रविवार, ३० जुलै, २०१७

वाचनप्रपंचाच्या निमित्ताने...

मी तसं खूप काही वाचत नाही, तरीही एक प्रश्न पडतोच. म्हटलं तर तसा खूपच बेसिक प्रश्न असावा हा, मी का वाचतो? उत्तरही तितकंच साधं- सोप्पं. वाचायला मिळतंय म्हणून. पण तरीही, का वाचतो? खूप दिवसांपासून या प्रश्नाच्या उत्तराविषयीची मत-मतांतरं डोक्यात सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिपोर्टिंगचे दिवस वाचणं सुरूए, ते आता शेवटच्या टप्प्यात आलंय. कामाच्या निमित्ताने रिपोर्टिंग सुरू केल्यावर ते एकदा हाती घेतलं होतं. आता पुन्हा जवळपास सहा वर्षांनंतर, तेच शिकवायला सुरुवात केल्यावर ते पुन्हा एकदा वाचून काढावं म्हटलं. त्या आधी राजधानीतून वाचून पूर्ण केलं. बातमीमागची बातमी नावाचं एक पुस्तक चांगलं आहे असं समजल्यावर तेही घेऊन आलोय. तेही वाचायचंय. का वाचतोय म्हटलं तर, सवड मिळाली की घ्यायचं वाचायला, बोअर झालं की घ्यायचं वाचायला, जास्तच बोअर झालं की ठेवायचं बाजूला. खूप जण सांगतात म्हणून वाचायचं, वाचणं चांगलं असतं म्हणून वाचायचं वगैरे वगैरे. नेमकं उत्तर तसं काही केल्या सापडत नाही. तरीही मी वाचतो. उत्तराविषयीचा विचार करायला लागल्यावर वाचनाविषयीच्या या प्रश्नाच्या उत्तरानं मला अनेकदा अगदी बालपणात नेऊन पोहोचवलं. कदाचित त्याचं उत्तर लहानपणापासूनच लागलेल्या- लावलेल्या सवयींमध्ये दडलेलं असावं म्हणून.  

भाऊ, माझे वडिल बाहेरगावी गेल्यावर आमच्यासाठी म्हणून नेहमीच पुस्तकंच आणायचे. ते बाहेरून आल्यावर खाऊ म्हणून हाती मिळायची ती पुस्तकंच. वाढदिवसाला पुस्तकं, परीक्षेत चांगल्या मार्कानं पास झालं की पुस्तकं, काही नवं चांगलं केलं की पुस्तकं, पुस्तकं नी पुस्तकंच. सुरुवातीच्या टप्प्यात गोष्टींची पुस्तकं, मग अभ्यासाला जोड देऊ शकतील अशी पुस्तकं, सुरुवातीची मराठी नी मग हिंदी पुस्तकं, हिंदी कथासंग्रह असलं काही- काही वाचायला मिळालं. मिळालं म्हणण्यापेक्षा ती वाचायची सवय लावली गेली. रोजचा पेपर तर असायचाच. अभ्यासाची पुस्तकं वाचायचा कंटाळा आला की गोष्टींची पुस्तकं वाचून विरंगुळा. जोडीला भरपूर खेळणं. शाळेतली लायब्ररी, तिथली गोष्टींची पुस्तकं. भुसावळचं शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाशेजारचं ते सार्वजनिक वाचनालय नी तिथली पुस्तकं. घरातली पुस्तकं कमी की काय, म्हणून जसं स्वतःची आवड- निवड समजायला लागली होती, तशी या दोन ग्रंथालयांनी ती आवड भागवली. कॉलेजला गेल्यावर लायब्ररीतनं पुस्तकं काढण्यापेक्षा सार्वजनिक वाचनालयातली पुस्तकं आणणं आवडायला लागलं होतं. शेरलॅक होम्स वाचला तो तेव्हाच. प्रवासवर्णनांनीही त्या वेळी मज्जा आणली होती. दरम्यानच्याच काळात सायन्समधनं लक्ष उडायला लागलं होतं. केमिस्ट्रीच्या वर्गात बसल्यावरही डोक्यातली रसायनं कधी-कधी होम्सच्या त्या गूढ कथांमध्ये अडकवायला लागली होती. त्यानंतर जाणीवपूर्वक होम्सला बाजूला सारलं. हळूहळू वाचनाविषयीची ती आवडही बदलत गेलीये. सुरुवातीला प्रवासवर्णनं, रहस्यकथा, फार फार तर हलकंफुलकं लेखन वाचायची आवड होती. आताही ते आवडतंच, पण त्या वेळी कधीही हाती न धरलेले जड-बोजड विषय वाचायला लागलो. आधी घरात रोजचा पेपर आला की पानांची वाटावाटी व्हायची. जड ऐवज असलेली मधली पानं आई- भाऊंकडं, मामांकडं जायची. आम्ही दोघं पोट्टे आपलं स्पोर्ट्सचं पान वाटून घ्यायचो. त्यावेळी पेपरही उलटाच वाचायची सवय होती. पेपरची पानं पसरून आपलं सार्वजनिक वाचन चालायचं. क्रिकेटच्या बातम्या पहिल्यांदा, नंतर फ्रंट पेजला काय असेल ते बघणे. त्यावेळी कोणी सांगितलं असतं की पेपर वाचायचीही एक पद्धत असते वगैरे, तर ऐकून सोडून दिलं असतं. आता तसं नाही करता येत. कोणी म्हटलं असतं की पत्रकार होणारेस, तर ही काय भानगड म्हणून विचारत बसलो असतो. आता वाचनाच्या निमित्ताने हा सगळा विचार करतो तेव्हा जाणवतंय, कदाचित त्या वाचनाच्या भानगडीमधूनच आपली गाडी इकडं वळली असावी.

