काल एका कार्यक्रमाला गेलो
होतो. कार्यक्रमात एका ज्येष्ठ प्राध्यापकाच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्याच माजी
विद्यार्थ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता. कार्यक्रमावरून परत आल्यावर
नेहमीप्रमाणे बातमी लिहिली. बातमी लिहिताना जाणवत होतं, की तिथं ऐकलं-पाहिलेलं मी
कुठेतरी माझ्या शिक्षकांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय, तिथली वर्णनं कुठेतरी
जुळवून पाहण्याचा प्रयत्न करतोय. बातमी पूर्ण करून ती पुढे सोडली, तरी ते विचार
काही जाईनात. थोड्या वेळाने दुसऱ्या कामाच्या नादात ते विचार थांबले, पण पुन्हा
घरी येताना आणि अगदी आजच्या दिवसभरातही ते विचार अनेकदा येत-जात राहिले,
वेगवेगळ्या निमित्ताने. त्यातूनच अगदी सुरुवातीपासून मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली
शिकलो त्या सर्व सरांचे चेहरे, त्यांचं शिकवणं, शिकवण्याव्यतिरीक्तच्या
काळातलं त्यांचं वागणं सगळं-सगळं असं समोर उभं राहिलं. सर नावाची सरच ती. सरीमागून
सर बरसावी तशी एकामागोमाग एक आठवण समोर येत राहिली.
तु. स. झोपे शाळेतल्या
आठवणी तश्या ताज्या नाहीत, पण भुसावळ हायस्कूलमध्ये अडमिशन घेतल्यानंतरचे दिवस
निश्चित आठवतात. पाचवीपासून ते दहावीपर्यंत कायम वर्गावर राहिलेले बी. पी. चौधरी
सर अर्थात 'बीप्पीसी', डाव्या हाताने अगदी पल्लेदार अक्षरात फळा लिहिणारे पी. डब्ल्यू.
चौधरी सर, प्रचंड कडक खडके सर, पी. के. पाटील सर ही त्या वेळची आवडती नावं.
प्रत्येक नावामागचं कारण वेगवेगळं. दिसायला गोरेपान, कायम टापटिपीत वर्गात येणारे,
भरपूर गप्पा मारणारे बीप्पीसी पाचवीपासूनच वर्गावर होते. शिकवता शिकवता ते भरपूर गोष्टीही
सांगायचे. महत्त्वाचं म्हणजे वर्गात किती गृहपाठ झालेत हे मलाच विचारायचे. त्यामुळं
मी सांगेल तो आकडा फायनल. त्यांच्या कॉलेज लाइफच्या गमतीजमती अगदी रंगवून
सांगायचे. 'बळिराम फकिरा चौधरीचं बीपीसी असं का,' विचारल्यावर, 'खरं तर ते बीएफसी असं
व्हायला हवं होतं, पण जाऊ दे बेटा,' असंही त्यांनी एकदा सांगितलं होतं. चौथीपर्यंत
लंगडी खेळायचा फायदा पाचवीपासून पुढे खो-खो खेळायला झाला. पाचवीत असताना वार्षिक
स्पर्धांमध्ये शेवटच्या मॅचला पहिल्या फळीतले दोघं पहिल्याच मिनिटात उडल्यावर एकट्याने खिंड लढवून सहावीच्या वर्गाला हरवलं होतं. त्यावेळी गेम संपल्याची
शिट्टी मारल्या मारल्या याच बीप्पीसींनी मला कडेवर उचलून घेतलं होतं. नंतर
कोणत्याच सरांनी तसं उचललेलं मला आठवत नाही. त्यांना फार कौतुक होतं माझं. शाळा
सुटेपर्यंत कायम पहिल्या एक-दोन नंबरात राहिल्यानं ते कायम होतं. पुढे परत भेट
नाही झाली. मी कॉलेजला गेल्यानंतर काही वर्षांनी ते अकालीच गेल्याचं कळलं.
त्यावेळी हळहळलो होतो आणि आताही.
