एरवी सकाळपासूनच काही ना काही निमित्ताने फोन वाजतच असतो, पण परवा सकाळचा फोन थोडा वेगळाच होता. पूर्णपणे अनपेक्षित आणि तितकाच धक्कादायक. इतका, की त्या पुढचा काही काळ आपण नेमकं काय ऐकलंय त्यांच खरं-खोटेपण तपासण्यात, त्याची खातरजमा करण्यातच गेला. डॉ. दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या झाल्याचा तो फोन होता. नेहमीसारखीच थोडी फोनाफोनी झाली. या वेळी ती बातमीसाठी झाली नाही, आणि मी ठरवून केली नाही इतकंच. ती आपोआपचं होत होती. शक्यतो मी सकाळी सकाळी कधीच टीव्ही लावायच्या फंदात पडत नाही. फोन ठेवता ठेवता ते ही आपोआपच केलं गेलं. मला आठवतंय तसं कसाबला फाशी दिल्याच्या घटनेनंतर, थेट या वेळीच इतक्या तातडीनं मी टीव्ही सुरू केला होता.
मराठी बातम्या देणाऱ्या
सगळ्या चॅनेल्सवर ती बातमी दाखवत होते. मी ऑफिसला जाण्यासाठी आवरा-आवरी करत होतो.
बातमी ऐकत होतो-बघत होतो. घरातून निघताना एकदा स्पॉटला भेट देऊनच ऑफिसला जाण्याचा
विचार आला. घटना घडून गेल्यानंतर नेहमी जसं वातावरण असतं, तसंच वातावारण तिथंही
होतं. पोलिस बघून माणसं एकमेकांना काय झालं म्हणून विचारत होती, वेळ असलेली थांबत
होती नी माझ्यासारखी घाई असलेली पुढे निघून जात होती. मला जास्त वेळ तिथं थांबता
येणारच नव्हतं त्यामुळं तिकडून निघून पुन्हा ऑफिसला आलो.
तिथला अस्वस्थपणा मला
जाणवला होता. सुरुवातीला वाटलं की, कदाचित या प्रकारामुळे मी अस्वस्थ झालो असेल
म्हणून मला तिथले लोकंही अस्वस्थच जाणवले असावेत, पण नाही. नंतर अगदी एक
अर्ध्याकश्या तासातच जाणवलं, नाही, माझ्यासारखे सगळेच अस्वस्थ झालेत. कारणे
वेगवेगळी असली, तरी सगळे अस्वस्थ आहेत एवढं खरं. काम सुरूच होतं. त्या जोडीला
डॉक्टरांच्या आठवणींचा विचारही सुरू होता. एफबी- जीचॅट- ट्विटर सगळ्या अकाउंटवरची
माझे स्टेटस मी तोपर्यंत बदललं होतं. अस्वस्थ वर्तमान, दुसरं काय..., धक्कादायक
आणि तितकीच अस्वस्थ करून जाणारी सकाळ वगैरे वगैरे त्यात लिहिलं होतं. इतरांचे
अपडेट्स चेक केले, तर त्यातही तसाच मॅटर सापडला. या ही बाबतीत आपण जगाबरोबरच
चाललोय हे बघून थोडं बरं वाटलं आणि आपण जे विचार करतोये, तश्या विचाराची, आपल्याच
वयाची आणखी बरीच लोकं आहेत, हे बघून चांगलं वाटलं.
डॉक्टरांना तसं मी माझ्या लहानपणापासून
ऐकीव माहितीच्या आधारावर ओळखत होतो. राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मुलन समिती,
साधना ही नावं आणि त्यांच्याशी संबंधित खानदेशातल्या कार्यकर्त्यांचं आमच्या घरी
असलेलं येणं-जाणं यामुळं मला ही ओळख झाली होती. या कार्यकर्त्यांपैकी मला अगदी
जवळची असणारी अविनाशकाका, गोपाळकाका, चंदुकाका ही त्यातली मंडळी डॉक्टरांच्याही
तितकीच जवळ होती. वडिलांसोबत या सगळ्यांच्या होणाऱ्या गप्पांमधून मिळालेल्या ऐकिव
माहितीच्या आधारावर मी सुरुवातीला डॉक्टरांविषयीची एक प्रतिमा माझ्या डोक्यात तयार
केली होती. डॉक्टर म्हटले की मस्त अगदी सुट-बुट, तब्येतीला थोडे सुटलेले, राज्य
पातळीवरचा मोठा माणूस म्हणजे मग आजूबाजूला त्यांचा लवाजमा वगैरे वगैरे. पण जळगावात
त्यांना एका भाषणाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच त्यांना पाहिलं, तेव्हा
त्यांच्याविषयीचं हे सगळं मत आपोआपचं बदललं. मनात राहिला तो त्यांचा साधेपणा आणि
त्यांचा करडा आवाज, जो मी पुण्यात आल्यानंतरच्या त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये,
बैठकांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये पुन्हा अनुभवला. त्यांच्या जाण्याने मी अस्वस्थ
होण्यामागे त्यांचा हा साधेपणा आणि ‘डाऊन टू अर्थ’ राहाण्याचा स्वभावच जास्त कारणीभूत असावा, असंच या सगळ्या
विचारांमधून वाटायला लागलं.
गेल्या महिन्या- दोन
महिन्याच्या काळात त्यांना एक- दोनदा खूप जवळून अनुभवण्याचे प्रसंग आले. पुण्यात
घरी साधना साप्ताहिक सुरू करायचं होतं. त्यासाठीची वर्गणी भरायला मी ‘साधने’च्या सदाशिव पेठेतल्या ऑफिसमध्ये
गेलो होतो. तिथं डॉक्टर असतात हे माहितीच होतं. मी घराचा पत्ता एका कागदावर लिहित
असताना ते तिथं आले. माझं लिहिणं सुरूच होतं, तोपर्यंत ते तिथल्या मॅडमशी बोलत
होते. बोलण्याचा आशय हा होता, की माझी वर्गणी संपली आहे, त्यासाठीचे पैसे भरायचे
आहेत. मी चेक देतो. तो घ्या. डॉक्टर ‘साधने’चे संपादक होते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्वेसर्वाही
तेच होते. तरीही ते या दोन्ही साप्ताहिक-मासिकांच्या वर्गणीच्या पैश्यांचा हिशेब
ठेवत होते आणि ते या दोन्हींची वर्गणीही भरतात हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला.
मी लिहिता लिहिताच वर
बघितलं. बोलणं संपलं की मी त्यांच्याकडे बघतोय, हे त्यांच्या लक्षात आलं. हसत हसत
त्यांच्या त्याच करड्या आवाजात मला विचारलं, ‘काय रे, काय म्हणतोस,’ मी आपलं सांगितलं, ’साधने’ची वर्गणी भरायला आलोय.
बाकी सगळं ठिक ना, म्हटल्यावर मी ही ‘हो’ म्हटलं आणि ते त्यांच्या कामाला निघून गेले. स्वतःच्या
मासिक- साप्ताहिकांची वर्गणीही ते स्वतः भरतात, ते अंक फुकट घेत नाहीत, चळवळीला
सुरुवात स्वतःपासून करतात, असे विचार त्यांच्या या वागण्यातून मला तिथल्या तिथे पटले.
मागे एकदा सज्जनगडावर गेलो असताना, तिथला एक श्लोक मी माझ्या एका डायरीत लिहून
ठेवला होता. तो आठवला-
स्वये कार्य जोमे मनाने
करोनी,
पुढे ठेव आदर्श आधि रचोनी।
पहा लोक येती न बोलावताही,
कृतीनेच शब्दा प्रति मोल
येई।।
।जय जय रघुवीर समर्थ।
अशा लोकांना आपल्याकडे वेडे
म्हणण्याचा प्रघात आहे. डॉक्टरांचं हे वेडेपण मला भावलं होतं. मनातल्या मनात अशा
माणसाला आपण ओळखतो, त्यांना खूप जवळून अनुभवतो याचं समाधानही होतं.
मागे एकदा असाच एका
असाइनमेंटच्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. ‘रानडे’मध्ये पहिल्याच वर्षाला
होता. मुलाखतीचं तंत्र-फिंत्र वर्गात शिकलो असलो, तरी ते प्रत्यक्ष वापरलं नव्हतं.
ते कसं वापरायचं, याची प्रात्यक्षिकं करेपर्यंत ही असाइनमेंट मिळाली होती. आधी फोन करून वेळ
घ्यायचं सौजन्य दाखवावं असं सुचलं, तेच काय ते नशीब. वेळ मिळाली, की गेलो तसाच
त्यांच्याकडे. मुलाखतीसाठीचे प्रश्न कुठयंत, असं विचारल्यावर मी आपलं वहीत ते शोधण्याचा
प्रयत्न केला. प्रयत्न फसलाय हे त्यांच्या लक्षात आलं, की त्यांनी आपलं सांगितलं, ‘तिथं बाहेर बैस, प्रश्न काढ
आणि मग आपण बोलूयात,’ पुन्हा प्रश्न काढले आणि मग डॉक्टरही बोलले. कोणतेच
आढेवेढे न घेता. चळवळी संपत चालल्या आहेत का वगैरै विषयावर त्यांची ती मुलाखत
होती. एनजीओंच्या चळवळींमुळे सामाजिक चळवळींना काय फटका बसला, याच्यावर त्यांनी
अगदी सविस्तर माहिती दिली. असाइनमेंट झाली, पण त्याहीपेक्षा डॉक्टरांची भेट झाली
हे माझ्यासाठी त्या वेळी महत्त्वाचं होतं आणि त्याचं महत्त्व मला आत्ताही जाणवतंय.
‘साधने’च्या पासष्टीचा कार्यक्रमही पाहायला गेलो होतो. पत्रकार म्हणून नाही
आणि रिपोर्टिंग होतं म्हणूनही नाही. काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल या अपेक्षेने. पळशीकरांची
मुलाखतही त्याच कार्यक्रमात झाली. तिथेही ‘साधने’ला समाजवाद्यांचा असलेला चेहरा बदलून, तो तरुणांचा चेहरा करण्यात
डॉक्टरांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक झालं. विशेष म्हणजे, त्या
कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड फौज उपस्थित होती. त्याच तरुणांच्या साक्षीने ‘साधने’ला आणखी तरुण, पण तितकंच जबाबदार
साप्ताहिक म्हणून समाजासमोर मांडण्याचा पुनरुच्चार डॉक्टरांनी केला. तोच साधेपणा
आणि तोच करडा आवाज मला तिथेही ऐकायला मिळाला. ते गेल्याचं कळल्यापासून मला त्यांचा
तो साधेपणा आणि त्यांचा तोच करडा आवाज पुन्हा ऐकायला-अनुभवायला मिळणार नाही, याचं
जास्त वाईट वाटतंय. त्यांनी केलेलं काम पुढे सुरू ठेवणारे कार्यकर्ते त्यांनी
जोडले आहेत. त्यामुळं ते सुरूच राहाणार आहे, याची खात्री वाटते. पण त्याचवेळी त्या
सगळ्या कार्यकर्त्यांसाठीचा बापमाणूस आता नाही, याचं वाईट वाटतंय. दोन दिवसांपासून
त्यांच्या त्या इंटर्व्ह्यूचं रेकॉर्डिंग शोधतोये. सापडलंच नाही. माणसाप्रमाणे
तेही हरवलं याचंही आता खूप वाईट वाटतंय. म्हणून कदाचित मी गेले दोन दिवस अस्वस्थ
झालो, हे उत्तर आता सापडतंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा