खरं तर खूप दिवसांनी ब्लॉगसाठी लिहायला बसलोय. जोपर्यंत मनापासून वाटणार नाही,
तोपर्यंत ब्लॉगसाठी काहीच लिहायचं नाही, हे तत्त्व पाळतोय. त्यामुळंच कदाचित
ब्लॉगवर लिहिलेलं नंतर परत कधीही वाचताना माझं मलाच आवडतं. इतरांना आवडतंय की नाही,
ते माहिती नाही. ते माहिती नसलेलंच उत्तम असतंय. फक्त स्वतःला आवडतंय तर लिहायचं,
इतकंच. आज लिहू वाटलं याला कारण आज ऐकलेलं एक लेक्चर. गिरीश कुबेरांचं लेक्चर. त्या
लेक्चरचा विषय- पत्रकारिता. जागा- पुण्यातलं रानडे इन्स्टिट्यूट, अर्थात
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचा परिसर.
वर्ग- तोच जिथं कुबेर सर पत्रकारिता शिकले, जिथं जवळपास पंचविसेक वर्षांनी आम्ही
शिकलो, नी नंतर जवळपास दहा वर्षांनी आता मी तेच शिकवायचा प्रयत्नही करतोय. तसे ते ‘लोकसत्ते’च्या
अग्रलेखातून भेटतच असतात. आज ते पत्रकारितेच्या विभागातील विद्यार्थ्यांसमोर काय
बोलतायेत, हे ऐकण्याची उत्सुकता होती. ‘पत्रकारिता’ हा तसा जिव्हाळ्याचाच विषय घेऊन ते बोलणार आहेत, म्हटल्यावर ही उत्सुकता
आणखीच वाढली होती. त्यांचं ते लेक्चर, लेक्चरदरम्यान त्यांनी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांसमोर-
म्हटलं तर उद्याच्या पत्रकारांसमोर- अनेक मुद्द्यांवर मांडलेली परखड मात्र तितकीच
तर्कनिष्ठ भूमिका, नी महत्त्वाचं म्हणजे पत्रकारितेविषयी सकारात्मक मांडणी करत, पत्रकारितेतील
वस्तुस्थितीची सर्वांनाच एक जबाबदार संपादक म्हणून करून दिलेली ओळख खूपच भावली. हे
महत्त्वाचं यासाठी, की पत्रकारिता या क्षेत्राविषयी सध्या चांगलं असं काही ऐकायला
मिळणं, हे काहीसं अवघड झालंय. नी कदाचित त्याचमुळे असेल कदाचित, हा विषय
ब्लॉगसाठीही लिहू वाटतोय.
त्यांच्या व्याख्यानाची सुरुवात झाली ती वर्गात उपस्थित सर्वांच्याच
जिव्हाळ्याच्या रानडे इन्स्टिट्यूटपासून. त्यांच्या इन्स्टिट्यूटविषयीच्या त्या
आठवणी त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर तो त्यांच्यासाठीचा ‘एक्सायटिंग एक्सपिरीअन्स’ होता. ते पत्रकारितेकडे ‘बाय चॉईस’ वळाले होते. १९८४-८५ च्या त्या काळामध्ये चंदिगड, चेन्नई व पुणे अशा तीन
ठिकाणच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे पर्याय त्यांच्यासमोर होते. त्यातून ‘रानडे’मधील प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत त्यांचा या अभ्यासक्रमाला
प्रवेश निश्चित झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. दिल्ली दौरा, इंटर्नशिपदरम्यानचा
कामाचा अनुभव हे मुद्दे ओघाने आलेच. त्याजोडीने उल्लेख आला तो ज्येष्ठ संपादक गोविंदराव
तळवलकरांचा. ते म्हणाले, ‘आय वॉज इन लव्ह विथ द पर्सन नेम्ड
तळवलकर...’. त्या प्रेमात मुंबईला ‘मटा’मध्ये काम करताना इंटर्नशिप संपल्यानंतरही ती सुरूच ठेवण्याचा प्रकार
केल्याचं त्यांनी नमूद केलं. तत्कालिन विभागप्रमुख परांजपे सरांनी पुण्याला परत बोलवून
घेतल्यावर, नी तळवलकर सरांनीही अभ्यासक्रम पूर्ण करून मग नोकरीसाठी येण्याविषयी
सांगितल्यावर पुन्हा अभ्यासक्रमाकडे वळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. या आठवणी
सांगताना तळवलकरांविषयीची त्यांची आत्मियता, त्यांच्याविषयीचा आदर नी एकूणात
पत्रकारितेविषयीची त्यांची आस्था हे सगळंच सहज जाणवून गेलं. या आठवणींच्या मदतीने
त्यांनी पहिल्या काही मिनिटांमध्येच समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना आपलंसं केलं
होतं. इतकं, की त्यानंतर पुढचे जवळपास तीन तास वर्गातले विद्यार्थी जागचे हलले
नव्हते. एखाद- दुसऱ्याचा अपवाद वगळता सगळेच कुबेर सर पत्रकारितेविषयी काय
बोलतायेत, हेच ऐकत होते. जेवणाची वेळ टळून गेली आहे, हेही प्रश्नोत्तरांच्या
ओघामध्ये सगळेच विसरले होते. कदाचित आम्ही सर्वच त्यावेळी कुबेर सरांच्या भाषेतला ‘क्लासिकल जर्नलिझम’चा मास्टर क्लास अनुभवत होतो,
म्हणून असेल कदाचित, पण हे घडून गेलं.
त्यांचं ते लेक्चर म्हणजे पत्रकारितेविषयीची थिअरी, सध्याची प्रॅक्टिकल्स नी
त्यातून चांगल्या पत्रकारितेकडे जाण्यासाठीचा मार्ग यांचं एक सुंदर विवेचन होतं.
सत्तेकडे जाण्याचा शॉर्टकट म्हणून पत्रकारितेकडं पाहिलं जातंय, इतर काही जमत नसल्यानं
पर्याय म्हणून पत्रकार होण्याचा मार्ग निवडला जातोय, या बाबी पत्रकारितेच्या
भवितव्याच्या दृष्टिने गंभीर असल्याचं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. लोकांना चांगलं
नी दर्जेदार वाचायला लावणं, त्यासाठी पत्रकारांनी ‘अज्ञानात सुख’ ही भावना न बाळगता काम करत
राहणं महत्त्वाचं आहे. निःपक्ष वा तटस्थ पत्रकारिता
हे थोतांड असून, पत्रकारिता ही भूमिका घेऊनच करायला हवी, असं त्यांनी स्पष्टच
केलं. ‘गिव्हिंग इक्वल स्पेस फॉर द अदर साईड अॅजवेल’ ही न्युट्रॅलिटीची व्याख्या त्यांनी त्या निमित्तानं सांगितली. ‘मटा’मध्ये सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये दि. वि.
गोखले या ज्येष्ठ सहकाऱ्याने दिलेला सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अनुभव
म्हणून मांडला. ‘या व्यवसायामध्ये टिकायचं असेल, तर ज्या
दिशेने वारा वाहतोय, त्याच्या विरुद्ध दिशेने बघायची सवय ठेव,’ हा तो सल्ला आजच्या काळातही भूमिका घेण्याच्या दृष्टीने तितकाच उपयुक्त
ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं. पत्रकारितेकडे वळताना बौद्धिक क्षमता घेऊनच यावं
लागेल, ‘मास्टर ऑफ वन ऑर टू’ व्हावंच
लागेल, हे सांगताना त्यांनी आता केवळ नी केवळ बातमीदारांची गरज उरलेलीच नसल्याचंही
स्पष्ट केलं. “तुम्हाला केवळ बातमी देऊन भागणार नाही. बातमी
सध्या ऑटोपायलट मोडवरच आहे. त्यासाठी बातमीदाराने काम करायची गरज नाही.
बातमीदाराने काम नाही केले, तरी बातमी या ऑटोपायलट मोडमुळे वाचकांपर्यंत थेट जाऊन
पोहोचते. त्या बातमीच्या पलिकडे जाण्यासाठी आता त्या ‘फाईव्ह
डब्ल्यू नी वन एच’च्या पुढे जावं लागेल. त्यात आणखी दोन नवे ‘डब्ल्यू’ अॅड करावे लागतील. ‘व्हाय
नाऊ?’ आणि ‘व्हॉट नेक्स्ट?’ हे दोन डब्ल्यू वाचकांना नेमकेपणाने हव्या असलेल्या बाबींपर्यंत आपल्याला
घेऊन जाऊ शकतात. या प्रश्नांना भिडायला सुरुवात करा,” असं
आवाहनच त्यांनी उपस्थित सर्वांना केलं.
भूमिका घेताना विचारधारा, वैचारिक बांधिलकी आणि वैचारिकता या बाबींमधील कोणती
गोष्ट कशी निवडायची याचीही कुबेर यांनी आपल्या विवेचनामधून पुरेशी स्पष्टता केली. विचारधारा
नावाच्या थोतांडासोबतची वैचारिक बांधिलकी ही पत्रकारितेची खरा शत्रू आहे.
पत्रकारांची बांधिलकी ही विचारधारेशी नव्हे, तर ती वैचारिकतेशी असायला हवी.
पत्रकारांनी लोकानुनय करता कामा नये. जनमताच्या आभासाविषयी प्रश्न विचारत, प्रसंगी
स्वतःच्या भूमिकांबाबत स्वतःला प्रश्न विचारत त्यांची उत्तरे पत्रकारितेच्या
माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘गप्प बसा संस्कृती’चे
पाईक न होता, प्रश्न विचारण्याचे आपले मूळ काम सुरूच ठेवण्याची गरज त्यांनी
अधोरेखित केली. पत्रकारितेला चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. हा स्तंभ जनतेचे
प्रतिनिधीत्त्व करतो. त्यामुळेच अगदी संसदेमध्येही अध्यक्षांच्या आगमनानंतर
ज्यावेळी सभागृहामध्ये उपस्थित सर्व उभे राहतात, त्यावेळी चौथ्थ्या स्तंभाचे
प्रतिनिधी हे आपापल्या जागी बसूनच असतात. ते ज्या जनतेचे प्रतिनिधीत्त्व करतात ती
जनता त्यावेळी कशी उभी राहणार, म्हणून ही बसण्याची कृती घडत असते. इतर तिनही स्तंभ
समोर दिसत असताना, हा चौथा स्तंभ तसा अदृश्यच असतो. हेच या स्तंभाचं वैशिष्ट नी
वेगळेपणही आहे. हा स्तंभ अदृश्य असूनही स्वतःच्या कार्याची जाणीव करून देत राहतो,
अशी स्पष्टताही त्यांनी केली. माध्यमांनी वेगवेगळ्या धारणा मांडण्याची गरज असते.
मात्र आजच्या समाजमाध्यमांच्या काळामध्ये वैयक्तिक धारणाच बळकट होऊ लागल्या आहेत.
समाजमाध्यमे केवळ त्यासाठीच गरजेच्या अशा गोष्टी दाखवू लागली आहेत. अशा
परिस्थितीमध्ये भावनेच्या पलिकडे जाऊन, तत्त्वाधिष्ठित भूमिका घेत, बुद्धी व अर्थकारणाशी
निगडित असलेल्या नानाविध मुद्द्यांचा विचार पत्रकारांनी, पत्रकारितेच्या
विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी आपल्या मांडणीच्या शेवटच्या
टप्प्यामध्ये स्पष्ट केलं.
या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी खरं तर अनेकदा पाश्चिमात्य माध्यमांची,
त्यांच्या कामांची उदाहरणे दिली. अखेरच्या टप्प्यात त्यांनी “आय अॅम ओपन टू एनी क्वेश्चन” म्हणत विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची खुलेपणाने, मनमोकळी आणि
विस्तृतपणे भूमिका मांडत उत्तरे दिली. अग्रलेखातील आपल्या भूमिकेमध्ये काही तरी
गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर अग्रलेख मागे घेण्यामागेही पाश्चिमात्य देशांमधील
वृत्तपत्रांच्या कार्याची प्रेरणाच असल्याची आठवणही त्यांनी एका प्रश्नाच्या
निमित्ताने सांगितली. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा बाबी होत असताना, तेथील समाजही
त्याविषयी तितक्याच मोकळेपणाने नी खुलेपणाने चर्चा करतो. पाश्चिमात्य देशांमध्ये
पत्रकारितेमधून काही तरी वेगळं देण्यासाठीची गुंतवणूक करण्याची एक संस्कृती रुजलेली
आहे. आपल्याकडे तसे होत नसल्याची खंतही त्यांनी मांडली. पत्रकारितेमध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’सारख्या मोठ्या समुहासोबत काम
करताना आलेला अनुभव हा एक प्रकारची मस्ती, इंग्रजीमध्ये सांगायचं तर पत्रकारितेची 'किक' बसवणारा ठरल्याचं त्यांनी सांगितलं. चांगल्या नी अभ्यासू लोकांची या क्षेत्रात
गरज आहे असं सांगत तुम्ही सर्वांनीच पत्रकारितेत आलेलं मला नक्की आवडेल, असं अगदी
शेवटाला सांगायलाही ते विसरले नाहीत.
कार्यक्रम
आटोपला, विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन्सही केले. दरम्यानच्या काळात
त्यांनी उदाहरणादाखल नमूद केलेले न्यूयॉर्करमधील लेख मी डाऊनलोड करून घेतले, वाचायचेत
आता. गंमत म्हणून घरी आल्यावर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर नजर टाकली.
फोटोसेशन्समधली छायाचित्रं आता स्टेटसवर पोहोचली होती. कुबेर सरांचं ते “वॉज इन लव्ह विथ...” वालं वाक्य डोक्यात घोळत होतंच.
‘लव्ह इन द एअर’च्या लाईनवर आपसूकच
त्यातल्याच एका स्टेटसवर माझा प्रश्न रिप्लाय म्हणून गेला होता, “सो जर्नलिझम इन द एअर नाऊ?” दोन दिलखुलास स्माइली नी
दोन जोडलेले हात रिप्लाय म्हणून आले होते. जर्नलिझम इन द एअर नाऊ आफ्टर द क्लासिकल
जर्नलिझम मास्टर क्लास.
सांराशातून कुबेर सरांचं व्याख्यान पोहोचलं. यामध्ये सरांची “निःपक्ष वा तटस्थ पत्रकारिता हे थोतांड असून, पत्रकारिता ही भूमिका घेऊनच करायला हवी,” ही त्यांची भुमिका माझ्या वैयक्तिक भुमिकेशी तंतोतंत जुळणारी आहे. त्यामुळं तुमच्या ब्लाॅगमुळं सरांच महत्वपूर्ण मत जाणून घेता आलं.
उत्तर द्याहटवाछानच सर ...
उत्तर द्याहटवाभारतासारख्या विकसनशील देशांना वास्तव मांडण्याऱ्या पत्रकारीतेची गरज आहे. जसे घडले आहे तसेच लिहने/प्रसारीत करणे.
उत्तर द्याहटवाव्हाय नाऊ? आणि व्हॉट नेक्स्ट? अप्रतिम. आणि विचार करायला लावणारं.
उत्तर द्याहटवासर मी सुद्धा पत्रकारितेचा विद्यार्थी आहे पण आज तुमच्यामुळे रानडे आणि कुबेर दोन्ही अनुभवायला मिळाले.धन्यवाद सर.
व्याख्यानाचा सारांश अप्रतिम रुपात मांडला सर आपण.
उत्तर द्याहटवा