रविवार, ११ डिसेंबर, २०११

पुन्हा एकदा...

जाहल्या त्याच चुका पुन्हा एकदा
वाटल्या अक्षम्य त्या पुन्हा एकदा
कदाचित सुधारू शकशील तूच फक्त,
जागली तिच आशा पुन्हा एकदा
भावनांचे द्वंद्व हरलो पुन्हा एकदा
जीवंतपणीच मेलो पुन्हा एकदा
वाटत होता आधार तुझाच फक्त
निराधार भासतंय पुन्हा एकदा
दु:खाचे सुख लाभले पुन्हा एकदा
का वाटावे असे पुन्हा एकदा
कदाचित उत्तर असेल फक्त वेडी अशा
पण निराशंच झालोय पुन्हा एकदा
मीच का व्हावे निराश, पुन्हा एकदा?
करावा प्रयत्न लढण्याचा, पुन्हा एकदा
तलवार देईल कोणीही, ढाल तूच दे फक्त
करतो प्रयत्न जिंकण्याचा पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा वाटतंय मी होईन यशस्वी
पुन्हा एकदा माझ्या आनंदात होतील सहभागी सगळे,
कदाचित ते विसरतील मलाच फक्त,
आठवण काढशील त्यावेळी तूच पुन्हा एकदा!
१/११/२००९

शनिवार, १० डिसेंबर, २०११

एक प्रेमळ तुलना...

सहसा कवितांच्या फंदात मी कधीच पडत नव्हतो; पण कधीकधी असंच काहीतरी सुचायचं. आपोआप यमक जुळायचे, कधी स्वत:हून जुळवायचो. आवडत्या विषयांवर जमलेल्या काही ओळी मग एकामागोमाग लिहून काढल्यानंतर जे जमा झालं; त्याचाच हा एक भाग-

एक प्रेमळ तुलना...
प्रेमात पडलेले वेडे...
इतर शहाण्यांचं सुख पाहुन जळतात
कारण ते इतर शहाणे...
एकाच वेळी अनेकींवर मरतात!
‘फक्त ती तेवढी माझी, बाकी सगळ्या तुमच्या,’
म्हणत वेडे स्वत:ला खूप दानशूर होतात;
पण त्याचवेळी इतरांना मात्र,
‘प्रेमात नका पडू बरं का!’ असंच बजावतात.
‘एकाचवेळी एकदम इतक्या कशा रे सांभाळता?’
असं वेडे मग त्या शहाण्यांना हळूच विचारतात.
‘एकमेकांशीच तुम्ही इतका वेळ गुलूगुलू काय बोलता?’
असा कुटप्रश्‍न शहाणे मग वेड्यांनाच टाकतात!
एकीसाठी झुरण्यापेक्षा वर्षाच्या ३६५ बर्‍या
असं शहाणे मग वेड्यांना सांगतात
पण एकीसाठीच किती ‘त्या’ वार्‍या ते
वेडे शहाण्यांना अगदी छाती फुगवून सांगतात.
एकीतच तुम्ही किती रे गुंतता...
एकमेकांनाच तुम्ही कसं रे पकवता...
असं म्हणत मग ते टवाळ शहाणे
आपल्या प्रेमवेड्यांनाच वेड्यात काढतात.
गाढवाला काय कळणार गुळाची चव...
असा विचार वेडे मग सात्विकतेनं करतात.
पण तरीसुद्धा शेवटी, ‘प्रेमात पडू नका बरं का!’
असंच त्या दांभिक शहाण्यांना समजावतात.
पुढच्यास लागली ठेच, निदान मागच्यानं तरी शहाणं व्हावं....
असंच काहीसं त्या वेड्यांच एक प्रेमळ धोरण असतं.
पण, त्या प्रेमवेड्यांचं वेडेपण अनुभवण्यासाठीच तर...
त्य टवाळ शहाण्यांचं, त्या वेड्यांभोवती धरण असतं! १४/३/२००९

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

बब्या...दि सायलेंट किलर!

बब्याला आम्ही ‘बब्या’ म्हणूनच ओळखायचो. त्याचं नाव वेगळचं होतं, पण आमच्या एका सरांनीच त्याचं नावं ‘बब्या’ ठेवलं, तेव्हापासून आम्हीही त्याला बब्याच म्हणायचो. बब्या...नाव जरासं गावंढळ ढंगाचं वाटत असलं, तरी त्यात एक वेगळाच जिव्हाळा वाटायचा. तसाच बब्याही होता. ‘तो होता,’ म्हणायचं कारण असं, की गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून म्हणा हवं तर, बब्यानं माझ्या वा आमच्यापैकी कोणाच्याच कॉल वा मेसेजला उत्तर दिलेलं नाही. सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून झालेत आजपर्यंत, पण अद्याप बब्याचा ठिकाणा आम्हाला समजलेला नाही. अर्थात बब्याचं असं वागणं आमच्यासाठी नवं असलं, तरी त्याच्या जुन्या मित्रांसाठी नवं नाही, हे विशेष. कारण यापुर्वीही तो असाच निघून गेला होता पुण्यातून, कोणालाही न सांगता. एक वर्षानंच परत आला होता. कदाचित यावेळीही तसंच असेल काहीसं. निदान मी तरी असाच विचार करतोय सध्या.

कॉलेजमध्ये एका असाईंमेंटचा भाग म्हणून मी त्याची मुलाखत घेतली होती. तसा तो माझा रूममेटच होता. त्यामुळे मला त्याच्याविषयीच्या बर्‍याच गोष्टी माहित होत्या. ज्या माहित नव्हत्या, त्या व्हाव्यात असाच त्या मुलाखतीत माझा प्रयत्न होता. बर्‍याच गोष्टी माहित झाल्या, काहीकाही अजूनही नाहीत. बब्या मुळचा लातूरकडचा. पत्रकारितेला ऍडमिशन घेण्याअगोदर त्याचं एम.ए. मराठी झालं होतं. त्यामुळे त्याचं शुद्धलेखनही माझ्यापेक्षा खूपच भारी होतं. माझं हस्ताक्षर मात्र त्याच्यापेक्षा चांगलं असल्याचं तो सांगायचा. कॉलेज लातूरकडेच पुर्ण करून तो पुण्यात आला होता. त्याची माझी पहिली भेट झाली ती ‘रानडे’मध्येच. त्या अगोदर आमचा परिचय असण्याचा संबंधच नव्हता. पण तो आमच्यापुर्वी दोन वर्ष पुण्यात होता, हे मला कालांतरानं समजलं होतं. सध्या जसा तो गायब झालाय, तसाच तो त्यावे़ळीही गायब झाला होता, हेही असंचं एकदा समजलं होतं.

