मयुरला सोडायला एअरपोर्टवर जायचं होतं. तो यूएसला निघाला होता. तिकडे जाण्यासाठीची गाडी खाली येऊन थांबल्यावर, मी जाऊन गाडीमध्ये किती माणसं बसतील याचा अंदाज घेऊन आलो होतो. गाडीमध्ये ड्रायव्हरसह सहा जण बसू शकणार होते. ते बसायच्या आधी गाडीत त्याच्या दोन बॅगा टाकल्या आणि मग आम्ही सगळे गाडीत बसलो. तिसरी बॅग खालीच राहिली होती. ती मग गाडीमध्ये बसल्यावर मांडीवर घेऊन मयुर, आप्पा, काकी, मी, सोनाली, आत्या आणि ड्रायव्हर मुंबईकडे निघालो. गाडीने औंधसोडून हिंजवडीचा रस्ता पकडला. डांगे चौक ओलांडून गाडी एक्सप्रेस वे कडे सुसाट सुटली. दरम्यानच्या काळात ड्रायव्हरने गाडीमधला एफएम सुरू केला. पहिलंच गाणं लागलं- बडा नटखट है, किशन कन्हैया, क्या करे यशोदा मैया...
औंधला घरी चाकचाकी गाडी असली, तरी त्यातला एफएम आम्ही शक्यतो आप्पा नसतानाच लावायचो. आप्पा गाडीमध्ये सोबत असताना तो बंदच असायचा. पण या प्रसंगी गाडी दुसऱ्याची होती. ड्रायव्हरही तिसराच होता. आणि आम्ही एका वेगळ्याच वातावरणामध्ये मुंबईकडे निघालो होतो. त्यामुळे गाडीमध्ये आप्पा असले, तरी एफएमवर गाणी अगदी व्यवस्थित सुरू करण्याचा डाव ड्रायव्हरने साधला होता. एरवी मी शांत किंवा त्यातल्या त्यात अगदी थोडसंही उदास गाणं असेल, तर ते बदलवणाऱ्यांच्या गटातला. पण का कोण जाणे, त्या दिवशी मला ते गाणं ऐकू वाटलं. कारण गाण्याच्या पहिल्या ओळी नंतरच मी त्या गाण्यात सांगितलेल्या कृष्णासारखाचं नटखटपणा करणारा मयुर आणि त्याच्या त्या खट्याळपणाने हैराण झालेली, पण त्याच्यावर तितकीच माया करणारी यशोदा काकींच्या रुपात आठवत बसलो होतो म्हणून. त्या गाण्याचा रोख एका वेगळ्या परिस्थितीकडे नेणारा आहे, ही परिस्थिती तशी वेगळीच आहे, पण तरीही ते गाणं या वेळीही तितकंच लागू आहे, असं मला त्यावेळी वाटू लागलं.
एव्हाना, गाडीने हायवे गाठला होता. बाहेर रिमझिम पाऊसही सुरू झाला होता. सगळं अगदी हिरवंगार दिसत होतं. निसर्गाच्या कृपेनी त्या हिरवळीवर मध्येच एखाद्या डोंगरावरून-टेकडीवरून येणारा शुभ्र पाण्याचा धबधबाही ठळकपणे दिसत होता. आणि तितक्याच ठळकपणे मयुरविषयीच्या आठवणी माझ्या मनामध्ये उमटून येत होत्या. मयुरचं हसणं, त्यांच आम्हा सगळ्यांनाच चिडवणं, आम्ही तिघं, मी-किरण-मयुर असताना आमचं पर्सनल लेव्हलवरचं बोलणं, त्याचे शाळा-कॉलेजातले किस्से, त्याचं आणि आप्पांचं एक वडील-मुलगा या पलिकडचं असणारं नातं, चेष्टेने त्यांना छळणं आणि हे सगळं कायमचं ज्यांच्या समोर व्हायचं त्या काकींचं त्या विषयीचं मत. वेळ पडली तर कौतूक, नाहीतर मग अगदी त्याची होणारी शाळा.
तो तसा माझ्यापेक्षा चार वर्षांनी लहान. पण तो आणि किरण, कधीही ते माझ्यापेक्षा लहान आहेत या हिशेबानी माझ्यासमोर वावरलेच नाहीत. नावाला मी त्यांचा दादा आहे. मानही देतात, पण खरी दादागिरी चालते ती त्या दोघांचीच. म्हणा मलाही त्याचं कौतुकच आहे. माझ्यावर हक्कानी दादागिरी करण्याची तशी परवानगी मी आधीपासूनच या दोघांनाच दिलीये. त्यांनी ती माझ्याकडे कधी मागितली नाही तरी. त्याच दादागिरीच्या नात्याने त्याने माझं लग्न झाल्यावरही मला एक सज्जड दम भरलाय, सोनालीला त्रास दिलास तर बघ. असा दम देणारा एक मयुर, मलवडीला गेल्यावर रस्त्यानं पळायची शर्यत लावल्यानंतर अगदी सुसाट पळत सुटणारा, अन नंतर मागे मी पळालोच नाही, हे पाहून चिडणारा हाफचड्डीतला मयुर आठवला की हसायला येतं. आम्हा तिघांनाही नोकऱ्या लागल्यानंतर आता ही परिस्थिती राहिलीच नाही. आणि आता तर तो तिकडे निघालाय म्हटल्यावर तो परत आल्यानंतरच असलं काहीतरी अनुभवायला मिळणार.
माझ्या डोक्यात हे चक्र सुरूच होतं. पण काकींच काय, मी आणि तो तसं सुट्टीलाच भेटणारे, जमलं तर गावी एकत्र किंवा मग मी पुण्याला वा तो भुसावळला आलो, तरच होणारी भेट. मागच्या तीन वर्षापासून, मी पुण्यातच राहायला आल्यापासून नियमित भेटी झाल्या, तरी माझ्या मनात इतक्या आठवणी येत होत्या. काकींचं काय होत असणार, त्यांनीही ते गाणं इतकंच लक्ष देऊन ऐकलं का, त्यांच्याही मनात त्याच्या अशाच आठवणी दाटून आल्या का, नक्कीच आल्या असणार, असाच विचार त्यावेळी डोक्यात सुरू होता. त्यावेळी त्यांना ते दाखवता येत नसावं आणि तशी गरजही नव्हती. शेवटी आईची मायाच ती.
मध्यरात्रीच्या सुमाराला एअरपोर्टवर पोचलो. त्याला सोडायला आम्हाला त्या टर्मिनलच्या गेटपर्यंत जाता आलं. त्यानंतर पुढे जाणं शक्य नव्हतं. तिथेच थांबलो. त्याला बाय केलं. पुन्हा लक्षात आलं, की
आत जाता येतंय. तिकिट काढून लगबगीने सगळेच आत गेलो. तो वेटिंग रुमसारखा परिसर होता. मयुर पलिकडे दिसत होता. तो त्या चेकिंगच्या लाईनमधून पुढे जात होता. सामान देत होता. बॅगमधून काहीतरी हातात काढून घेऊन पुन्हा पुढे जात होता. मध्यरात्रीच्या सुमाराला आपण एअरपोर्टवर आहोत आणि आपल्याला पुण्याला परत जायचे आहे, हे कदाचित काकींना मध्येच आठवलं. मयुरकडे बघत-बघतच त्या मध्येच म्हणाल्या, आता काय, काचेच्या भींतीपलिकडे तो आहे. दिसतोय तोपर्यंत थांबू आणि मग निघू...मला पुन्हा त्याच गाण्याच्या ओळी आठवल्या- बडा नटखट है, किशन कन्हैया, क्या करे यशोदा मैया... त्यावेळीही अशीच अगतीकता असावी, तीच गाणं लिहिताना त्या गीतकारानं शब्दबद्ध केली असावी आणि त्यावेळी मी तीच अगतीकता त्या ठिकाणी अनुभवत होतो. शेवटी अगतीकताच ती. तिन्ही प्रसंग वेगळे, पण तिन्ही ठिकाणी त्या मागची भावना मात्र कायम एकच होती. प्रेमाची, त्याच प्रेमाखातर केलेल्या त्यागाची.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा