शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

रविशचे आभार, कारण की...


ब्लॉगवरची ही सलग तिसरी पोस्ट आहे, की जी एका पत्रकाराविषयीची आहे, पत्रकारितेच्या क्षेत्राविषयीची आहे. या तिन्ही पोस्टसाठी विचार झालेल्या प्रत्येकाचंच काम, त्यांचा लौकीक, त्यांचं समाजामध्ये असणारं स्थान हे निश्चितच महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी महत्त्वाचं ठरतंय ते त्यांच पत्रकार असणं नी पत्रकारितेविषयी तितकंच जास्त सकारात्मक असणंही. तेही एका अशा काळामध्ये की ज्या काळात पत्रकारितेची गरज आहे की नाही, या विषयीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. पत्रकारिता संपली आहे की काय, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. खरं तर आता 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चा जमाना सुरू झालाय. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्येही त्याचा शिरकाव होऊ लागला आहे. तंत्रज्ञानामधील बदलांचा विचार करता, तो तसा स्वाभाविकच म्हणावा लागणार आहे. आता अशा परिस्थितीत विचार करू शकणाऱ्या माणसांची म्हणा गरज उरणार तरी कोणाला आहे. ज्यांना उरणार आहे ते कदाचित बहुसंख्यांच्या रेट्यामधले नसतीलही. कारण कदाचित ते तंत्रज्ञानापासून अलिप्त असू शकतील. तसे मोजकेच निघतील. अशांसाठी काम करणारे जे कोण असतील, ते कदाचित मग पत्रकार ठरतील बहुदा. हे भविष्यात होईल तेव्हा होवो. आत्ता वर्तमानात काहीशा तशाच, एका विचार करणाऱ्या पत्रकाराविषयी लिहू वाटलंय. रविश कुमार हे त्याचं नाव.

त्याला रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळालाय म्हणून हे लिहू वाटणं जरी असलं, तरी निव्वळ तेवढंच कारण नाही. सचिन तेंडुलकरला अगदी प्रेमाने नी हक्काने सच्या म्हणेपर्यंतच्या पातळीवर आपण पोहोचलो होतो. तेवढी आपुलकी आपल्याकडे होती. तसंच एखाद्या मोठ्या चॅनेलच्या मॅनेजिंग एडिटरला अगदी आपल्याच एखाद्या दोस्तासारखी हाक मारावी, तेवढा हक्क गाजवावा असा अधिकार नी तेवढीच आपुलकी देणारं जर कुठलं एखादं नाव अलिकडच्या काळात आमच्यासारख्या पोरांसमोर आलं असेल तर ते रविश कुमारचं. अनेकदा गरज नसताना, अनेकदा तशी पात्रताही नाही हे माहिती असतानाही अनेकांना नावापुढे जी वगैरे लावून लोकं आपली विनम्रता दाखवतात. अनेकांना सर म्हणावं लागतं. रविश याला अपवाद ठरतो. म्हणजे त्याच्याविषयी आमच्यासारख्यांच्या मनात आदर नाही असं अजिबातच नसतंय. पण एक हक्क गाजवण्यातून, तो किती जवळचा आहे ते दाखवण्याच्या पद्धतीतून कदाचित अगदी साहाजिकच रविशचा शो पाहिला का, असं अनेकजण अनेकदा एकमेकांना विचारू शकतायेत. ही आपुलकी तो आपल्याला अगदी नावासकट ओळखतोय म्हणून नाही आलेली. त्याच्या पत्रकारितेच्या शैलीतून ती तुम्हा- आम्हाला त्याच्या तितकी जवळ घेऊन गेली आहे. औपचारिकतेची बंधनं त्याने कधीच मोडून टाकलीत. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन त्याचं ते सायकल रिक्षामधून फिरणं, भर बाजारात वा अगदी माणसांच्या वाहत्या जथ्थ्यांमधून अगदीच किरकोळ दिसणाऱ्याला समोर घेत त्याच्याशी बोलणं, ती त्याची शैली त्याला जनसामान्यांच्या जवळ घेऊन आलीये. माझ्याही. त्यामुळे हे लिहू वाटलं. त्याच्यासोबतच्या दोन भेटीत अनुभवायला मिळालेला रविश कुमार हाही तितकाच महत्त्वाचा आहे, म्हणून मग ते वाटणं कृतीत बदललं.

       त्याच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा मागे आमच्या अंगदनी अगदी भारी शब्दांमध्ये चितारला होता. गेल्या वर्षी रानडेच्या दिल्ली दौऱ्याचा तो प्रसंग होता. पोरांना रविश कुमारला भेटायचं होतं. मी आपला एक साधा मेसेज पाठवला होता. पत्रकारितेचे विद्यार्थी घेऊन दिल्लीत आलोय, तुम्हाला भेटायचंय वगैरे लिहिलं होतं. त्याचा एक रिप्लाय आला, सोमवारको ले आईये’. त्याच्या त्या एका रिप्लायवर एनडीटीव्हीच्या ऑफिसला पोहोचलो होतो. ट्रॅफिकने दगा दिला होता, तरी आम्ही ट्राय केला. सिक्युरिटीच्या भानगडी टाळायच्या म्हणून आधी अंगद नी मी असं दोघंच तिकडे गेलो. तो प्राईम टाइमच्या गडबडीत होता. तरीही तो जिने उतरून आम्हा दोघांना भेटण्यासाठी खाली आला. आता गडबडीत शक्य नाही, उद्या परत आलात तरी चालेल म्हणत त्याने निरोप घेतला होता. त्यादरम्यानच्या काळात अनुभवलेला रविश कुमार हा कामाच्या घाईगडबडीत कसा असेल, हे स्पष्टपणे दाखवणारा होता. पण म्हणून तो पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना विसरू शकला नव्हता. त्यांच्यासाठी तो प्राईम टाईमची मीटिंग सोडून खाली आला होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवण्याची तयारी दाखवणारा तो होता. आमच्या हाती त्यावेळी हे पत्रकारितेचंच भांडवल होतं काय ते. दुसऱ्या दिवशी भेट शक्य झाली नाही.

