रविवार, ३० जुलै, २०१७

कॉफी विथ फादर...

साधारण वर्ष-दीडवर्षापूर्वी हे लिहून ठेवलं होतं. ब्लॉगवर पोस्ट करायचं राहूनच जात होतं. त्यावेळचे काही संदर्भ आता थोडे फार बदललेत. पुण्यातल्या पत्रकारितेच्या, फर्ग्युसन कॉलेज रोडच्या, रानडेच्या सोबतीनं असणारं कामाचं स्वरूप मात्र अजूनही तसंच आहे. त्यामुळेच कदाचित असेल, पण अजूनही हे लिहिलेलं तितकंच आवडतंय. म्हणून शेअर करतोय.

कॉफी विथ फादर...
ऑफिस फर्ग्युसन कॉलेज रोडवर असल्यानं वैशाली-रुपाली-आम्रपाली हॉटेलं तशी खूप जवळची. रानडेचा पत्ता शोधतानाच मुळी पहिल्यांदा रुपालीची ओळख झाली. वैशाली त्या ओघानेच समजलं. आम्रपालीचा तपास तसा काहीसा उशीराने लागला. हॉटेलं माहिती झाली, तरी स्वतःहून त्यात आत शिरायचं डेरिंग अगदी अलिकडच्याच काळात केलं. नाहीतर आम्ही आपलं त्रिवेणी वा रानडेच्या कँटिनमध्येच पडिक राहणाऱ्यातले. हल्ली मित्र-मैत्रिणींसोबत वैशालीची कॉफी, कधी तरी डोसा इथपर्यंत मजल गेलीये. मित्र मैत्रिणींसोबतच्या या कट्ट्यांवर तसे घरातल्यांसोबत कधी जाणे झाले नव्हते. आजचा दिवस, आजची ती कॉफी त्यामुळेच खास बनली. कॉफी विथ फादर म्हणून.

एकूणातच हॉटेलिंग हा प्रकार आमच्या घरासाठी तसा जवळपास निषिद्धच. भुसावळमध्ये असताना फारसं कधी हॉटेलमध्ये गेल्याचं आठवत नाही. जास्तच वाटलं, तर कधी तरी संगमची पावभाजी. मी पुण्यात आल्यानंतर घरचं खायला मिळत नसल्यानं, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपोआपच हॉटेलिंग सुरू झालं. दुधाची तहान ताकावर नी घरच्या जेवणाची भूक हॉटेलांवर भागवणं सुरू झालं. सुरुवातीला अप्रूप वाटायचं. नंतर ते वाटेनासं झालं. तसंच सुरुवातीला वैशाली- रुपालीत शिरणंही अप्रूप वाटायचं. आता तेही बंद झालंय. आज भाऊंना, माझ्या वडिलांना वैशालीत घेऊन जाताना थोडं टेन्शन आलं होतं. विनाकारणचा खर्च टाळणे, पण आवश्यक त्या गोष्टीवर आणि आवश्यक तेवढा खर्च नक्कीच करणे, हे त्यांचं साध सूत्र आहे. त्यानुसार त्यांचे सगळे व्यवहार चालतात. वैशालीमध्ये हे सहजचं जाणं यातल्या कुठल्याच सूत्रात बसत नसेल. त्यामुळे ते टेन्शन असेल कदाचित. पण आज ते टेन्शन बाजूला सारलं नी गेलो त्यांना घेऊन आत. योगायोगानं आत टेबल मोकळं सापडलं. जाऊन निवांत बसलो. दोन कॉफी सांगितल्या.


ते परत भुसावळला निघाले होते. गाडीला वेळ होता, म्हणून माझ्या ऑफिसकडे आले होते. सोबत दोन बॅगा होत्या. बॅगा म्हणजे एक पिशवी आणि एक बॅग. पिशवी म्हणजे आपली बाजाराला नेतात तशी दोन बंदांची पिशवी. संध्याकाळी बातम्यांचा ओघ सुरू होण्यापूर्वीचा मोजका वेळ होती असल्यानं मी आपलं बाकी कुठे जात बसण्यापेक्षा वैशालीचा पर्याय निवडला होता. आत जाता जाताच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. वेटरने येऊन टेबलखाली ठेवलेल्या दोन बॅगा थोड्या आत, टेबलखाली सरकवायचा प्रयत्न केला. आम्ही दोघांनीही त्या बॅगा एकेकाने एकेक करत आपापल्या बाजूला ठेवल्या. तोपर्यंत कॉफी आली. कॉफी पिणं सुरू होतं. मला वैशालीच्या कॉफीची चव काहीशी कडवट वाटते. त्यामुळे मी एरवीच त्यात भरपूर साखर घालून पितो. आज कॉफी सांगतानाच ती गोड करून आणायला सांगितली होती. त्यानुसार वेटरने कपात साखर घालून, त्यावर कॉफी ओतली असावी. कॉफी संपता संपता भाऊंना तळाशी असणारी ती साखर दिसली. कपात साखर तशीच आहे म्हणाले. मी म्हणालो, अहो इथली कॉफी खूप कडू असते म्हणून मी गोड करून आणायला सांगितली होती त्याला. तेही काही बोलले नाहीत.

कॉफी संपत आली होती. त्यांच्याशी गप्पा मारता मारताच विचार सुरू झाले होते. आजपर्यंत कधी असं घरच्यांसोबत या हॉटेलात येऊन बसलेलो नाही. आजूबाजूचं जग या हॉटेलांच्या किश्श्यांमध्ये रमतंय, आपल्याला मात्र त्या हॉटेलांची गोडी कधी लागत नाही.... गोडी लागणं म्हणण्यापेक्षाही इथं येणाऱ्यांपैकी अनेकांसाठीच्या त्या स्टेटस सिम्बॉलच्या भानगडीत अडकणं जमेनासं होतं. सुरुवातीला एक प्रकारची अस्वस्थता जाणवायची या हॉटेलांविषयी. रानडेत असतानाच, एका मित्रासोबत या हॉटेलातून जेवायचा प्रसंग आला होता. परत तशी वेळ येऊच नये, याची पुरेपूर काळजी घेत मेसच लावून टाकली. कॉफीच्या घोटांसोबतच्या बिझनेस डिल्स कोणाकोणाकडून ऐकायला मिळाल्या होत्या. कधी कधी सीसीडी वा तत्सम ब्रँडच्या नी या हॉटेलांमधल्या कॉफीच्या तुलनाही ऐकल्या. आपण यात कशातच बसणारे नाही हे जाणवत होतं. तरीही अनुभवण्याची इच्छा तर होतीच. आता ते अनुभवणंही संपलंय. आता काय राहिलंय. आज घरच्यांसोबत, भाऊंसोबत इथं कॉफी पितोय. कधी झालं असतं का असं... जर, तर वगैरे वगैरे.


बिलाचं ते चॉकलेटी पाकिट वेटरनं टेबलवर आणून ठेवलं की जागेवर आलो. पैसे त्यात ठेवले नी ते पुन्हा टेबलाच्या कडेला सारलं. डोक्यात विचार सुरूच होते. म्हटलं, आपलं आपण कधी सेलेब्रिटी होणारंय. असलं जगणं काय सेलेब्रेटींनीच जगायचं असतंय का. लोकं ते कॉफी विथ करन की काय करतात. आपली लोकं आपल्यासाठी सेलेब्रिटींपेक्षाही नक्कीच मोठी आहेत. आपल्या त्या टिनपाट विचारांमुळं त्यांचं सेलेब्रिटी स्टेटस का म्हणून कमी करायचं. कॉफी विथ करन मला तर काय बाबा माहिती नाही. तिथं कुठली कॉफी देतात, तेही काही माहिती नाही. माझ्यासाठी आजची कॉफी, कॉफी विथ फादर बनली ती वैशालीच्या कॉफीमुळं. कडवट घोटांपेक्षा थोड्याशा गोड, तळाला का होईना पण साखरेचा गोडवा देणारी ती कॉफी खरंच माझ्यासाठी स्पेशल ठरलीये. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा