सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

आठवणींची वली भेळ...

    थंडीचे दिवस आणि संध्याकाळची वेळ. अशा वेळेला घरात काही सटर-फटर खायला मिळतंय का याचा अंदाज घेतला. भेळ करता येतेय असं दिसलं. कांदा-टमाटं चिरलं. चिंच-गुळाचा आंबट-गोड कोळही सोबत घेतला. भेळेचा बेत आता जमून येणार हे साहाजिकचं जाणवलं. भेळ वली की सुकी, ह्याचा काय तो निर्णय लावायचा होता. त्यामुळं आधी असा निर्णय कधी घ्यावा लागायचा, हे साहजिकंच आठवलं. लहानपणी रविवारचा बाजार संपवून अरविंदमामा घराकडं येताना आपल्याला काय आणणार, ह्याचा विषय व्हायचा. मामा घरी आल्यावर, तो हात-पाय तोंड धुवेपर्यंतच त्याच्या बाजाराच्या पिशव्यातला वजनकाटा साईडला निघालेला असायचा. पेपरात साध्या पांढऱ्या दोऱ्यानं नीट गुंडाळलेले भेळेचे दोन-तीन पुडे त्याच पिशव्यांमधून हाती लागायचे. मामाचं हात-पाय-तोंड धुवून होईपर्यंत तर घरात त्या पुड्यांचा घमघमाट पसरलेला असायचा. त्यातली कोणती भेळ खायची, वली का सुकी ह्याचा जो काही निर्णय करावा लागायचा, तो बघा तेव्हा. हे आठवताना भेळेच्या या बेतासोबतच अशा आठवणीत रमायला होणारंय हेही जवळपास नक्की झालं होतं. संध्याकाळचं वातावरण, हवेतला गारवा एकीकडं, तर या आठवणींचा ओलावा दुसरीकडं.

मामाचं गाव फलटण, तर आमचं मूळ गाव माण तालुक्यातलं मलवडी. दोन्हीही जि. साताराच. वडिलांच्या नोकरीमुळं नी शिक्षणामुळं तिकडं खान्देशात भुसावळला वर्षभर राहणं असलं, तरी उन्हाळा नी दिवाळी शक्यतो मलवडी नी फलटणलाच. भुसावळचा उन्हाळा म्हणजे अगदी जीवाला घोर. अलिकडं सगळीकडंच तापमान पन्नाशी गाठायचं बघतंय. तिकडं भुसावळला ४५ वगैरे टेम्परेचर तसं मार्च-एप्रिलला ओपनिंगलाच असायचं. त्यामुळं तिकडच्या मंडळींना ह्या वाढत्या तापमानाचं तसं अप्रूप त्यावेळीही नसायचं नी आताही नसतंय. उन्हाळ्याची चाहूल लागली की तिकडं मरीमाता मंदिराजवळचा गोळेवाला आठवायचा. माव्याच्या रश्श्यात बुडवलेला बर्फाचा गोळा किंवा मग माव्याच्या रश्श्यातलंच शरबत ही त्याची स्पेशालिटी. स्टेशन रोड - गांधी रोडच्या परिसरातल्या मठ्ठ्याच्या गाड्यांचीही ओढ लागायची. ह्या दोन गोष्टींचा नाद करायचा, तर ऐन उन्हाच्या वेळी कॉलेजला जाता-येताना कधी तरी जामनेर रोड सोडून बाजाराच्या रस्त्यानं सायकली मरीमाता मंदिराकडं वळवाव्या लागायच्या. बुंदी घातलेला थोडासा आंबट-गोड मठ्ठा अगदी मनसोक्त पिणं व्हायचं ते तेव्हाच. दुपारी जमलं तर दुपारी, नाही तर मग संध्याकाळी बर्फाचा मावा गोळा खायला जाणं हे तर सुखंच असायचं. परीक्षांच्या हंगामाचा अंदाज घेत या दोन गोष्टींचे बेत व्हायचे. त्रास होऊ नये, परीक्षा बुडू नये, ऊन लागू नये, अशा साऱ्या गोष्टी जुळवून आणत असा बेत व्हायचा. त्यासाठी एका वेळेला पन्नास रुपयेही खूप व्हायचे. आता एवढ्यात काय येतंय म्हणा!  

परीक्षांचा हंगाम संपला की गावाकडं कधी एकदा निघतोय अशी ओढ लागलेली असायची. गाडीला बसलं की त्यावेळी दिवसभरात भुसावळ – जामनेर – सिल्लोड – औरंगाबाद – नगर – दौंड – बारामती असे टप्पे करत करत एसटीनं फलटण गाठता यायचं. रेल्वेचं रिझर्व्हेशन मिळालं, तर भुसावळहून निघून आठ-दहा तासानी निरेला उतरून, तिथून अर्ध्या तासात फलटणला जाणं व्हायचं. दरम्यानच्या काळात दिसायचे ते उन्हानं सोनेरी-पिवळसर झालेले माळरानाचे पट्टे. उन्हाची रखरख. चुकून कधी तरी एखाद-दुसऱ्या ठिकाणी दिसणारे पाणवठे, नाही तर सगळी नुसती रखरखंच. त्या तसल्या रखरखीत जर सुख मिळत होतं, तर ते तिखट-मीठ लावलेल्या काकड्यांमुळं. हिरव्या-पिवळ्या, साल काढलेल्या, सुरुवातीला तिखट-खारट आणि मध्येच पाणीदार लागणाऱ्या काकड्या खाता-खाता प्रवासाचा शीण कमी व्हायचा. अंतरं समजायची नाहीत. दोन स्टॉप असेच निघून जायचे. सुट्टीला निवांतपणा असल्यानं असल्या खाण्याचीही तिकडं चंगळ व्हायची. कधी नाना, तर कधी दादांमुळं मिळणारं गारेगार दुपारचा उन्हाचा त्रास कमी करायला मदत करायचे. वाठार फाट्यावरच्या वावरात लिंबाखाली, नाही तर तिकडं मलवडीला डोंगराच्या उतरणीला वावरातल्या पिंपरनीखाली अंग पसरून पडल्यानंतर रस्त्यानं लांबनंच ऐकू येणारा गारैSSS, गारैSSS”चा आवाज आणि सोबतची घंटा हे त्यासाठीचं खास निमंत्रण असायचं. त्या गारेगारवाल्याला लांबनंच हाक मारून थांबायला लावून, त्याच्याकडून गारेगार घेण्यासाठी नाना-दादा किंवा मामांकडनं पैसे घेऊन, तिकडं धावत जाऊन गारेगार घेऊन येण्यात वेगळीच मजा यायची. तिकडनं पुन्हा सावलीला येऊन निवांत बसेपर्यंत निम्मं गारेगार संपलेलं असायचं. उरलेलं गारेगार फस्त करून, दुपारचं ऊन सुसह्य व्हायची वाट पाहावी लागायची.  

मलवडीच्या स्टँडवरच्या कांदाभज्यांचीही तीच तऱ्हा. गावात गेल्यावर कुंभारांच्या हॉटेलमधला चहा आणि कांदाभजी खाणं ही तिथली त्या वेळची लक्झरी. गरमागरम आणि तितकीच कुरकुरीत कांदाभजी खाताना हॉटेलमध्ये होणाऱ्या गप्पा गावपणाची जाणीव करून देणाऱ्या असायच्या. तिथं अनश्या (अनुसया) आकाचा किंवा बाप्पूदादाचा नातू ही आपली आयडेंटीटी असायची. घरातल्या बाकीच्यांचं आता काय सुरू आहे, कोण कुठं आहे, कोण काय करतंय, कोण कधी येणारै अशा तिथल्या गप्पा त्या भज्यांना आणि चहाला आपलेपणाची चव देऊन जात. तिथल्या गप्पांच्या ह्या अशा आठवणी होतात. त्या अशा ओघाओघानेच चघळल्या जातात. ह्या असल्या भानगडींमुळं आपण जे खातोय त्याची चव लागतेच, पण ह्या आठवणींमुळं त्या चवीत खरा रंग भरला जातोय, हे जाणवतं. ही अशी आठवणींची वली भेळ खाल्ली नाही, तर मग काय खाल्लं महाराज?