यंदाच्या दौऱ्यात हा अनुभव गाठीशी होताच. ट्रॅफिकचं भयंकर प्रकरणही लक्षात होतं. रविश कुमारच्या भेटीसाठी थेट एचआरपासून सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून झाले होते. त्याला वैयक्तिकरीत्या पाठवलेले मेसेज हे परत वेगळेच. एनडीटीव्हीच्या स्टुडिओची वेळ मिळाली होती. एचआर स्वतः आम्हाला विद्यार्थ्यांसोबत स्टुडिओ दाखवायला येणार होते. त्या अनुषंगाने वेळ लक्षात घेत तिकडे सुटलो होतो. या वेळी ट्रॅफिकनं पुन्हा दगा दिला. गाड्या पाक तिकडं चार किलोमीटरवर सोडून आम्ही एनडीटीव्हीच्या दिशेने चालत निघालो होतो. वेळ गाठायची होती. एचआरनं स्वागत करत आम्हा सगळ्यांना दोन गट करत स्टुडिओ वगैरे दाखवला. मात्र, सगळ्यांना रविश कुमारही हवा होता. तो भेटायची चिन्ह दिसत नव्हती. स्टुडिओ बघून आम्ही परत गाड्यांकडे निघायच्या बेतात असताना त्याला केलेल्या मेसेजवर त्याचा रिप्लाय आला आला, आ जाओ. रिप्लाय दिला, ऑफिसच्या खालीच आहोत. एचआरला सांगितलं. त्यांनाही ते तसं शॉकिंगच होतं. त्यांनी लगेच परत आतली व्यवस्था कामाला लावली. तोपर्यंत आम्ही तूर्तास रिसेप्शनच्या जवळची खोली पोरांसह भरून टाकली. म्हटलं तर तिच खोली होती, जिथं मी नी अंगद गेल्या वेळी त्याची वाट पाहात थांबलो होतो. आता आख्खा वर्ग त्यात अक्षरशः कोंबला होता. रविश समोर येऊन बसला होता. मी उभाच होतो, अगदी त्याच्या खुर्चीच्या शेजारी. मोजक्यांना बसायला जागा मिळाली होती. तांबट सर समोर होते, काही मुलं बसली होती, अनेक उभी होती. पण म्हणून कोणाचीच कसलीच तक्रार नव्हती. त्यावेळीही नव्हती नी त्यानंतरच्या जवळपास आख्ख्या दौऱ्यातही नव्हती. कदाचित त्यांना जे हवं होतं ते त्या एका भेटीनंच त्यांना दिलं होतं.  
        
         
त्या रुमच्या बाहेर अगदी सुरुवातीच्या भेटीतंच रविशनं पोरांना दिल्लीतल्या वह सब लाल, झिरो रिझल्टवाली बिल्डिंग वगैरा देख ली, असा प्रश्न विचारून बोलतं केलं होतं. मी कुठूनही कुठेही सुरू होऊ शकतो, पण तुम्ही तुम्हाला काय हवं ते विचारा, असं हिंदीमधून म्हणत रविश त्या खोलीत आत आला. सोबत 'एचआर'ही होते. त्यांचा तो सब लाल बिल्डिंग झिरो रिझल्टवाली बिल्डिंग वगैरा चा संदर्भ घेत तांबट सरांनी त्याच अनुषंगाने सुरुवातीचा प्रश्न विचारत फ्लोअरचा टोन सेट केला होता. त्या अनुषंगाने त्याने बोलणं सुरू केलं. खूप वाचणं, खूप जास्त तांत्रिक मुद्दे समजून घेणं हे पत्रकारांसाठी कसं महत्त्वाचं आहे ते त्याने सांगितलं. सध्या पत्रकारिता व्हिजिटिंग कार्ड, नवनवी पदं वगैरेतच अडकून पडली आहे, तुम्ही त्यात पडू नका. मी माझ्या 'एचआर'कडे त्यासाठी कधीही गेलो नाही, असं सांगत त्याने वस्तुस्थितीवर सहजच पण नेहमीसारखंच तिखट भाष्य केलं. पढनेका बॅकग्राऊंड बनाके रखो. कल व्हॅलेंटाइन डे है, तो थोडा मजाभी करो,’ हे दरम्यानच्याच काळात सांगायलाही तो विसरला नाही. रोज चार तास वाचणार नाही, तर तुम्ही स्वतः स्वतःला फसवणार आहात. वाचाल तर तुम्ही कायम इतरांपेक्षा चांगलं कराल. रोज चार हजारांवर शब्द लिहिणं, पत्रकारिता करणाऱ्या इतर संस्थांचं पब्लिक ऑडिट करणं, त्याचं विश्लेषण करणं, हे त्याच्या पुढच्या टप्प्यांचा भाग म्हणून होत राहातंय हे त्याने सांगितलं. त्यासाठी फॅक्ट सही होने चाहिये, इल इंटेन्शन ना हो इतनाही, ही आपल्या कामाची गरज म्हणूनही स्पष्ट केली. त्या त्या वेळचे संदर्भ तुम्हाला समजायला हवेत. त्यासाठी तुमचं वाचन असेल, तर तुम्हाला तुमचं काम अगदी सहज पुढे नेता येतं. कोणत्याही भाषेत पत्रकारिता केलीत, तरी तुम्ही कायम यशस्वी राहता. तुम्ही जे काही लिहिणार आहात ते सगळं पब्लिकमध्ये येणार आहे. अनेकदा तुम्ही अस्वस्थही होऊ शकताय. म्हणून ते लिहिण्यापूर्वी त्यासाठीचे फॅक्ट शोध, त्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या. ते मी स्वतः करतो, हे सांगायला तो विसरला नाही.

