मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

अशी माणसं...

काही माणसांचं मोठेपण आपल्याला हळूहळू विरघळणाऱ्या एखाद्या चॉकलेटच्या स्वादासारखं समजत जातं. चॉकलेटं जस जसं जास्त विरघळत जातं, तस तसं ते जास्त चवदार वाटायला लागतं. ते जिभेवर रेंगाळायला लागतं आणि अचानक ते पूर्ण विरघळलयं, संपलंय असं जाणवतं. ते पुन्हा हवंस वाटतं, पण मिळत नाही. ‘त्यांच्या’ बाबतीतही माझी अशीच परिस्थिती आहे. आहे म्हणायला कारण असं, की ‘ते’ असूनही मला आता तितकेसे अनुभवायला मिळत नाहीत. कधीतरी चुकून भेट झालीच, तरी एखादं चॉकलेट कसं तोंडात जाण्याआधीच कुठेतरी पडतं, तसंच ‘ते’ गायब होतात. कधी पाहून हसतात, बोलतात; तर कधी काहीही न बोलताच. आत्ताही व्यंकटेश माडगूळकरांचं ‘अशी माणसं, अशी साहसं’ वाचायला घेतलं होतं. शेवटून दुसरी गोष्ट वाचून थांबलो. पुस्तक मिटायच्या आधी शेवटचं पान, मग ब्लर्ब आणि मग पुन्हा प्रस्तावना चाळली. त्यात पुन्हा मला ‘त्यांचं’ नाव दिसलं. ‘त्यांच्या’ नावाभोवतीच्या वलयात आणि मग आपसूकच ‘त्यांच्या’विषयीच्या आठवणींमध्ये रमणं आलंच. तसं आता ‘त्यांचं’ नाव असं कुठल्या कुठल्या पुस्तकांच्या प्रस्तावनांमध्ये किंवा त्या त्या लेखकाने आभार मानलेल्या लोकांच्या यादीत किंवा मग स्वतः लेखक म्हणून ‘ते’, असं वाचणं माझ्यासाठी नवं नाही. पण तरीही, माझ्यासाठी ‘त्यांचं’ नाव आणि ‘ते’ ही खूपच विलक्षण गोष्ट आहे. ‘ते’ म्हणजे खूप भारदार आणि लौकीकाची गोष्ट वाटतात मला. ‘त्यांचं’ व्यक्तिमत्त्व तसं नसलं तरी.


तशी ‘त्यांची’ नी माझी पहिली भेट ‘रानडे’च्या मुलाखतीमध्येच झालेली. मुलाखतीच्या वेळचं इतर काहीही आठवत नसलं, तरी ‘त्यांनी’ विचारलेला प्रश्न मी कधीही विसरू शकलो नव्हतो. ‘त्यांनी’ थेट खान्देशातल्या राजकारणावरचा प्रश्न त्यावेळी मला विचारला होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या त्या वेळच्या कुलगुरूंचं नावही ‘त्यांनी’च विचारलं होतं. राजकारणावर त्यांना समाधानकारक उत्तर दिलेलं जाणवलं असलं, तरी कुलगुरूंचं नाव आठवेना म्हटल्यावर ‘त्यांनी’ मला छळलं होतं. कुलगुरू कुठले आहेत, कोणत्या विषयाचे आहेत हा तपशील सांगून, मला फक्त नावचं आठवत नाही, म्हटल्यावर ‘त्यांना’ मला छळायची लहर आली होती. मुलाखतीतून उठता उठता ते नाव सांगितल्यावर ‘ते’ हसलेलंही मला चांगलं आठवतंय. 

त्यानंतरची ‘त्यांची’ भेट झाली, तीच मुळी ‘रानडे’च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच वर्गात. त्यावेळी ‘त्यांचं’ नाव समजलं. मग रोजच्या रोज भेटणं, बोलणं स्वाभाविकच होतं. त्यातूनच मग ‘त्यांची’ आणखी ओळख होत गेली. व्यवस्थित इन केलेलं शर्ट, नीटनेटका ड्रेस, कधीतरी काखेला अडकवलेली पिशवी, पायात सँडेल आणि सॉक्स अशाच युनिफॉर्ममध्ये ते ‘रानडे’ला येत. त्यांनी कधी खूप डार्क, भडक रंगाचा शर्ट घातलेलं मी अजूनही पाहिलेलं नाही. ‘त्यांच्या’ शांत स्वभावाचं प्रतिबिंब कदाचित ‘त्यांच्या’ कपड्यांमध्येही जाणवत असावं ते असं. लांब सडक नाक, उभट चेहेरा आणि या सगळ्यांना साजेशी शिडशिडीत देहयष्टी असा ‘त्यांचा’ एकंदर रुबाब. रुबाबच म्हणेन मी, कारण भारदार व्यक्तिमत्त्व वाटावं असं काहीही जवळ नसताना माणसं कसं रुबाबदार राहू शकतात, याचं ते एक मुर्तीमंत उदाहरण ठरू शकतात. 

‘त्यांच्या’ वर्गात शिकवण्याच्या पद्धतीविषयी आम्हाला सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटायचं. वर्गात येतानाच पाच-दहा पेपरांचा गठ्ठा आणायचे. वर्गात बसल्या बसल्या मग चिरफाड चालायची. संपादन नावाची भानगड नेमकी काय असते, न्यूजरूमचा फील काय असतो, डेस्कची मीटिंग कशी होत असावी, याचा सगळा वृत्तान्त ‘त्यांनी’ अशाच चिरफाडीमधून आम्हाला समजून दिला होता. या
सगळ्या भानगडी सुरू असताना, वर्गात कोण कसं आहे, कोणाला काय आवडत असावं-नसावं, कोण कुठल्या बाजूला झुकलेला आहे, याचा त्यांनी आढावा घेतलेला असे. त्यातूनच मग त्यांच्या कोपरखळ्या, त्यातून कधी आम्हाला समजणारे, कधी उशीरा समजणारे, तर कधी कधीच न समजणारे विनोदही घडत. त्यांच्या चर्चा मग वर्गाबाहेर त्यांच्या मागेमागे त्यांच्या केबिनपर्यंत, कधी केबिनच्या बाहेर कँटिनमध्ये चालत. कधी कधी या चर्चा इतक्या कुत्सितपणे संपत, की ‘त्यांनी’ त्या विषयावर दिलेली प्रतिक्रिया किंवा त्या विषयावरची ‘त्यांची’ ती नजर, तो विषय त्यांच्या दृष्टीने किती क्षूद्र आहे, याची जाणीव करून देई. मग तो विषय पुन्हा न काढता, इतर
विषयांवरच्या गप्पा रंगत.

तिकडे जळगावच्या विद्यापीठात मध्यंतरी गेलो, तेव्हा तिथंही ‘त्यांच्या’विषयी विचारणा झाली. ‘ते आहेत ना अजून, ते म्हणजे त्या वास्तूची जान, त्यांचीच पुस्तकं आहेत इथं अभ्यासाला,’ म्हणत ‘त्यांची’ पुस्तकं समोर करून दाखवत झालेली ‘त्यांची’ स्तुतीही ऐकली. मी आपलं, ‘आहेत,’ म्हणून सांगितलं, ‘त्यांनी’च शिकवलंय म्हणून सांगितलं. समोरच्यानंही, ‘मग तुला पुस्तकं दाखवायची गरजच नाही,’ म्हणत पुस्तक मागे घेतलेलं पाहिलं. दोन-चार आठवणी सांगून ‘भाग्य आहे तुमचं,’ म्हटलेलंही आठवतंय. ‘रानडे’मध्ये असण्याच्या काळात ते असं का म्हटले असावेत, याचा प्रत्यक्ष प्रत्ययच घेतला. अनेक मोठ्या लोकांपासून ते आमच्यासारख्या, म्हटलं तर अगदी फालतू, किस पेड की पत्ती, गटातल्या पोरा-सोरांपर्यंत सगळ्यांचाच राबता त्यांच्याकडे असायचा. मात्र प्रत्येकासोबत ते एकाच न्यायाने बोलतात-बसतात-चहा घेतात, शिव्या घालायच्या तर यथेच्छ घालतात आणि जिथं कौतुक करायचं तिथं मनापासून आणि हातचं काहीही न ठेवता कौतुक करतात हे अनेकदा पाहिलं होतं. कदाचित त्यामुळंच ‘ते’ म्हणजे त्या वास्तूची एक वेगळी ओळख बनले होते.

संगीताविषयीची ‘त्यांची’ आवड, शास्त्रीय संगीताविषयी ‘त्यांना’ असणारी जाण, त्या विषयीचा अभ्यास आणि ‘त्यांनी’ त्या विषयी केलेलं लेखन आमच्यासाठी कौतुकाचा विषय होता. आमच्या वर्गात माझ्यासकट काही जण ‘त्यांच्या’कडे असलेल्या त्या विषयीच्या ज्ञानभांडाराचा लाभ घेण्यासाठी सदैव आसुसलेलो असायचो. ते संगीत आणि इतर कलांविषयी बोलायला लागले, की शक्यतो फक्त ऐकण्याचंच काम करायचं. विचारू वाटलं, तर काही विचारायचं. नाहीतर एक शब्दही बोलायचा नाही, ही माझी त्या दरम्यानच्या काळातली स्ट्रटर्जी होती. त्यातूनच ‘त्यांनी’ आम्हाला समीक्षण शिकवावं, असं आम्हा सगळ्यांनाच वाटायचं. पण ते तशी संधी कधी देत नसत. वर्गाबाहेरच त्यांनी आम्हाला समीक्षणाचे धडे दिले होते. वर्गात ते मिळण्यासाठी आम्ही धडपडायचो, हे त्यांनाही तसं माहिती होतं. ते फक्त कधीही जाणवू देत नव्हते एवढंच.

याचाच परिणाम की काय, पण त्यांनी आम्ही दुसऱ्या वर्षाला असताना त्यांच्या वर्गातच समीक्षण या विषयावर बोलायला सुरुवात केली. तासाचा तो विषय नव्हता, पण बोलण्याच्या ओघात तो विषय निघाला आणि मग त्यापुढचा सर्व तास, म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन तास, आणि त्यांनतर कँटिनचा चहा घेतानाचा वेळ, हा सगळा त्या समीक्षणाच्या चर्चेमध्येच गेला. त्या वर्गात तसं खूप कमी संख्येने हजेरी होती, पण जी मोजकी टाळकी वर्गात होती, त्यांनी समीक्षणाविषयीची अमृतवाणीच ऐकल्याचे अनुभवले. वर्गात उभं राहून ते शिकवतात, हे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. आमच्या सर्व सीनिअर्सला त्या विषयी सांगितल्यावर, ‘त्यांनी उभं राहून शिकवलं,’ म्हणून आश्चर्य व्यक्त केलं होतं. कला, कलांचे प्रकार, कलांच्या प्रकारांनुसार समीक्षणाची बदलणारी पद्धत, सिनेमाचे-नाटकांचे समीक्षण, एखाद्या मैफलीचे समीक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिनेमे आणि त्यांचे समीक्षण, नवख्या समीक्षकाने लिहिता- बोलताना घ्यायची काळजी, काय वाचावे- काय वाचू नये अशा अनेक गोष्टींची माहिती ‘त्यांनी’ त्या वर्गात दिली. खरं तर ‘ते’ समीक्षणाविषयी बोलणारेत हे जर माहिती असतं, तर त्या विषयाचं रेकॉर्डिंगच करून ठेवलं असतं, पण ‘त्यांनी’ ती संधीही दिली नाही. त्या वर्गात अनुभवलेले ‘ते’ खूप वेगळे आहेत हे पदोपदी जाणवत होतं. आवडीच्या विषयावर माणूस किती भरभरून बोलतो, ते त्या वर्गात मी पाहिलं होतं. ‘त्यांनी’ आपलं बोलणं थांबवूच नये, असं वाटत होतं. ‘त्यांचं’ तसं बोलणं, ते शिकवणं पुन्हा कधीही अनुभवायला मिळणार नाही, याची मला वर्ग सुरू असतानाही खात्री होती. ती खात्री आता इतिहासामध्येच बदलली आहे. त्या तासानंतर ‘त्यांनी’ केबिनमध्ये भेटायला गेल्यावर आम्हाला भेट म्हणून दिलेला ‘छंद’चा एक विशेषांक मी जपून ठेवलाय. त्यावर आमच्या वर्गातल्या दोस्तांची नावं घालून सरांनी तो दिलाय. तो चाळायला लागलं, की पुन्हा ‘त्यांच्या’ अशा साऱ्या आठवणी समोर येतात.

माझं ‘रानडे’तलं पहिलं वर्ष संपल्यावर ‘ते’ निवृत्त होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आमच्या नंतरच्या बॅचमध्ये ‘त्यांच्या’विषयी बोलताना अनेकदा आमच्या बॅचमधले सगळे ती पुढची बॅच ‘अनलकी’ म्हणायचो. तिच नाही त्या पुढच्या सगळ्या. कारण त्यांना या सगळ्या बाबी कधीच अनुभवायला मिळणार नव्हत्या. असाच एक भन्नाट अनुभव या काळात अनुभवला. ‘त्यांचं’ रानडेमधलं येणं जवळपास बंद झालं होतं. कधीतरी रस्त्यानं येता – जाता फक्त दिसायचे. बोलणं होत नव्हतं. एकदा ‘ते’ डेक्कनच्या चौकात रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेले दिसले. आम्ही दोघंही काहीतरी कामाने तिकडे निघालो होतो. ‘ते’ दिसले की एकदम थांबलो. ‘त्यांनी’ आपली सँडल समोरच्या चांभाराकडे दिली होती. हातात एक आख्खा पेरू होता. आम्ही दिसताच हसले. ‘सर किती दिवसांनी दिसलात,’ म्हणेपर्यंत त्यांनीच आम्हाला प्रतीप्रश्न केला, ‘इकडे कुठे फिरायला,’ उत्तर सांगेपर्यंतच्या काळात ‘त्यांनी’ त्यांच्या हातातल्या पेरूच्या दोन फोडी आमच्या समोर केल्या. ‘दोघंही वाटून घ्या बरं नीट. भांडू नका,’ म्हणत दोघांनाही ‘त्यांच्या’ नेहमीच्या स्टाइलमध्ये एक टोला हाणला. मग हसत हसतच गप्पा झाल्या. ‘रानडे’मध्ये आल्यावर चहाला भेटू असं ठरलं आणि निरोपानिरोपी झाली. 

आम्ही दिल्ली दौऱ्याला गेलो होतो, त्यावेळी मी विचारलेल्या एकदोन प्रश्नांचं सगळ्यांनीच कौतुक केलं होतं. त्यातला एक प्रश्न सध्या देशाचे ‘युवराज’ म्हणवल्या जाणाऱ्या एका व्यक्तीला विचारलेला होता. तो प्रश्न ‘यांना’ही खूप आवडला असावा. पुण्यात परत आल्यावर मध्येच असंच कधीतरी ‘त्यांनी’ मला वर्गाबाहेर थांबून सांगितलं, ‘ते तू युवराजांना विचारलेला प्रश्न आणि त्याच्यावर त्याने दिलेलं उत्तर, जसं आठवेल तसं लिहून मला दे.’ मी ते लिहून घेऊन ‘त्यांच्या’कडे गेलो. त्यांनी ते का मागितलंय ते माहिती नव्हतं. ते कळावं म्हणून विचारलं, ‘सर कशासाठी हवं होतं हो हे.’ ते म्हणाले, ‘एवढ्या वर्षाच्या दिल्लीच्या वाऱ्यांवर एक कादंबरी लिहायचीये. त्याची सुरुवात सापडलीये असं वाटतंय. बघू.’ त्यानंतर परत मी त्यांच्या या कादंबरीचं आणि एकूणच त्यांच्या त्या लिखाणाचं काय झालं, ते विचारायचं डेरिंग केलं नाही. कदाचित पुढच्या वेळी चान्स मिळाला तर विचारून घेईन. त्या निमित्ताने त्यांच्याशी भरपूर वेळ गप्पा मारता येतील. त्यांच्याविषयीच्या नानाविध चर्चा मी ऐकल्या आहेत, पण अनुभव मात्र त्यांच्या  चांगुलपणाच, मोठेपणाचाच घेतला आहे. त्यांचं ते मोठेपण पुन्हा अनुभवता येईल. चॉकलेटचा स्वाद... पेरूच्या त्या दोन फोडींनी दिलेली गोडी... छंदचा तो विशेषांक... एका तासात वर्गात उभं राहून शिकवलेलं त्यांचं ते शिकवणं असा सगळ्यांचाच जुना हिशेब कदाचित पुन्हा मांडता येईल.