मंगळवार, ३० डिसेंबर, २०१४

हॅरिसची खिचडी...फर्ग्युसन कॉलेज रोडवर डेक्कनकडून शिवाजीनगरकडे जाताना वाडेश्वरच्या समोरच रानडे इन्स्टिट्यूटचा कँपस आहे. आत्ताच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा, त्यावेळच्या पुणे विद्यापीठाचा जर्नलिझमचा विभागही तिथेच आहे. वाडेश्वर म्हणा, रुपाली म्हणा, की वैशाली म्हणा अगदी हाकेच्या अंतरावर आहे या कँपसपासून. पण या सगळ्यांना तोडीस तोड एक कट्टा या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये आहे. रमेशचं कँटिन. म्हटलं तर कँटिन. बाह्यरुपाची ओढ असणाऱ्यांसाठी म्हटलं तर एक झोपडीवजा हॉटेल. पैशांचा विचार करणाऱ्यांसाठी म्हटलं, तर फर्ग्युसन रोडसारख्या भागात किमान खर्चात, त्या खर्चाचं चीज झालं वाटेल अशा पद्धतीने आणि तुमचं किमान कन्फ्युजन करतील एवढेच पदार्थ यादीमध्ये असणारं ठिकाण. चहा- कॉफी -बिस्किटं, पोहे, वडा-पाव, मॅगी हे तिथे हमखास मिळणारे पदार्थ. यादीत वाढलंच, तर चुकून कधीतरी इडली- चटणी, कधी वडा- सांबर. इथंच हॅरिसची अर्थात हरीशची नी माझी पहिल्यांदा ओळख झाली. 

त्याचं नाव हरीश होतं. होतं म्हणायला कारण, मागच्याच महिन्यात तो गेला. मी त्याला हॅरिस म्हणायचो, कधीकधी हरीश भाय किंवा नुसतं हॅरी. तो कोणी फार ग्रेट माणूस होता, असं नाही. तो तिथं पडेल ते काम करायचा. मी त्याला चहा बनवताना पाहिलाय, मॅगी टाकताना पाहिलाय, वडे तळताना पाहिलाय, चहाचे ग्लास धुणे वगैरे तर आलंच. फार फार तर सव्वा पाच वगैरे हाइट आणि अगदीच शिडशिडीत अशा हरीशला मी रमेशभय्याच्या हॉटेलसाठी किराण्याची ओझी आणतानाही पाहिलाय नी त्याच्यासोबत राहणाऱ्या सगळ्यांसाठी खिचडी करतानाही पाहिलाय. थोडक्यात काय, तर आपल्या भाषेत, ग्लोबलाइज्ड टर्मिनॉलॉजी वापरायची, तर हरिश मल्टिटास्कर होता. तो सगळ्यांना चहाही तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सर्व्ह करायचा. सगळ्यांना तो चहा देणारा पोऱ्या म्हणूनच माहिती होता. माझ्यासाठी त्याची अॅडिशनल ओळख म्हणजे मला अत्यंत आवडीची अशी तांदळाची खिचडी तिथं, रानडेमध्ये, खाऊ घालणारा माझा दोस्त. त्याची हिच ओळख मला त्याच्याविषयी असं लिहायला भाग पाडतेय.

हॉस्टेलवर राहणाऱ्यांसाठी घरच्यासारखा एखादा पदार्थ अचानक बाहेर खायला मिळणं किती सुखावह असतं, याची जाणीव हरीशने मला पहिल्यांदा करून दिली होती. रानडेच्या पहिल्याच वर्षात असताना, एकदा मी अकराच्या सुमाराला नेहमीसारखा तिथं चहा घ्यायला गेलो होतो. कँटिनच्या अगदी समोरच्या बाकावर बसलं, की कँटिनच्या मागच्या खोलीत नेमकं काय चाललंय याचा अंदाज येतो. मी समोरच्या बाकावर बसून चहा घेत घेत त्या खोलीत पाहिलं. हरीश छोटा स्टोव्ह घेऊन बसला होता. त्याला विचारलं, तू आत काय करतोयेस. त्यानी सांगितलं, दुपारच्या जेवणाची तयारी. विचारलं, काय करणारेस. त्याने उत्तर दिलं, खिचडी