अगदी हसत- खेळत हे वातावरण खुललं होतं. आपल्या एचआरकडे बघत तो म्हणाला, ते व्हिजिटिंग कार्ड वगैरे छापणं खूपच सोप्प आहे, यांच्यासाठी तर ते रोजचं काम आहे. त्यात काय आज माझं छापलं, तसं ते उद्या कोणा दुसऱ्याचंही छापून देतील. काळ सरत जाईल, तसं माझ्यावरूनही लोकांचं लक्ष हटेल, पण जर मला आता अँकर बनवलंच आहे तर त्याचा मी फायदा कसा घेतोय हे महत्त्वाचं आहे. तसं नको असेल, तर हार्डवर्क हवंच. अनेकजण माझ्यापेक्षाही जास्त क्षमता असणारे होते, मात्र ते भरकटले. एक अपना पॅशन बना लिजिए, हमें ये पढना है, और पढते जाईये. और दुसरा वो टॅक्सवॅक्स क्लिअर रखीये, रिश्तेदार वगैरा फोन करते है कामके लिए, तो थोडा दूर रखिए. मैं उनसे कम मिलता जुलता हूँ.हे सगळं तो अगदी सहज बोलत गेला. प्रश्न येत गेले, रविश उत्तरं देत गेला. अजिबातही अवघडलेपणा नव्हता. पत्रकारितेच्या स्वरुपाकडे वळताना त्याने नव्या पोरांना दोष दिला नाही. तो म्हणाला, बस आप ह्युमन व्हॅल्युज रखिये. सब बाएसेस दूर रखिये, वो आ जाते है, उसमें आपकी गलती नहीं है. वो आपको समझना पडेगा. मैं लिखके देता हूँ की उसका रिझल्ट झिरो है. आप मंत्री या विधायक के पीए-सीए बन जाओंगे लेकिन जर्नलिस्ट नहीं बन पाओगें. हमारा काम है ऐसे बाएसेस के खिलाफ खडा होना. अगर हम ह्युमॅनिटीमें विश्वास नहीं रखेंगे, तो हमे जर्नलिस्ट किस बातके लिए बनना है. पैसा हमेशा आप दुसरे प्रोफेशनमें कमा सकते हो. एमएलए वगैरा बनीये. खतरों को पहचानो, हम सबको प्रोपगंडासे प्रभावित नहीं होना है. हम जर्नलिस्ट है.शेवटाला अगदी फॉलोअर्सचीही गोष्ट आली तेव्हा गांधी नी आंबेडकर समजून घ्या, त्यांचे फॉलोअर्स व्हा, माझेही नको म्हणत त्याने त्या औपचारिक गप्पा थांबवल्या.  

ही प्रश्नोत्तरं साधारण पंधरा मिनिटं वगैरे चालली. पोरं दिलखुलासपणे हसली, खोचकपणे प्रश्न विचारले, रविशनं दिलेली उत्तरं तितक्याच मोकळेपणाने स्वीकारलीही. त्याच खोलीत पुढच्या गेस्ट्सना जागा करून द्यायची वेळ झाली होती. रिसेप्शनिस्टने येऊन सूचना करून झाली. आम्ही सर्व उठून बाहेरच्या लॉबीत आलो. सर्वांसोबत ग्रुप फोटो झाला. आम्ही परत गाडीकडे निघायला लागतो. मुलं रविशसोबत बोलतच होती. रविशही त्यांच्यासोबत बोलत- बोलत पार्किंगपर्यंत येऊन पोहोचला होता. तिथं पुढचा काही काळ पुन्हा सगळे त्याच्याशी बोलले. रविश कुमार आमच्यासाठी पार्किंगपर्यंत आलाय हे अनेकांच्या समजण्यापलीकडे गेलं होतं. पण ते कदाचित त्याच्यासाठी तितकंच स्वाभाविक होतं. त्याने सगळ्यांना पत्रकारितेतील त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. पोरांनीही अगदी हसत हसत त्या स्वीकारल्या. हे पाहणंही सुखावणारं होतं. एखाद्या पत्रकारावर नवी पोरं इतका कमालीचा विश्वास टाकू शकतात, हे त्यातून स्पष्टच दिसत होतं. पत्रकारांविषयीचं काहीसं अविश्वासाचं वातावरण, एकमेकांमधील टीका-टिप्पणीचं भांडवल यात आता काय ते नवं नाही. मागे एकदा एका लेखाच्या निमित्ताने लिहिलं होतं. पत्रकारांविषयीचं ते तसलं वातावरण, त्यांच्यातील ते वैचारिक वा तात्त्विक वा ऑफिशिअल संघर्ष हे लोकशाहीच्या उर्वरीत स्तंभांना कधीही हवेच असतील. कोणाला वाटणारे की पत्रकार असा इतर स्तंभांएवढा असा इतका मोठा व्हावा, नी त्यालाही असा मोठा सन्मान मिळावा ना. त्यांची उणीदूणी निघतील तेवढं तिन्ही स्तंभांसाठी भारीच. आज मात्र गंमतच झालीये. पत्रकार मोठा झालाय. ही काही पहिलीच वेळ नाहीये, पण मागच्या काही वर्षांमधली ही तशी पहिलीच वेळ ठरणारे, अनेकांसाठी. माझ्यासाठी हे पत्रकार मोठं होणं जरा जास्तच महत्त्वाचं आहे. रविशचं पुरस्कारासाठी अभिनंदन वगैरे त्याच्यापर्यंत कधी पोहोचेल तेव्हा पोहोचो, पण पत्रकारिताही मोठी होऊ शकते, हे सकारात्मक कृतीतून दाखवून दिल्याबद्दल त्याचे खूप जास्त आभार.     