पुण्यात आल्यानंतरच्या काळात साधं- सोप्प लिखाण वाचायच्या निमित्ताने व्यंकटेश माडगुळकरांच्या पुस्तकांकडे वळलो. साधं- सोप्प अनेक जण लिहित असतील कदाचित. पण माडगुळकरचं आपण का प्रेफर करत असू, असाही प्रश्न पडला. कदाचित त्यांनी लिहून ठेवलंल मनाला जास्त भावतंय असं वाटतं. गावाकडची माणसं, गावाकडची दुनिया ते अक्षरशः शब्दांनीच उभी करतात असं जाणवतं. गावापासून लांब असणाऱ्यांना अशा गोष्टींचं अप्रुप असणारंच की. मीही कदाचित त्यातलाच एक झालो असेन. शंकर पाटील, अनिल अवचटांचं लेखन आवडायचं कारणही कदाचित असंच काहीसं असावं. हे वाचणं आवडीतून व्हायला लागलं. पहिल्या टप्प्यातली सवय जडली नसती, तर कदाचित दुसऱ्या टप्प्यातली निवड समजली नसती. निवड समजल्यानंतर नेमकं कोणाचं काय वाचावं, हे जे आत्ता समजतंय तेही कदाचित समजलं नसतं. त्यामुळंच कदाचित आता तो बालपणातला पुस्तकांच्या खाऊचा टप्पा महत्त्वाचा वाटतोय. वाचनाची ती सवय लावण्यासाठी म्हणून भाऊंनी त्या वेळी जाणीवपूर्वक हाती दिलेली ती गोष्टींची पुस्तकंही महत्त्वाची वाटतायेत.


पुण्यात आल्यावर आपल्याला आवडेल, रुचेल, झेपेल असेच विषय वाचायचे असं सुरुवातीपासूनच ठरवून टाकलं. स्वतःची लायब्ररी करायची, निवडून- निवडून चांगली पुस्तकं गोळा करायची ठरवलं. आता तशी पुस्तकंही जमायला लागलीत. हे सगळं पाहिलं की भारी वाटतं. मागे एकदा असंच घरातल्या पुस्तकांचं छानसं लिस्टिंग झालं होतं. तेव्हा जाणवलं होतं की पुस्तकांचा हा ऐवज म्हणजे आपल्याकडचा खजानाच होत चाललाय. भुसावळला असताना कधी-कधी चोऱ्या-माऱ्यांचा विषय व्हायचा. भुसावळच्या घरात पुस्तकं, पेपर नी कागदाचं भांडवलं खूपच जास्त होतं, आत्ताही परिस्थिती फारशी बदललेली नाही. आपल्या घरात चोर आले तर घरात काय सापडणार, तर ही रद्दी असंच भाऊ म्हणायचे. पुण्यातल्या घरात अजून तेवढं ऐश्वर्य नाही. पण, निवडक पुस्तकं गोळा करण्याचा साधारण वेग विचारात घेतला, तर आपलं आपल्यापुरतीचं एक छानसं छोटेखानी ग्रंथालय घरातंच निघू शकेल असं वाटायला लागलंय आता. कदाचित तीच आपली दौलत ठरेल. बघुयात कसं जमतंय ते. एकुणात हा वाचनप्रपंच आपल्याला स्वतःला शोधायला शिकवणारा ठरतोय, आणखी काही प्रश्न नी अशीच आणखी काही उत्तरही देणारा ठरेल बहुदा. 

कॉफी विथ फादर...

साधारण वर्ष-दीडवर्षापूर्वी हे लिहून ठेवलं होतं. ब्लॉगवर पोस्ट करायचं राहूनच जात होतं. त्यावेळचे काही संदर्भ आता थोडे फार बदललेत. पुण्यातल्या पत्रकारितेच्या, फर्ग्युसन कॉलेज रोडच्या, रानडेच्या सोबतीनं असणारं कामाचं स्वरूप मात्र अजूनही तसंच आहे. त्यामुळेच कदाचित असेल, पण अजूनही हे लिहिलेलं तितकंच आवडतंय. म्हणून शेअर करतोय.

कॉफी विथ फादर...
ऑफिस फर्ग्युसन कॉलेज रोडवर असल्यानं वैशाली-रुपाली-आम्रपाली हॉटेलं तशी खूप जवळची. रानडेचा पत्ता शोधतानाच मुळी पहिल्यांदा रुपालीची ओळख झाली. वैशाली त्या ओघानेच समजलं. आम्रपालीचा तपास तसा काहीसा उशीराने लागला. हॉटेलं माहिती झाली, तरी स्वतःहून त्यात आत शिरायचं डेरिंग अगदी अलिकडच्याच काळात केलं. नाहीतर आम्ही आपलं त्रिवेणी वा रानडेच्या कँटिनमध्येच पडिक राहणाऱ्यातले. हल्ली मित्र-मैत्रिणींसोबत वैशालीची कॉफी, कधी तरी डोसा इथपर्यंत मजल गेलीये. मित्र मैत्रिणींसोबतच्या या कट्ट्यांवर तसे घरातल्यांसोबत कधी जाणे झाले नव्हते. आजचा दिवस, आजची ती कॉफी त्यामुळेच खास बनली. कॉफी विथ फादर म्हणून.

एकूणातच हॉटेलिंग हा प्रकार आमच्या घरासाठी तसा जवळपास निषिद्धच. भुसावळमध्ये असताना फारसं कधी हॉटेलमध्ये गेल्याचं आठवत नाही. जास्तच वाटलं, तर कधी तरी संगमची पावभाजी. मी पुण्यात आल्यानंतर घरचं खायला मिळत नसल्यानं, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपोआपच हॉटेलिंग सुरू झालं. दुधाची तहान ताकावर नी घरच्या जेवणाची भूक हॉटेलांवर भागवणं सुरू झालं. सुरुवातीला अप्रूप वाटायचं. नंतर ते वाटेनासं झालं. तसंच सुरुवातीला वैशाली- रुपालीत शिरणंही अप्रूप वाटायचं. आता तेही बंद झालंय. आज भाऊंना, माझ्या वडिलांना वैशालीत घेऊन जाताना थोडं टेन्शन आलं होतं. विनाकारणचा खर्च टाळणे, पण आवश्यक त्या गोष्टीवर आणि आवश्यक तेवढा खर्च नक्कीच करणे, हे त्यांचं साध सूत्र आहे. त्यानुसार त्यांचे सगळे व्यवहार चालतात. वैशालीमध्ये हे सहजचं जाणं यातल्या कुठल्याच सूत्रात बसत नसेल. त्यामुळे ते टेन्शन असेल कदाचित. पण आज ते टेन्शन बाजूला सारलं नी गेलो त्यांना घेऊन आत. योगायोगानं आत टेबल मोकळं सापडलं. जाऊन निवांत बसलो. दोन कॉफी सांगितल्या.


