गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

चार्मिंग जंटलमन, आय विल रिअली मिस यू...

            दसऱ्याचा दिवस का कोणास ठाऊक थोडा अस्वस्थता घेऊनच आला होता. आदल्या दिवशी दुपारपासूनच आभाळ भरून यायला सुरुवात झाली होती. कदाचित दसऱ्याला पाऊस पडणार असंच चित्र दिसत होतं. दसऱ्याला दिवसभर वेगळंच वातावरण अनुभवत होतो. संध्याकाळी आलेल्या फोनमुळं ती अस्वस्थता अशीच बातमी ऐकण्यासाठी तर नव्हती ना, असा प्रश्न पडला होता. ती बातमी दनकन कानावर आदळली. अमित शर्मा सर गेले. सरांविषयीच्या आठवणी तितक्याच झर्रकन डोळ्यासमोर तरळून गेल्या. माझ्यासाठी डिसेन्सीचं दुसरं नाव म्हणजे शर्मा सर होते. व्यवस्थित भांग पाडलेले केस, डोळ्यावर चष्मा, मिशी, नीट इन केलेलं शर्ट, बहुतांश वेळा जिन्स, नी एक मोठी साइड बॅग असा त्यांचा एकूण अवतार असे. तसं बघायला गेलं, तर रानडेमध्ये पत्रकारिता शिकण्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला होता. मी रानडेमध्ये शिकवायला सुरुवात केली, त्यावेळी त्यांच्या बॅचचं पहिलं सेमिस्टर आटोपत आलं होतं. त्यामुळे त्या अर्थाने ते विद्यार्थी आणि मी त्यांच्यासाठी सर झालो होतो. मात्र, त्यानंतरही त्यांच्या त्याच डिसेन्सीमुळे मला त्यांना कधीही सर सोडून इतर दुसरं काहीही म्हणू वाटत नव्हतं. अगदी त्यांना पाठवलेल्या शेवटच्या व्हॉट्सअप मेसेजपर्यंत ते कायमच होतं, नी आत्ताही ते तसंच आहे. त्यांना मी पाठवलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये, ते पुन्हा एकदा पूर्वीसारखेच एक चार्मिंग जंटलमन म्हणून रानडेच्या आवारात दिसावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. काळजी घेण्याच्या सदिच्छाही दिल्या होत्या. त्याला उत्तर देतानाही, थँक्स सर, आय डेफिनिटली विल असंच त्यांनी लिहिलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं कानावर आलं होतं. पण आजच्या बातमीनं तो चार्मिंग जंटलमन आता भेटणार नसल्याचं सांगितलंय.

            खरं तर ते एक मिलिटरी ऑफिसर. मिलटरीवाला माणूस म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर ज्या काही प्रतिमा येतात, त्या सगळ्या प्रतिमांमध्ये कधी ना कधी जगलेला, मात्र रानडेमध्ये आल्यावर त्या सगळ्या प्रतिमांच्या पलिकडे जाऊन सगळ्यांमध्ये मिसळून गेलेला माणूस म्हणून मला अमित सर महत्त्वाचे वाटत गेले. आम्ही माध्यमं शिकताना स्टिरिओटाइप्स शिकत असतो. साचेबद्ध प्रतिमा. विशिष्ट गटांच्या, विशिष्ट प्रकारच्या व्यक्तींच्या साचेबद्ध प्रतिमा. माध्यमं अशा प्रतिमा तयार करायला हातभार लावत असतात. मिलिटरीतल्या ऑफिसर्सविषयीचे असले सगळे स्टिरिओटाइप्स त्यांनी हलकेच मोडीत काढले होते. वर्गातलं त्यांचं बसणं- उठणं, साधारण त्यांच्या मुलांच्या वयांच्या इतर वर्गमित्र- मैत्रिणींसोबत तितक्याच सहजतेनं वावरणं, त्यांच्या वयाच्या निम्म्या वयाच्या असलेल्या माझ्यासारख्याशीही तितक्याच अदबीनं बोलणं असलं सगळं काही ते अगदी तितक्याच सहजतेने करायचे. लष्करातलं त्यांचं पद, त्यांची एकूणच शैक्षणिक आणि लष्करी पार्श्वभूमी या सगळ्या बाबतीत ते आम्हा सगळ्यांसाठीच तसे वरिष्ठ होते. मात्र त्यांनी तसं एकदाही जाणवू न देता, सर मैं अगर आप लोगों के लिए कुछ कर सकू, तो मेरे लिए वो बोहोत खुषी की बात है, असं ते म्हणायचे. अनेकदा त्यांना आम्ही दिलेले थँक्सही तितक्याच अदबीने स्वीकारलेले मी कित्येकदा पाहिलेत. त्यांच्या सोबतीने केलेला दिल्ली दौरा तर त्यांनी केवळ माझ्यासाठीच नाही, तर त्यांच्या आख्ख्या बॅचसाठी अविस्मरणीय करून ठेवलाये.