मंगळवार, २५ जून, २०१९

बापमाणूस

       खरं तर त्यांच्याविषयी असं लिहिलेलं त्यांना आवडेल की नाही, याची काहीच कल्पना नाही. तरीही लिहितोय. लिहिण्याला कारण आहे ते अर्थातच त्यांचं मोठेपण. हे मोठेपण त्यांनी मिळवलेल्या पद वा प्रतिष्ठेत गुरफटून गेलेलं नाहीये. एक माणूस म्हणून असलेलं त्यांचं मोठेपण हे त्याचं कारण आहे. केवळ मलाच नाही, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकालाच त्यांचं हे मोठेपण नकळत त्यांच्या जवळ घेऊन जातं. आपल्याला त्यांचा माणूस बनवतं, एक वेगळी ओळखही देतं. ते म्हणजे आमचे पराग सर. पराग करंदीकर हे ते नाव. मला त्यांची ओळख झाली, ती मी रानडेत विद्यार्थी असताना. ते शहरीकरण वगैरे विषयावर आमच्याशी बोलायला वर्गात आले होते. तेव्हाही (म्हणजे तसं 'लोकसत्ता', नंतर 'सकाळ' नी मग मटामध्येही सोबत असणारा) प्रसाद पानसे माझ्या सोबत वर्गात होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला तसं थेट ओळखायचा काही संबंधही नव्हता. त्यावेळी सकाळमधून त्यांच्या नावासकट वाचायला मिळणारे विषय आणि प्रत्यक्षात त्यांनी त्या तासाला केलेली मांडणी आम्हाला सर्वांनाच त्यांच्याविषयीचे कुतुहल जागृत करणारी भासली होती. तासानंतर त्यांच्याशी वर्गाबाहेर मारलेल्या गप्पा नी त्यांचा चला भेटू हा निरोप आपुलकी वाढवणारा ठरला होता. त्यावेळी कल्पना नव्हती, की पुढे हेच नाव मला; पुण्याबाहेरून पुण्यात आलेल्या एकाला; पुण्यासारख्या शहरात स्वतःची वेगळी ओळख तयार करण्यासाठी संधी देणार होते म्हणून.


             पुढे लोकसत्तामधील इंटर्नशिप व विद्यार्थी बातमीदार म्हणूनचे काम संपल्यावर प्रत्यक्षात नोकरीची सुरुवात करताना आधी सकाळमध्ये अगदी अल्पकाळ व त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये जवळपास सहा वर्षांचा काळ हा खरं तर त्यांच्या सान्निध्यामध्येच गेला म्हणायला हरकत नाही. मला चांगलं आठवतंय ते महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीवेळी मी नको तेवढं खरं बोलून गेलो होतो. मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, की मी मटा वाचत नाही म्हणून. त्यात पुण्यातल्या बातम्यांचे प्रमाण इतर पेपरांच्या तुलनेत कमी असते म्हणून मी तो वाचत नाही, हे त्याचे कारणही दिले होते. मुख्य संपादक मुलाखत घ्यायला, तर निवासी संपादक म्हणून पराग सर ती मुलाखत ऐकायला समोर होते. मुलाखत संपल्यावर बाहेर भेटल्यावर त्यांनी मुलाखतीविषयी बोलताना मला लेका एवढंही खरं बोलायचं नसतंय रे,असा प्रेमळ निरोप दिला होता. त्यानंतरची सूत्रे हलवली ती त्यांनीच. मटामध्ये बातमीदार म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर त्या मुलाखतीतल्या प्रतापाचे परिणाम समजले होते. नी त्यावेळीच हे समजले होतं, की ही नोकरी मिळाली ती पराग सरांमुळेच. याविषयी नंतर एकदा बोलल्यावर, संधी मिळालीये, आता चांगलं काम करून दाखवा,’ इतकंच ते बोलले होते.

          जानेवारी, २०११ मध्ये पुणे मटा सुरू झाला, नी जून-जुलैमध्ये पंढरपूरची वारी आली. एकदा मीटिंगमध्ये वारीचं काय करायचं, याची चर्चा सुरू झाली. वारीला जायला कोणी इच्छुक आहे का, असा प्रश्न सरांनी विचारला. मी त्या मीटिंगमध्येच, मला वारीला जायचंय,” असं म्हटलं. बाकीच्यांनी थोडं काय जाणार, कसं जाणार वगैरे विचारून झाल्यावर मग सरांनी मीटिंग संपल्यावर भेटा बोराटे, असा निरोप दिला. पुन्हा भेटल्यावर नक्की जाणार ना, एवढंच सरांनी विचारलं. मी हो म्हणताच, ते त्यांची खूर्ची फिरवून डेस्कटॉपकडे वळले. पुढच्या काही मिनिटात एक पत्र टाइप करून, त्याची प्रिंट घेत सही करून ते मला दिलं. ते पत्र होतं आळंदी देवस्थान ट्रस्टसाठीचं. त्या पत्राची एक कॉपी अजून माझ्याकडे तशीच जपून ठेवलेली आहे. त्यावरची सरांची पल्लेदार सही अगदी बघतच राहावी इतकी सुंदर आहे. पत्र झाल्यावर त्यांनी एक फोन फिरवला. वारीला एक कार्यकर्ता पाठवतोय, सांभाळून घ्या, असा निरोप पलीकडे पोचला होता. एका नवख्या बातमीदारावर एका संपादकाने टाकलेला हा विश्वास होता. त्याचवेळी आपल्या माणसाची काळजी घेणारा सूरही त्यात होता. त्यांचं हे असं वागणं कायमच मला एक वेगळा आत्मविश्वास देत राहिलं. त्यानंतर बातमीदारीच्या निमित्ताने अनेकदा असे प्रसंग येत गेले, नी प्रत्येक वेळी त्यांचं हे वागणं तितकंच ठाम होत गेलं. विज्ञान नी शिक्षणविषयक बातमीदारीच्या आवडीमुळे मी त्यांच्यासाठी तसा लोणी- पेंडसेंचा माणूस ठरायचो. त्यावरून ते काही वेळा चिडवतातही. पण, त्या चिडवण्यामधूनही समोर येणारी त्यांची आत्मियता, त्यांचा विश्वास, बोलण्यामधली सकारात्मकता, वेळप्रसंगी पडणारे रट्टे माझ्यासारख्या अनेकांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी दिशा देत राहिले. आपल्या बातमीदारावर त्यांनी टाकलेला विश्वास, त्याला पाठबळ देण्यासाठी त्यांनी स्वतः टाकलेले शब्द हे केवळ संपादक म्हणूनच होते, असं कधीच वाटलं नाही.  

     

          दरम्यानच्या काळात पुण्यातलं घर झालं. नंतर लग्नही ठरलं. लग्नासाठीचा रजा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी सरांकडे गेलो. रिसेप्शनचं निमंत्रण दिलं. सरांनी बसवून घेतलं. लग्नाचं नियोजन विचारलं. माझ्याकडे हातात पुरते पैसे आहेत की नाहीत, याचा अंदाज घेतला. लेका लग्नात काय पाहिजे ते सांग, म्हणाले. मी आपलं रिसेप्शनला तुम्ही यायला हवंय, असं बोलून गेलो. सर म्हणाले, अरे तसं नाही योगेश. संकोच करू नकोस. पुण्यात घर चालवणं, नी तेही पत्रकाराने घर चालवणं किती अवघड असतंय ते आम्ही पाहिलंय. काही लागत असेल, कुठली वस्तू तुला लागणार असेल तर ती सांग. त्यात अजिबातही गैर वाटू देऊ नकोस. हे सांगताना त्यांनी घरात काय आहे- काय नाही, याची सगळी चौकशी केली. सगळं ठिकठाक आहे म्हटल्यावर मग रिसेप्शनला येतो म्हणाले. ते फक्त म्हणाले नाहीत, तर आलेसुद्धा. संध्याकाळच्या रिसेप्शनला नी तेही जवळपास निम्म्या-अर्ध्या टीमसह येणं पत्रकारितेमध्ये किती अवघड आहे, हे पत्रकारितेत असणाऱ्यांना चांगलंच माहितीये. आमच्या या संपादकाने आमच्यासाठी तेही केलंय.

           एकदा अगदी रात्री साडेअकराच्या सुमाराला हर्षला चहाची लहर आली. कुलदीप नी मी त्याच्या जोडीला होतो. निघता निघता हर्षने सरांना, चहाला येणार का सर, म्हणून विचारलं होतं. फर्ग्युसन रस्त्यावर आम्हा तिघांच्या सोबतीने त्यावेळी सर आले. केवळ आलेच नाही, तर पुढचा काही काळ ते आमच्यातलेच होऊन राहिले. अगदी निवांतपणे चहाचा आस्वादही घेतला. त्यांच्यावेळच्या पत्रकारितेतले अनेक किस्से नी आठवणी त्यांनी आमच्यासोबत त्यावेळी शेअर केल्या. अशा प्रसंगांविषयी एकदा त्यांना विचारलं तर सर म्हणाले, सगळे सोबत असण्यात जी मजा आहे, ती एकटं असण्यात नाही. मी एकटा मोठा झालो, तर मी मोठा झालोच नाही. माझ्यासोबतचे मोठे झाले, तर मलाही मोठं होण्यात मजा असेल. या सगळ्या गोष्टी कदाचित त्यासाठी महत्त्वाच्या आहेत, बाकी काही नाही. सरांशी जोडले गेलेले असे अनेक प्रसंग आता डोळ्यासमोर अगदी सहजच येऊन जातायेत. आणखी एक असाच प्रसंग होता तो मटामध्ये राजीनामा देण्याचा. आयुष्यात राजीनामा लिहिण्याचा प्रसंग तसा आत्तापर्यंत एकदाच आला होता. तो कसा लिहावा, याची कल्पना नसल्याने मी आपला जमेल तसा एक ड्राफ्ट सरांकडे पाठवला होता. सरांनी तो माझ्यासमोरच वाचायला घेतला. तो वाचल्यावर एक दुसरा ड्राफ्ट मला वाचा,” म्हणाले. राजीनाम्याचा ड्राफ्ट कसा असावा, याचा तो एक उत्तम नमुना होता. थोडक्यात अगदी राजीनाम्याचा ड्राफ्ट कसा असावा, हेही त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने आणि सकारात्मक कृतीतून मला सांगितलं होतं.

