मंगळवार, २५ जून, २०१९

बापमाणूस

       खरं तर त्यांच्याविषयी असं लिहिलेलं त्यांना आवडेल की नाही, याची काहीच कल्पना नाही. तरीही लिहितोय. लिहिण्याला कारण आहे ते अर्थातच त्यांचं मोठेपण. हे मोठेपण त्यांनी मिळवलेल्या पद वा प्रतिष्ठेत गुरफटून गेलेलं नाहीये. एक माणूस म्हणून असलेलं त्यांचं मोठेपण हे त्याचं कारण आहे. केवळ मलाच नाही, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकालाच त्यांचं हे मोठेपण नकळत त्यांच्या जवळ घेऊन जातं. आपल्याला त्यांचा माणूस बनवतं, एक वेगळी ओळखही देतं. ते म्हणजे आमचे पराग सर. पराग करंदीकर हे ते नाव. मला त्यांची ओळख झाली, ती मी रानडेत विद्यार्थी असताना. ते शहरीकरण वगैरे विषयावर आमच्याशी बोलायला वर्गात आले होते. तेव्हाही (म्हणजे तसं 'लोकसत्ता', नंतर 'सकाळ' नी मग मटामध्येही सोबत असणारा) प्रसाद पानसे माझ्या सोबत वर्गात होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला तसं थेट ओळखायचा काही संबंधही नव्हता. त्यावेळी सकाळमधून त्यांच्या नावासकट वाचायला मिळणारे विषय आणि प्रत्यक्षात त्यांनी त्या तासाला केलेली मांडणी आम्हाला सर्वांनाच त्यांच्याविषयीचे कुतुहल जागृत करणारी भासली होती. तासानंतर त्यांच्याशी वर्गाबाहेर मारलेल्या गप्पा नी त्यांचा चला भेटू हा निरोप आपुलकी वाढवणारा ठरला होता. त्यावेळी कल्पना नव्हती, की पुढे हेच नाव मला; पुण्याबाहेरून पुण्यात आलेल्या एकाला; पुण्यासारख्या शहरात स्वतःची वेगळी ओळख तयार करण्यासाठी संधी देणार होते म्हणून.


             पुढे लोकसत्तामधील इंटर्नशिप व विद्यार्थी बातमीदार म्हणूनचे काम संपल्यावर प्रत्यक्षात नोकरीची सुरुवात करताना आधी सकाळमध्ये अगदी अल्पकाळ व त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये जवळपास सहा वर्षांचा काळ हा खरं तर त्यांच्या सान्निध्यामध्येच गेला म्हणायला हरकत नाही. मला चांगलं आठवतंय ते महाराष्ट्र टाइम्सच्या मुलाखतीवेळी मी नको तेवढं खरं बोलून गेलो होतो. मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, की मी मटा वाचत नाही म्हणून. त्यात पुण्यातल्या बातम्यांचे प्रमाण इतर पेपरांच्या तुलनेत कमी असते म्हणून मी तो वाचत नाही, हे त्याचे कारणही दिले होते. मुख्य संपादक मुलाखत घ्यायला, तर निवासी संपादक म्हणून पराग सर ती मुलाखत ऐकायला समोर होते. मुलाखत संपल्यावर बाहेर भेटल्यावर त्यांनी मुलाखतीविषयी बोलताना मला लेका एवढंही खरं बोलायचं नसतंय रे,असा प्रेमळ निरोप दिला होता. त्यानंतरची सूत्रे हलवली ती त्यांनीच. मटामध्ये बातमीदार म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर त्या मुलाखतीतल्या प्रतापाचे परिणाम समजले होते. नी त्यावेळीच हे समजले होतं, की ही नोकरी मिळाली ती पराग सरांमुळेच. याविषयी नंतर एकदा बोलल्यावर, संधी मिळालीये, आता चांगलं काम करून दाखवा,’ इतकंच ते बोलले होते.

          जानेवारी, २०११ मध्ये पुणे मटा सुरू झाला, नी जून-जुलैमध्ये पंढरपूरची वारी आली. एकदा मीटिंगमध्ये वारीचं काय करायचं, याची चर्चा सुरू झाली. वारीला जायला कोणी इच्छुक आहे का, असा प्रश्न सरांनी विचारला. मी त्या मीटिंगमध्येच, मला वारीला जायचंय,” असं म्हटलं. बाकीच्यांनी थोडं काय जाणार, कसं जाणार वगैरे विचारून झाल्यावर मग सरांनी मीटिंग संपल्यावर भेटा बोराटे, असा निरोप दिला. पुन्हा भेटल्यावर नक्की जाणार ना, एवढंच सरांनी विचारलं. मी हो म्हणताच, ते त्यांची खूर्ची फिरवून डेस्कटॉपकडे वळले. पुढच्या काही मिनिटात एक पत्र टाइप करून, त्याची प्रिंट घेत सही करून ते मला दिलं. ते पत्र होतं आळंदी देवस्थान ट्रस्टसाठीचं. त्या पत्राची एक कॉपी अजून माझ्याकडे तशीच जपून ठेवलेली आहे. त्यावरची सरांची पल्लेदार सही अगदी बघतच राहावी इतकी सुंदर आहे. पत्र झाल्यावर त्यांनी एक फोन फिरवला. वारीला एक कार्यकर्ता पाठवतोय, सांभाळून घ्या, असा निरोप पलीकडे पोचला होता. एका नवख्या बातमीदारावर एका संपादकाने टाकलेला हा विश्वास होता. त्याचवेळी आपल्या माणसाची काळजी घेणारा सूरही त्यात होता. त्यांचं हे असं वागणं कायमच मला एक वेगळा आत्मविश्वास देत राहिलं. त्यानंतर बातमीदारीच्या निमित्ताने अनेकदा असे प्रसंग येत गेले, नी प्रत्येक वेळी त्यांचं हे वागणं तितकंच ठाम होत गेलं. विज्ञान नी शिक्षणविषयक बातमीदारीच्या आवडीमुळे मी त्यांच्यासाठी तसा लोणी- पेंडसेंचा माणूस ठरायचो. त्यावरून ते काही वेळा चिडवतातही. पण, त्या चिडवण्यामधूनही समोर येणारी त्यांची आत्मियता, त्यांचा विश्वास, बोलण्यामधली सकारात्मकता, वेळप्रसंगी पडणारे रट्टे माझ्यासारख्या अनेकांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी दिशा देत राहिले. आपल्या बातमीदारावर त्यांनी टाकलेला विश्वास, त्याला पाठबळ देण्यासाठी त्यांनी स्वतः टाकलेले शब्द हे केवळ संपादक म्हणूनच होते, असं कधीच वाटलं नाही.  

     

          दरम्यानच्या काळात पुण्यातलं घर झालं. नंतर लग्नही ठरलं. लग्नासाठीचा रजा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी सरांकडे गेलो. रिसेप्शनचं निमंत्रण दिलं. सरांनी बसवून घेतलं. लग्नाचं नियोजन विचारलं. माझ्याकडे हातात पुरते पैसे आहेत की नाहीत, याचा अंदाज घेतला. लेका लग्नात काय पाहिजे ते सांग, म्हणाले. मी आपलं रिसेप्शनला तुम्ही यायला हवंय, असं बोलून गेलो. सर म्हणाले, अरे तसं नाही योगेश. संकोच करू नकोस. पुण्यात घर चालवणं, नी तेही पत्रकाराने घर चालवणं किती अवघड असतंय ते आम्ही पाहिलंय. काही लागत असेल, कुठली वस्तू तुला लागणार असेल तर ती सांग. त्यात अजिबातही गैर वाटू देऊ नकोस. हे सांगताना त्यांनी घरात काय आहे- काय नाही, याची सगळी चौकशी केली. सगळं ठिकठाक आहे म्हटल्यावर मग रिसेप्शनला येतो म्हणाले. ते फक्त म्हणाले नाहीत, तर आलेसुद्धा. संध्याकाळच्या रिसेप्शनला नी तेही जवळपास निम्म्या-अर्ध्या टीमसह येणं पत्रकारितेमध्ये किती अवघड आहे, हे पत्रकारितेत असणाऱ्यांना चांगलंच माहितीये. आमच्या या संपादकाने आमच्यासाठी तेही केलंय.

           एकदा अगदी रात्री साडेअकराच्या सुमाराला हर्षला चहाची लहर आली. कुलदीप नी मी त्याच्या जोडीला होतो. निघता निघता हर्षने सरांना, चहाला येणार का सर, म्हणून विचारलं होतं. फर्ग्युसन रस्त्यावर आम्हा तिघांच्या सोबतीने त्यावेळी सर आले. केवळ आलेच नाही, तर पुढचा काही काळ ते आमच्यातलेच होऊन राहिले. अगदी निवांतपणे चहाचा आस्वादही घेतला. त्यांच्यावेळच्या पत्रकारितेतले अनेक किस्से नी आठवणी त्यांनी आमच्यासोबत त्यावेळी शेअर केल्या. अशा प्रसंगांविषयी एकदा त्यांना विचारलं तर सर म्हणाले, सगळे सोबत असण्यात जी मजा आहे, ती एकटं असण्यात नाही. मी एकटा मोठा झालो, तर मी मोठा झालोच नाही. माझ्यासोबतचे मोठे झाले, तर मलाही मोठं होण्यात मजा असेल. या सगळ्या गोष्टी कदाचित त्यासाठी महत्त्वाच्या आहेत, बाकी काही नाही. सरांशी जोडले गेलेले असे अनेक प्रसंग आता डोळ्यासमोर अगदी सहजच येऊन जातायेत. आणखी एक असाच प्रसंग होता तो मटामध्ये राजीनामा देण्याचा. आयुष्यात राजीनामा लिहिण्याचा प्रसंग तसा आत्तापर्यंत एकदाच आला होता. तो कसा लिहावा, याची कल्पना नसल्याने मी आपला जमेल तसा एक ड्राफ्ट सरांकडे पाठवला होता. सरांनी तो माझ्यासमोरच वाचायला घेतला. तो वाचल्यावर एक दुसरा ड्राफ्ट मला वाचा,” म्हणाले. राजीनाम्याचा ड्राफ्ट कसा असावा, याचा तो एक उत्तम नमुना होता. थोडक्यात अगदी राजीनाम्याचा ड्राफ्ट कसा असावा, हेही त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने आणि सकारात्मक कृतीतून मला सांगितलं होतं.

         सरांच्या केबिनकडे जाताना कधीच तसं दडपण जाणवत नाही. ते बातमीदार म्हणून काम करताना जाणवलं नव्हतं, नी नंतर प्राध्यापक झाल्यावरही कधी वाटलं नाही. केवळ मलाच नाही, तर सर्वांनाच त्यांनी ते जाणवू नये, अशाच पद्धतीने आम्हाला वागवलंय. आई- भाऊ, आप्पा- काकी, किरण- शिल्पा, मयूर- वृषाली, सोनाली नी मी या सर्वांची चौकशी ते करतात. कोण कुठे कसं राहतंय, काय चाल्लंय हे आत्मियतेने समजून घेतात. लेका घरच्यांना जप रे. आपण आपल्या घरच्यांना गृहित धरतो. तसं करू नका. हे सांगण्याचा मला अधिकार नाही, कारण मीही तेच केलंय. पण शक्यतो लवकर घरी जात जा,’’ असं सांगणारा हा माणूस. मला तुम्हाला आता सल्ला देण्याचा अधिकार नाही, पण वडिलधारा म्हणून सांगतोय, असं म्हणत काळजीपोटी मला, प्रसाद वा चिन्मयला अगदी घरच्यांसारखे सल्ले देणारे हे आमचे सर. दोन मित्रांमधला अबोला दूर करण्यासाठी दोघांना समोरासमोर घेऊन, "एवढे मोठे झालात की काय तुम्ही दोघं लगेच," असं विचारत दोघांनाही जागेवर आणणारे हे सर. मी प्राध्यापक झाल्यावर नवं घर घेतलं. त्यांचं घरी येणं अजून तसं राहिलंय.
पण ते आठवलं की पुन्हा, लेका योग्या तुझ्या घरी येणं राहिलंय रे. येऊन जातो एकदा. करूत प्लॅन, असं म्हणणारा माणूस हा तुमच्यासाठी फक्त तुमचा संपादकच कसा राहील ते सांगा. असे हे आमचे सर नी अनेकांचे लाडके मास्तर. 

             

          एखाद्या कार्यक्रमात हलकेच हळवा होणारा, डोळ्यांच्या कडा ओल्या झालेल्या असताना हलकेच त्या पुसणारा तो माणूस आहे. नी कधी तरी गरजेनुसार तितकीच कणखर भूमिका घेत ये ठोकून काढा रे त्यांना. सोडायचं नाही हं अजिबात. कोण आलं, तर मी बघतो काय ते,” असं सांगत आख्खं ऑफिस दणाणून टाकणारा तो एक बॉसही आहे. डिझायनरला बाजूला सारून तो पानही लावू शकतो, नी क्राईम रिपोर्टरला बाजूला करून क्राईमची बातमीही लिहू शकतो. म्हणूनच असा संपादक फक्त संपादक म्हणून नाही, तर माणूस म्हणूनही ग्रेट असतो. तो एक बापमाणूस असतो.  

          ता. क. खरं तर सरांविषयी लिहिलेली हे लेखन पोस्ट करण्यासाठी तसा मुहूर्त सापडत नव्हता. सर मुंबई मटाचे संपादक होत आहेत, हे समजल्याबरोबर तो मुहूर्त मिळाला. सरांना भेटायला जाताना प्रमोद सरवळे सोबत होता. सरांना भेटून निघताना सरांशी त्याची ओळख करून दिली. सर नेहमीप्रमाणेच त्याच्याशीही तितक्याच आत्मियतेने बोलले. घराकडे परतत असताना प्रमोद बोलून गेला, ‘’सर, ते किती डाऊन टू अर्थ आहेत. माझ्याशी कित्ती सहज बोलले....’’ त्याच्या या बोलण्यातलं अप्रूप हे मी ज्यावेळी त्यांच्याशी पहिल्यांदा भेटून समोरासमोर बोललो, तेव्हा मलाही होतं. सर का ग्रेट आहेत, याचं हे उत्तर आहे. ते एक ग्रेट माणूस आहेत, म्हणून.