आमचे पी. के. पाटील म्हणजे
भन्नाट रसायन. त्यांना सगळे त्यावेळी 'गुंडाप्पा' म्हणायचे. का ते माहिती नाही, पण
म्हणायचे. त्यांच्या एक फेव्हरेट डायलॉग होता, 'बाळा, तुला कोण मारणार,' आणि हा
डायलॉग ते ज्याच्या जवळ म्हणत असत, पुढच्या क्षणी तो आणि त्याच्या शेजारी बसणारा,
अशा दोघांची पाठ ते मऊ करत असत. त्यांच्या वर्गात भरपूर धिंगाणा चालायचा. आमच्या
वर्गातला पंकज आणि राजेश हे त्यांची आवडती गिऱ्हाइकं होती. या दोघांनी त्यांना
अनेकदा वर्गभर मागेमागे फेऱ्या मारायला लावल्या होत्या आणि त्याचा नंतर होणारा
परिणामही भोगला होता. त्यामुळे आम्ही शक्यतो सावधच असायचो. त्यांच्या वर्गात मीही
एक-दोनदा धपाटे खाल्लेत, पण हसण्याच्या नादात ते किती लागले ते समजलंच नाही.
दहावीनंतर अकरावी सायन्सला
नाहाटा कॉलेजला अडमिशन घेतलं. तिथं पी. डी. चौधरी नावाचे सर केमिस्ट्री शिकवायचे. ज्युनिअर
कॉलेजचे उपप्राचार्यही तेच होते. त्यावेळी इतर कोणापेक्षा या सरांची पर्सनॅलिटी
एकदम भन्नाट होती. उंचपुरं व्यक्तिमत्त्व. चष्मा, मिशी, शक्यतो हसून बोलण्याचा
कायमचा प्रयत्न, पण वर्गात तसे खूप कडक. अकरावी आणि बारावी दोन्ही वर्षांना
त्यांनी आम्हाला केमिस्ट्री शिकवलं. उंची कमी असल्यानं मी वर्गात शक्यतो पहिल्या
बेंचवर बसायचो. या सरांचं पोरांच्या वहीतही बारीक लक्ष असायचं. बारावीच्या
कोचिंगला एकदा त्यांनी अल्केन, अल्किन आणि अल्काइनचे वेगवेगळे फॉर्म्युले लिहायला
सांगितले होते. त्यावेळी फॉर्म्युला तयार कसा होतो, हे शिकण्यापेक्षा तो पाठ करण्याची
सवय लागली होती. त्यातच नवा फॉर्म्युला कोणी सांगितला तर सिंगल बाँड - डबल बाँड - ट्रिपल
बाँड वाटेल तसे द्यायची सवय. अशाच एका फॉर्म्युल्यात डबल बाँडच्या जागी ट्रिपल
बाँड लिहिलेला त्यांनी पाहिला. ते पाहिल्या –पाहिल्या त्यांनी माझी लायकीच काढली.
'तू सायन्सच्या लायकीचाच नाहीस,' हे तिथंच सांगितलं. आख्या वर्गासमोर लायकी काढली
म्हटल्यावर वाइट वाटणं साहाजिकचं होतं. रागही आला. पुढे बी. एस्सीला केमिस्ट्री
विषय ठेवण्यामागे हा रागही काही प्रमाणात कारणीभूत होता. पण आता बरेचदा वाटतं, की
सरांनी त्यावेळी ओळखलेली माझी लायकी अत्यंत बरोबर होती.