         सरांच्या केबिनकडे जाताना कधीच तसं दडपण जाणवत नाही. ते बातमीदार म्हणून काम करताना जाणवलं नव्हतं, नी नंतर प्राध्यापक झाल्यावरही कधी वाटलं नाही. केवळ मलाच नाही, तर सर्वांनाच त्यांनी ते जाणवू नये, अशाच पद्धतीने आम्हाला वागवलंय. आई- भाऊ, आप्पा- काकी, किरण- शिल्पा, मयूर- वृषाली, सोनाली नी मी या सर्वांची चौकशी ते करतात. कोण कुठे कसं राहतंय, काय चाल्लंय हे आत्मियतेने समजून घेतात. लेका घरच्यांना जप रे. आपण आपल्या घरच्यांना गृहित धरतो. तसं करू नका. हे सांगण्याचा मला अधिकार नाही, कारण मीही तेच केलंय. पण शक्यतो लवकर घरी जात जा,’’ असं सांगणारा हा माणूस. मला तुम्हाला आता सल्ला देण्याचा अधिकार नाही, पण वडिलधारा म्हणून सांगतोय, असं म्हणत काळजीपोटी मला, प्रसाद वा चिन्मयला अगदी घरच्यांसारखे सल्ले देणारे हे आमचे सर. दोन मित्रांमधला अबोला दूर करण्यासाठी दोघांना समोरासमोर घेऊन, "एवढे मोठे झालात की काय तुम्ही दोघं लगेच," असं विचारत दोघांनाही जागेवर आणणारे हे सर. मी प्राध्यापक झाल्यावर नवं घर घेतलं. त्यांचं घरी येणं अजून तसं राहिलंय.
पण ते आठवलं की पुन्हा, लेका योग्या तुझ्या घरी येणं राहिलंय रे. येऊन जातो एकदा. करूत प्लॅन, असं म्हणणारा माणूस हा तुमच्यासाठी फक्त तुमचा संपादकच कसा राहील ते सांगा. असे हे आमचे सर नी अनेकांचे लाडके मास्तर. 

             

          एखाद्या कार्यक्रमात हलकेच हळवा होणारा, डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या असताना हलकेच त्या पुसणारा तो माणूस आहे. नी कधी तरी गरजेनुसार तितकीच कणखर भूमिका घेत ये ठोकून काढा रे त्यांना. सोडायचं नाही हं अजिबात. कोण आलं, तर मी बघतो काय ते,” असं सांगत आख्खं ऑफिस दणाणून टाकणारा तो एक बॉसही आहे. डिझायनरला बाजूला सारून तो पानही लावू शकतो, नी क्राईम रिपोर्टरला बाजूला करून क्राईमची बातमीही लिहू शकतो. म्हणूनच असा संपादक फक्त संपादक म्हणून नाही, तर माणूस म्हणूनही ग्रेट असतो. तो एक बापमाणूस असतो.  

          ता. क. खरं तर सरांविषयी लिहिलेली हे लेखन पोस्ट करण्यासाठी तसा मुहूर्त सापडत नव्हता. सर मुंबई मटाचे संपादक होत आहेत, हे समजल्याबरोबर तो मुहूर्त मिळाला. सरांना भेटायला जाताना प्रमोद सरवळे सोबत होता. सरांना भेटून निघताना सरांशी त्याची ओळख करून दिली. सर नेहमीप्रमाणेच त्याच्याशीही तितक्याच आत्मियतेने बोलले. घराकडे परतत असताना प्रमोद बोलून गेला, ‘’सर, ते किती डाऊन टू अर्थ आहेत. माझ्याशी कित्ती सहज बोलले....’’ त्याच्या या बोलण्यातलं अप्रूप हे मी ज्यावेळी त्यांच्याशी पहिल्यांदा भेटून समोरासमोर बोललो, तेव्हा मलाही होतं. सर का ग्रेट आहेत, याचं हे उत्तर आहे. ते एक ग्रेट माणूस आहेत, म्हणून. 

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

क्लासिकल जर्नलिझमचा मास्टर क्लास

खरं तर खूप दिवसांनी ब्लॉगसाठी लिहायला बसलोय. जोपर्यंत मनापासून वाटणार नाही, तोपर्यंत ब्लॉगसाठी काहीच लिहायचं नाही, हे तत्त्व पाळतोय. त्यामुळंच कदाचित ब्लॉगवर लिहिलेलं नंतर परत कधीही वाचताना माझं मलाच आवडतं. इतरांना आवडतंय की नाही, ते माहिती नाही. ते माहिती नसलेलंच उत्तम असतंय. फक्त स्वतःला आवडतंय तर लिहायचं, इतकंच. आज लिहू वाटलं याला कारण आज ऐकलेलं एक लेक्चर. गिरीश कुबेरांचं लेक्चर. त्या लेक्चरचा विषय- पत्रकारिता. जागा- पुण्यातलं रानडे इन्स्टिट्यूट, अर्थात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचा परिसर. वर्ग- तोच जिथं कुबेर सर पत्रकारिता शिकले, जिथं जवळपास पंचविसेक वर्षांनी आम्ही शिकलो, नी नंतर जवळपास दहा वर्षांनी आता मी तेच शिकवायचा प्रयत्नही करतोय. तसे ते लोकसत्तेच्या अग्रलेखातून भेटतच असतात. आज ते पत्रकारितेच्या विभागातील विद्यार्थ्यांसमोर काय बोलतायेत, हे ऐकण्याची उत्सुकता होती. पत्रकारिता हा तसा जिव्हाळ्याचाच विषय घेऊन ते बोलणार आहेत, म्हटल्यावर ही उत्सुकता आणखीच वाढली होती. त्यांचं ते लेक्चर, लेक्चरदरम्यान त्यांनी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसमोर- म्हटलं तर उद्याच्या पत्रकारांसमोर- अनेक मुद्द्यांवर मांडलेली परखड मात्र तितकीच तर्कनिष्ठ भूमिका, नी महत्त्वाचं म्हणजे पत्रकारितेविषयी सकारात्मक मांडणी करत, पत्रकारितेतील वस्तुस्थितीची सर्वांनाच एक जबाबदार संपादक म्हणून करून दिलेली ओळख खूपच भावली. हे महत्त्वाचं यासाठी, की पत्रकारिता या क्षेत्राविषयी सध्या चांगलं असं काही ऐकायला मिळणं, हे काहीसं अवघड झालंय. नी कदाचित त्याचमुळे असेल कदाचित, हा विषय ब्लॉगसाठीही लिहू वाटतोय.


त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात झाली ती वर्गात उपस्थित सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या रानडे इन्स्टिट्यूटपासून. त्यांच्या इन्स्टिट्यूटविषयीच्या त्या आठवणी त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर तो त्यांच्यासाठीचा एक्सायटिंग एक्सपिरीअन्स होता. ते पत्रकारितेकडे बाय चॉईस वळाले होते. १९८४-८५ च्या त्या काळामध्ये चंदिगड, चेन्नई व पुणे अशा तीन ठिकाणच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यातून रानडेमधील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत त्यांचा या अभ्यासक्रमाला प्रवेश निश्चित झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. दिल्ली दौरा, इंटर्नशिपदरम्यानचा कामाचा अनुभव हे मुद्दे ओघाने आलेच. त्याजोडीने उल्लेख आला तो ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकरांचा. ते म्हणाले, आय वॉज इन लव्ह विथ द पर्सन नेम्ड तळवलकर.... त्या प्रेमात मुंबईला मटामध्ये काम करताना इंटर्नशिप संपल्यानंतरही ती सुरूच ठेवण्याचा प्रकार केल्याचं त्यांनी नमूद केलं. तत्कालिन विभागप्रमुख परांजपे सरांनी पुण्याला परत बोलवून घेतल्यावर, नी तळवलकर सरांनीही अभ्यासक्रम पूर्ण करून मग नोकरीसाठी येण्याविषयी सांगितल्यावर पुन्हा अभ्यासक्रमाकडे वळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. या आठवणी सांगताना तळवलकरांविषयीची त्यांची आत्मियता, त्यांच्याविषयीचा आदर नी एकूणात पत्रकारितेविषयीची त्यांची आस्था हे सगळंच सहज जाणवून गेलं. या आठवणींच्या मदतीने त्यांनी पहिल्या काही मिनिटांमध्येच समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना आपलंसं केलं होतं. इतकं, की त्यानंतर पुढचे जवळपास तीन तास वर्गातले विद्यार्थी जागचे हलले नव्हते. एखाद- दुसऱ्याचा अपवाद वगळता सगळेच कुबेर सर पत्रकारितेविषयी काय बोलतायेत, हेच ऐकत होते. जेवणाची वेळ टळून गेली आहे, हेही प्रश्नोत्तरांच्या ओघामध्ये सगळेच विसरले होते. कदाचित आम्ही सर्वच त्यावेळी कुबेर सरांच्या भाषेतला क्लासिकल जर्नलिझमचा मास्टर क्लास अनुभवत होतो, म्हणून असेल कदाचित, पण हे घडून गेलं.

त्यांचं ते लेक्चर म्हणजे पत्रकारितेविषयीची थिअरी, सध्याची प्रॅक्टिकल्स नी त्यातून चांगल्या पत्रकारितेकडे जाण्यासाठीचा मार्ग यांचं एक सुंदर विवेचन होतं. सत्तेकडे जाण्याचा शॉर्टकट म्हणून पत्रकारितेकडं पाहिलं जातंय, इतर काही जमत नसल्यानं पर्याय म्हणून पत्रकार होण्याचा मार्ग निवडला जातोय, या बाबी पत्रकारितेच्या भवितव्याच्या दृष्टिने गंभीर असल्याचं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. लोकांना चांगलं नी दर्जेदार वाचायला लावणं, त्यासाठी पत्रकारांनी अज्ञानात सुख ही भावना न बाळगता काम करत राहणं महत्त्वाचं आहे. निःपक्ष वा तटस्थ  पत्रकारिता हे थोतांड असून, पत्रकारिता ही भूमिका घेऊनच करायला हवी, असं त्यांनी स्पष्टच केलं. गिव्हिंग इक्वल स्पेस फॉर द अदर साईड अॅजवेल ही न्युट्रॅलिटीची व्याख्या त्यांनी त्या निमित्तानं सांगितली. मटामध्ये सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये दि. वि. गोखले या ज्येष्ठ सहकाऱ्याने दिलेला सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अनुभव म्हणून मांडला. या व्यवसायामध्ये टिकायचं असेल, तर ज्या दिशेने वारा वाहतोय, त्याच्या विरुद्ध दिशेने बघायची सवय ठेव, हा तो सल्ला आजच्या काळातही भूमिका घेण्याच्या दृष्टीने तितकाच उपयुक्त ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं. पत्रकारितेकडे वळताना बौद्धिक क्षमता घेऊनच यावं लागेल, मास्टर ऑफ वन ऑर टू व्हावंच लागेल, हे सांगताना त्यांनी आता केवळ नी केवळ बातमीदारांची गरज उरलेलीच नसल्याचंही स्पष्ट केलं. तुम्हाला केवळ बातमी देऊन भागणार नाही. बातमी सध्या ऑटोपायलट मोडवरच आहे. त्यासाठी बातमीदाराने काम करायची गरज नाही. बातमीदाराने काम नाही केले, तरी बातमी या ऑटोपायलट मोडमुळे वाचकांपर्यंत थेट जाऊन पोहोचते. त्या बातमीच्या पलिकडे जाण्यासाठी आता त्या फाईव्ह डब्ल्यू नी वन एचच्या पुढे जावं लागेल. त्यात आणखी दोन नवे डब्ल्यू अॅड करावे लागतील. व्हाय नाऊ?’ आणि व्हॉट नेक्स्ट?’ हे दोन डब्ल्यू वाचकांना नेमकेपणाने हव्या असलेल्या बाबींपर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतात. या प्रश्नांना भिडायला सुरुवात करा, असं आवाहनच त्यांनी उपस्थित सर्वांना केलं.

