शुक्रवार, २१ जून, २०१३

पै...पैलवानाचा



पै.’ म्हणजे माझ्या लेखी पैलवान. पै. आणि त्याच्यापुढे एखादं नाव असलेले अनेक फ्लेक्स मी जाता-येता पाहत असतो. त्या फ्लेक्समध्ये पै. च्या पुढे असलेल्या नावात बदल होत असला, तरी त्याच्यापुढचं फोटोमधलं सन्माननिय व्यक्तिमत्त्व एकंदरीत भारदस्तच असतं. त्यामुळं मला पै. स्टँड्स फॉर भारदस्तपणा,’ असंच फीलिंग येतं. पै.’ म्हणजे कोणी पहेलवान म्हणतं, तर कोणी पहिलवान. मला आपलं पैलवान हा पल्लेदार शब्दच जास्त आपलासा वाटतो. त्यातली ती पै वर जोर देऊन उच्चार करण्याची गावाकडच्या लोकांची लकब एकच नंबर असते. त्यामुळंच न राहावून मग आपल्या नावापुढंही असं पै. लावावं असं वाटून जातं. पै. योगेश बोराटे.

असं हे आत्ता आत्ताच वाटायला लागलं असंही नाही, ते आकर्षण बालपणापासूनच आहे. आम्ही भुसावळला गेल्यावर पहिल्याप्रथम टाक गल्लीमध्ये भाड्याच्या घरात राहायचो. तिथं तीन खोल्यांचं घर होतं. त्यातल्या मधल्या खोलीत भींतीवर अगदी वरच्या बाजूला बजरंग बैठकीतलं मारूतीचं
पोस्टर चिकटवलेलं होतं. ते पोस्टर माझ्या वडिलांनी चिकटवण्याचा संबंध नसावा. कारण ते त्यावेळी दत्ताचे गुरुवारचे उपास करायचे. दत्ताचे भक्त आणि त्यातल्या त्यात त्यांची उंचीही तशी कमीच असल्याने एवढ्या उंचीवर लावलेलं बजरंगबलीचं पोस्टर त्यांनी लावलेलं नसावं, असा माझा तर्क आहे. त्यामुळं कदाचित आमच्या अगोदर त्या घरात जे कोणी राहत असेल, त्यांनी हा प्रताप केलेला असावा, असं वाटतं. त्या पोस्टरमध्ये बजरंगाची एकूणच छबी पाहून मलाही तशीच बैठक मारावी असं वाटायचं. त्या बैठकीला पूरक म्हणून मी खेळण्यातली गदाही अनेकदा सोबत ठेवायचो. चिखलाच्या गाड्या करून त्याच फिरवायचा खेळ करेपर्यंत निदान मला ती गदाच सर्वात प्यारी होती. नंतरच्या टप्प्यात मग बजंरगासारखीच तब्येत असावी हे वाटणं ओघाओघानी आलंच.

गल्लीत राहायला असताना अमित सोबत असायचा. अमित माझ्यालेखी माझा बॉडी बिल्डरच होता. तो आणि मी चौथीपर्यंत तु. स. झोपे शाळेत सोबतच होतो. त्याची तब्येत एकदम तगडी. व्यायामही चालायचा. आता तो डॉक्टर झाला असला, तरी त्याचा जड व्यायाम अजूनही सुरूच असावा. त्याच्यासोबत शाळेत जाणं-येणं. इतरांच्या खोड्या काढल्या, तरी सावरून घ्यायला तो असायचा. त्यामुळं कधी अडचण येत नव्हती. हाणामारी झालीच, तरी सोडवायला तो धावून यायचाच. बरं, तसं आम्ही दोघंही वर्गात इतरांच्या तुलनेत हुशार टाळक्यांपैकी असल्यानं मास्तरचा मारही पडला नाही कधी. शाळेत लंगडी खेळताना धिंगाणा झालाच, तर खेळणं आवरल्यावर एखाद्याची कॉलर पकडून मग अमितला हाक मारली तरी कार्यक्रम निपटायचा. त्यामुळं शाळेत पै. होण्यापेक्षा असा बिल्डर सोबत असण्यावर भागलं होतं. त्यामुळे तु. स. झोपेमध्ये मी तसा पै. बनलोच नाही.  

पाचवीपासून भुसावळ हायस्कूलला अडमिशन घेतलं. हायस्कूलसमोर भरपूर मोठ्ठं पटांगण. दोन खो-खोची मैदानं. मैदानाच्या कडेला एका बाजूनं पटांगणाच्या रुंदीएवढी व्यायामशाळा. मला त्या शाळेत अडमिशन घेतल्यावर हे मैदान आणि ती व्यायामशाळाच भावली. पाचवी ते दहावीच्या वर्षांमध्ये शाळेत खो-खोचाच नाद जास्त लागला. बर, या शाळेत अमित सोबत नसला, तरी तशीच पै. कॅटेगिरीतली सात-आठ दहा दोस्त मंडळी मिळाली. हे हायस्कूल तसं निवांत होतं. भिल्ल, बैलम, भोईंची तुफान भरती असलेलं हे हायस्कूल. तिथं बोराटे आडनावाला अल्फाबेटिकली शेजार मिळाला तो याच आडनावाच्या दोस्तांचा. तब्येतीला अडदांड. एकेका वर्षात किमान दोनदा हजेरी लावलेली ही दोस्तमंडळी वयाने माझ्यातुलनेत मोठीच होती. तब्येतही तशीच. बर ही मंडळी वर्षभर अभ्यासाच्या नावानी शिमगाच करायची. गृहपाठ करणे म्हणजे आमच्या सर-मॅडमवरचे उपकार. हे उपकार नाही केले, तर वर्गात मास्तरनी बडव-बडव बडवताना झालेली वर्गातल्या इतरांची करमणूक ही त्यांच्या लेखी परोपकारासारखीच. त्यामुळं अभ्यासाचं तसं काही सोयरंसुतक नसलेली ही दोस्तांची फौज परीक्षा जवळ आली, की आमच्या दिमतीला हजर असायची. 

मला आठवतंय तसं, पाचवीच्या परीक्षेपासून या सर्व दोस्तांनी मला कधीच एकटं सोडलं नाही. परीक्षेमध्ये ह्यांची अपेक्षा काय, तर रिकाम्या जागा, जोड्या लावा आणि एका वाक्यात उत्तरं सांग. माझ्याकडून त्यांच्यापैकी एकापर्यंत जरी ही माहिती गेली, तर ती बाकी सगळ्या भाऊबंदकीला पोचणार याची शाश्वती त्यांच्यातला एक जण कुणीतरी घ्यायचं. माझ्याकडून माहिती घ्यायची जबाबदारी मात्र बैलमवर. शांताराम रामा बैलम. त्यावेळी माझ्या निदान दुप्पट उंचीचा. मी उत्तरपत्रिका लिहित असलो, तरी तो माझ्यामागून वा पुढून सहज ती पाहू शकत असे. वर्गाच्या शेवटच्या लायनीत जर नंबर आले, तर त्यानं कमवलंच, तो पलिकडच्या लायनीतूनही माझा पेपर वाचू शकत असे. त्याच्या पाठोपाठ मग सगळी भोई गँग ऐश करायची. आणि ही सगळी गँग माझी दहावी होईपर्यंत माझ्यासाठी बॉडी बिल्डरची फौजच असल्यासारखी होती. वर्गात भांडणं करायची वेळ आलीच किंवा खो-खोच्या मैदानावर कुणाशी वाजलं तर ह्यांच्यातला एखादा तरी भांडणं सोडवायला यायचा. त्यानी समोरच्याला त्यांच्या ग्लुसरीपैकी एखादी गावरान शिवी हासडली की झालं. समोरचा जो कोणी असे, तो आपला गप गार. मी ह्या दोस्तांसाठी चिंगळीच होतो. ते घ्यायचे सांभाळून. त्यांच्यामुळंच मग या हायस्कूलला असेपर्यंत अगदी समोर असलेल्या व्यायामशाळेकडे मी व्यायाम करायचा म्हणून फिरकलो नव्हतो. एक-दोनदा गेलोच, तर तो आखाडा कसा असतो ते बघायला आणि शांत्या भोई वजनं उचलतो की नुसत्याच अमुक उचललं नी तमुक उचचलं ते बघायला. झालं. तिथंही आमची पैलावानकीची स्वप्नं स्वप्नंच राहिली.

कॉलेजलाईफ म्हणजे बिइंग ए सायन्स स्टुडंट, अभ्यासाकडे लक्ष देणे. टवाळक्या न करता शांततेत पुस्तकात डोके घालणे, कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज करणे. मी त्यात कधी रमलो नाही. अभ्यासातला फर्स्ट क्लास कायम सांभाळून बाकी सगळं करायचं ते केले. सीनियर कॉलेजला आल्यावर मात्र पैलवानकीच्या स्वप्नांनी पुन्हा जोर धरला. पुन्हा मग हायस्कूलसमोरच्या व्यायामशाळेतला आखाडा आठवला. त्या आखाड्यासमोर आणि फक्त तेल लावून मालिश करून आखाड्यात उतरणाऱ्या तिथल्या भोई-भिल्ल दोस्तांसमोर कॉलेजमधली जीम फिकी वाटली. मग रोज सकाळी हायस्कूलसमोरच्या आखाड्यात जायचं ठरलं. पहिल्याच दिवशी जामी पैलवान नावाचा दोस्त भेटला. सुरुवात करतोये तर जाऊन बजरंगाला नमस्कार कर, वर्गणी भर आणि लाल मातीत उतर म्हणून सांगितलं. मीपण वस्ताद सांगतोये तर करायला पाहिजे, म्हणून सगळे सोपस्कार आटोपून आखाड्यात उतरलो. सुरुवात झाली ती लोखंडी खोऱ्याने आखाड्याची माती मोकळी करण्यापासून, पण पहिल्याच दिवशी लोड नको म्हणून जामी वस्तादने अर्धाच आखाडा खणायला लावला. तेवढ्यातच चक्कर आल्यासारखं झालं. खोरं बाजूला ठेवून लाल मातीत लोळूनच पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवसापासून खोऱ्यानी ओढनं सोडून दिलं. 

त्यानंतर चार-सहा दिवस गेले असतील. वजनं उचलायला सुरूवात झाली होती. आता बेंचवर झोपून वजनं उचलायची ठरलं. तिथं एका लायनीत चार बेंच मांडले होते. लायनीने तिसरा बेंच तेव्हा रिकामा होता. त्या बेंचच्या दोन्ही बाजूनी असलेल्या दोन उभ्या खांबावर आडव्या रॉडनं बरोबर वजनं मांडलेली होती. मी नवशिक्या गडी. या रॉडच्या दोन्ही बाजूनची वजनं समान मापानी काढायची असतात हे माहितीच नव्हतं. मी आपला शांततेत गेलो. वजनं आपल्याचानी पेलवणार नाहीत हे लक्षात घेतलं आणि वजनं कमी करायची ठरवलं. एका बाजूच्या प्लेटला हात लावला आणि ओढली रॉडवरून बाहेर. एका बाजूचं वजन कमी झाल्यानं रॉडचा बॅलन्स गेला. मला काही कळायच्या आत तो रॉड माझ्या समोरून असा उंच जात दुसऱ्या बाजूला आदळला. बर तेवढ्यावरच थांबलं नाही. रॉडला मिळालेल्या गतीमुळे तो पलिकडच्या बेंचवर गेला. तिथं व्यायाम करत असलेला गडी सावरायच्या आत हा रॉड त्याच्या मानेजवळ गेला. दुसऱ्याने तोपर्यंत धरला म्हणून कमवलं. वजनं पडल्याच्या आवाजाने सगळे माझ्याकडे बघायला लागले होते. ज्याच्या मानेजवळ तो रॉड गेला होता तो तर, अर का रे भो. नवा आला का तू, कोन्ह सोडलं रे याले आतमंधी, असं म्हणत उठला. मी म्हटलं झाला आता कार्यक्रम. पण जामी पैलवानानी आवरलं. आम्ही दोघं बाहेर आलो. शाळेच्या कट्ट्यावर बसलो. त्यानी मला समजवलं, अरे छोटे ऐसा नी करनेका. मेरेको आवाज देने का. मै बताता था ना तेरेको, म्हणत त्याने छान माहिती दिली. ती शेवटचीच. कारण त्यानंतर आपल्या स्वप्नाचा इतरांना त्रास नको, म्हणून मी तिकडं जाणं थांबवलं. घरच्या घरीच व्यायाम सुरू केला.

आता व्यायामशाळाही नाही आणि घरचा व्यायामही नाही. पै. व्हायचं स्वप्न मात्र अजूनही ताजं आणि तेवढंच टवटवीत वाटतं. आज वजन केलं. गेल्या वेळच्या तुलनेत पाच किलोंनी जास्तच भरलं. आता ते कमी करायचं म्हणजे व्यायाम करणं आलं. आणि व्यायाम म्हटलं की माझ्या या पैलवानकीच्या स्वप्नांना पुन्हा कोंब फुटतो. बघू आता काय होतं ते. व्यायाम सुरू झाला तरी बास.   

1 टिप्पणी: