शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११

बब्या...दि सायलेंट किलर!

बब्याला आम्ही ‘बब्या’ म्हणूनच ओळखायचो. त्याचं नाव वेगळचं होतं, पण आमच्या एका सरांनीच त्याचं नावं ‘बब्या’ ठेवलं, तेव्हापासून आम्हीही त्याला बब्याच म्हणायचो. बब्या...नाव जरासं गावंढळ ढंगाचं वाटत असलं, तरी त्यात एक वेगळाच जिव्हाळा वाटायचा. तसाच बब्याही होता. ‘तो होता,’ म्हणायचं कारण असं, की गेल्या काही दिवसांपासून, महिन्यांपासून म्हणा हवं तर, बब्यानं माझ्या वा आमच्यापैकी कोणाच्याच कॉल वा मेसेजला उत्तर दिलेलं नाही. सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून झालेत आजपर्यंत, पण अद्याप बब्याचा ठिकाणा आम्हाला समजलेला नाही. अर्थात बब्याचं असं वागणं आमच्यासाठी नवं असलं, तरी त्याच्या जुन्या मित्रांसाठी नवं नाही, हे विशेष. कारण यापुर्वीही तो असाच निघून गेला होता पुण्यातून, कोणालाही न सांगता. एक वर्षानंच परत आला होता. कदाचित यावेळीही तसंच असेल काहीसं. निदान मी तरी असाच विचार करतोय सध्या.

कॉलेजमध्ये एका असाईंमेंटचा भाग म्हणून मी त्याची मुलाखत घेतली होती. तसा तो माझा रूममेटच होता. त्यामुळे मला त्याच्याविषयीच्या बर्‍याच गोष्टी माहित होत्या. ज्या माहित नव्हत्या, त्या व्हाव्यात असाच त्या मुलाखतीत माझा प्रयत्न होता. बर्‍याच गोष्टी माहित झाल्या, काहीकाही अजूनही नाहीत. बब्या मुळचा लातूरकडचा. पत्रकारितेला ऍडमिशन घेण्याअगोदर त्याचं एम.ए. मराठी झालं होतं. त्यामुळे त्याचं शुद्धलेखनही माझ्यापेक्षा खूपच भारी होतं. माझं हस्ताक्षर मात्र त्याच्यापेक्षा चांगलं असल्याचं तो सांगायचा. कॉलेज लातूरकडेच पुर्ण करून तो पुण्यात आला होता. त्याची माझी पहिली भेट झाली ती ‘रानडे’मध्येच. त्या अगोदर आमचा परिचय असण्याचा संबंधच नव्हता. पण तो आमच्यापुर्वी दोन वर्ष पुण्यात होता, हे मला कालांतरानं समजलं होतं. सध्या जसा तो गायब झालाय, तसाच तो त्यावे़ळीही गायब झाला होता, हेही असंचं एकदा समजलं होतं.

रंगाने काळा, पण अगदीच कोळसा असं नव्हतं. चेहर्‍याला शोभणारी मिशी आणि पाणीदार डोळे. नेहमी अगदी साधे कपडे वापरायचा. अलिकडेच त्याला मी जिन्स पँट -टी-शर्टची सवय लावली होती. तेही शोभूनच दिसायचं त्याला. मुळातच नीटनेटका होता, त्यामुळं शक्यतो त्याच्याविषयी कधीच तक्रार नसायची. आमच्या वर्गातल्या एका मुलीनं त्याला चॉकलेट दिलं, त्यावेळी आम्ही त्याला जाम चिडवलं होतं. कधीतरीच लाजायचा. त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कमालीचा शांत स्वभाव! कमालीचा शांत म्हणजे इतका, की एकदा त्यानं सहजच एक साधी शिवी टाकली होती बोलता-बोलता, त्यावेळी आम्ही हा विषय कट्‌ट्यावरही चर्चेला घेतला होता. मी त्याच्यावर कधी खूप चिडचिड केली तरी हा पठ्ठा शांतच असायचा. त्याने आणखीनच चीडचीड व्हायची.