भूमिका घेताना विचारधारा, वैचारिक बांधिलकी आणि वैचारिकता या बाबींमधील कोणती गोष्ट कशी निवडायची याचीही कुबेर यांनी आपल्या विवेचनामधून पुरेशी स्पष्टता केली. विचारधारा नावाच्या थोतांडासोबतची वैचारिक बांधिलकी ही पत्रकारितेची खरा शत्रू आहे. पत्रकारांची बांधिलकी ही विचारधारेशी नव्हे, तर ती वैचारिकतेशी असायला हवी. पत्रकारांनी लोकानुनय करता कामा नये. जनमताच्या आभासाविषयी प्रश्न विचारत, प्रसंगी स्वतःच्या भूमिकांबाबत स्वतःला प्रश्न विचारत त्यांची उत्तरे पत्रकारितेच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी गप्प बसा संस्कृतीचे पाईक न होता, प्रश्न विचारण्याचे आपले मूळ काम सुरूच ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पत्रकारितेला चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. हा स्तंभ जनतेचे प्रतिनिधीत्त्व करतो. त्यामुळेच अगदी संसदेमध्येही अध्यक्षांच्या आगमनानंतर ज्यावेळी सभागृहामध्ये उपस्थित सर्व उभे राहतात, त्यावेळी चौथ्थ्या स्तंभाचे प्रतिनिधी हे आपापल्या जागी बसूनच असतात. ते ज्या जनतेचे प्रतिनिधीत्त्व करतात ती जनता त्यावेळी कशी उभी राहणार, म्हणून ही बसण्याची कृती घडत असते. इतर तिनही स्तंभ समोर दिसत असताना, हा चौथा स्तंभ तसा अदृश्यच असतो. हेच या स्तंभाचं वैशिष्ट नी वेगळेपणही आहे. हा स्तंभ अदृश्य असूनही स्वतःच्या कार्याची जाणीव करून देत राहतो, अशी स्पष्टताही त्यांनी केली. माध्यमांनी वेगवेगळ्या धारणा मांडण्याची गरज असते. मात्र आजच्या समाजमाध्यमांच्या काळामध्ये वैयक्तिक धारणाच बळकट होऊ लागल्या आहेत. समाजमाध्यमे केवळ त्यासाठीच गरजेच्या अशा गोष्टी दाखवू लागली आहेत. अशा परिस्थितीमध्ये भावनेच्या पलिकडे जाऊन, तत्त्वाधिष्ठित भूमिका घेत, बुद्धी व अर्थकारणाशी निगडित असलेल्या नानाविध मुद्द्यांचा विचार पत्रकारांनी, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी आपल्या मांडणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्पष्ट केलं.  

या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी खरं तर अनेकदा पाश्चिमात्य माध्यमांची, त्यांच्या कामांची उदाहरणे दिली. अखेरच्या टप्प्यात त्यांनी आय अॅम ओपन टू एनी क्वेश्चन म्हणत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची खुलेपणाने, मनमोकळी आणि विस्तृतपणे भूमिका मांडत उत्तरे दिली. अग्रलेखातील आपल्या भूमिकेमध्ये काही तरी गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर अग्रलेख मागे घेण्यामागेही पाश्चिमात्य देशांमधील वृत्तपत्रांच्या कार्याची प्रेरणाच असल्याची आठवणही त्यांनी एका प्रश्नाच्या निमित्ताने सांगितली. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा बाबी होत असताना, तेथील समाजही त्याविषयी तितक्याच मोकळेपणाने नी खुलेपणाने चर्चा करतो. पाश्चिमात्य देशांमध्ये पत्रकारितेमधून काही तरी वेगळं देण्यासाठीची गुंतवणूक करण्याची एक संस्कृती रुजलेली आहे. आपल्याकडे तसे होत नसल्याची खंतही त्यांनी मांडली. पत्रकारितेमध्ये इंडियन एक्स्प्रेससारख्या मोठ्या समुहासोबत काम करताना आलेला अनुभव हा एक प्रकारची मस्ती, इंग्रजीमध्ये सांगायचं तर पत्रकारितेची 'किक' बसवणारा ठरल्याचं त्यांनी सांगितलं. चांगल्या नी अभ्यासू लोकांची या क्षेत्रात गरज आहे असं सांगत तुम्ही सर्वांनीच पत्रकारितेत आलेलं मला नक्की आवडेल, असं अगदी शेवटाला सांगायलाही ते विसरले नाहीत.
कार्यक्रम आटोपला, विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन्सही केले. दरम्यानच्या काळात त्यांनी उदाहरणादाखल नमूद केलेले न्यूयॉर्करमधील लेख मी डाऊनलोड करून घेतले, वाचायचेत आता. गंमत म्हणून घरी आल्यावर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर नजर टाकली. फोटोसेशन्समधली छायाचित्रं आता स्टेटसवर पोहोचली होती. कुबेर सरांचं ते वॉज इन लव्ह विथ...” वालं वाक्य डोक्यात घोळत होतंच. लव्ह इन द एअरच्या लाईनवर आपसूकच त्यातल्याच एका स्टेटसवर माझा प्रश्न रिप्लाय म्हणून गेला होता, सो जर्नलिझम इन द एअर नाऊ?” दोन दिलखुलास स्माइली नी दोन जोडलेले हात रिप्लाय म्हणून आले होते. जर्नलिझम इन द एअर नाऊ आफ्टर द क्लासिकल जर्नलिझम मास्टर क्लास.