शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

सवाई अनुभूती


गेली दोन-तीन वर्षे मी एका गोष्टीची वाट पाहात होतो. यंदा सवाई महोत्सवाला जाण्याच्या निमित्ताने ती संधी मिळाली होती. शास्त्रीय संगीताच्या साम्राज्यामध्ये दिग्गज अनुभवण्याची ही संधी साधल्यानंतर घरी आल्याआल्या त्याविषयी वाटलेलं सगळं लिहिलं होतं. गेले काही दिवस लॅपटॉपमध्ये पडून असलेलं हे लिखाण आता इथं मांडतोय...

सवाई अनुभूती

गुरुवारी रात्री योगायोगाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला जायची संधी मिळाली. त्या दिवसापुरतं कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याचं रिपोर्टिंग करायचं होतं, म्हणून मी तिकडे गेलो होतो. नेहमीच्या कामाचाच एक भाग म्हणून हे जाणं झालं. योगायोग अशासाठी, की पुण्यात राहायला आल्यापासून यापूर्वी अनेकदा मी तिकडं जाऊन एखादीतरी मैफल ऐकायचा विचार केला होता आणि कोणत्या न कोणत्या कारणाने तो बारगळला होता. या वेळी मात्र तसं झालं नाही म्हणून हा योगायोग. सवाईला जाणं म्हणजे शास्त्रीय संगीताविषयी आवड असणाऱ्यांसाठी पर्वणीच. पण मला तिकडं जायचं होतं किंवा मी तिकडे गेलो, याचा अर्थ मला शास्त्रीय संगीतातलं खूप सारं कळतं असं नक्कीच नाही.

तिथून जाऊन आल्यावर बातमीपुरती माहिती दिल्यानंतर तसं माझं काम संपलं होतं. पण तरी डोकं शांत राहात नव्हतं. ऑफिसमध्ये आल्याआल्या आमच्या एका मित्राशी शास्त्रीय संगीत या विषयावर अगदी उडत उडत गप्पा झाल्या. त्याचा विचार असा, की तिथं गेल्यावर संगीताची पार्श्वभूमी नसलेल्यांना काही कळतं का, झेपतं का, आणि तसं होत नसेल तर तिथं जाऊन काही फायदा होतो का? त्यावर माझं मत होतं, की कळो न कळो, शेवटी शास्त्रीय संगीत ही एक कला आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण ज्याच्या-त्याच्या पद्धतीने कलेची अनुभूती घेत असतो. कला समजणं किंवा न समजणं ही बाब तशी त्या वेळी दुय्यम ठरते, कारण त्या अनुभूतीतून त्याला मिळणारा आनंद प्रत्येकवेळी महत्वाचा ठरत असतो... एवढं सांगून मी त्यावेळी थांबलो.  

ते विचारचक्र तसंच सुरू होतं... कदाचित कलांची निर्मितीच मनुष्याला आनंद देण्यासाठी झाली असावी. हा आनंद अधिकाधिक वाढवण्यासाठी त्या कलेचा शास्त्रोक्त अभ्यास केला जात असावा आणि त्यातून अधिकाधिक आनंदही मिळवला जात असावा. संगीतही त्यास अपवाद नसेल. पण एखादं लहान मूल जेव्हा त्याला न समजणारं संगीत, आपल्या भाषेत म्हणायचं तर गाणं, ऐकून डुलतं- नाचतं त्यावेळी त्याला ते गाणं समजतं म्हणून ते नाचतं-डुलतं असं नाही ना. त्याला आनंद मिळाला, नाचू वाटंल की ते नाचणार. त्याच्या दृष्टीने ते ऐकून नाचू वाटण्यासारखा मोठा आनंद त्या वेळी नसतो. तसं मोठ्यांचही होणारचं की. फरक एवढाच, की मोठ्यांना लहानांपेक्षा थोडी जास्त जाण असते. काय समजतं, काय समजतं नाही आणि काय न समजताही समजल्यासारखं दाखवावं याची.

अशाच काही विचारांमध्ये घरी येता येता मी परत सवाईच्या वातावरणामध्ये जाऊन बसलो होतो. मी गेलो त्यावेळी समीहन कशाळकर केदार राग सादर करत होते. त्याच रागाच्या सुरावटीने बांधलेली ऐसी का मनभावन चाली ही रचना त्यांनी सादर केली. त्यांनी गायलेल्या त्रीतालातील तरान्यानंतर त्यांचे वडिल ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर मंचावर विराजमान झाले. त्यांनी बिहागडा रागाने सुरुवात केली. त्यांनतर सोहनी नावाचा राग आणि मग आज जमुनाके तीर ही भैरवी सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. या दोघांना पंडित सुरेश तळवलकर यांनी तबल्यावर, तर डॉ. अरविंद थत्ते यांनी हार्मोनियमवर साथ दिली. दरम्यानच्या काळात मी सवाईचं रुप न्याहाळत होतो. त्यातून मला जाणवलेली एक बाब म्हणजे एवढे सारे लोक जे सवाईला येतात, ते फक्त या मोठ्या कलाकारांना ऐकायला किंवा बघायला येत नाही, तर ते त्यांना अनुभवायला इथं येतात.

कदाचित त्या वेळी तिथं उपस्थित प्रत्येकालाच पंडितजींचा प्रत्येक स्वर लोण्याचा गोळा जिभेवर ठेवल्यानंतर तो जसा हळूहळू विरघळावा, तसा भासत होता. तो तितक्याच सहजतेने त्यांच्यामधून येत होता आणि श्रोत्यांपर्यंतही तितक्याच सहजतेने पोहोचत होता. सूरांना तितक्याच प्रेमाने आपल्याकडे बोलावून ते तितक्याच सहजतेने आणि एखाद्या अधिकारवाण्या व्यक्तिच्या भूमिकेतून त्यांना परत पाठवत होते. त्यांच्या हातांच्या हालचाली म्हणजे त्यांचा प्रत्येक स्वर किती आणि कसा घोटून तयार झाला आहे, याचे प्रतिक वाटत होत्या. खर्जातल्या एखाद्या स्वरापासून थेट तार सप्तकातील एखाद्या सूरावर पोचताना त्यांनी आपल्या समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनातील भावनांच्या तारा छेडल्या नसतील तर नवलच.

रैन बिन कैसी कटेगी दैया म्हणत विरह असह्य झालेल्या एका प्रेयसीच्या मनातील भावनांचे द्वंद्व त्यांनी आपल्या सूरावटींमधून अगदी चपखल मांडले. ते मांडताना शब्दांना सूरांच्या जोडीने न्याय कसा द्यायचा, याचं प्रात्यक्षिकच जणू त्यांनी तिथं सादर केलं. शब्दांमध्ये जादू असते, पण त्याला सूरांची जोड मिळाल्यास ही जादू काय साध्य करू शकते तेच त्या रचनेमधून त्यावेळी दिसत होतं. सूरांना सूरांच्याच भाषेत विचारलेल्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे समजल्यानंतर उपस्थित श्रोत्यांमधून वाहवा मिळाली नसती तर नवलच होते. दोघांनी एकत्र सादरीकरण करायला सुरूवात केल्यानंतर उल्हासजींच्या सादरीकरणातील मुरब्बीपणा आणि सहजता स्पष्टपणे जाणवत होती. त्याचवेळी आपणही कुठे कमी नाही हे दाखवताना समीहनने आपल्या वडिलांसोबत केलेले कोऑर्डिनेशनही वाखाणण्याजोगं होतं. शेवटच्या पाच-दहा मिनिटांमध्ये सादर केलेल्या भैरवीत आपल्या सूरांमधल्या प्रवाहीपणाच्या आधारावर त्यांनी उपस्थितांना यमुनेच्या काठावर नेऊन बसवलं होतं.

संगीत समजणं किंवा त्यातले बारकावे कळणं यापेक्षा त्यातून आनंद घेता येणं मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळेच मग काही समजत असेल, त्याची जाण असेल किंवा अगदी काहीही समजत नसेल तरी अशा मैफलांना जाणं हे आनंददायीच ठरेल. एक प्रोटोकॉल असल्यासारखं वा शायनिंग मारायला तिकडं जाण्यापेक्षाही शास्त्रीय संगीतातूनही आनंद कसा मिळतो ते अनुभवायला जाणं महत्वाचं आहे. शेवटी ती एक कला आहे. आणि कलेचा आनंद जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने घेतच असतो. कुणाला वाटलं तर फक्त तो समेवरच त्याच्या पद्धतीने दाद देईल किंवा मग एखादा ऑफबिट उचलला पण तरीही ऑफबिट न झालेला सूर समजून घेत नुसतंच मान डोलावेल. आपण यातलं काही नाही केलं तरी संगीत आपल्याला त्याच्या पद्धतीने नक्कीच आनंद देईल. अवकाश आहे ती सवाई अनुभूती अनुभवण्याचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा