात, तशी त्या दाराला ती काठी खुंटी म्हणून लावली. खुटी काढल्याशिवाय दार बंदच होणार नाही. रखवालदार गेला. मी अन भैया परत फ्लॅटमध्ये निवांत पडलो. पुन्हा उंदराच्या नादी लागायचं नाही हे ठरवलं. कोणी काहीही म्हटलं तरी फ्लॅटमध्ये एक मांजर पाळायचं ठरवलंय आता. निदान उंदराच्या नादानी अस परत फ्लॅटमध्ये अडकनं तरी होणार नाही ना. गरम होत होतं. त्यामुळं भैया झोपायला अंथरून घेउन गॅलरीत गेला. मी आत हॉलमध्ये गादीवर पडलो. पुन्हा मला तो टणाटण उड्या मारत खाली पळणारा उंदीर आठवला. पण या वेळी त्याच्या मागे मीही नाही गेलो अन माझ मनही नाही गेलं. मनातल्या मनात त्याला म्हटलं तू  पळ थकेस्तोवर. मी थकलोय. मी झोपतोय. आता गोष्ट पुरे.


बुधवार, २८ मार्च, २०१२

मी अनुभवलेली ग्रेसभेट... एक ग्रेसफुल भेट


परवा सकाळी सकाळी ग्रेस गेल्याचं समजलं. काहीसा शॉक बसला होता त्यावेळी. ते समजल्यावर थोडं अस्वस्थ वाटत होतं. माझ्या त्या अस्वस्थतेला कारणही तसंच होतं. एरवी आपल्याला एखादी वाचलेली गोष्ट आठवत नसली, तर ती परत वाचता येते. पण आपण एखादी विशेष गोष्ट एखाद्या विशेष व्यक्तिच्याच तोंडून ऐकली असेल आणि ती परत आता ऐकायची संधी मिळणारच नाही, याची खात्री झाली की जशी अस्वस्थता जाणवेल ना, तशीच ती अस्वस्थता होती. आता ग्रेस गेल्यामुळे अस्वस्थ होत नसलं, तरी त्यांच्या काही ओळी आठवत नसल्यानं ती अस्वस्थता नक्कीच जाणवत होती. ग्रेसांच्याच कवितेच्या त्या ओळी मी त्यांच्याच तोंडून ऐकल्या होत्या. ५ जानेवारी, २०१२ ला ‘एसपी’तल्या ‘ग्रेस भेट’ कार्यक्रमात.
त्या ओळी सांगू शकतील, अशी आशा असणार्‍या सगळ्यांना मी त्यावेळी विचारूनही पाहिलं होतं; पण माझे ते प्रयत्नही व्यर्थ ठरले होते. आता ते गेले म्हटल्यावर साहजिकच मी त्या ऐकलेल्या ओळी आठवून बघत होतो, पण आठवतील तर शप्पथ. शेवटी मग ऑफिसमध्ये आमच्या सॉफ्टवेअरवर मी त्या कार्यक्रमाची मी केलेली बातमी शोधली. त्यात सापडल्या त्या ओळी. त्या काहीश्या अशा होत्या-
‘नदी हिंडू दे झर्‍याला शोधत,
झर झर झर झर झरता,
लख्ख निरंजन वाणी माझी,
अलख निरंजन कविता.’
ओळी सापडल्या, की एफबीवर टाकून मोकळा झालो. सोबत लिहिलं होतं...मी अनुभवलेले ग्रेस खरंच ग्रेसफूलच होते...

तसं बघायला गेलं, तर मी सायन्सचा विद्यार्थी. त्यामुळं दहावीनंतर मराठी विषयाशी तसा अभ्यास म्हणून संपर्क राहिला नव्हता. बरं मी तसा कधी कवितेच्या प्रेमात पडणार्‍यांपैकीही नव्हतो. त्यामुळे माहितीतल्या कविता अगदीच मोजक्या. कवींची संख्याही तशीच. खानदेशात वाढलो म्हणून बहिणाबाई आणि साने गुरुजींच्या एक दोन कविता. कुसुमाग्रजांची ‘कणा’. ती आमच्या भुसावळ हायस्कूलच्या पुष्पा टिचरनी अगदी चालीसकट शिकवली होती. त्यामुळं ती कधीच विसरलो नव्हतो. वय वाढलं तसं कुसुमाग्रजांचीच प्रेम कर भिल्लासारखं वगैरे वगैरे, पाडगावकरांच्या प्रेम म्हणजे प्रेम..., त्याच आधारवर संदीप खरेंची लव्हलेटर... अशा प्रेमकविता माहिती असणार्‍यांमधला मी. त्यात ग्रेस हे नाव कधीही नव्हतं. म्हणजे ग्रेस नावाचे कुणीतरी एक कवी आहेत एवढी माहिती होती; पण त्यांच्या कविता किंवा कवितासंग्रह म्हणाल, तर आम्ही म्हणजे ‘बाकी सगळे शुन्यातले’च होतो. पण तरीही ग्रेस मला भावले. आवडले.