ते परत भुसावळला निघाले होते. गाडीला वेळ होता, म्हणून माझ्या ऑफिसकडे आले होते. सोबत दोन बॅगा होत्या. बॅगा म्हणजे एक पिशवी आणि एक बॅग. पिशवी म्हणजे आपली बाजाराला नेतात तशी दोन बंदांची पिशवी. संध्याकाळी बातम्यांचा ओघ सुरू होण्यापूर्वीचा मोजका वेळ होती असल्यानं मी आपलं बाकी कुठे जात बसण्यापेक्षा वैशालीचा पर्याय निवडला होता. आत जाता जाताच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. वेटरने येऊन टेबलखाली ठेवलेल्या दोन बॅगा थोड्या आत, टेबलखाली सरकवायचा प्रयत्न केला. आम्ही दोघांनीही त्या बॅगा एकेकाने एकेक करत आपापल्या बाजूला ठेवल्या. तोपर्यंत कॉफी आली. कॉफी पिणं सुरू होतं. मला वैशालीच्या कॉफीची चव काहीशी कडवट वाटते. त्यामुळे मी एरवीच त्यात भरपूर साखर घालून पितो. आज कॉफी सांगतानाच ती गोड करून आणायला सांगितली होती. त्यानुसार वेटरने कपात साखर घालून, त्यावर कॉफी ओतली असावी. कॉफी संपता संपता भाऊंना तळाशी असणारी ती साखर दिसली. कपात साखर तशीच आहे म्हणाले. मी म्हणालो, अहो इथली कॉफी खूप कडू असते म्हणून मी गोड करून आणायला सांगितली होती त्याला. तेही काही बोलले नाहीत.

कॉफी संपत आली होती. त्यांच्याशी गप्पा मारता मारताच विचार सुरू झाले होते. आजपर्यंत कधी असं घरच्यांसोबत या हॉटेलात येऊन बसलेलो नाही. आजूबाजूचं जग या हॉटेलांच्या किश्श्यांमध्ये रमतंय, आपल्याला मात्र त्या हॉटेलांची गोडी कधी लागत नाही.... गोडी लागणं म्हणण्यापेक्षाही इथं येणाऱ्यांपैकी अनेकांसाठीच्या त्या स्टेटस सिम्बॉलच्या भानगडीत अडकणं जमेनासं होतं. सुरुवातीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवायची या हॉटेलांविषयी. रानडेत असतानाच, एका मित्रासोबत या हॉटेलातून जेवायचा प्रसंग आला होता. परत तशी वेळ येऊच नये, याची पुरेपूर काळजी घेत मेसच लावून टाकली. कॉफीच्या घोटांसोबतच्या बिझनेस डिल्स कोणाकोणाकडून ऐकायला मिळाल्या होत्या. कधी कधी सीसीडी वा तत्सम ब्रँडच्या नी या हॉटेलांमधल्या कॉफीच्या तुलनाही ऐकल्या. आपण यात कशातच बसणारे नाही हे जाणवत होतं. तरीही अनुभवण्याची इच्छा तर होतीच. आता ते अनुभवणंही संपलंय. आता काय राहिलंय. आज घरच्यांसोबत, भाऊंसोबत इथं कॉफी पितोय. कधी झालं असतं का असं... जर, तर वगैरे वगैरे.


बिलाचं ते चॉकलेटी पाकिट वेटरनं टेबलवर आणून ठेवलं की जागेवर आलो. पैसे त्यात ठेवले नी ते पुन्हा टेबलाच्या कडेला सारलं. डोक्यात विचार सुरूच होते. म्हटलं, आपलं आपण कधी सेलेब्रिटी होणारंय. असलं जगणं काय सेलेब्रेटींनीच जगायचं असतंय का. लोकं ते कॉफी विथ करन की काय करतात. आपली लोकं आपल्यासाठी सेलेब्रिटींपेक्षाही नक्कीच मोठी आहेत. आपल्या त्या टिनपाट विचारांमुळं त्यांचं सेलेब्रिटी स्टेटस का म्हणून कमी करायचं. कॉफी विथ करन मला तर काय बाबा माहिती नाही. तिथं कुठली कॉफी देतात, तेही काही माहिती नाही. माझ्यासाठी आजची कॉफी, कॉफी विथ फादर बनली ती वैशालीच्या कॉफीमुळं. कडवट घोटांपेक्षा थोड्याशा गोड, तळाला का होईना पण साखरेचा गोडवा देणारी ती कॉफी खरंच माझ्यासाठी स्पेशल ठरलीये.