मी तसाच चहा घेत घेत आत गेलो. त्याला म्हटलं, मलाही पाहिजे. तो हसला फक्त. विचारलं, हे आमचं खाणं आहे, तुम्हाला चालेल का,’. मी विचारलं, का नाही चालणार. मला खिचडी खूप आवडते. मला हवीये. तो म्हणाला, तुम्ही जाऊन या, तोपर्यंत शिजेल. दुपारी देतो. मी त्याला म्हटलं, वाटलं तर पैसे घे, पण खिचडी दे. त्याने रमेशभय्यालाही सांगितलं, की मी खिचडी मागतोय म्हणून. तेही म्हणाले, परत ये, देतो. आमचा त्यावेळचा हा संवाद पूर्ण हिंदीत झाला होता. मला आत्ता त्याची अशी सगळी आउटलाइन जरी आठवत असली, तरी त्यावेळी मी जेवढा एक्सायटेड होतो, तेवढाच आत्ताही तो प्रसंग आठवून झालोय. मी खुषीतच वर्गाकडे गेलो.

दुपारी डबा खायच्या वेळी मागे गेलो. त्याच्याकडे फक्त पाहिलं. त्याने हातानेच इशारा करून टेबलकडे बोलवलं. त्याचं ते खिचडी करायचं जर्मलचं पातेलं दाखवलं. थोडीशी खिचडी शिल्लक होती. म्हणाला, ही शिल्लक ठेवली आहे. तुम्ही खरंच खाणार का,’ मी खिचडी पाहिली की लगेचच म्हणालो, दे चल प्लेटमध्ये.’ मग पुन्हा त्याने रमेशभय्याकडे पाहिलं. त्यांनीही दे असा इशारा केल्यावर एका डिशमध्ये, जवळपास पूर्ण डिशला शिग लागेल, अशा पद्धतीने त्याने ती खिचडी मला दिली. 

बाकी सगळं साइडला ठेऊन मी ती खिचडीच खायला घेतली. टिपिकल राजस्थानी खिचडी होती. हरीश, रमेशभय्या नी त्यांचं ते सगळं कुटुंब राजस्थानचंच होतं. त्यामुळं आपसूकच तो टच होता. भुसावळला टाक बाईंकडे राजस्थानी माल-मसाला असलेली तशीच खिचडी खायला मिळायची. खूप दिवसांनी आणि तेही पुण्यात अगदी तशीच टेस्ट असलेली खिचडी मिळाली. बेतच झाला त्या दिवशी. खिचडीचे पैसे द्यायला गेलो, तो ना हरीशने, ना रमेश भय्याने ते घेतले. हरीश म्हणाला, खिचडी का कायका पैसा.
 
त्यानंतर अनेकदा खिचडी केल्यानंतर मला हरीशकडून आमंत्रण असायचं. योगेस भाय, आज खिचडी है... कधी शंतनु तसंच सांगायचा, कधी हरीश खिचडी खायला बोलवायचा. त्यानंतर एक-दोनदा आमचा असाच बेत जमला असेल. मजा यायची. मला खिचडी खायला मिळतेय, याची मजा वाटायची. तर त्यांना मी त्यांनी त्यांच्यासाठीच म्हणून केलेल्यातलं काहीतरी अगदी आवडीनं खातोय याची मजा वाटायची. खिचडी, डाल-बाटी हे त्यांचे राजस्थानी प्रकार, तिकडं खानदेशात कसे करतात, कसे खातात याची माहिती त्यांनी माझ्याकडूनही घेतली होती. रेल्वेने गेल्यावर भुसावळ, त्यांच्या भाषेत भुसावल स्टेशन लागतं हे त्यांना कळायचं. त्यांना पुण्याच्या तुलनेत ते त्यांच्या गावाच्या जवळ वाटायचं. त्यामुळं कधीकधी तिकडच्याही गप्पा व्हायच्या. हे सगळं जुळून यायचं ते केवळ नी केवळ खिचडीमुळे.

रानडेत असताना नी आता रानडेबाहेर पडल्यानंतरही हरीश नी माझी जुळलेली ही खिचडीची केमिस्ट्री कायम राहिली होती. त्यामुळंच त्याच्या कँटिनकडे कधीही गेलं, तरी हरीश स्वतः पुढे यायचा. चहा सांगायचीही गरज पडायची नाही. तो चहा घेऊन हजर असायचा. बिस्किट मागायचं अवकाश, की तो सोबत खिशामध्येच आणलेला ट्वेंटी-20 चा पुडा पुढे करायचा. साबजी तुम बोलो, तुमको मिल जाऐंगा,’ वगैरे वगैरे डायलॉग टाकायचा. मी थँक्यू म्हटलं तरी त्याला खूप काही मिळाल्याचं समाधान असायचं. हसत हसत परत जायचा. त्याचे रंगबेरंगी कपडे बघून, त्याचं कौतुक केलं की लाजल्यासारखं करायचा. कधी गळ्यात रुमाल अडकवायचा. कधी भडक रंगाचं टी-शर्ट –जीन्स घालायचा, सगळं एकदम कसं फॅशनेबल असायचं त्याचं. एकूणच थोडं वेगळं रसायन होतं ते.

आत्ता महाबळेश्वरला गेलो असताना, त्याची व्हिकेट पडल्याचा मेसेज फेसबुकवर वाचला. चुकचुकलोच. हे सगळं वर जे लिहिलंय ना, ते सगळं असं सर्रर्रकन डोळ्यासमोरनं गेलं. मनात म्हटलं, राव एक चांगला दोस्त गमावलास यौग्या. दोस्तीची काही लिमिट नसते. कोणीही आपलं दोस्त असू शकतं. लहान-मोठं, गरीब-श्रीमंत, सगळ्याच्या पार जाउन जी टिकते ती दोस्ती. हरीशचं नी माझं तसंच जमलं होतं काहीसं. पावसाळ्यात चहाची तल्लफ भागवायला त्याच्या गळक्या कँटीनमध्ये उभं राहून चहा पिताना माझ्या अंगावर पाणी गळू नये म्हणून धडपडणारा, कँटिनकडे येणारा रस्ता सगळा पाण्यात गेलेला रस्ता पाहून मी थबकलोय असं दिसलं, की साबजी इधरसे आओ,’ असं म्हणत लगबगीनं दोन-चार विटांची खांडं पुढं भिरकावून रस्ता करणारा हरीश, त्याच्या त्या खिचडीसारखीच माझ्या या विचारांची खिचडी करून गेलाय. हिच ती हॅरिसची खिचडी.
... 
#Pune #RanadeInstitute #Pune

सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

जगणं...

संध्याकाळची असाइनमेंट आटोपून ऑफिसमध्ये आलो. रिपोर्टिंगची वही टेबलवर ठेवली. नेहमीच्या सवयीप्रमाणं आक्काला म्हटलं चला कॉफी प्यायला. बातम्यांची तशी गडबड नसल्यानं दोघंही खाली उतरलो. फर्ग्युसन कॉलेज रोड नेहमीसारखाच वाहता होता, एकाच दिशेनं. मी पुण्यात आलो, त्यावेळी तो दोन्ही बाजूनं येण्या-जाण्यासाठी खुला होता. ‘रानडे’त शिकत होतो त्यावेळी मध्येच तो एकाच दिशेनं, डेक्कनकडून म्हसोबा गेटकडं जाण्यासाठी वन-वे झाला. त्यामुळं आत्ताही गाड्या त्याच दिशेनं पळत होत्या. एखाद-दुसरं उलटं जाणारं होतंच त्यातही. आम्ही आपलं फुटपाथवरून आमच्या नेहमीच्या सवयीनं गाड्यांच्या उलट्या दिशेनं निघालो डेक्कनकडं. ‘त्रिवेणी’त जाऊन कॉफी प्यायचा प्लॅन होता. त्याच्याआधी थोडं पाय मोकळे करायला हवेत, म्हणून ‘त्रिवेणी’च्या समोरून गुडलक चौकात, आपटे रोडनं पुन्हा ‘व्हिनस’च्या गल्लीतून वन-वेनं पुन्हा ‘फर्ग्युसन’ला लागलो नी आलो ‘त्रिवेणी’कडं.

फर्ग्युसन रोडसारखंच ‘त्रिवेणी’ही आता बदललेलं आहे. मी ‘रानडे’त शिकत होतो, त्यावेळी तिथं बसायला बाकडी होती. मोजून तीन टेबलं होती बसायला. ‘रानडे’तल्या कँटिनच्या चहा- नाष्ट्याला वैतागल्यावर, रस्ता ओलांडून पलिकडं गेल्यावर ‘रानडे’च्या समोरच असलेल्या या छोट्या हॉटेलमध्ये जाणं व्हायचं. आता ती बसण्यासाठीची टेबलं राहिली नाहीत. चहा, नाष्टा जे काही घ्यायचंय ते घ्या नी फक्त ते ठेवण्यासाठी जागा असलेल्या टेबलांच्या भोवतीनं कोंडाळं करून उभं रहा. त्यावेळच्या टेबलांची नी आताच्या टेबलांची संख्या मात्र तेवढीच आहे, तीन. हॉटेलातल्या गरम वाफांनी आत तोंड करून थांबणं मुश्किलच होणार. त्यामुळं आपलं रस्त्याकडं तोंड करून थांबा. खा- प्या नी नेत्रसुख घ्या. सोबतच्यांसोबत गप्पा मारा. चहा- नाष्ट्याचे पैसे आधीच दिले असल्याने, खाणे- पिणे झाले की थेट निघून जा. कोणी काही बोलणार नाही. अशी सगळी सोय.

 कॉफीचे पैसे दिले नी कॉफी यायची वाट बघत आम्ही दोघंही रस्त्याकडे अगदी पहिल्या टेबलला खेटून उभे राहिलो. गप्पा सुरू होत्याच. इकडचे- तिकडचे विषय सुरू होते. तिचं तोंड अगदी रस्त्याकडं, माझं डेक्कनकडं. कॉफी आली. कॉफी पिणंही सुरू होतं. ‘त्रिवेणी’च्या पलिकडं एक भेळ- पाणीपुरीवाला असतोय. त्याच्याकडचं आलं- गेलेलं गिऱ्हाईक मला दिसत होतं. त्याबाजूने ‘त्रिवेणी’च्या भिंतीआडून आधी ‘दिल’वाल्या लाल फुग्यांचा एक झुपका पुढे आला. तो वाऱ्यावर डोलतो ना डोलतो, तोच या फुग्यांच्या दोऱ्या एका हातात सांभाळणारं पोर पुढे आलं. दुसऱ्या हातात भेळेची डिश सांभाळत. फुगे सांभाळताना तारांबळ चालली होती, नी भेळही खायची होती. त्यामुळं थोडा विचार करून बहुतेक, ते सरळ फुटपाथवर बसलं. बसता बसता भेळेवर भेळवाल्याने सजवलेले चार-सहा खारे दाणे, थोडीशी शेव नी काही लाह्या असं सारं फुटपाथवर सांडलं. तो नेमका माझ्याकडं तोंड करूनच खाली बसलेला. ते सांडलेलं माझ्याही लक्षात आलं, तो ते सांडलेलं बघत होता हेही लक्षात आलं, नी मी त्याच्याकडे बघतोय हे त्याच्याही लक्षात आलं. त्याचा जीव त्या चार-सहा दाण्यांमध्ये, त्या शेवेमध्ये नी लाह्यांमध्येही अडकलेला होताच. पण मी त्याचाकडे रोखून बघतोय हे लक्षात आल्यावर, ‘हातात भेळेची आख्खी प्लेट आहे माझ्या, मी त्या दाण्यांकडे बघतही नाहीये,’ अशा आविर्भावात त्याने प्लॅस्टिकचा पांढरा चमचा उचलला नी भेळ खायला सुरुवात केली.

 आमची कॉफीही अर्ध्याच्या वर संपून गेली होती, तोपर्यंत. गप्पाही तशाच सुरू होत्या. माझं त्या पोराकडे लक्ष मात्र होतं. दरम्यान, त्याच्याकडे असणारे फुगे बघून, एक मुलगी थांबली. ते पोरगं आपलं फतकाल मांडून बसलेलं. भेळेची प्लेट त्याच्या पुढ्यात. एक पाय दुमडलेला, तर एक पाय पसरलेला. त्या मुलीने ते सगळेच्या सगळे फुगे कितीला देणार म्हणून विचारलं बहुतेक. पोरगं एकदम गांगरलं. चमचा हातात तसाच नाचवत शंभर रुपये म्हणालं. त्या मुलीनं आपल्या सोबतच्या मैत्रिणींना ‘काय करायचं गं,’ असं विचारलं नी ‘त्रिवेणी’च्या पुढपर्यंत आल्या. त्या पोरानं मग चमचा बाजूला ठेवून, डिशला धक्का लागू न देता उठत उठतच तिला परत हाक मारली. सगळेच्या सगळे फुगे देऊ केले. त्या पोरीनंही मग जास्त घासाघीस न करता पाकीटातनं शंभरची नोट काढली नी सरळ दिली पोराच्या हातात. पोरानं फुग्यांच्या सगळ्या दोऱ्या दिल्या त्या मुलीकडं. डिल फायनल एन कम्प्लिट. ती बया फुगे घेऊन आमच्या समोरनं निघूनही गेली. तो पोरगां तिथंच बसला होता. आता त्याच्या एका हातात चमचा नी दुसऱ्या हातात ती शंभरची नोट होती. त्याची भेळेची प्लेट फुटपाथवरच होती. येणार-जाणाऱ्यांनी ती प्लेट लाथाडू नये, म्हणून त्याचं तिकडंही लक्ष होतं. ती शंभरची नोट कशी नी कुठे ठेऊ, हा प्रश्न त्याला पडलेला असावा.