त्याच्या यच शांत स्वभावाचं कारण जाणून घ्यायचं होतं, म्हणून वर्गातल्या असाईंमेटसाठी म्हणून त्याची मुलाखत घेतली. मला थोडा वेगळा संशय होता. वाटायचं की काही प्रेमभंग वगैरे आहे की काय; पण निघालं भलतचं. तो लातूरचा. गावी शेती. ती ही कोरडवाहू. आई-वडिल शेतीच करायचे. अगोदर घर होतं. भूकंपामध्ये ते गेलं. त्या वेळपासून त्याच्या वडिलांचा स्वभाव खूपच शांत झाला होता. बब्याही तश्याच छायेत वाढला. त्यामुळे तोही तसाच झाला. त्यावेळी त्याने हे उत्तर दिलं, तसा मीच एकदम शांत झालो होतो. तसंच त्याला विचारलं होतं की तू मध्ये एकदमच गायब झाला होतास, ते का? त्याचं उत्तर मिळालं नव्हतं मला. तो नुसतं म्हणाला होता, कधीकधी परिस्थितीनुरूप वागावं लागतं....वगैरे वगैरे एकदम भारी उत्तर दिलं. मराठीचा विद्यार्थी होता, मनाला भावणारे शब्द हळूवार टाकायचा आपल्या पुढ्यात, की मग आपणचं शांत होणं आलं. त्यावेळीही तसंच झालं.

तो जेव्हा दिवाळीच्या सुट्टीला गावी गेला, तेव्हा आमच्या एका सिनिअरनं मला बजावलं होतं, ‘बघं यौग्या, बब्या लय खतरनाक आयटम आहे. गायब झाला की महिनोंमहिने गायब होतो. आधीच सगळे पत्ते-बित्ते घेऊन ठेव. घरनं परत आला तर मग त्याच्याकडचा चिवडा नक्की घे. लय भारी असतोय,’ त्यावेळी चेष्टाच वाटली होती. नंतर समजलं होतं की ते खरं होतं. त्यावेळी तसं झालं नव्हतं. नशीबानं आम्हाला सगळ्यांनाच त्याच्या घरच्या चिवड्याची टेस्टही चाखायला मिळाली होती. भारीच होता चिवडा. कांद्याच्या आख्ख्या खापा भाजून टाकलेल्या असायच्या त्यात. बाकी सगळ्ं साधंच होतं, तरीही टेस्टी होता. आता मात्र तसं नाही, अन सध्या त्या सिनिअरनं दिलेला सल्ला न ऐकल्याचा परिणाम भोगतोय. बब्याचा तपासच नाही. आमच्या कोणाकडेच त्याच्या मोबाईल नंबरशिवाय बाकी माहिती नाही. आमच्याच एका दोस्ताकडे त्याने त्याची सगळी कागदपत्रं ठेवली आहेत आणि थोडं सामानही; पण तीही इथंच आहेत.

कोणी कसं काय असं वागू शकतं याचंच नवल वाटतं. आजकालच्या जमान्यात आपली सर्टिफिकेटस हीच आपली कमाई असते असं मानलं जातं. आमच्या बब्याला त्याचं काही वाटत नाही. ज्या गोष्टींचं आम्हाला भलं मोठ्ठं टेन्शन्स असायचं, त्याचंही त्याला कधी काही वाटलं नव्हतं. अगदी आमच्या डिसर्टेशनच्या काळातही, काहीच तयारी न करता शेवटच्या दोन आठवड्यात त्यानं डिजर्टेशन संपवलं होतं. आम्ही दोन-दोन महिने कामं केली होती त्यासाठी. माझं लॅपटॉपचं काम झाल्यावर, मी झोपल्यावर तो लॅपटॉप वापरायचा. ऍडजस्टमेंटच्या बाबतीत गुरू होता तो. वेळ पडली तर कँपातून विद्यापीठामध्ये चालत येणे, कधी एकवेळचच जेवण वा नाष्टा करण, आम्ही पुस्तकं वाचत असलो तर आम्ही झोपल्यावर ती पुस्तक रात्री अगदी अडीच-तीन वाजेपर्यंत वाचणे असं करणारा बब्या मी पाह्यलाय.

ज्या दिवशी त्याचं ‘बब्या’ असं नामकरण झालं होतं, त्याचवेळी आमच्या सरांनी त्याला बजावलं होतं, ‘बब्या, बोलायचं भाऊ. तू बोलला नाहीस, तर तुला तुझ्या आईकडे पाठवील.तिकडे लातूरला पाठविन. बोलता आलं तर सगळं आहे...’ सर नेहमीच असं सांगायचे. आम्हालाही तसंच बोलायचे. आम्ही एंजॉय करायचो बरेचदा, पण बब्याचं समजलं नव्हतं आम्हाला. शिक्षण संपल्यावर आम्ही वेगळे राहायलो लागलो. नंतर संपर्क कमी झाला होता; पण निदान माहिती असायची. आता...काहीच माहिती नाही आणि कसलाच संपर्कही नाही. म्हणजे आम्ही संपर्क करायचा प्रयत्न करतोय; पण तिकडून उत्तरच नाही. कधीतरी उत्तर येईल किंवा थेट बब्याच समोर येईल अशी आशा आहे. ही पोस्ट टाकली की बब्यालाही एक मेसेज टाकणार आहे. बघू, वाचून काही कमेंट आली तर...

1 टिप्पणी: