मंगळवार, १ जुलै, २०१४

शुक्राची चांदणीआज खूप दिवसांनी भल्या पहाटे उठलो होतो. भाऊंना कोल्हापूरला जायचं होतं म्हणून. हॉलमध्ये गेल्या गेल्या त्यांच्याशी गप्पा मारतच हॉलच्या गॅलरीचं दार उघडलं. गॅलरीचं दार पूर्वेकडे आहे. दार उघडल्या उघडल्याच समोर चंद्रकोर नी चंद्रकोरीच्याच जवळ टप्पोरी चांदणी दिसली. शुक्राची चांदणी. आमच्या दादांच्या भाषेत ती फक्त चांनीच असायची.


दादांची आठवण येण्याचं कारण म्हणजे मलवडीला खूपदा या चांनीच्याच जोडीनं दारी धरायचा कार्यक्रम व्हायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही नित्यनेमाने खानदेशातल्या भुसावळहून माणदेशातल्या आमच्या मलवडीत येत असू. मलवडीला आल्यावर तिथल्या बाबाच्या माळावर बोंबलत फिरणं व्हायचं. बोंबलत फिरणं हे खरंच बोंबलत वगैरे नसे, पण तिथल्या स्थानिक प्रथेनुसार रिकामटवळ्या पोरांना कुठं फिरतायं रं बोंबलत,’ असं विचारण्याची एक पद्धत आहे. सुरुवातीला मला, हे आपण बोंबललो नाही, तरी आपल्याला असं का विचारतात,’ याचं नवल वाटायचं. पण जस जसं तिकडची शब्द वापरायची पद्धत आणि ढंग समजायला लागला, तसं मला हे बोंबलत फिरणं म्हणणं नी तसं फिरणंही आवडू लागलं. या फिरण्याच्याच जोडीनं असायचं ते दारी धरणं. 

दारी धरणं म्हणजे दूर विहिरीवरनं, तिथल्याच भाषेत म्हणायचं तर हिरीव्नं आलेलं पाणी पाटाने आपापल्या शेतात आल्यावर शेतात केलेल्या वाफ्यांना योग्य पद्धतीनं देणं. आता गावाकडंही पाइपीनं पाणी देण्याची, शक्य असेल तर ठिबक नी स्प्रिंक्युलर वापरायची पद्धत आलीये. आम्ही लहान होतो, त्यावेळी हे प्रमाण फार तुरळक होतं. आमच्या माण-खटावातल्या दुष्काळी टप्प्यात तर त्याची फार-फार उपयुक्तता असूनही, ते फारसं कुठं दिसत नसे. पाटातलं पाणी वाफ्यात सोडायचं. वाफा भरला की त्या वाफ्याचं तोंड अलिकडं-पलिकडची माती ओढून बंद करून, पाणी पुढच्या वाफ्यात सोडायचं, अशी ती दारी धरण्याची पद्धत. 

आम्ही वर्षातनं आपले दोन महिने कसं तरी तिकडं राहणार. त्यातही दिवसभर माळावर हिंडणार- फिरणार, मग आमच्यात कसलं बळ राहतंय दारी धरायचं. पण तरी मी हौशेने दादांच्या मागे लागून दारी धरायच्या कार्यक्रमाला जायचो. त्यांनाही नातवाचं कौतुक असायचंच. शहरातून आलेली आपली नातवंडं दारी धरण्यासारखं एखादं काम शिकू पाहतात, म्हटल्यावर तेही त्याची माहिती द्यायला मागे पुढे पाहात नव्हते. अशाच सुरुवातीच्या टप्प्यात मला या शुक्राच्या चांनीची भानगड समजली होती. 

आमच्याकडे विहिरींवर पाण्यासाठी पाळ्या असतात. ज्याची पाळी असेल, त्याने त्या त्या वेळी, त्या त्या दिवशी आपापल्या शेताला पाणी द्यायचं. दुष्काळ आणि लोडशेडिंग या दोन कारणांनी तिकडं दिवसा- उजेडी हे काम करता येईल, याची तितकीशी शाश्वती नसायची. त्यामुळेच बहुतेक वेळी हे काम रात्रीच केले जाई. त्यासाठी शुक्राची ही चांनी एक इशारा देणारी ठरे. दादांच्या भाषेत चांनी उगवायला भिजवण संपवायचं. घरी जाऊन निवांत पडी घ्यायची. चांनी उगवायला हे व्हायला पायजे, ते संपाय पायजे, पोरा उरकं... असं सगळं सगळं. 

त्यावेळी ही चांनी शुक्राची,’ एवढंच त्यांनी नीटसं सांगितलेलं आठवतंय. शुक्राची चांदणी नंतर गाण्या- लावण्यांमधूनही ऐकली- पाहिली. भूगोल- खगोलाच्या अभ्यासक्रमातूनही नंतर शुक्राची नेमकी भानगड समजली. आकाशदर्शनांच्या कार्यक्रमांमधून थेट दुर्बिणीतून ती तेजस्वी चांदणी निट पाहिलीसुद्धा. पण शुक्राच्या त्या चांदणीपेक्षा मला दादांनी दाखवलेली शुक्राची चांनीच जास्त प्यारी वाटली. त्यामुळेच आज पहाटे उठल्यावर ती समोर दिसल्यावर आपसूकच मलवडीच्या माळावर पहाटे पहाटे सुटलेल्या गार वाऱ्यात आणि पायाखाली काहीशा मुरमाड, काहीशा भुसभुशीत मातीतून जाणाऱ्या गार पाण्यात उभं राहून दादांच्या गप्पा ऐकताना पाहिलेली ती चांनीच आठवली. तीच ती शुक्राची चांनी.