सीनिअर कॉलेजचा काळ म्हणजे
जे. जे. वारकेंचाच. काळेशार आणि उंचपूरे. पुण्यातून एम. एस्सी झालेले. ते फिजिकल
केमिस्ट्री शिकवायचे. गिब्स फ्री एनर्जी, हेल्महोल्ट्स फ्री एनर्जी आणि एन्थाल्पी
या किचकट बाबी त्यांनी पिक्चरच्या तिकिटाच्या रकमेच्या माध्यमातून समजावून दिल्या
होत्या. किचकट आणि अवघड विषय सोपा करून शिकवणं हे त्यांचं वैशिष्ट. त्यामुळंच पुढं
पुढं मला फिजिकल केमिस्ट्री विषयच जास्त आवडायला लागला होता. त्यांना सवय होती ती
बेटा म्हणायची. 'बेटा, तुम्हाले सांगू...', 'बेटा हे...', 'बेटा ते...', 'बेटा मी आलाच...',
'बेटा मी उद्या येनार नी..', प्रत्येक गोष्टीसाठी 'बेटा' ठरलेलंच. त्यांच्या वर्गात
शक्यतो कधी बोअर व्हायचं नाही. पण ज्या दिवशी बोअर होतंय असं लक्षात यायचं, त्या
दिवशी एकच काम. ते किती वेळा 'बेटा' म्हणतायेत ते मोजायचं. जाम मज्जा यायची. नंतर
एकदा त्यांनीच वर्गात सांगितलं, की तुमचं सगळ्यांच लक्ष माझ्याकडे राहावं म्हणून
मी निरनिराळे प्रयोग करतो. एखाद्या शब्दावर मुद्दाम जोर देतो, एखादा शब्द मुद्दाम
पुन्हा पुन्हा म्हणतो, मी एक शब्द खूप वेळा म्हणतो आणि तुमच्यापैकी काही जण तो
शब्द मी किती वेळा म्हणतोय हेही मोजतात. हे ऐकल्यावर वर्गात कोणालाच आपण नेमकं काय
बोलावं, सरांना काय सांगावं हे सुचलं नव्हतं.
याच दरम्यानच्या काळात
केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल लॅबपेक्षा माझा वावर कल्चरलच्या प्रॅक्टिस सेशन्स आणि
एनएसएसच्या कार्यक्रमांमधून वाढायला लागला होता. इतरांपेक्षा तुलनेत माझं अक्षर चांगलं
होतं आणि फळ्यावर शक्यतो एका ओळीमध्ये सरळ अक्षर लिहिता यायला लागलं होतं.
त्यामुळं कॉलेजच्या नोटिस बोर्डवर सूचना लिहायची संधी मिळायला सुरुवात झाली होती.
वारके सरांचं या बाबीकडे बारीक लक्ष होतं. त्यातच कल्चरलच्या वाऱ्यांमधून
परीक्षांच्या वाऱ्या करून करून टी.वाय.बीस्सीचं थर्ड इयर सुरू झालं होतं. तरीही
वर्गावर वारके सर आणि त्यांच्या लेक्चरला हजर असणारा मी कॉमन होतो. शेवटी तिसऱ्या
वर्षात त्यांच्या पहिल्या लेक्चरला इतर नव्या विद्यार्थ्यांची ओळख करून घेतल्यावर
मी ओळख करून देणार, तेवढ्यात त्यांनीच सांगितलं, 'बेटा याह्यांची ओळख असू द्या बरं.
लय कामाले येतीन. बेटा हे आपल्या वर्गातले थोर समाजसेवक. आण्णा हजारेंच्या नंतर
याह्यचाच नंबर येनारे. बेटा कधी तरी आपल्याभी वर्गातले फळे लिहित जाय ना. बेटा,
सांग बेटा तुह्य नाव...,' ही स्तुतिसुमनं ऐकल्यावर मला पुढं काय बोलावं हेच समजत
नव्हतं. नशिबानी साथ दिल्याने थर्ड इअरचं चौथं वर्ष करावं लागलं नाही. त्यामुळे
सुटलो.
आता हे सारं आठवलं की
अजूनही हसायला येतं. ही सारी मंडळी आपल्याला गुरू म्हणून लाभली म्हणून इथपर्यंत
आलोय हे जाणवतं. भुसावळला गेल्यावर या साऱ्यांना भेटावसं वाटतं, पण अजूनही हिम्मत
होत नाही पुढे जायची. बघू, आता पुढच्या वेळी गेलो, तर नक्की जाऊन एकदा भेट
घेण्याचा विचार करतोय. कदाचित त्यांनाही आनंद वाटेल आणि मलाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा