रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

एकटेपणाच्या अंतराळातून...



मी योगेश. कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा नवरा, कुणाचा मित्र, अजून कुणाचा कोण, तर कुणाचा कोण. पण मी स्वतः स्वतःचा कोण? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत. मी माझा कुणीच नाही... अजब वाटतं थोडं हे. आपल्याकडे कुणाचं कुणीच नसलं, तर त्याला एकटा वा एकटी असं म्हणतात. ही बाब आता स्वतःविषयी लागू केली, तर मी एकटा, असंच आपण म्हणू शकतो. उगाच कशाला सांगायचं मग, की मी अमक्याचा अमूक अन तमक्याचा तमूक. मी एकटा ही आपली स्वतःची स्वतःला पटणारी ओळख पुरी होत नसते का आपल्याला. नसावी. म्हणूनच तर कुणी कधी लवकर तसं सांगत नाही एखाद्याला, मी एकटाच म्हणून.

तरीही का कोण जाणे, एकटेपणाची जाणीव सगळ्यांनाच छळत असावी, असं मला नेहमीच वाटत आलंय. कदाचित, मी एकटा आहे असं मला वाटतं, असं आपल्यापैकी अनेकजण अनेकदा एकमेकांना सांगत असतो म्हणून ते असेल. त्या शब्दांपाठीमागे त्या-त्या स्थळ-काळाचं बंधन असतं. त्यानंतरच्या काळामध्ये आपण समाजामध्ये सामावलेलेच असतो. त्यावेळी अगोदरच्या एकटेपणाचा संदर्भ ध्यानी घेतला, तर समाजामध्ये असतानाही आपण अनेक एकट्यांमध्ये एकेकट्याने मिसळल्यासारखेच असतो. त्यावेळीही एकटेपणाची जाणीव आपल्यासोबतच असते, फक्त ती जाणवण्याचा अवकाश असतो. त्या-त्या वेळच्या समाजानुरुप, व्यक्तिनुरुप आपलं एकटेपण कमी अथवा जास्ती जाणवतं असावं.

एकटेपणाच्या बाबतीत ते जाणवणं महत्वाचं असलं, तरी एकटेपणाचंही एक स्पेशल अंतराळ असावं. त्या अंतराळामध्ये आपण शिरलो, की एकटेपणाची ती जाणीव प्रत्येकालाच होत असावी. मग तुम्ही घरात असा की कुठे गर्दीत असा, मित्रांमध्ये बसा की मग कुटुंबियांमध्ये गप्पा मारा. एकटेपणाच्या त्या अंतराळाचा तुमच्या मन नावाच्या अशाच कुठल्यातरी अंतराळाशी संयोग झाला, की मग एकटेपणाचे योग सुरू होत असावेत. चल अकेला, चल अकेला... किंवा मग दिवस असे की, कोणी माझा नाही…’ सारखी दोन चार गाणी सुचत असावीत, उगाचच सगळे सोबत असतानाही आपल्या सोबत कोणीच नसल्याचे भास होत असावेत. इ. इ.

अंतराळावरून आठवलं, आपली पृथ्वी अंतराळामध्ये एकटीच आहे. तो एकटेपणा घालवण्यासाठी आपण नव्या जीवसृष्टीचा शोध घेतोय. तो शोध कधी संपेल ते माहिती नाही. आता ही बाब खूप मोठ्या पातळीवर होती. तिच अतीसूक्ष्म पातळीवर आणायची म्हटली, की ती एखाद्या माणसासाठी आपण लागू करू शकतो. माणसंही आपला एकटेपणा घालवण्यासाठी असंच करतात. कोणी तरी दुसरं एकटं शोधतात, ज्याच्याशी त्यांचं थोडं जुळून येईल. आपल्या पृथ्वीच्या बाबतीत आपण दुसरा एखादा सजीव ग्रह शोधायच्या मागे लागलोय. माणसांच्या बाबतीत विचार केला, तर आपण त्या एकट्यासारखाच दुसरा वा दुसरी एकटी शोधतो. त्या दोघांना एकमेकांच्या एकटेपणाची जाणीव झाली तर ठिक. नाहीतर पुन्हा ते एकत्र असूनही एकटेच ठरतात. 
 
गम्मतचं आहे राव या एकटेपणाची. एकटेपणामध्ये आपण इतके एकटे असतो, याचा साक्षात्कार मला आजपर्यंत कधीही झाला नव्हता. आज झाला याला कारण झोप लागत नसल्याने आलेला एकटेपणा. आता तसं पाहिलं, तर मी एकटा नाहीये. भाऊ, बायको, अजून म्हणायंच, तर आमचं कुत्रं माझ्या सभोवतालच्या अंतराळामध्ये आहे. पण कदाचित वर म्हटलंय तसं माझ्या मनातल्या अंतराळात ते एकटेपणाचं अंतराळ गुरफटलं असावं कुठतरी. म्हणूनच ते जाणवलं.  
 
आपल्या या असल्या एकटेपणाचा माणूस नावाच्या, समाजप्रिय म्हणवल्या जाणाऱ्या प्राण्याला तिटकारा वाटत असावा. आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच समाजप्रिय प्राण्यांच्या गटात मोडणारा. त्यामुळे जरी प्रत्येकजण ती एकटेपणाची ओळख स्वतः सोबत कायमच घेऊन फिरत असला, तरी ती तशी ओळख कुणी सांगत नसावं. त्या ऐवजी आपण आपली थोडी सोपेस्टिकेटेड ओळख एकमेकांना दाखवत बसतो. आपलं स्टेटस वाढवणारी ओळख एकमेकांना करून देत असतो. अमक्याचा अमूक, तमक्याचा तमूक, त्यामुळे मग तुमचा अमूक-तमूक. या अमूक-तमूकच्या भानगडीत आपली खरी ओळख राहाते बाजूला, आणि त्यांना वेगळीच ओळख होते. पुढे हिच ओळख इतरांपर्यंतही पोचते. त्यातूनच मग पुन्हा दोन वेगवेगळ्या ओळख्यांच्या म्हणा किंवा आजकालच्या भाषेत सांगायचं तर आयडेंटिटी म्हणा, त्यात आपण अडकतो. या दोन आयडेंटिटीच्या दरम्यान पुन्हा एक अंतराळ आपल्याला सापडतं. त्यात राहाणं आपल्याला त्रासदायक वाटतं. तरीही त्या तसल्या आयडेंटिटीपेक्षा तेच बरं वाटत असावं. तेच असावं हे एकटेपणाचं अंतराळ.

२ टिप्पण्या:

  1. खूप सुंदर जमली आहे ही पोस्ट.

    आपली पृथ्वी अंतराळामध्ये एकटीच आहे. तो एकटेपणा घालवण्यासाठी आपण नव्या जीवसृष्टीचा शोध घेतोय...

    त्या दोघांना एकमेकांच्या एकटेपणाची जाणीव झाली तर ठिक. नाहीतर पुन्हा ते एकत्र असूनही एकटेच ठरतात...

    ही काही वाक्य खूपच लक्षात राहण्यासारखी आहेत. झोप लागत नाही तेव्हा ज्या पातळीवर आपण विचार करतो ते गांभीर्य जाणवतं या पोस्टवरून.

    उत्तर द्याहटवा