रंगाने काळा, पण अगदीच कोळसा असं नव्हतं. चेहर्‍याला शोभणारी मिशी आणि पाणीदार डोळे. नेहमी अगदी साधे कपडे वापरायचा. अलिकडेच त्याला मी जिन्स पँट -टी-शर्टची सवय लावली होती. तेही शोभूनच दिसायचं त्याला. मुळातच नीटनेटका होता, त्यामुळं शक्यतो त्याच्याविषयी कधीच तक्रार नसायची. आमच्या वर्गातल्या एका मुलीनं त्याला चॉकलेट दिलं, त्यावेळी आम्ही त्याला जाम चिडवलं होतं. कधीतरीच लाजायचा. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कमालीचा शांत स्वभाव! कमालीचा शांत म्हणजे इतका, की एकदा त्यानं सहजच एक साधी शिवी टाकली होती बोलता-बोलता, त्यावेळी आम्ही हा विषय कट्‌ट्यावरही चर्चेला घेतला होता. मी त्याच्यावर कधी खूप चिडचिड केली तरी हा पठ्ठा शांतच असायचा. त्याने आणखीनच चीडचीड व्हायची.

त्याच्या यच शांत स्वभावाचं कारण जाणून घ्यायचं होतं, म्हणून वर्गातल्या असाईंमेटसाठी म्हणून त्याची मुलाखत घेतली. मला थोडा वेगळा संशय होता. वाटायचं की काही प्रेमभंग वगैरे आहे की काय; पण निघालं भलतचं. तो लातूरचा. गावी शेती. ती ही कोरडवाहू. आई-वडिल शेतीच करायचे. अगोदर घर होतं. भूकंपामध्ये ते गेलं. त्या वेळपासून त्याच्या वडिलांचा स्वभाव खूपच शांत झाला होता. बब्याही तश्याच छायेत वाढला. त्यामुळे तोही तसाच झाला. त्यावेळी त्याने हे उत्तर दिलं, तसा मीच एकदम शांत झालो होतो. तसंच त्याला विचारलं होतं की तू मध्ये एकदमच गायब झाला होतास, ते का? त्याचं उत्तर मिळालं नव्हतं मला. तो नुसतं म्हणाला होता, कधीकधी परिस्थितीनुरूप वागावं लागतं....वगैरे वगैरे एकदम भारी उत्तर दिलं. मराठीचा विद्यार्थी होता, मनाला भावणारे शब्द हळूवार टाकायचा आपल्या पुढ्यात, की मग आपणचं शांत होणं आलं. त्यावेळीही तसंच झालं.

तो जेव्हा दिवाळीच्या सुट्टीला गावी गेला, तेव्हा आमच्या एका सिनिअरनं मला बजावलं होतं, ‘बघं यौग्या, बब्या लय खतरनाक आयटम आहे. गायब झाला की महिनोंमहिने गायब होतो. आधीच सगळे पत्ते-बित्ते घेऊन ठेव. घरनं परत आला तर मग त्याच्याकडचा चिवडा नक्की घे. लय भारी असतोय,’ त्यावेळी चेष्टाच वाटली होती. नंतर समजलं होतं की ते खरं होतं. त्यावेळी तसं झालं नव्हतं. नशीबानं आम्हाला सगळ्यांनाच त्याच्या घरच्या चिवड्याची टेस्टही चाखायला मिळाली होती. भारीच होता चिवडा. कांद्याच्या आख्ख्या खापा भाजून टाकलेल्या असायच्या त्यात. बाकी सगळ्ं साधंच होतं, तरीही टेस्टी होता. आता मात्र तसं नाही, अन सध्या त्या सिनिअरनं दिलेला सल्ला न ऐकल्याचा परिणाम भोगतोय. बब्याचा तपासच नाही. आमच्या कोणाकडेच त्याच्या मोबाईल नंबरशिवाय बाकी माहिती नाही. आमच्याच एका दोस्ताकडे त्याने त्याची सगळी कागदपत्रं ठेवली आहेत आणि थोडं सामानही; पण तीही इथंच आहेत.

कोणी कसं काय असं वागू शकतं याचंच नवल वाटतं. आजकालच्या जमान्यात आपली सर्टिफिकेटस हीच आपली कमाई असते असं मानलं जातं. आमच्या बब्याला त्याचं काही वाटत नाही. ज्या गोष्टींचं आम्हाला भलं मोठ्ठं टेन्शन्स असायचं, त्याचंही त्याला कधी काही वाटलं नव्हतं. अगदी आमच्या डिसर्टेशनच्या काळातही, काहीच तयारी न करता शेवटच्या दोन आठवड्यात त्यानं डिजर्टेशन संपवलं होतं. आम्ही दोन-दोन महिने कामं केली होती त्यासाठी. माझं लॅपटॉपचं काम झाल्यावर, मी झोपल्यावर तो लॅपटॉप वापरायचा. ऍडजस्टमेंटच्या बाबतीत गुरू होता तो. वेळ पडली तर कँपातून विद्यापीठामध्ये चालत येणे, कधी एकवेळचच जेवण वा नाष्टा करण, आम्ही पुस्तकं वाचत असलो तर आम्ही झोपल्यावर ती पुस्तक रात्री अगदी अडीच-तीन वाजेपर्यंत वाचणे असं करणारा बब्या मी पाह्यलाय.

ज्या दिवशी त्याचं ‘बब्या’ असं नामकरण झालं होतं, त्याचवेळी आमच्या सरांनी त्याला बजावलं होतं, ‘बब्या, बोलायचं भाऊ. तू बोलला नाहीस, तर तुला तुझ्या आईकडे पाठवील.तिकडे लातूरला पाठविन. बोलता आलं तर सगळं आहे...’ सर नेहमीच असं सांगायचे. आम्हालाही तसंच बोलायचे. आम्ही एंजॉय करायचो बरेचदा, पण बब्याचं समजलं नव्हतं आम्हाला. शिक्षण संपल्यावर आम्ही वेगळे राहायलो लागलो. नंतर संपर्क कमी झाला होता; पण निदान माहिती असायची. आता...काहीच माहिती नाही आणि कसलाच संपर्कही नाही. म्हणजे आम्ही संपर्क करायचा प्रयत्न करतोय; पण तिकडून उत्तरच नाही. कधीतरी उत्तर येईल किंवा थेट बब्याच समोर येईल अशी आशा आहे. ही पोस्ट टाकली की बब्यालाही एक मेसेज टाकणार आहे. बघू, वाचून काही कमेंट आली तर...

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०११

नजरच वाईट...

रानडेमध्ये असताना एकदा अनिल अवचटांचं उर्फ बाबांचं लेक्चर अटेंड करायला मिळालं होतं. त्याला आता जवळपास दोन वर्ष होऊन गेली असतील. रानडेमध्यल्या आमच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळातच त्यांचं ते व्याख्यान होतं. बाबा अगदी साध्या, सोप्या आणि तितक्याच हृदयस्पर्शी भाषेत समोरच्यापर्यंत त्यांच्या भावना पोचवण्याबद्दल जाणले जातात. त्यांच्या त्या लेक्चरमध्ये मला तोच अनुभव आला. वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांसाठीच्या सेवाभावी कार्याविषयी त्यांनी आम्हाला माहिती सांगितली होती. ‘तशा’ महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, समाजाच्या रोखलेल्या नजरा आणि समाज भावनांविषयी बाबा त्यावेळी बोलले होते. काल दुपारी लक्ष्मी रोडच्या बुधवारातून जाणार्‍या भागामध्ये फिरताना अचानक हे सगळ्ं आठवलं. कदाचित माझ्याही नजरेत त्याच भावनांपैकी एक, तसलीच किळस माझी मलाच जाणवली म्हणून...

तसं त्या भागातून मी पहिल्यांदाच जात नव्हतो. माझा दोस्त आरके आणि मी, आम्ही दोघेही त्या रस्त्याने लोकसत्ताच्या अरोरा टॉवरमध्यल्या ऑफिसकडे जायचो-यायचो. लोकसत्तामधला ट्रेनी पिरिअड होता. बरेचदा रात्री उशीरा हॉस्टेलवर परतायचो. तेव्हाही त्या भागातलं वास्तव सहज समजून यायचं; पण त्यावेळी अशा कोणत्या किळसवाण्या नजरेपेक्षा थोडी भीती असायची मनात. कोणी अचानक अडवलं तर...इथंच काही झालं गाडीला म्हणजे... आरके मराठी लिटरेचरचा विद्यार्थी. एम.ए. मराठी नंतर त्याने रानडेमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. माझ्यापेक्षा दोन वर्ष अगोदर पुण्यात आलेला. त्यामुळं बुधवारातल्या वास्तवाशी निगडीत बर्‍याच ऐकिव गोष्टी तो सांगायचा. त्या कायमच भितीदायक वाटायच्या. ‘आपला इथल्या लोकांविषयीचा विचार चुकीचा असू शकतो,’ असं मनोमन वाटायचं त्यावेळी. पण स्वत:ला एक सभ्य, सुसंस्कृत म्हणवून घ्यायला आवडणार्‍या माझ्यासारख्याला तिथल्या वातावरणामधली असभ्यता किंवा व्यक्तीला अगदीच खालच्या पातळीवर नेऊन ठेवणारी एक ‘तसली’ आयडेंटी पुन्हा-पुन्हा थांबवायची. पुन्हा तीच नजर तिथली असहायता पाहू शकत असली, तरी!

रानडेमधल्या एका असाईनमेंटच्या निमित्ताने बुधवारात घडलेल्या घटनेवर अभ्यास करायचा चान्स मिळाला होता. त्यासाठी लोकसत्तामधल्याच कडुसकर सरांची मुलाखत घेतली होती. त्यांनीच तो प्रकार समोर आणला होता. त्या वेळीही कडुसकर सरांनी त्या भागात राहाणार्‍या महिलांच्या परिस्थितीविषयी पुसटशी कल्पना दिली होती. रंगरंगोटीच्या आड लपलेल्या दु:खाविषयी पहिल्यांदाच माहिती मिळाली होती. स्वत:चा चेहरा लपवून रंगवलेले चेहरे शोधणार्‍यांच्या ‘तसल्या’ नजरांना ते दु:ख कसं जाणवत नसेल हेच समजत नव्हतं. हा सगळा घटनाक्रम अगदी मोजक्या मिनिटांमध्ये नजरेसमोरून गेला. गाडी चालवत ऑफिसमध्ये येईपर्यंत डोक्यात आलेले सगळे विचार ‘मी चुकलो’ हेच सांगणारे होते. सुसंस्कृतपणाच्या आड मी झापडं लावूनच जगतोय असंच वाटायला लागलं होतं.

काहीही असो; पण काल माझ्या नजरेतली किळस आवडली नाही मला. स्वत:लाच स्वत:ची लाज वाटली. आपल्याला जर त्यांच्यासाठी काही करता येणार नाहीये; तर मग त्यांचा तिरस्कार किंवा किळस करणं तरी आपण थांबवलं पाहिजे असं वाटतंय. ते त्यांच्या पद्धतीने जगतायेत; आपण आपल्या. आपल्याला त्यांच्या विषयी चांगले विचार करता येणार नसतील; तर वाईटही करू नयेत. आणि त्यांच्याविषयी करुणा किंवा सिंपथी तर अजिबातही नसावी...मलाच आवडत नाही कोणी माझ्याविषयी दया दाखवली तर, तसंच कदाचित त्यांनाही वाटत असेल. शेवटी माणसं आहेत ना यार तीही. पण त्यांच्यातंल माणुसपण दिसतचं नाहीए. नजरच वाईट आहे बहुतेक...
...

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

मनासाठी हवंय काहीतरी...

आजारी असल्यामुळे कामावरून सुट्टी मिळाली होती आज. त्यामुळे घरी आराम करणं आणि जमलं तर थोडं छोटं-मोठं काम विरंगुळा म्हणून करण्याचा ठराव मी सकाळीच मनातल्या मनात पास केला होता. त्या हिशेबानं दिवसभर स्वत:ला गुंतवून ठेवण्याचा विचार होता. बाहेर भरपूर पाऊस सुरू होता. त्यामुळं बाहेर जाणं तर शक्यच नव्हतं आणि तसं निमित्तही नव्हतं. सकाळी पेपर वाचून झाल्यावर जरा निवांत झालो होतो. घरच्याच एका कामामुळ्ं अचानक बाहेर जाण्याचं ठरलं. घरची चारचाकी असल्यानं पावसात भिजायचा मुद्दा नव्हता. त्यामुळ्ं चुलत भावासोबत निघालो.

गाडीत बसलो. बाहेर जोरात पाऊस सुरूच होता. भावानं गाडी पार्किंगमधून काढली आणि अगदी काही क्षणातचं गाडीचे वायपर सुरू केले. पावसाचे थेंब गाडीच्या काचेवर पडत होते. एकेक थेंब हळूहळू मोठा-मोठा होत होता आणि अचानक वायपरच्या सपक्याने एकदम गायब होत होता. काच अगदी स्वच्छ दिसत होती. वायपरचा वेग वाढवला की पाणी काढून टाकण्याचा वेगही वाढत होता. मग समोरचा रस्ताही तसाच पटकन मोकळा झालेला दिसत होता. काचेतून पलिकडचं अगदी स्वच्छ आणि ठळकपणे दिसेइतपत पाणी काचेवरून काढून टाकण्याचं काम वायपर करत होते. ओलावा मात्र तसाच राहात होता. गाडीसोबत सुरू होता फक्त वायपर!

एका ठिकाणी काही कारणामुळं थांबावं लागलं. भावानं गाडी रस्त्याच्या थोडी बाजूला घेतली. आम्ही गाडीतच बसून होतो. गाडी बंद केली. काचा बंदच होत्या. गाडीतल्या गाडीतच गप्पा सुरू होत्या आमच्या. बाहेर पाऊस पडतच होता. गाडीच्या टपावरच्या थेंबांच्या वेगाचा आणि आवाजाचा अंदाज घेत पाऊस किती जोरात सुरू आहे याची चर्चा सुरू होती. अचानक आजूबाजूच्या काचांवर लक्ष गेलं. काचांवर धुकं साचलं होतं. धुक्यावर रेघोट्या मारत थोडावेळ् टाईमपास केला. एक ऑबझर्व्हेशनही केलं. अगदी सुरूवातीला जे लिहिलं ते कायम राहातं. त्याच्यावर काही वेळानं धुकं साचलं तरी ते मिटत नाही. धुक्याचा थर त्याच्यावर साचतो. इतर ठिकाणी धुकं गडद दिसतं, जिथं लिहिलयं तिथं जरा फिकं पडतं, लिहिलेलं मात्र पुसलं जात नाही. भावानं गाडीतला एसी सुरू केला. धुक काही क्षणात विरून गेलं. हवेतला गारवा आणि आर्द्रता मात्र जाणवत होतीच. एसी बंद केला की पुन्हा तसंच धुकं साचायला लागलं.

बाहेर पाऊस आणि आत धुकं. बाहेर वायपर आणि आत एसी. साम्य एकच- एक सुरू केलं की दुसरं बाजूला जात होतं आणि सुरू असलेलं बंद केलं की बाजूला गेलेलं पुन्हा परत येत होतं. दरम्यानच्या काळात गाडीतून रस्ता आणि बाहेरचं जग मात्र जसं आहे तसंच दिसत होतं. स्वत:च्या अस्त्वित्त्वाची जाणीव करून देत होतं. मलाही माझ्या विचारचक्रापासून बाहेर ओढत होतं. कल्पनेच्या जगातून वास्तवात ये, असं सांगत होतं. ते पावसाचे थेंब, वायपर, ते गाडीच्या काचेवर साचलेलं धुकं, एसी या सगळ्या गोष्टी सहजच मनाशी-भावनांशी जोडून पाहिल्या.

वाटलं, असा वायपर किंवा तसाच एक एसी मनामध्येही हवा कुठंतरी. पावसात गाडीत बसल्यानंतर रस्त्याचं भान तो एसी किंवा तो वायपर देत होता. पावसाच्या वा धुक्याच्या रुपानं आलेलं साचलेपण बाजूला सारत वास्तवाचं भान देत होता. आयुष्याचंसुद्धा असंच असेल ना? सुख-दु:ख येतच राहातात. त्याच्यातच गुरफटत राहिलो तर आपल्यालाही साचलेपण येतं ना? जास्त सुखही बोचतं आणि दु:ख तर सारखंच टोचतं. परिस्थिती बदलली तरी आठवणी तशाच राहातात. त्याच आठवणी पुन्हापुन्हा आपल्याला जाणीव करून देत राहातात. आठवणी आनंद देणार्‍या असल्या तर हरकत नसते; पण वेदना देणार्‍या असल्या तर...
म्हणूनच आज मनापासून वाटलं, एक वायपर नाहीतर एक तसाच एसी मनात हवा. आठवणींवर फिरला किंवा तो नुसता सुरू केला तरी आजूबाजूच्या परिस्थितीची जाणिव होईल. आठवणींचं अस्तित्त्व त्या ओलाव्यासारखं किंवा त्या आर्द्रतेसारखं कायम असेलच. वाटलं तर मारायच्या रेघोट्या. काही काळ त्या तग धरून असतातच की; पण स्वत:च्या कोशातच अडकल्यासारखं व्हायला लागलं, गुरफटल्यासारखं वाटायला लागलं तर करायचा सुरू तो वायपर नाहीतर एसी. थोड्याच वेळात पुन्हा नॉर्मल. किती बरं होईल ना असं झालं तर...
२९/८/२०११
....रविवार, २८ ऑगस्ट, २०११

हसरी...

हसरी...तसं नावही आहे एक आणि व्यक्तिविशेषणही. मला इथं हा शब्द दोन्ही अर्थांनी वापरायचा आहे. हसरीची आणि माझी ओळख तशी अलीकडचीच, साधारण दोन वर्षांपूर्वीची. हसण्याच्या आवडीमुळेच आमची चांगली गट्टी जमली. काही दिवसांमध्येच आमची अशी खात्री झाली होती; की आम्ही म्हणजे जत्रेत हरवलेले बहिण-भाऊच! बर्‍याच काही बाबतीत साम्य होतं. धिंगाणा-मस्ती मलाही आवडायची अन तिलाही. हसायलाही भरपूर आवडत असे. तसं अजूनही आवडते; पण आता बंधनं आली. लोकं म्हणतात आता मोठे झालोय आम्ही. त्यामुळे नो धिंगाणा... अगदी हसायलाही बंदी! वर्गातही सोबतच असायचो. शक्यतो एकमेका शेजारच्या खुर्च्यांवर बसायचो, सर रागवत नाहीत तोवर. सर रागवले की जबरदस्ती मग हसरी एका कोपर्‍यात आणि मी दुसर्‍या असं बसायचो. आता वर्गही नाही राहिला आणि तिचं हसणंही नाही राहिलं...

एक प्रसंग आठवतोय. दिल्लीला ट्रिपसाठी जायचे होते. रात्री अडीचच्या आसपासची गाडी होती. आम्ही सगळेच नऊ-साडेनऊपासूनच स्टेशनवर जमायला सुरुवात केली होती. हॉस्टेलवरून आम्हा मित्र-मैत्रिणींचा ग्रुप निघाला होता. आम्ही स्टेशनवर पोहोचल्यावर काही वेळातच हसरीही आली. काकांसोबत आली होती तिच्या. आम्ही सगळेच मग निवांत गप्पा मारत बसलो. गाडीची वाट पहायचीच होती. पर्यायच नव्हता. पण आम्हा सगळ्यांपेक्षा तिला जास्त आतुरता होती.

तिचा भाऊ येणार होता. ‘तो कुठेतरी दुसरीकडेच असतो. तो परत तिसरीकडेच जाणार होता. मध्येच रस्त्यात पुणं लागतं आणि हसरीही पुण्यातच असते म्हणून येणार होता. निरोप द्यायला घरचं, जवळचं कोणी माणूस असावं, म्हणून दादा येणार आहे,’ असं ती सांगत होती. याच दादानं तिचं नाव ठेवलं होतं म्हणून जास्तच कौतुक होतं त्याचं. नावही तिच्या स्वभावासारखंच ठेवलं आहे. हसरी!

थोडा वेळ गेला. दादा स्टेशनवर आला हे आम्हा कोणालाच कळलं नव्हतं तसं. अचानक आमची ही हसरी स्वारी अचानक उड्या मारतच स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पळाली आणि साधारण तिच्याच उंचीच्या, कदाचित थोडं जास्तच, अशा आमच्यासाठी अनोळखी माणसाला जाऊन बिलगली. ‘हा माझा दादा.’ आम्ही काही विचारायच्या आतच आमची ओळख परेड झाली. काका, दादा आणि हसरी मग ट्रेन निघेस्तोवर गप्पा मारत असावेत बहुतेक.

त्यानंतर ट्रिप झाली...पुन्हा पुण्यात आलो...अशा खूपसार्‍या आठवणी आहेत. आता तर कॉलेजही संपलं आणि जो तो ज्याच्या त्याच्या उद्योगालाही लागला; पण ती त्या रात्री स्टेशनवर दादाला जाऊन बिलगणारी हसरी...वर्गामध्ये दिलखुलासपणे हसणारी हसरी...‘तू माझा भ्भो किन्नी, मग मला आत्ताच्या आत्ता चॉकलेट दे’ असं हक्काने सांगणारी हसरी...तितकीच चटकन रागावणारी, संताप करणारी; पण मनातून अगदी स्वच्छ हसरी...टप्पोर्‍या डोळ्यातून तितकेच टप्पोरे, मोत्यांसारखे अश्रू ढाळणारी अन तेही लपवत ‘काहीच झालं नाही मला,’ सांगत पुन्हा एकदा हसणारी हसरी हरवली ती हरवलीच.

माणसं अचानक अशी का बदलतात याचं उत्तर सापडतंच नाहीए मला. कारणं माहिती असली तरी काही बंधनं पाळावी लागतात म्हणून बोलताही येत नाही. बोलू वाटतं, सांगू वाटतं खूप काही; पण आता कळतं फायदा नाही ते. पण तरीही मनापासून असंच वाटतं हसरी हसरीच राहावी. हसरीला अजूनही जगाचे नियम-अटी समजायचेत. मला अगदीच सगळे समजलेत असं नाही; पण तिच्यापेक्षा वयानं मोठा म्हणून तरी जास्त माहितीयेत. म्हणूनच पुन्हा-पुन्हा वाटतं- हसरी हसरीच राहावी!
...

स्वत:ला शोधताना...

परवा डॉक्टरांकडे गेलो होतो. माझ्यासाठी ते फॅमिली डॉक्टरच्याही पलिकडेच. आमच्या फॅमिलीपैकी त्यांच्याकडे जाणारा मी एकटाच; पण तरीही माझ्यासाठी ते डॉक्टरांपेक्षाही वेगळे. काही दिवस रूम पार्टनर म्हणून सोबत राहिलो असल्याने ते एखाद्या पेशंटपेक्षाही जास्त जवळून ओळखतात मला. त्याचा फायदाही होतो अन तोटाही. गेलो, चेकअप झालं, औषधं घेतली, निघालो. निघता निघताच गणेशचा विषय निघाला.

गणेश. माझा भुसावळचा मित्र. मी डॉक्टरांसाठी फ्रेंड कम पेशंट; तर गणू पेशंट कम फ्रेंड. त्याचा हात फ्रॅक्चर झाल्यापासून तो डॉक्टरांकडे यायला लागलाय. डॉक्टर म्हणाले, ‘गणेशला काही प्रॉब्लेम आहे का रे? खूपच शांत वाटला.’ मी म्हणालो, ‘नाही. तो मुळातच खूप शांत आहे. हळवाही आहे तितकाच. अशा स्वभावामुळेच त्याचं आणि माझं छान जमतं आधीपासुन. आता मी पुण्याला आल्यापासून थोडा धीट व्हायला लागलो. बुजरेपणा सुटला. हळवेपणा कधीकधीच जाणवतो. गणेश शिकतोय अजून.’ माझं वाक्य पुर्ण व्हायच्या आतचं डॉक्टर हसले. म्हणाले, ‘बेटा पांघरून घ्यावं लागतं कधीकधी; पण पांघरून घेतलं तरी माणसं बदलत नसतात.’या वाक्याचा रोख माझ्याकडे होता हे लक्षात यायला वेळ लागला नव्हता; पण त्यावेळी डॉक्टरांचे इतर पेशंट्‌स थांबून होते; त्यामुळे निघणे भाग होतं. नाहीतर गप्पा रंगल्याच असत्या त्या विषयावर.