दरम्यान, आमच्या गप्पांचा ओघ ‘जीवन’ नावाच्या एका गहन विषयापर्यंत पोचला. आपण सध्या काय जगतोय, कसं जगतोय अशा खूपच गहन विषयावरचं विचारमंथन सुरू झालं. मी आपलं म्हटलं सरळ, ‘जगणं विसरलोय आपण.’ ‘जगणं विसरूनही जगण्याच्याच मागे पळतोय,’ असं काहीतरी बोललो असेन त्या दरम्यान. माझं लक्ष पोराकडेही होतंच. अगोदर त्याने पुन्हा एकवार त्या भेळेच्या गाड्याकडे पाहिलं. नंतर पुन्हा माझ्याकडे पाहिलं नी पँटचा खिसा तपासला. पँट तर फाटकी दिसत होती. शर्टचा खिसा तसा ठिकठाक वाटत होता. त्याने मग बसल्या बसल्याच एका हातातला चमचा तसाच ठेवून, दुसऱ्या हाताने हात अगदी खांद्याच्या लायनीत वर उचलून, कोपरात नी मनगटात पुरेसा वाकवून खिशात घातला. शंभरची नोट खिशात पडली, नी मग त्याचा हात पुन्हा बाहेर आला. मी समोरच होतो. पाहात होतो. त्याच्या चेहऱ्यावर आता समाधान होतं. आनंद होता. आता दोन्ही पाय पसरले, ती भेळेची डिश मांड्यांवर घेतली, नी फुटपाथवर मस्त माझ्याकडे बघत भेळेचे तोबरे भरणं सुरू केलं. शंभराच्या त्या नोटेच्या भानगडीत तो त्याचं जगणं विसरला नव्हता. अगोदर एक पाय पसरला होता, आता दुसराही पसरून मस्त बसून भेळेची मजा घेत होता.

ऑफिसला परतलो. काम आटोपून घरी आलो. घरी निवांतपणा दिसत होता. बायकोनं आपलं काम आवरलेलं दिसलं. हात-पाय धुवून जरा बेडवर पडलो. कारण नसताना बायकोनं एकदम एक फिलॉसॉफिकल स्टेटमेंट माझ्यावर फेकलं. अचानक एकदम म्हणाली, ‘जगणं म्हणून काही राहिलंच नाही....’ मी तिला थोडं आणखी बोलतं करण्यासाठी प्रयत्न केला. विचारलं, ‘अरे हे असलं गहन तत्त्वज्ञान म्हणून तू बोलतेयेस की गम्मत म्हणून...,’ तोपर्यंत माझ्यासमोर संध्याकाळचा प्रसंग उभा राहायला सुरुवात झाली होती. वन-वे रस्त्यावरच्या त्या गाड्या... गाड्यांचे ते आवाज... त्रिवेणी... ते फुगेवालं पोरगं... त्याची ती शंभरची नोट... माझं ते ‘जगणं विसरलोय आपण,’ हे वाक्य... त्याच लायनीवरचं बायकोचं आत्ताचं ‘जगणं म्हणून काही राहिलं नाही’चं वाक्य... हेच जगणं असेल का. असंच नकळत अनुभवता येणारं. त्या पोराच्या समाधानातलं. त्याच्या त्याच्याच धुंदीतल्या त्याच्या जगण्यातलं. अशा साध्या- साध्या प्रसंगांमधलं. योगायोगाने झालेल्या योगायोगांमधलं. असंच जगणं असावं नाही का. ते आधीच कळलं, तर जगायला मजा तरी कशी येणार, ना.

