बुधवार, २८ मार्च, २०१२

मी अनुभवलेली ग्रेसभेट... एक ग्रेसफुल भेट


परवा सकाळी सकाळी ग्रेस गेल्याचं समजलं. काहीसा शॉक बसला होता त्यावेळी. ते समजल्यावर थोडं अस्वस्थ वाटत होतं. माझ्या त्या अस्वस्थतेला कारणही तसंच होतं. एरवी आपल्याला एखादी वाचलेली गोष्ट आठवत नसली, तर ती परत वाचता येते. पण आपण एखादी विशेष गोष्ट एखाद्या विशेष व्यक्तिच्याच तोंडून ऐकली असेल आणि ती परत आता ऐकायची संधी मिळणारच नाही, याची खात्री झाली की जशी अस्वस्थता जाणवेल ना, तशीच ती अस्वस्थता होती. आता ग्रेस गेल्यामुळे अस्वस्थ होत नसलं, तरी त्यांच्या काही ओळी आठवत नसल्यानं ती अस्वस्थता नक्कीच जाणवत होती. ग्रेसांच्याच कवितेच्या त्या ओळी मी त्यांच्याच तोंडून ऐकल्या होत्या. ५ जानेवारी, २०१२ ला ‘एसपी’तल्या ‘ग्रेस भेट’ कार्यक्रमात.
त्या ओळी सांगू शकतील, अशी आशा असणार्‍या सगळ्यांना मी त्यावेळी विचारूनही पाहिलं होतं; पण माझे ते प्रयत्नही व्यर्थ ठरले होते. आता ते गेले म्हटल्यावर साहजिकच मी त्या ऐकलेल्या ओळी आठवून बघत होतो, पण आठवतील तर शप्पथ. शेवटी मग ऑफिसमध्ये आमच्या सॉफ्टवेअरवर मी त्या कार्यक्रमाची मी केलेली बातमी शोधली. त्यात सापडल्या त्या ओळी. त्या काहीश्या अशा होत्या-
‘नदी हिंडू दे झर्‍याला शोधत,
झर झर झर झर झरता,
लख्ख निरंजन वाणी माझी,
अलख निरंजन कविता.’
ओळी सापडल्या, की एफबीवर टाकून मोकळा झालो. सोबत लिहिलं होतं...मी अनुभवलेले ग्रेस खरंच ग्रेसफूलच होते...

तसं बघायला गेलं, तर मी सायन्सचा विद्यार्थी. त्यामुळं दहावीनंतर मराठी विषयाशी तसा अभ्यास म्हणून संपर्क राहिला नव्हता. बरं मी तसा कधी कवितेच्या प्रेमात पडणार्‍यांपैकीही नव्हतो. त्यामुळे माहितीतल्या कविता अगदीच मोजक्या. कवींची संख्याही तशीच. खानदेशात वाढलो म्हणून बहिणाबाई आणि साने गुरुजींच्या एक दोन कविता. कुसुमाग्रजांची ‘कणा’. ती आमच्या भुसावळ हायस्कूलच्या पुष्पा टिचरनी अगदी चालीसकट शिकवली होती. त्यामुळं ती कधीच विसरलो नव्हतो. वय वाढलं तसं कुसुमाग्रजांचीच प्रेम कर भिल्लासारखं वगैरे वगैरे, पाडगावकरांच्या प्रेम म्हणजे प्रेम..., त्याच आधारवर संदीप खरेंची लव्हलेटर... अशा प्रेमकविता माहिती असणार्‍यांमधला मी. त्यात ग्रेस हे नाव कधीही नव्हतं. म्हणजे ग्रेस नावाचे कुणीतरी एक कवी आहेत एवढी माहिती होती; पण त्यांच्या कविता किंवा कवितासंग्रह म्हणाल, तर आम्ही म्हणजे ‘बाकी सगळे शुन्यातले’च होतो. पण तरीही ग्रेस मला भावले. आवडले.

एसपीतल्या त्या कार्यक्रमामध्ये मी अनुभवलेले ग्रेस, त्या कार्यक्रमापूर्वी मी ऐकलेल्या अनेक ग्रेसांपेक्षा खूप वेगळे वाटले. ग्रेस काय बोलतात ते समजतचं नाही.... ते बोललेलं सगळं डोक्यावरूनच गेलं... ग्रेस आहेत. सांभाळून. बातमीत काय लिहायचं, ते समजलं तर आम्हालाही सांगा... अशा नानाविध पण काहीशा एकाच अर्थाच्या प्रतिक्रिया मी त्यांच्याविषयी ऐकल्या होत्या. ग्रेस खूपच अवघड बोलतात, ते खूप ओरडतात किंवा अगदी आपण लिहिलेलं जर त्यांना आवडलं नाही तर ते फोन करूनही सांगतात असंही मी ऐकलं होतं. त्यातून त्यांच्याविषयी माझ्या मनात कार्यक्रमामध्ये ते बोलायला सुरुवात करेपर्यंत जी भावना होती ती अशीच, की ग्रेस म्हणजे एक भयंकर अवघड माणूस असावा. कदाचित म्हणूनच कविता लिहित असावा. बरं माझ्या मते गद्यापेक्षा पद्य लिहिणं तसं अवघडचं आणि पुन्हा गद्यापेक्षा ते पद्य समजून घेणं त्यापेक्षाही कितीतरी पट अवघड. असा काहीतरी भन्नाट विचार करतच मी कार्यक्रमाला गेलो होतो.

कार्यक्रमाची सुरुवात झाली. व्यासपीठावर ग्रेस होते ते काहीशा चॉकलेटी- ग्रे शेडच्या टी शर्टमध्ये. डार्क निळ्या रंगाची पँट, डोक्यावर गोल हॅट आणि डोळ्यांवर चष्मा. कार्यक्रमामध्ये बसायला जागा नसल्याने जागा शोधण्याचा प्रयत्न करत मी त्यांच्या बोलण्याकडे कान लावून होतो. त्यांची पहिली काही वाक्ये अशी होती -‘ साष्टांग नमस्कार करतो. आवाजाची थोडी गडबड आहे. गोंधळ नाही. काव्याच्या अनुभूतीच्या मार्गाने शाक्त आहे. देवीसाठी जागरण. गोंधळ नाही. मागे मी आणि पुढेही मीच आहे. ‘मुझे मुझसे जुदा देखा न जाये’. आतड्यातील पेशींची वीण आहे. ती कंपल्सिव्ह म्हणून मी स्वीकारली आहे. कणाकणाने जगताना कणाकणाने मरत असतो; म्हणूनच शेवटचं मरण सुकर होतं. माझ्या असंबद्धपणाकडे लक्ष देऊ नका. आय ऍम ए ऑक्सफर्ड पोएट.’

ते हे बोलत असताना त्यांच्या आवाजातला रखरखीतपणा, ‘ण’ आणि ‘न’ मधला फरक उपस्थितांना समजावा म्हणून जोर देऊन ते शब्द बोलण्याची त्यांची शैली, टी शर्टच्या खिशामध्ये हात घालून, तो खिसा बोलण्यातील चढ-उतारांनुसार हलवत हलवत, दुसरा हात फिरवत बोलण्याची त्यांची ती वेगळीच स्टाइल मी अनुभवत होतो. आता त्या अगोदर त्यांच्याविषयीची ख्याती ऐकली असल्याने, त्याच नजरेतून मी तोपर्यंत ग्रेस बघत होतो. ‘हे काहीतरी बडबडतायेत. बातमीसाठी काही तरी बोलले म्हणजे आपलं काम झालं,’ असंच तोपर्यंत वाटत होतं. कार्यक्रमाच्या ओघामध्ये ते बोलत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी प्रतिभावंत कसा असतो, ते सांगितलं. ‘आपल्याला आयुष्यात लाभलेला एकमेव अद्वितीय मित्र म्हणजे जी.ए. कुलकर्णी. आणि कलाकाराचा मेंदू हा त्याचा एकमेव मित्र असतो.’ असं सांगितलं. समोर सगळे विद्यार्थी आणि शिक्षक ऐकत होते. जी. एं. चा उल्लेख आल्यावर मी मनातल्या मनात म्हटलं, ‘हेही असंच अवघड बोलतात, जीएसुद्धा तसलंच अवघड, गुढ आणि रहस्यमयी लिहित होते म्हटल्यावर जमणारंच की मैत्री.’ बाकीच्यांना तसं वाटलं की नाही हे माहिती नव्हतं. पण या प्रसंगानंतर त्या कार्यक्रमामध्ये एक कवी किंवा कलावंत म्हणून बोलायला आलेले ग्रेस अचानक त्यांच्याच भूतकाळामध्ये गेले. ते प्राध्यापक असतानाच्या नागपूरच्या आठवणी त्यांनी सांगायला सुरुवात केली.

‘मी रक्तबंबाळ मनुष्य आहे. त्यामुळे साधेसुधे शब्द वापरून कसे चालतील. प्रत्येक शब्दाच्या टोकावर फिकट झालेल्या सृजनशीलतेचा भगवा ध्वज आहे. प्रतिभावंताने हात हलवला की ते दिग्दर्शन होते. त्यामुळे कधीही कलाकाराचा इन्सल्ट करू नका. ज्या-ज्या ठिकाणी असे झाले, ती राष्ट्रे तळफटली आहेत. माय एस्टिम्ड फ्रेंड्‌स अँड एनिमीज... आय लूक मॅग्निफिसंट्ली हँडसम इन माय ग्रेव्ह बट आय डोन्ट लाइक टू लूक हँडसम इन एनिबडीज पॅलेस...’ असं सांगताना त्यांना कदाचित त्यांच्या दु:खाची, कॅन्सरमुळे होणार्‍या त्रासाची पुन्हा एकदा आठवण वा जाणीव झाली असावी. ‘ग्रेस इज नॉट माय अचिव्हमेंट, इट इज अ गिफ्ट गिव्हन बाय माय मदर अँड मास्टर. त्यामुळे जी कविता माझी मिळकतच नाही, त्या विषयी कोणतेही विधान करणे योग्य नाही.’ हे सांगताना त्यांच्यामधील एक प्रामाणिक मातृभक्त आम्ही सगळेच त्यावेळी अनुभवत होतो.
बोलण्याच्या ओघामध्ये ते आपल्या कवितांचे दाखले देत चालले होते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन्ही भाषांमधून ते आपलं मनोगत मांडत होते. बोलण्याच्या ओघातच मग त्यांनी मग त्या वर लिहिलेल्या ओळी म्हटल्या आणि उपस्थितांना विचारलं, ‘आता लोकांना हेही दुर्बोध वाटत असेल तर माफ करा.’ मग लोक त्यांना कोणकोणत्या प्रकारे दुर्बोध ठरवतात ते सांगायला लागल्यावर मात्र उपस्थितांची चांगलीच करमणूक व्हायला लागली. आपली गोल टोपी, त्या टोपीखालची पुन्हा आतली टोपी; त्यांच्याच भाषेत सांगायचं तर टोपीचं अंतर्वस्त्र काढून दाखवत ते म्हणाले, ‘कॅन्सरमुळे केस गेलेत. आता हॅट वापरतो. हे पाहिलं की लोकं माझ्याकडे वेगळ्याच नजरेतून बघतात. त्यांना वाटतं हा माणूस उन नसतानाही हॅट घालतो. काहीतरी वेगळंच आहे. नागपूरला होतो, तेव्हा लेडिज सायकल चालवावी लागायची. कारण माझा ऍक्सिडंट झाला होता. टांग मारून सायकलवर बसता येत नव्हतं. मग लेडिज सायकल चालवावी लागायची. तरीही लोकं मी काहीतरी गूढ करत असल्यासारखं माझ्याकडे बघायचे. लोकांना सगळंच गुढ वाटायचं....’ असं म्हणत म्हणत ते परत नागपूरच्या दिवसांकडे वळाले. कॉलेजमध्ये शिकवतानाचे आपले अनुभव त्यांनी पुन्हा कॉलेजच्याच विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. परत म्हणाले, ‘आय ऍम मॅन ऑफ रिस्क. टू से नो इज दि मोस्ट फंडामेंटल राइट ऑफ जंटलमन... अशी वाक्ये मी वापरतो. ती ही ह्यांना दुर्बोध वाटतात. अरे ग्रेसला ऐकायला आलात तर त्याला समजवू द्या ना...

कार्यक्रमाचा हा शेवट असेल असे वाटले नव्हते. त्यांनी नागपूरचीच कॉलेजमधली एक आठवण सांगत ‘और पुरानी बाते याद आयी,’ म्हणत आपलं बोलणं थांबवलं. कार्यक्रमही संपला. इतर सर्व कार्यक्रमांमध्ये जशी वक्त्यापुढे सह्यांसाठी गर्दी व्हावी, तशीच विद्यार्थ्यांनी त्यावेळी ग्रेसांच्या भोवती गर्दी केली होती. मी सहीसाठी त्यांच्याजवळ जायला थोडा घाबरतच होतो. म्हणून मग स्टेजच्या जवळ जाऊन ते सही कशी देतायेत आणि ते जवळून कसे दिसतायेत एवढंच बघून माघारी फिरलो. ग्रेसांच्या भाषणाच्या अगोदर त्यांच्याविषयीची एक डॉक्युमेंट्री कॉलेजने दाखवली होती. ती डॉक्युमेंट्रीही ग्रेसांनी ‘हो दाखवा की...’ म्हणत पाहिली. त्यात बॅकग्राउंडला कुठेतरी त्यांनीच लिहिलेलं ‘भय इथले संपत नाही...’ वाजत होतं. तेच गुणगुणत मी बाहेर पडलो होतो. आता तेच लिहिलेलं वास्तव असल्याच पटतयं. ग्रेसफूल ग्रेस अनुभवल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी त्यांच्या कवितेतलं वास्तव पटल्यासारखं वाटलं. मी एक वास्तववादी आणि ग्रेसफुल ग्रेस अनुभवल्याचं समाधानही त्याच निमित्ताने वाटतंय.
२९/०३/२०१२