एसपीतल्या त्या कार्यक्रमामध्ये मी अनुभवलेले ग्रेस, त्या कार्यक्रमापूर्वी मी ऐकलेल्या अनेक ग्रेसांपेक्षा खूप वेगळे वाटले. ग्रेस काय बोलतात ते समजतचं नाही.... ते बोललेलं सगळं डोक्यावरूनच गेलं... ग्रेस आहेत. सांभाळून. बातमीत काय लिहायचं, ते समजलं तर आम्हालाही सांगा... अशा नानाविध पण काहीशा एकाच अर्थाच्या प्रतिक्रिया मी त्यांच्याविषयी ऐकल्या होत्या. ग्रेस खूपच अवघड बोलतात, ते खूप ओरडतात किंवा अगदी आपण लिहिलेलं जर त्यांना आवडलं नाही तर ते फोन करूनही सांगतात असंही मी ऐकलं होतं. त्यातून त्यांच्याविषयी माझ्या मनात कार्यक्रमामध्ये ते बोलायला सुरुवात करेपर्यंत जी भावना होती ती अशीच, की ग्रेस म्हणजे एक भयंकर अवघड माणूस असावा. कदाचित म्हणूनच कविता लिहित असावा. बरं माझ्या मते गद्यापेक्षा पद्य लिहिणं तसं अवघडचं आणि पुन्हा गद्यापेक्षा ते पद्य समजून घेणं त्यापेक्षाही कितीतरी पट अवघड. असा काहीतरी भन्नाट विचार करतच मी कार्यक्रमाला गेलो होतो.

कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर ग्रेस होते ते काहीशा चॉकलेटी- ग्रे शेडच्या टी शर्टमध्ये. डार्क निळ्या रंगाची पँट, डोक्यावर गोल हॅट आणि डोळ्यांवर चष्मा. कार्यक्रमामध्ये बसायला जागा नसल्याने जागा शोधण्याचा प्रयत्न करत मी त्यांच्या बोलण्याकडे कान लावून होतो. त्यांची पहिली काही वाक्ये अशी होती -‘ साष्टांग नमस्कार करतो. आवाजाची थोडी गडबड आहे. गोंधळ नाही. काव्याच्या अनुभूतीच्या मार्गाने शाक्त आहे. देवीसाठी जागरण. गोंधळ नाही. मागे मी आणि पुढेही मीच आहे. ‘मुझे मुझसे जुदा देखा न जाये’. आतड्यातील पेशींची वीण आहे. ती कंपल्सिव्ह म्हणून मी स्वीकारली आहे. कणाकणाने जगताना कणाकणाने मरत असतो; म्हणूनच शेवटचं मरण सुकर होतं. माझ्या असंबद्धपणाकडे लक्ष देऊ नका. आय ऍम ए ऑक्सफर्ड पोएट.’

ते हे बोलत असताना त्यांच्या आवाजातला रखरखीतपणा, ‘ण’ आणि ‘न’ मधला फरक उपस्थितांना समजावा म्हणून जोर देऊन ते शब्द बोलण्याची त्यांची शैली, टी शर्टच्या खिशामध्ये हात घालून, तो खिसा बोलण्यातील चढ-उतारांनुसार हलवत हलवत, दुसरा हात फिरवत बोलण्याची त्यांची ती वेगळीच स्टाइल मी अनुभवत होतो. आता त्या अगोदर त्यांच्याविषयीची ख्याती ऐकली असल्याने, त्याच नजरेतून मी तोपर्यंत ग्रेस बघत होतो. ‘हे काहीतरी बडबडतायेत. बातमीसाठी काही तरी बोलले म्हणजे आपलं काम झालं,’ असंच तोपर्यंत वाटत होतं. कार्यक्रमाच्या ओघामध्ये ते बोलत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी प्रतिभावंत कसा असतो, ते सांगितलं. ‘आपल्याला आयुष्यात लाभलेला एकमेव अद्वितीय मित्र म्हणजे जी.ए. कुलकर्णी. आणि कलाकाराचा मेंदू हा त्याचा एकमेव मित्र असतो.’ असं सांगितलं. समोर सगळे विद्यार्थी आणि शिक्षक ऐकत होते. जी. एं. चा उल्लेख आल्यावर मी मनातल्या मनात म्हटलं, ‘हेही असंच अवघड बोलतात, जीएसुद्धा तसलंच अवघड, गुढ आणि रहस्यमयी लिहित होते म्हटल्यावर जमणारंच की मैत्री.’ बाकीच्यांना तसं वाटलं की नाही हे माहिती नव्हतं. पण या प्रसंगानंतर त्या कार्यक्रमामध्ये एक कवी किंवा कलावंत म्हणून बोलायला आलेले ग्रेस अचानक त्यांच्याच भूतकाळामध्ये गेले. ते प्राध्यापक असतानाच्या नागपूरच्या आठवणी त्यांनी सांगायला सुरुवात केली.