         त्यांचं माझ्या केबिनला येणं, हे मला खरंच खूप वेगळं वाटत असे. केबिनला आल्यावर बसायला सांगितल्याशिवाय ते बसत नसत. मला अनेकदा त्यांचं हे वागणं थोडं अवघडल्यासारखं करून टाकायचं. एकदा असंच या विषयी बोलणं झाल्यावर ते म्हणाले होते, सर आय शूड रिस्पेक्ट यू, दॅट इज माय ड्युटी. आप हमारी इज्जत करते हो, तो हमेभी आपके लिए अपना फर्ज निभाना चाहिये. हे त्यांचं वेगळेपणच होतं. त्यांच्या वागण्या- बोलण्यातल्या अदबीने त्यांनी मला एक माणूस म्हणून त्यांच्या जवळ ओढलं होतं. अगदी सुरुवातीच्या काळात त्यांच्याशी बोलताना येणारं दडपण त्यांनीच दूर सारायला मदत केली होती. त्यांनी डिफेन्स रिपोर्टिंगविषयी केलेल्या प्रेझेंटेशननंतर तर मी, सर आपका ये प्रेझेंटेशन तो हमारे डिफेन्स रिपोर्टर दोस्तोंकोभी बहुत इनपूट्स देगा, अशीच प्रतिक्रिया दिली होती. दिल्ली दौऱ्याच्या नियोजनादरम्यान त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत दिल्लीत एडीजीपीआय, आर्टिलरी ब्रिगेड व्हिजिट्ससाठीची परवानगी मिळवून दिली होती. आर्टिलरी ब्रिगेडमध्ये आत गेल्यावर त्यांच्या सिनिअर्सना त्यांनी सर, ये मेरे प्रोफेसर है, म्हणत ओळख करून दिली होती. त्या दोघांच्या तुलनेत वयाने निम्माच असलेला हा प्रोफेसर त्यावेळी अवघडला होता. आप हमारे मेहमान हो, बाकी कुछ नही. आप बस रिलॅक्स रहो, असं म्हणत त्या दोघांनीही ते अवघडलेपण दूर केलं होतं. कदाचित ते नसते, तर त्या जागांना आणि त्या अनुभवांना त्यावेळी तिथे उपस्थित असलेला आमच्यापैकी प्रत्येक जणच मुकला असता. त्यांच्याविषयीच्या अशा एक ना अनेक आठवणी आता एकामागून एक समोर येत आहेत.

            त्यांची डिग्री पूर्ण होता होताच त्यांचं पोस्टिंग लेहला झाल्याचं समजलं होतं. सर, इट विल हार्डली टेक फोर अवर्स टू रिच देअर. सो यू आर माय गेस्ट देअर अँड वी आर मीटिंग देअर इन लेह, इन फ्युचर, असं म्हणत त्यांनी डिपार्टमेंटमधून निरोप घेतला होता. त्यांचं परीक्षेचं मार्कलिस्ट घ्यायला यायलाही त्यांना जमलं नव्हतं. एक दिवशी सकाळी सकाळी त्यांचा फोन आला. फोन उचलतानाच सर क्या बोल रहा है लेह, असं म्हणत मी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी सर मैं पूना में कमांड हॉस्पिटलमें हूँ,’ असं सांगायला सुरुवात केली. त्यांचा आवाज खालावला होता. काही तरी सिरिअस असल्याचं जाणवत होतं. कर्नल बॅनर्जींच्या सोबतीने त्याच दिवशी जाऊन त्यांची कमांड हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. सरांना कॅन्सरचं निदान झालं होतं. सुरुवातीला पाठमोरे बसलेल्या सरांची प्रकृती अक्षरशः निम्म्यावर आलेली जाणवली होती. तरीही त्यांनी त्याच अदबीने आमचं दोघंचं तिथे स्वागत केलं. त्यांच्या पत्नीशी ओळख करून देताना, परत धिस इज अवर प्रोफेसर देअर हू टेक्स केअर ऑफ अस, असं सांगितलं. अमित अल्वेज रेफर्ड यूवर नेम इन हिज डिस्कशन्स,’ म्हणत मॅडमनंही त्यांना माझ्याविषयीची कल्पना असल्याचं सांगितलं. सरांना जास्त वेळ बोलणं अवघड होत होतं. त्यामुळे त्यांना आराम करायचं सांगून आम्ही त्यांचा निरोप घेत होतो. सर आप आये, बहोत अच्छा लगा, हे त्यांचे शब्द होते. त्यांना म्हटलं, सर आपके लिए इतना करना हमारा फर्जही है, म्हणत त्यांना पुन्हा रानडेत येण्याचं निमंत्रण दिलं होतं. ते निमंत्रण तसंच राहिलं आता. तो चार्मिंग जंटलमन आता त्या कँपसमध्ये आपल्याला भेटणार नाही, नी विस्मरणातही जाणार नाही. चार्मिंग जंटलमन, आय विल रिअली मिस यू.