तिथून निघालो खरा; पण डॉक्टरांच्या त्या वाक्यामुळे काहे चैन पडेना. पांघरून घ्यावं लागतं....माणसं बदलत नसतात...त्यांचं हे बोलणं अगदी सहज होतं. त्यामागे कुठलाच हेतू नव्हता; पण तरीही ते वाक्य मला पुन्हापुन्हा विचार करायला लावत आहे. मी नक्की कसा आहे? सध्या पांघरून घेऊन जगतोय का? माझ्या मते मी म्हणजे एक शांत, आगाऊ, शॉर्ट टेम्पर्ड पण संयमी, हळवा पण तितकाच जिद्दी अशी स्वभाव गुणधर्मांची खिचडी असणारा आहे. आता यातला परिस्थितीनुरूप वेगळा मी माझ्या आणि इतरांसमोर येत राहतोय. परिस्थिती बदलली की ‘मी’ बदलतोय; मग नेमका मी कसा आहे?

माझी एक मैत्रिण मला नेहमी बरेचदा सांगायची, ‘शांत माणसं खूप तापट असतात आणि जी माणसं खूप तापट असतात ती खूप हळवीही असतात. त्यांच्या चेहर्‍यावरच्या रागीटपणा इतकच त्यांचं मन हळवं असतं,’ हे तिचं आमच्या मित्रांपैकी एकाविषयीचं ऑब्झर्व्हेशन होतं. आता हे ऑब्झर्व्हेशन माझ्याबाबतीतही लागू आहे का, याचा मी विचार करतो कधीकधी. उत्तरच सापडत नाहीये. माझ्यातलाच मी मलाच सापडत नसला तरी सध्या मला माझ्यातल्याच अनेक ‘मी’पैकी प्रगतीकडे धावणरा ‘मी’ बाहेर आलेला पाहायचयं...स्वत:ला मागे खेचणार्‍या हळव्या ‘मी’पेक्षा...
२७/११/२०११

बुधवार, २० जुलै, २०११

वारी अनुभवताना...

वारीतले वॉटरप्रुफिंग एक्सपर्ट...
(महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने)
परवा दिवेघाटात पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी, आळंदीपासून अगदी पुणे ओलांडेपर्यंत पांढरा कुर्ता आणि धोतर या ‘वारकरी स्पेशल’ गणवेशात चालणारे सगळे वारकरी अचानक रंगबेरंगी प्लॅस्टिकच्या कागदांमध्ये स्वत:ला गुंडाळत पुढे निघाले होते. घाटमाथ्यावरून हे चित्र मस्तच वाटलं. आपल्याकडच्या रेनकोटच्या तुलनेत कितीतरी विविधता होती त्यात. पुढे इकडे लोणंदमध्ये पोचेपर्यंत रस्त्याच्या कडेने तसले प्लॅस्टिकचे कागद, वारकर्‍यांच्या भाषेत सांगायचं झालं, तर कचकड्याचे कागद विकणारे अनेक विक्रेते पाहिले.

हे झालं दिवसभर चालतानाचं, रात्रभरं रहायची सोयही काहीशी अशीच आहे.पालखी तळावर शेकडो तंबू उभारलेले दिसतात. काही तंबू खास वॉटरप्रुफ ताडपद्रीचे आहेत. काही आहेत मेणकापडाचे तर काही ठिकाणी कापडी तंबूला प्लॅस्टिकचं प्रोटेक्शन आहे. पावसापासून संरक्षणासाठीची ही तरतूद आहे.पण फक्त चालताना आणि झोपताना आपल्या प्रोटेक्शनचा विचार करतील ते वारकरी कसले. टाळेसाठी वॉटरप्रुफिंगची गरज नाही; पण वीणा आणि मृदुंगासाठी अशी वॉटरप्रुफींगची ट्रिटमेंट दिलेली वारीत पहायला मिळाली.

लोणंदच्या मुक्कामासाठी पालखी थांबलेली असताना कोपरखैरण्यावरून आलेल्या दिंडीमध्ये चक्कर मारायला गेलो. दिंडी नेहमीसारखीच होती, वेगळं काही नव्हतं पण विणेकर्‍याकडची विणा वेगळी वाटली. अगोदर चकाकते म्हणून लक्ष गेलं, पण नंतर जरा निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की ती पूर्ण प्लॅस्टिकच्या कागदात होती. तरीही नीट वाजत होती हे विशेष! विणेकर्‍याचं नाव आहे बबन नाईक, दिंडी क्रमांक ६०, कळवा-बेलापूर विभाग, ठाणे. असं का केलयं विचारल्यावर नाईक म्हणाले, पावसापासून बचाव होतो, विणा अजिबातही खराब होत नाही. गर्दीपासूनही विणा सुरक्षित ठेवता येते. अन विणा सारखी सोबत घेऊन हिंडावं लागतं. आपण भिजलो तरी जमतं, विणेचं लाकूड खराब झालं की सूर लागत नाही. अभंग- गाणी म्हणायला विणेचा आणि मृदुंगाचा सूर द्यावा लागतो. विणा भिजली की तो सूर कसा मिळायचा? म्हणून मग आपलं आसं कागदात ठेवलंलं परवडतं.

पावसात आपण शक्यतो एक गंम्मत म्हणून भिजतो, पाऊस वाढला की एकतर आडोश्याला नाहीतर रेनकोटसह. वारकर्‍यांच तसं नाही. पाऊस आला तरी चालणं सोडायचं नाही. अगदी नाईलाज झाला तरच थांबायचं. नाहीतर जेव्ह्डं जमेल तेवढं असंच वॉटरप्रुफ करायचं की झालं.यालाच आपल्याकडे ऍडजस्टमेंट म्ह्णतात, वारकरी म्हणतात सेवा!
....
योगेश बोराटे
2/7/2011
.......

वारी अनुभवताना...

चंगळ खाण्याची, वारकर्‍यांची...
(महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने)

पुणं सोडल्यापासून आजूबाजूचा परीसर मस्तच वाटतोय. नुकत्याच झालेल्या पावसाने सगळीकडे हिरवळ पसरली आहे. एरवी बोडके वाटणारे डोंगरही हिरवे दिसायला लागले आहेत. चालताना आजूबाजूच्या शेतांकडे हलकेच नजर टाकली तर बहुतांश ठिकाणी नांगरट केलेली दिसतेय. काही ठिकाणी तर पहिल्या वाफश्यासाठी ढेकळं अगदी आसूसलेलीच आहेत, असं भासलं. कारण ही ढेकळं त्यांच्यावर थोडं पाणी जरी पडलं तरी शोषुन घेत अजून कुणी पाणी टाकतंय का, अशी वाटच बघतायेत. अर्थात ती वाट बघतायेत पावसाचीच, अन नेहमीप्रमाणे वारीसोबत तो येणार हेही त्यांना ठाऊक असावं!

अशा वातावरणात वारीसोबत चालताना पावसाच्या हलक्या सरींमुळे येणारा मृद्गंध आणि त्यासोबतच चुलीवर केलेल्या भाकरी वा चपातीचा घमघमाट नाकात गेल्यावर अंगावर शहारा आल्यावाचून अन् ती चव आठवत तोंडाला पाणी सुटल्यावाचून नक्कीच रहावणार नाही. हं, ज्यांना ही चवचं माहिती नाही त्यांची गोष्ट वेगळी, पण वारकर्‍यांचं काय? त्यांच्यासाठी हा मृद्गंध आणि तो घमघमाट विसावा घ्यायला मजबूर करतोय. दुपारच्या विश्रांतीसाठी थांबायच्या अगोदर असा ‘टेम्प्टींग स्मेल’ त्यांना ही भूकेची वेळ आहे, असं सुचवत असावा. पालखीच्या तळाच्या आजूबाजूला अनेक दिंड्यांच्या भोवताली असे अनेक टेम्प्टींग स्मेल सध्या दरवळत आहेत.

तसं शहरांमधून आलेल्या थोड्या स्टँडर्ड वारकर्‍यांइतकं दुसरं कुणी वारीमध्ये खाण्या-पिण्याची काळजी करताना पाहिलं नाही. पण एक गोष्ट नक्कीच ऑबसर्व्ह केली, खाण्याच्या बाबतीत वारीत अगदी चंगळच असते. आणि असं कोणी सांगितलं तरी ते वावगं ठरू नये इतक्या प्रकारचे निरनिराळे पदार्थ आणि निरनिराळ्या चवी आपण वारीमध्ये चाखू शकतो. आत्तापर्यंत किती प्रकारच्या चटण्या, लोणची अन् किती प्रकारच्या दशम्यांची चव चाखली हे निश्‍चित सांगता येत नाही; पण जितक्या ठिकाणांहुन अन् गावांहून लोकं वारीसाठी आली असणार, त्या-त्या ठिकाणची चवं ती लोकं वारीमध्ये घेऊन आली आहेत.

विशेष उल्लेख करुन सांगावं असं काही म्हणाल तर सुधारस! पहिलांदाच चाखला. लिंबाचा रस, साखरेचा पाक, त्यात बेदाणे, वेलची अन् डाळींबाचे दाणे...काय चवं होती यार...आपल्याकडच्या सीसीडीमध्ये असे काही पदार्थ असतील तर बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे बघायलाही होणार नाही. बेसण, खिचडी, लसणी-खोबर्‍याची चटणी, धपाटे, उसळी, मिठायांची तर खैरातच आहे. खाऊन-खाऊन थकायला होणार. आता आठवडा होत आलाय, पण एकही पदार्थ रिपिट नाही, इतकी वैविद्यता खाण्यामध्ये आहे इथं. अर्थात पुढचा प्रवास चालत करायचा हे लक्षात घेत वारकरी भूकेला एक घास कमी म्हणत शिस्तीत जेवतात. इतर कोणत्या पंगतीच्या ठिकाणी असं बघायला मिळणार नाही. वारी अशा अनेक अनुभवांनी आपल्याला समृध्द बनवणार आहे, हा विचारच सुखावह आहे, अन् खाण्याचे इतके पदार्थ असताना भूक मरणार की जगणार हा ज्याच्या त्याचा प्रश्‍न आहे. वारीतला हा अनुभव वारकर्‍यांसाठी लिमिटेड आहे, इतरांसाठी नियम- अटी लागू.
....................

योगेश बोराटे
30/6/2011
..............

रविवार, २२ मे, २०११

दिल तो बच्चा है जी...

दिल तो बच्चा है जी... हे गाणं बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय. त्यावेळी गाणं ऐकायच्या धुंदीत कदाचित त्या गाण्यातल्या शब्दांकडे लक्ष दिलं नव्हतं. परवा अचानक लक्षात आलं, मास्टर्स झालो. दुर्दैवानी औपचारिक शिक्षण संपलं. तितक्याच सुदैवानी अनौपचारिक शिक्षण सुरू झालं हे नशिब! तर म्हणत होतो, की शिक्षण संपलं. हा एक अध्याय पूर्ण केला की आपल्याकडे ‘माणूस मोठा झाला’ असं म्हणायची पद्धत आहे. माणसं मोठी होतात, पण मला स्वतःला मी वयाने खूप मोठा झालोय असं वाटतच नाही अजून.

अजूनही ते लहाणपणीचे दिवस आठवतायेत. चिखलाच्या गाड्या बनवत फिरणारा, क्रिकेटसाठी थोडा तडफडणारा, शाळा सुटली की रोजच्या नियमाने पाच ते साडे सहाच्या दरम्यान नियमितपणे खेळणं, नंतर अभ्यास वगैरे वगैरे करणारा मी... तसे बरेच काही पराक्रम केले, पण आता ते जेव्हा आठवतात तेव्हा पुन्हा वाटतं की, अजूनही लहानपण गेलेलं नाही आपलं. अजूनही तश्याच करामती कराव्याशा वाटतात. करता येत नाहीत, हा भाग वेगळा. हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा त्या गाण्याचे शब्द किती खरे आहेत, आपल्यासाठी कसे लागू आहेत ते समजतं. अजूनही मी लहान असल्याचं भासतं. मोठे म्हणतात, हो लहानच आहात तुम्ही, पण म्हणून काय लहानांसारखं वागायचं का. त्यावेळी जबाबदारीची जाणीव होते, पण सांगावं वाटतं खरचं अजून लहानच आहोत.

लहानपण किती भारी असतं, हे आता मोठं झाल्यावर लक्षात येतं हे दुर्दैव म्हणेन मी. कदाचित प्रत्येकालाच वाटत असावं असं. म्हणूनच तर ती गाणी लिहिली जात असावीत. ‘दुसऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणं, हा जणू काही आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे’ अस मानून जगणारे प्रत्येकवेळी लहानांसारखं जगणाऱ्यांना त्रास देतात, असं माझं स्पष्ट मत आहे. आम्ही लहानांसारखे वागतो ठिक आहे, पण बालिश तर नक्कीच नाही ना, मग असं का वाटतं हाही एक गंभीर प्रश्न आहे. कोणीतरी म्हटलयं बहुतेक, की प्रत्येकात एक खट्याळ मूल दडलेलं असतं... असं असेल तर मग त्या मुलाचा साक्षात्कार होतो कधी-कधी. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपल्याकडे सांगतात, तर मग असा साक्षात्कार झालेली मुलं ‘बावळट’ कशी ठरतात.

मोठं झाल्यावर लहानांसारखं वागण्याचं समर्थन नाही करत मी, पण आपण हे का विसरतो की असं जगण्यातही एक वेगळा आनंद असतो, एक वेगळी मजा येते. लहान मुलं खेळताना पाहिली की किती आनंद होतो, तसंच खेळावसं वाटतं. पण प्रयत्न केला की बास, झालंच. थोडं वाईट वाटतं, पण कोणीच ही बाब समजून घेत नाही. ही अडचण फक्त माझीच होते असं नसावं कदाचित. प्रत्येकालाच हा अनुभव एकदातरी आला असावा. जर वाटतं तर व्हावं लहान, थोड्या वेळासाठी. घ्यावा तोही आनंद. पुन्हा व्हावं मोठं. पण मोठं झाल्यावर जर पुन्हा आपली तिच लहाणपणाची छबी इतर आपल्याला आपला बावळटपणा म्हणून सांगत असतील, तर तसं न करणं अन आपलं मन मारणं ठिक आहे असंच वाटतं ना?

अवघड जागेचं दुखणं म्हणतात ते असं. बाकी काही नाही. ही पोस्ट म्हणजे बालिशपणा नाही, मोठा झालोय याचं वाईटही वाटत नाही, पण लहानपण उपभोगता येत नाही याचंच जास्त दुःख होतंय म्हणून लिहिलिये. बाकी काही नाही.

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०११

सोनेरी दिवस


(सुरुवातीला इंग्रजी मुळाक्षरांच्या सहाय्याने मराठीत लिहिलेल्या लेखाविषयी मिळालेल्या प्रतिक्रियांनातर, आमच्या मित्रमंडळाच्या आग्रहास्तव देवनागरीमध्ये केलेला हा लेखप्रपंच.)
खरं तर रानडेत पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्या दिवसापासून माझं जग बदललं. किंबहुना मला ओळखणाऱ्या सगळ्यांना त्यावेळी मीच बदललो असही वाटायला लागलं. काही खास माणसं सोडली तर बाकी सगळ्यांच हेच मत होतं. काही म्हणायचे चला योगेश सुधारला आता... तेव्हा माझा मी स्वतःलाच प्रश्न विचारायचो, मी बिघडलो होतो केव्हा की हे माझ्याविषयी असा विचार करतायेत... या प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडलेली नाहीत. 
हळू-हळू सगळंच स्थिरस्थावर होतंय. सगळ्यांचं माझ्याविषयीचं मत पुन्हा बदलायला सुरुवात झालये. कदाचित बदल हाच जगाचा खरा नियम आहे हे कोणाचं वाक्य आहे ते नाही माहिती, ते मलाही लागू पडतंय असंच भासतंय प्रत्येकवेळी. बदल होतंच चाललेत. मीही बदलतोय आणि माझ्या आजूबाजूचेही. आता महाराष्ट्र टाइम्सला आल्यापासूनतर कमावता झालोय म्हटल्यावर हे अजूनच वाढलंय. एखाद्यासाठी पूर्वी माझ्याकडे असणारी वेळ माझ्याकडे नाही हे त्यांना सांगणं मला स्वतःला जड होतं, तसं त्यांना सांगूही वाटत नाही, तरी ते सांगणं ही माझी अपरिहार्यता बनलीये. पण समोरची माणसं विचार करतात, हा आता जास्तच शहाणा झालाय, जास्तच भारी भरायला लागलाय. कोणाला कसं पटवून सांगावं हेही समजत नाही. हे मात्र नक्की, की जग दोन्ही बाजूजी बोंबलतं (जरा जास्तच वाइट शब्द वापरला मी इथं, पण तोच चपखल बसतोय,).
भुसावळमध्ये होतो, त्यावेळचे काही दिवस आयुष्यामध्ये कधीही विसरू शकणार नाही. वाईट दिवस होते ते म्हणून, पण आता सध्या पुण्यात जे दिवस पाहातोय, त्याचा विचार करता हे दिवस नक्कीच सोनेरी दिवस आहेत माझ्या आयुष्यातले असंच म्हणेन मी. खरं तर इथला प्रत्येक दिवस मला मी कोणे एके काळी पाहिलेल्या स्वप्नांची आठवण करून देतोय. बी.एस्सी. सुरू होतं तेव्हा विचार करायचो की केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स करायचं तर पुणे विद्यापीठातूनच. नंतर विचार बदलला. पण पुण्यात येऊन शिकण्याचाय विचार कायम होता. मधल्या काळात मी पुढे शिकेन, काही करेन याविषयी कोणालाही विश्वास वाटत नव्हता. जवळचे दोघं-चौघ मित्र सोडले, तर त्यावेळी प्रत्येकानेच झिडकारलं. कदाचित त्यांनाही वाटलं असेल मनातल्या मनात तसं, पण मैत्रिचं नातं कदाचित विसरले नसावेत ते. त्यामुळे सहन केलं त्यांनी मला. नंतर काही दिवसांनी जेव्हा पुण्यात प्रवेश मिळाल्याचं समजलं सगळ्यांना तेव्हा, चला सुटतो असाही विचार केला असेल काहींनी...
सुधारलो त्यावेळी. कदाचित पुन्हा एकदा बिघडण्यासाठी असेल हे सुधारणं, पण आता मागचे एक वर्ष आणि हे सध्याचे दिवस जेव्हा निवांतपणामध्ये बसून अनुभवतोय, तेव्हा एकच लक्षात येतंय, बेटा योग्या जी स्वप्न पाहिली होतीस, तीच जगतोयेस... असंही होऊ शकतं... निवांतपणा कदाचित आत्मपरीक्षण करण्यासाठीच मिळत असावा... भारी वाटतं हे सगळं आठवताना. अन सहजच मनात येतं यार आपण जे जगतोय सध्या त्यालाच सोनेरी दिवस म्हणत असावेत. कदाचित हाच काळ माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला खास काळ असावा. या काळात माझ्याशी नव्याने जोडल्या गेलेल्यांना, जूने लोक जे अजूनही जोडलेले आहेत, त्यांच्यामुळेच अजूनही तसाच आहे, त्या सगळ्यांनाच या माझ्या सोनेरी दिवसांचे श्रेय.