‘मी रक्तबंबाळ मनुष्य आहे. त्यामुळे साधेसुधे शब्द वापरून कसे चालतील. प्रत्येक शब्दाच्या टोकावर फिकट झालेल्या सृजनशीलतेचा भगवा ध्वज आहे. प्रतिभावंताने हात हलवला की ते दिग्दर्शन होते. त्यामुळे कधीही कलाकाराचा इन्सल्ट करू नका. ज्या-ज्या ठिकाणी असे झाले, ती राष्ट्रे तळफटली आहेत. माय एस्टिम्ड फ्रेंड्‌स अँड एनिमीज... आय लूक मॅग्निफिसंट्ली हँडसम इन माय ग्रेव्ह बट आय डोन्ट लाइक टू लूक हँडसम इन एनिबडीज पॅलेस...’ असं सांगताना त्यांना कदाचित त्यांच्या दु:खाची, कॅन्सरमुळे होणार्‍या त्रासाची पुन्हा एकदा आठवण वा जाणीव झाली असावी. ‘ग्रेस इज नॉट माय अचिव्हमेंट, इट इज अ गिफ्ट गिव्हन बाय माय मदर अँड मास्टर. त्यामुळे जी कविता माझी मिळकतच नाही, त्या विषयी कोणतेही विधान करणे योग्य नाही.’ हे सांगताना त्यांच्यामधील एक प्रामाणिक मातृभक्त आम्ही सगळेच त्यावेळी अनुभवत होतो.
बोलण्याच्या ओघामध्ये ते आपल्या कवितांचे दाखले देत चालले होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन्ही भाषांमधून ते आपलं मनोगत मांडत होते. बोलण्याच्या ओघातच मग त्यांनी मग त्या वर लिहिलेल्या ओळी म्हटल्या आणि उपस्थितांना विचारलं, ‘आता लोकांना हेही दुर्बोध वाटत असेल तर माफ करा.’ मग लोक त्यांना कोणकोणत्या प्रकारे दुर्बोध ठरवतात ते सांगायला लागल्यावर मात्र उपस्थितांची चांगलीच करमणूक व्हायला लागली. आपली गोल टोपी, त्या टोपीखालची पुन्हा आतली टोपी; त्यांच्याच भाषेत सांगायचं तर टोपीचं अंतर्वस्त्र काढून दाखवत ते म्हणाले, ‘कॅन्सरमुळे केस गेलेत. आता हॅट वापरतो. हे पाहिलं की लोकं माझ्याकडे वेगळ्याच नजरेतून बघतात. त्यांना वाटतं हा माणूस उन नसतानाही हॅट घालतो. काहीतरी वेगळंच आहे. नागपूरला होतो, तेव्हा लेडिज सायकल चालवावी लागायची. कारण माझा ऍक्सिडंट झाला होता. टांग मारून सायकलवर बसता येत नव्हतं. मग लेडिज सायकल चालवावी लागायची. तरीही लोकं मी काहीतरी गूढ करत असल्यासारखं माझ्याकडे बघायचे. लोकांना सगळंच गुढ वाटायचं....’ असं म्हणत म्हणत ते परत नागपूरच्या दिवसांकडे वळाले. कॉलेजमध्ये शिकवतानाचे आपले अनुभव त्यांनी पुन्हा कॉलेजच्याच विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. परत म्हणाले, ‘आय ऍम मॅन ऑफ रिस्क. टू से नो इज दि मोस्ट फंडामेंटल राइट ऑफ जंटलमन... अशी वाक्ये मी वापरतो. ती ही ह्यांना दुर्बोध वाटतात. अरे ग्रेसला ऐकायला आलात तर त्याला समजवू द्या ना...

कार्यक्रमाचा हा शेवट असेल असे वाटले नव्हते. त्यांनी नागपूरचीच कॉलेजमधली एक आठवण सांगत ‘और पुरानी बाते याद आयी,’ म्हणत आपलं बोलणं थांबवलं. कार्यक्रमही संपला. इतर सर्व कार्यक्रमांमध्ये जशी वक्त्यापुढे सह्यांसाठी गर्दी व्हावी, तशीच विद्यार्थ्यांनी त्यावेळी ग्रेसांच्या भोवती गर्दी केली होती. मी सहीसाठी त्यांच्याजवळ जायला थोडा घाबरतच होतो. म्हणून मग स्टेजच्या जवळ जाऊन ते सही कशी देतायेत आणि ते जवळून कसे दिसतायेत एवढंच बघून माघारी फिरलो. ग्रेसांच्या भाषणाच्या अगोदर त्यांच्याविषयीची एक डॉक्युमेंट्री कॉलेजने दाखवली होती. ती डॉक्युमेंट्रीही ग्रेसांनी ‘हो दाखवा की...’ म्हणत पाहिली. त्यात बॅकग्राउंडला कुठेतरी त्यांनीच लिहिलेलं ‘भय इथले संपत नाही...’ वाजत होतं. तेच गुणगुणत मी बाहेर पडलो होतो. आता तेच लिहिलेलं वास्तव असल्याच पटतयं. ग्रेसफूल ग्रेस अनुभवल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी त्यांच्या कवितेतलं वास्तव पटल्यासारखं वाटलं. मी एक वास्तववादी आणि ग्रेसफुल ग्रेस अनुभवल्याचं समाधानही त्याच निमित्ताने वाटतंय.
२९/०३/२०१२