मंगळवार, १ जुलै, २०१४

शुक्राची चांदणीआज खूप दिवसांनी भल्या पहाटे उठलो होतो. भाऊंना कोल्हापूरला जायचं होतं म्हणून. हॉलमध्ये गेल्या गेल्या त्यांच्याशी गप्पा मारतच हॉलच्या गॅलरीचं दार उघडलं. गॅलरीचं दार पूर्वेकडे आहे. दार उघडल्या उघडल्याच समोर चंद्रकोर नी चंद्रकोरीच्याच जवळ टप्पोरी चांदणी दिसली. शुक्राची चांदणी. आमच्या दादांच्या भाषेत ती फक्त चांनीच असायची.


दादांची आठवण येण्याचं कारण म्हणजे मलवडीला खूपदा या चांनीच्याच जोडीनं दारी धरायचा कार्यक्रम व्हायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही नित्यनेमाने खानदेशातल्या भुसावळहून माणदेशातल्या आमच्या मलवडीत येत असू. मलवडीला आल्यावर तिथल्या बाबाच्या माळावर बोंबलत फिरणं व्हायचं. बोंबलत फिरणं हे खरंच बोंबलत वगैरे नसे, पण तिथल्या स्थानिक प्रथेनुसार रिकामटवळ्या पोरांना कुठं फिरतायं रं बोंबलत,’ असं विचारण्याची एक पद्धत आहे. सुरुवातीला मला, हे आपण बोंबललो नाही, तरी आपल्याला असं का विचारतात,’ याचं नवल वाटायचं. पण जस जसं तिकडची शब्द वापरायची पद्धत आणि ढंग समजायला लागला, तसं मला हे बोंबलत फिरणं म्हणणं नी तसं फिरणंही आवडू लागलं. या फिरण्याच्याच जोडीनं असायचं ते दारी धरणं. 

दारी धरणं म्हणजे दूर विहिरीवरनं, तिथल्याच भाषेत म्हणायचं तर हिरीव्नं आलेलं पाणी पाटाने आपापल्या शेतात आल्यावर शेतात केलेल्या वाफ्यांना योग्य पद्धतीनं देणं. आता गावाकडंही पाइपीनं पाणी देण्याची, शक्य असेल तर ठिबक नी स्प्रिंक्युलर वापरायची पद्धत आलीये. आम्ही लहान होतो, त्यावेळी हे प्रमाण फार तुरळक होतं. आमच्या माण-खटावातल्या दुष्काळी टप्प्यात तर त्याची फार-फार उपयुक्तता असूनही, ते फारसं कुठं दिसत नसे. पाटातलं पाणी वाफ्यात सोडायचं. वाफा भरला की त्या वाफ्याचं तोंड अलिकडं-पलिकडची माती ओढून बंद करून, पाणी पुढच्या वाफ्यात सोडायचं, अशी ती दारी धरण्याची पद्धत. 

आम्ही वर्षातनं आपले दोन महिने कसं तरी तिकडं राहणार. त्यातही दिवसभर माळावर हिंडणार- फिरणार, मग आमच्यात कसलं बळ राहतंय दारी धरायचं. पण तरी मी हौशेने दादांच्या मागे लागून दारी धरायच्या कार्यक्रमाला जायचो. त्यांनाही नातवाचं कौतुक असायचंच. शहरातून आलेली आपली नातवंडं दारी धरण्यासारखं एखादं काम शिकू पाहतात, म्हटल्यावर तेही त्याची माहिती द्यायला मागे पुढे पाहात नव्हते. अशाच सुरुवातीच्या टप्प्यात मला या शुक्राच्या चांनीची भानगड समजली होती. 

आमच्याकडे विहिरींवर पाण्यासाठी पाळ्या असतात. ज्याची पाळी असेल, त्याने त्या त्या वेळी, त्या त्या दिवशी आपापल्या शेताला पाणी द्यायचं. दुष्काळ आणि लोडशेडिंग या दोन कारणांनी तिकडं दिवसा- उजेडी हे काम करता येईल, याची तितकीशी शाश्वती नसायची. त्यामुळेच बहुतेक वेळी हे काम रात्रीच केले जाई. त्यासाठी शुक्राची ही चांनी एक इशारा देणारी ठरे. दादांच्या भाषेत चांनी उगवायला भिजवण संपवायचं. घरी जाऊन निवांत पडी घ्यायची. चांनी उगवायला हे व्हायला पायजे, ते संपाय पायजे, पोरा उरकं... असं सगळं सगळं. 

त्यावेळी ही चांनी शुक्राची,’ एवढंच त्यांनी नीटसं सांगितलेलं आठवतंय. शुक्राची चांदणी नंतर गाण्या- लावण्यांमधूनही ऐकली- पाहिली. भूगोल- खगोलाच्या अभ्यासक्रमातूनही नंतर शुक्राची नेमकी भानगड समजली. आकाशदर्शनांच्या कार्यक्रमांमधून थेट दुर्बिणीतून ती तेजस्वी चांदणी निट पाहिलीसुद्धा. पण शुक्राच्या त्या चांदणीपेक्षा मला दादांनी दाखवलेली शुक्राची चांनीच जास्त प्यारी वाटली. त्यामुळेच आज पहाटे उठल्यावर ती समोर दिसल्यावर आपसूकच मलवडीच्या माळावर पहाटे पहाटे सुटलेल्या गार वाऱ्यात आणि पायाखाली काहीशा मुरमाड, काहीशा भुसभुशीत मातीतून जाणाऱ्या गार पाण्यात उभं राहून दादांच्या गप्पा ऐकताना पाहिलेली ती चांनीच आठवली. तीच ती शुक्राची चांनी.

बुधवार, ११ जून, २०१४

खोट्या वास्तवाचे खरे बळी !!!व्हॉट्सअपच्या एका ग्रुपवर चॅट सुरू होता. एकाकडून पार्टी वसूल करून घेण्यासाठीचे प्रयत्न ऐन रंगात आले होते. आत्तापर्यंतच्या इतरांकडच्या कमेंट्स वाचताना एकदम वर्गातली मीडिया थिअरी आठवली. मीडियाचं अजेंडा सेटिंग फंक्शन. एखाद्याला एखादी गोष्ट करायला लावायची ताकद मीडियामध्ये असते. त्यासाठीचे मेसेज पाठविण्याचं काम, इतरांची मतं बनविण्याचं काम मीडियामधून करता येणं शक्य असतं... वगैरे वगैरे. चॅट करता करताच, इतर दोघा- तिघांना उद्देशून मी लिहिलं... याला म्हणतात अजेंडा सेटिंग... पुढे पुन्हा पार्टी वसूल करून घेण्यासाठीचे प्रयत्नही सुरू झाले. प्रयत्नांना यश आलं. पार्टीची तारीख ठरली. व्हॉट्सअपरूपी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ठरलेला पार्टीचा अजेंडा सेट झाला. बकराही कापला गेला. मागच्या काही दिवसातल्या काही घटनांचा याच चॅटच्या निमित्ताने विचार केला. जाणवलं, याच खोट्या जगातल्या अशाच काही सेटिंग्समुळं एक बळी गेलाय, अनेक ठिकाणी मोडतोड झालीये आणि खोट्या खोट्या म्हणता म्हणता खऱ्यांचेच नुकसान व्हायलाही सुरुवात झालीये.

पत्रकारितेच्या औपचारिक शिक्षणाचा भाग म्हणून मीडिया थिअरी शिकलो. आवडीचा विषय म्हणून त्यात आणखी खोलात जाऊन विचार करताना आता अशी मन अस्वस्थ करून टाकणारी उदाहरणं समोर यायला लागली आहेत. अशा अनेक घटना यापूर्वीही घडून गेल्या असणारेत. आत्ता आणि तेव्हाचा फरक फक्त एवढाच आहे, की त्यावेळी हे असलं काही समजतही नव्हतं आणि त्याचे असे संदर्भही लावता येत नव्हते. आता असे संदर्भ लावता येतायेत. त्यातलं किती समजतं, हा कदाचित वादाचा मुद्दा ठरू शकतोय. पण तरी, मला तसं वाटतंय हे माझ्यालेखी जास्त महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांमधल्या सोशल नेटवर्किंगशी थेट संबंधित असणाऱ्या आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीमधून सुरुवात होत थेट वास्तविक जगातही धिंगाणा घालू पाहणाऱ्या घटनाही अशाच गटात मोडतात

