गुरुवार, ३१ मे, २०१२

रक्ताचं नातं...


हॉस्पिटलमध्ये बसलोय. दादा ऍडमिट आहेत, म्हणून सध्या इकडची चक्कर सुरू आहे. दादा म्हणजे माझे आजोबा. वय झालंय त्यांच. जरा चक्कर येतेय, अशी तक्रार सुरू झाल्याने त्यांना पुन्हा एकदा ऍडमिट करावं लागलं इथं. त्या सोबतच आमचा इथला मुक्कामही आलाच. मागच्या वेळी त्यांना दोन रात्री आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. त्यावेळीही आम्ही आयसीयूच्या बाहेर असेच थांबलो होतो. या वेळी निदान हे बरं की त्यांच्या जवळ थांबलोय. आताही त्यांना रक्ताची एक पिशवी लावलीये. रक्ताचा एकेक थेंब हळूहळू त्या पिशवीतून त्यांच्या शरीराकडे निघालाय आणि त्यासोबत मा़झं मनही मला माझ्या गावाकडे घेऊन चाललंय, अशाच रक्ताच्या नात्यांच्या ओढीने आणि त्या विषयीच्या आठवणींसोबत...

माझं गाव तसं मलवडी. आक्का- दादा मलवडीलाच असतात. सातारा जिल्ह्यामधलं हे एक खेडेगाव. माण नदीच्या काठावर वसलेलं हे गाव तसं खूपच छोटं. माण तालुक्यात असल्याने माडगुळकरांच्या ‘माणदेशी माणसं’ वाचलेल्यांना तिकडच्या भागाचा तसा संदर्भ लक्षात येतो. येरवी तो संदर्भ जोडला जातो दुष्काळाशी. माण-खटाव हे दुष्काळी तालुके. म्हणून मग त्या भागाची जगाला असणारी ओळखही तशीच. त्याच भागातला मी. माणदेशी असलो तरी शिक्षणासाठी वडिलांच्या नोकरीमुळे थेट तिकडं भुसावळ, खानदेशच गाठला. त्यामुळे आमचा प्रवास तसा माणदेश ते खानदेश असाच. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्‌ट्यांमध्ये आमचा खानदेश ते माणदेश आणि पुन्हा खानदेश असा प्रवास व्हायचा. निमित्त असायचं ते आमच्या याच आक्का- दादांना भेटायचं.

एक लेंगा-पायजमा आणि दंडकी, वाटलं तर पांढरा शर्ट. डोक्यावर गांधी टोपी. हा दादांचा कायमचा युनिफॉर्म. त्यातली युनिफॉर्म्यालिटी विस्कळीत झाल्यांच मला तरी आठवत नाही. दादांचं वय आता नव्वदीच्या आसपास आहे. हे शारीरिक बरं का. मनानं ते माझ्याहीपेक्षा  प्रचंड खंबीर आहेत. आताही, मला कसलाच त्रास होत नाहीये, या आविर्भावामध्ये ते कॉटवर आहेत. मगाशी मी त्यांना जरा लोळा म्हणालो, तर कितीक वेळ पडून राहाणार, पडून पडूनच कटाळा येतो...असं काहीसं ऐकवलं. मी पुन्हा शांत झालो. बसलोय आता लॅपटॉप काढून.

मागच्या वेळी त्यांना ऍडमिट केल्यानंतर त्यांनी एक भारीच किस्सा केला होता. तो आठवला की अजूनही हसू येतं. त्यांच्या हृदयाची एक झडप काम करत नसल्यानी, त्यांना मागच्या वेळी तातडीने पुण्यात ऍडमिट केलं होतं. मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठे डॉक्टर. असेच एकजण आले रात्री राउंड घ्यायला. दादांची तब्बेत कशी आहे, अंगात किती जीव आहे, हे तपासण्यासाठी त्यांनी दादांच्या हातात हात दिला आणि म्हणाले, बाबा दाबा बरं जरा. दादांनीही घेतला त्यांचा हात हातात. आधी हळूच दाबला. मग डॉक्टर म्हणाले दाबा अजून. दादा मग आमच्याशी ज्या टोनमध्ये बोलतात, त्याच टोनमध्ये म्हणाले, दमं जरा, अन थोडे मागे सरले, डॉक्टरांचा हात पुन्हा नीट धरला अन असा काही दाबला की डॉक्टर आपोआप असे पाय उंचवायला लागले अन म्हणाले, बाबा बास बास. मग दादांनीही हात सोडला अन त्यांनाच म्हणाले, मंग तुमाला काय वाटलं, मी काय मागं हटतूय व्हयं... ते त्यावेळी अगदी मिश्किलपणे हसत होते. बहुतेक म्हणत असावेत, कशी खोड मोडली आ...

दादा म्हणजे कायम फिजिकली फिट असणारं तितकंच वल्ली कॅरेक्टर. तरुणपणी हमालीची कामंही केलेली. गावी गेलो की ते आम्हाला दगडी गोट्या, फळ्यांपासून बॅट, विटी-दांडू असलं बरंच काही करून द्यायचे. सोबन्या म्हणजे आपण जेवताना जे ताटाला लावायला घेतो ना, ते तयार करण्यात तर त्यांचा खास हातखंड. त्यांना गावच्या म्हशीचा फार लळा. मागच्या वेळी ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तरी त्यांना गावच्या म्हशीचीच फार आठवण यायची. रात्री झोपेतचं कधीतरी बरळायचे, धारंची येळ झाली. जायाला पायजे, म्हणत ते कॉटवरून उठायचा प्रयत्नही करायचे. मला या गोष्टीचं फार नवल वाटायचं. आम्ही सगळे ह्यांची काळजी करतोय, अन हे त्या गावच्या म्हशीची. तो लळा काही वेगळाच होता. आमची आक्का सांगते, हे सुतारकीतल्या हिरीजवळ आले कीच म्हस हांबारती. मग वळकायचं की आलं, मालकं आलं हिजं. असा हा लळा.

दादा म्हशीला घेऊन डोंगराला जातात. तिकडंच म्हशीला भरपूर चाराही मिळतो. दादाही परत येताना चार्याचा एखादा भारा डोक्यावर घेऊन यायचे. त्यांना आसूड बनवायलाही जाम आवडतं. कुणाचा ना कुणाचा आसूड तयार करायला असायचाच. चेष्टाही जाम करतात. गावी ते आणि आक्का असे दोघेच राहायला. बरं, आक्का एकदा का घराबाहेर पडली, की ती परत कधी घरी येईल याचा कधीच अंदाज लागत नसे. कारण ती दादांना अगदी आले जरा दहीवडीला जाऊन म्हणायची, अन थेट भुसावळलाही यायची. दादांचं तसं कधीच नव्हतं. ते घर, त्यांची म्हस, अन मलवडी सहसा सोडत नाहीत. त्यांना करमतंच नाही. इथं हॉस्पिटलमध्येही पडून राहणं त्यांना आवडत नाही. मलवडीमध्ये त्यांच्या भोवती कायम पोरांची टोळी असते. त्यांच्यासोबतही ते जणू त्यांच्याच वयाचे असल्यासारख्या गप्पा मारतात. चिक्कार चेष्टा अन तेवढंच चिक्कार कामही. त्यामुळे त्यांनी   हाक मारली की कोणीतरी त्यांच्यासाठी हजर असतंच. तसंच दादाही त्यांच्यासाठी वेळ पडेल तेव्हा कामासाठी जातात. त्यांचं हे मॅनेजमेंट काही अफलातूनच आहे, कोणत्याही शिक्षणाविना.

दादांनी आम्हालाही अनेक गोष्टी अशाच अगदी सहस शिकवल्या होत्या. डोंगराला भटकणं, रात्रीची दारी धरणं, वैरण कापणं, धार लावणं, अन एक भन्नाट गोष्ट म्हणजे झेल्यानी आंबा झेलणं. यातल्या सर्व गोष्टी मी पुन्हा प्रॅक्टिस करून बघण्याचा संबंधच आला नाही. अन त्या मी विसरलो म्हणून ते कधीच माझ्यावर रागावलेत असं झालं नाही. त्यांना त्यांच्या सर्व नातवंडांच फार कौतुक आहे. अन ते तसं कधीतरी बोलूनही दाखवतात. का नाही बोलायंच, शेवटी त्यांच्याच रक्ताची माणसं आहोत ना,
दादा माझ्याकडे पाठ करून झोपलेत. त्यांची रक्ताच्या सलाइनची नळी जराशी ताणली गेलीये. पिशवीतलं रक्तही संपत आलंय. ती संपायच्या आधी सिस्टरला बोलवायचंय. हे थांबवतोय, रक्त थांबण्यापूर्वी लिखाण थांबतंच. आताही काहीसं तसंच होणार आहे. शेवटी तेच विश्‍वातलं एकमेव सत्य असावं...    

1 टिप्पणी: