बुधवार, १८ जानेवारी, २०१२

कधीतरी कुणावर तरी...

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे
असं दुसर्‍यानच येऊन का आपल्याला सांगाव?
आपणही कधीतरी स्वत: हून ते धाडस करावं.
एकदातरी निदान कुणावर तरी चुक्कुन का होइना; पण प्रेम करावं.

नावडत्या गोष्टींना आपलंस करावं
आवडतील नंतर म्हणून त्या स्वीकारावं
आवड-निवडीचं स्वातंत्र्य स्वेच्छेने गमवावं,
कधीतरी नक्कीच कुणावर तरी प्रेम करावं.

नातं ते नेमकं कोणतं, स्वत: च जाणावं
काय आहे ते विचारून कधीही ना दुखवावं
ही जाणीव येण्याइतपत तरी स्वत: झुकावं
कधीतरी नक्कीच कुणावर तरी प्रेम करावं.

अडीच अक्षरी प्रेमामधलं सामर्थ्य ते अनुभवावं
वात्सल्य अन त्यागाला सोबत घेऊन चालावं
‘मी’ पणाचं नकळत कधीतरी बलिदान द्यावं
कधीतरी नक्कीच कुणावर तरी प्रेम करावं.

दुसर्‍यासाठी जगण्यातला अर्थ काय असतो,
या प्रश्‍नाचं उत्तर स्वत: च शोधावं
प्रेमळ त्या आठवणींमध्ये एकदा तरी रमावं
कधीतरी नक्कीच कुणावर तरी प्रेम करावं.

२८/९/२००९

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

मन्या आणि मनू...

काल संध्याकाळी नोकरीमधलं पहिलं प्रमोशन लेटर आणि ऍग्रिमेंट हातात पडलं होतं. त्यामुळे डोक्यात जरा वेगळेच विचार होते. तशाच विचारांमध्ये फेसबुकला स्टेटस अपडेट केलं- फायनली गॉट प्रमोटेड टू नेक्स्ट स्टेप इन करिअर. डिजिग्नेशन चेंज्ड टू करसपॉंडंट कम कॉपी एडिटर फ्रॉम ट्रेनी करसपॉंडंट. ही वस्तुस्थिती आणि सोबत डोक्यातल्या विचारांची जाणीव म्हणून की काय, रिस्पॉन्सिबिलिटि वाढत असल्याची शेवटची ओळ. लगेच अभिनंदनाच्या प्रतिक्रिया मिळायलाही सुरुवात झाली. रुमवरच्या रवीनेही ऑनलाइन झाल्या-झाल्या कमेंट केली आणि एक चॅट मेसेज टाकला- भाऊ, रुमवर एक स्पेशल गिफ्ट आणलयं.

मी ही बाब तितकी गांभीर्याने न घेता, त्याला थँक्स म्हणत पुन्हा कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
सगळं आवरून रूमवर आलो. येतानाही त्या गिफ्टची कसलीच कल्पना नव्हती किंवा मनात त्याविषयी कुतुहलही शिल्लक राहिलेलं नव्हतं. पण रूमवर आल्यावर घडलं भलतचं. रूमवर धाकट्या भावाने एक मांजराचे पिल्लू आणले होते. ‘भाऊ हेच गिफ्ट’ असं रवी का म्हणाला तेही लक्षात आलं.

पांढुरकं केशरी रंगाचं ते मांजराचं पिल्लू पाहिल्या पाहिल्या मला आमचा मन्या आठवला. मन्या म्हणजे आमचा बोका. मी सहावी-सातवीत असताना कधीतरी किरणने, माझ्या धाकट्या भावाने तो उचलून घरी आणला होता. आजही त्यानेच ते पिल्लू रूमवर आणलंय. अगदी तसंच दिसणारं. त्यामुळं पुन्हा ते दिवस आठवलं. मन्याशी खेळणं...मन्याला दुध ठेवणं..सकाळी सकाळी दुध हवं म्हणून आई उठल्या-उठल्या तिच्या पायात घुटमळणारा-फ्रिझपासून त्याच्या हक्काच्या दुधाच्या वाटीपर्यंत आणि पुन्हा फ्रिझपर्यंत येरझर्‍या घालत, ‘मला दुध हवयं’ असं सांगणारा मन्या...आम्ही खेळायला गेल्यावर गच्चीवरून आईसोबत आमच्या आवाजाकडे लक्ष देत आणि आम्ही आल्याची चाहूल लागली की खाली गेटकडे येत आम्हाला पंजानेच त्याचा प्रसाद देत, जणू काही मला का नेलं नाही तिकडे? असं विचारणारा मन्या...भाऊंच्या, माझ्या वडिलांच्या टेबलवर त्यांच्याच मनगटी घड्याळाशी खेळता-खेळता ते टेबलवरून पडताना, आमच्या सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकलेला असतानाच ते घड्याळ लिलया झेलत पुन्हा ते टेबलवर नेणारा मन्या... आणि अचानक एके दिवशी आम्हाला कुणालाही कसलीच पूर्वकल्पना न देता, घरून नेहमीपर्यंत समोरच्या लिंबाच्या झाडाकडे पळत गेल्यावर परत न आलेला मन्या... असं सगळं सगळं काही क्षणांमध्येच डोळ्यासमोर तरळून गेलं.

गिफ्ट आवडलंच होतं यात शंकाच नव्हती. तसं हे आमच्याकडे आणलेलं तिसरं मांजर. मन्यानंतर आणखी एक मांजर आणलं होतं, पण ते आमच्या घरी थांबायला तयारच नव्हतं. सोडूनच द्यावं लागलं शेवटी. त्यानंतर बर्‍याच वर्षांनंतर आता हे एक मांजर. मी त्याला आपसूकच ‘मनू’ म्हणालो. भावाने त्याच्यासाठी दुध ठेवलं होतं. त्याला खायलाही घातलं होतं. त्यामुळे ते थोडं सुस्तावलं होतं. त्याच्याच अंथरूणामध्ये शिरून निवांत बसलं होतं. मला न राहावल्याने त्याला उचलून घेतलं, गोंजारलं आणि ठेवलं स्वत: जवळचं. थोडा वेळ गेल्यावर त्याला जरा वेगळीच लहर आली. म्यॅऊ-म्यॅऊ करत आलं बाहेर. मग त्याच्यासाठी एक बॉल आणि एका दोरीला लटकवलेलं बाटलीचं एक झाकण, अशी दोन खेळणी पूर्वानुभवातून तयार करण्यात आली. नंतर काय मग स्वारी जोपर्यंत थकली नाही तोपर्यंत खेळली. सध्या किरणच्या पांघरूणाखाली निवांत लोळतेयं.

दरम्यानच्या काळात या मनूनेही त्या मन्यासारखाच लळा लावला. कदाचित आमच्याकडे मांजरांविषयीच्या प्रेमाचा लळा अनुवांशिकतेनूनच आला असावा. गावी, मलवडीलाही दादांनी, माझ्या आजोबांनी मांजर पाळलंय. ती आज्जीला जाम घाबरते, पण आजोबांशिवाय कधीच जेवण घेत नाही की दुधाला तोंड लावत नाही. आता तोच ‘मनूप्रेमाचा’ वारसा कदाचित आम्ही चालवू. अगदी काही तासांच्या या भानगडीमध्ये या मनूने माझ्या गालापर्यंत मजल मारली तेव्हा नकळतच डोळ्यात पाणी आलं होतं. खूप पुढचा विचार असेल हा; पण ही मनू माझ्या इतक्या जवळ, अगदी गालापर्यंत बिनधास्त पोचली. गालावरच निवांत बसली. तिला गोंजारताना अजिबातही हयगय न करता तिच्या जिभेने माझ्यावरची तिची माया दाखवली. इतका जिव्हाळा?

नवीन माणसांना भेटताना कधीच असा जिव्हाळा जाणवला नाही. विश्‍वासाचा भाग असेल कदाचित. माणसं हल्ली माणसांवरच विश्‍वास ठेवत नाहीत, त्यामुळे पुढच्या इतर गोष्टीही तितक्याच अविश्‍वासाने होतात. सोज्वळ भाषेत आपण त्याला प्रॅक्टिकल जगणं म्हणतो. प्राण्यांच्या विश्‍वात ते थेट विश्‍वास टाकूनच होत असेल का? काहीही असलं तरी हे गिफ्ट मला जाम आवडलंय. त्या मन्याची आठवण करून देणारी एक मनी भेटलीये. माणसंही अशीच भेटली तर...
१२/१/२०१२
०००