कोणी तरी, कुठे तरी एक फोटो फेसबुकवर टाकतोय काय, लोकं ते फोटो बघून शेअर करतात काय आणि त्याच्यावरून काही आक्षेप आलेच, तर कोणा तिसऱ्यालाच तो कोणी तरी समजून बदडतात मारतात काय. अरे काय चाल्लय हे.
आता काल- परवा कुठेतरी आपल्या महापुरुषांबाबतचा असाच एक वाद पुढे आला. बरं, हे सगळं एका सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरून सुरू होतं आणि लागलीच दुसऱ्या- तिसऱ्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर पसरतंही. सोशल नेटवर्किंगच्या बाबतीत आता तो अॅक्शन रिअॅक्शनचा एक वेगळाच नियम पुढे येताना या निमित्तानेच दिसतो आहे... 

एव्हरी सोशल नेटवर्किंग अॅक्शन हॅज अॅन इक्वल अँड मेनी पॅरलल रिअॅक्शन अॅज वेल,’...

असाच तो नियम म्हणावा लागणार आहे. कारण सोशल नेटवर्किंगचे लाईक्स आणि शेअरर्स पाहिले, तर ते कधी अपोजिट अॅक्शनही म्हणता येतात, असेच असतात. आणि कदाचित त्याचाच परिणाम म्हणून की काय, व्हर्च्युअल जगातल्या घटनांचे पडसाद पॅरलली आपल्या वास्तविक जीवनातही उमटायाला लागले आहेत. फोटो ई- मीडियामध्ये, धिंगाणा वास्तविक जीवनात. अजेंडा ई- मीडियासाठीचा आणि परिणाम रिअल लाइफमध्ये.

कोणी तरी, कुठे तरी बसून एक अजेंडा सेट करतोय. त्याचे फॉलोअर्स हा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतायेत. अजेंडा सेट करणाऱ्याचा उद्देश हा फक्त अपोझिट अॅक्शन किंवा रिअॅक्शन पुरताच मर्यादीत राहिलेला नाही. त्याला रस आहे, तो व्हर्च्युअल लाइफशी पॅरलल असणाऱ्या रिअल लाइफमधील रिअल घटनांमध्ये. त्यामुळेच तर अजेंडा सेट होतोय तो तिकडं व्हर्च्युअल जगात आणि पडसाद मात्र उमटताहेत ते रिअल लाइफमध्ये. अर्थात आता हसू याचं येतंय, की या सगळ्या बाबींवर नियंत्रण ठेऊ पाहणारे लोक व्हर्च्युअल रिअॅलिटीबाबतची रिअॅक्शन नोंदवताना दिसतात. त्याचवेळी पॅरलल अॅक्शन्श नेमक्या काय घ्यायच्या, याची मात्र त्यांना जाणीव असल्याचं मला स्वतःला तरी दिसत नाही. सोशल मीडियामधून एकाच वेळी अॅक्शन, रिअॅक्शन आणि पॅरलल अॅक्शन साध्य होत असताना, रिअल लाइफमध्ये हे करण्यासाठी वेगवेगळ्या बाबींचा आधार घ्यावा लागतोय. कसं काय राव हे असं.... 

सोशल नेटवर्किंगच्या आहारी गेलेल्यांची अनेक उदाहरणं आत्तापर्यंत माहिती होती, पण सोशल नेटवर्किंगवरच्या वास्तवाशी कोणताही संबंध नसताना, केवळ तो जोडला गेल्याने झालेली तोडफोड वा गेलेल्या बळीचा प्रकार आत्ता पहिल्यांदाच अनुभवतोय. हे सारं करणारे लोक निश्चितच बाळबोध नाहीत. त्यांना या दोन्ही गोष्टींचे परिणाम माहिती असणारच. बाळबोध तर आपण ठरतोय. त्यांनी सेट केलेल्या अजेंड्यानुसार त्यांच्या अॅक्शन्सवर रिअॅक्शन्स देत बसतोय. त्यांच्या अॅक्शन्सची तीव्रता त्यांना हव्या त्याच पद्धतीने वाढवतोय. खोट्या वास्तवाभोवती असाच बाळबोध विचार करत खऱ्यांचेच बळी पाडतोय.