शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

‘माणदेशा’चा ‘ब्रँड अँबेसेडर’

आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं. माण तालुक्यातलं मलवडी. खूप मोठं नाही आणि अगदी छोटंही नाही. गावाविषयी ऐकलंय तसं, तिथल्या जवळपासच्या बारा-चौदा वाड्यांची मिळून एक ग्रामपंचायत आमच्या मलवडीसाठी. आमच्या गावासोबतच माण- खटाव तालुक्यातल्या प्रत्येक घरातून एखादातरी माणूस नोकरी-चाकरीच्या शोधात मुंबई-पुण्याकडे आला. आला तो आलाच. गावाकडच्या यात्रांच्या निमित्ताने, नातेवाईकांच्या लग्नांच्या निमित्ताने कधीतरी गावाकडे येणं-जाणं.  तेवढं सोडलं, तर गावांचा आणि त्यांचा तसा संबंध हळूहळू संपलाच. हा संबंध संपल्यानं माणदेश किंवा माणदेशातल्या गावांचा परिचय बाकीच्या जगाला तसा झालाच नाही. जगाला हा भाग माहितीये तो केवळ एक दुष्काळी प्रदेश म्हणूनच. ही एवढी ओळख सोडली, तर माणदेशाचं फारसं कौतुक करावं, असं कोणालाच वाटत नसावं. अपवाद फक्त व्यंकटेश माडगूळकरांचा.

माडगूळकरांच्या माणदेशी माणसंसारख्या वेगवेगळ्या कथासंग्रहांमधून जगाला माणदेशातल्या माणसांच्या वेगवेगळ्या छटा समजल्या. माझ्यासारख्या खुद्द माण नदीच्या काठावर कधीकाळी घर असणाऱ्या, पण सगळी वाढ तिकडे दूर खान्देशामध्ये झालेल्यालाही ती ओळख या पुस्तकांनीच करून दिली. त्यामुळंच मला माडगूळकर म्हणजे माणदेशाचे ब्रँड अँबेसेडर वाटतात. त्यांच्या कथांचा आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा मी फॅन झालोय, हे आता प्रांजळपणे कबूल करावंस वाटतं. कदाचित त्याचंच कारण असेल, की मी आता माणदेशी माणसं, सत्तांतर, अशी माणसं अशी साहसं, प्रवास : एका लेखकाचा अशी पुस्तकं हातोहात वेगळी करायला लागलोय. दिवाळी-उन्हाळ्याच्या सुट्टीत माणदेशाच्या एखाद्या भेटीदरम्यान अनुभवलेल्या काही बाबी या पुस्तकांच्या माध्यमातून पुन्हा कुठंतरी अनुभवायला लागलोय.

मी समीक्षक वगैरे नाही. साहित्याचा खूप मोठा अभ्यासकही नाही. पण माडगूळकरांची पुस्तकं वाचताना मिळणारी ही अनुभूतीच कदाचित त्यांच्या साहित्यकृतींची ताकद ठरली असावी असं वाटतंय. त्यांची वाक्यं, वाक्यांची रचना, त्यातलं साधेपण अशा सगळ्या बाबींमधून त्यांनी त्या –त्या ठिकाणाविषयीची, त्या त्या पात्राविषयीची एक ओढ माझ्यासारख्याच्या मनात निर्माण केली असावी. त्यामुळंच ती पात्र आपल्या आजूबाजूलाच आहेत, आपल्यातलीच आहेत, आपणही त्यांना कुठेतरी पाहिलं आहे, भेटलो-बोललो आहोत अशी रिलेट होतात असं वाटायला लागतं. यापूर्वी कोणत्याच लेखकाच्या बाबतीत असं जाणवलं नव्हतं. दुर्दैव एवढंच वाटतं, की माणदेशाविषयी आणि तिथल्या माणसांविषयी अशी ओढ निर्माण करण्यात यशस्वी झालेले माझ्या माहितीतले ते एकटेच.  

मला ना राव या बाबतीत कोकणाविषयी फार अप्रूप वाटतंय. कोकणी माणसं सहसा कोकणाविषयी वाईट बोलताना मी ऐकलीच नाहीयेत. कोकणाविषयी बोलायचं, तर ते भरभरून बोलायचं आणि बोलायचं ते चांगलंच बोलायचं, असंच कोकणी माणसांचं गणित दिसतंय. त्यामुळं कोकणी माणसांशी बोलताना आपल्यालाही कोकणाबद्दल आत्मियता वाटायला सुरुवात होते. त्यामुळं फणस म्हणून एखाद्याला चिडवत जरी असले, तरी फणसाच्या झाडांविषयीचं कुतुहल आपोआपच जागृत होतं. कोकणातला प्रत्येक माणूस कोकणासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून वागायला लागतो. आमच्या माणदेशाबाबत मला हे गणित कधी जुळलेलं दिसलंच नाही. माणदेशातली खूपसारी माणसं माणदेशाबाहेर वावरत असतील, पण माडगूळकरांसारखा एखादाच आणि त्यांच्या निमित्तानं का होईना माझ्यासारखा एखादा आत्ता त्या माणदेशाविषयी काहीतरी बोलत असावा.

तसं आत्ता लिहिताना ब्रँड अँबेसेडर ही खूप आधुनिक संकल्पना त्यांच्यासाठी वापरली आहे. पण मला त्यांनी केलेलं लेखनच एवढं आवडायला लागलंय, की मी तसा विचार करतोय. आमच्या माणदेशात आता माणदेशी फेस्टिव्हलवगैरे आयोजित केले जातात, असं ऐकायला मिळालं. त्या ठिकाणी अशा माणसांची दखल घेतली जाते की नाही, या विषयी शंकाच आहे. आपल्याकडे ब्रँड अँबेसेडर म्हणजे एखादी मोठी सेलेब्रिटी व्यक्तीअशी सर्वसाधारण भावना आहे. आमच्या माणदेशातून अनेक मोठ्ठे अधिकारी पुढे आलेत. आपापल्या क्षेत्रामध्ये अनेकांनी आपलं नाव मोठ्ठं केलं आहे, पण जाहीरपणे माणदेशाचा पुरस्कार करणारी फार थोडी लोकं आजपर्यंत आढळून आली. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील, पण आपापल्या मर्यादेत राहून माणदेशाचं कौतुक केलेलं दिसलं. माडगुळकरांनी केलेलं कौतुक मात्र कुठे दुसरीकडे अद्यापपर्यंत दिसलं नाही.

त्यांनी माणदेशी माणसं या त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या निर्मितीविषयी प्रवास : एका लेखकाचामध्ये लिहिलेली काही वाक्ये इथे संदर्भासाठी देतोय –
मला जीवनाशी संबद्ध असं लिहायचं होतं. माणदेश ह्या प्रदेशातले लोक कसे जगतात, काय विचार करतात, काय भोगतात, काय उपभोगतात- हे मला अनुभवाशी प्रामाणिक राहून सांगायचं होतं.
ह्या माणसांची जगण्याची दुर्दम्य इच्छा, कुठल्याही परिस्थितीत पाय रोवून आला दिवस सुख-दुःखासह स्वीकारण्याची त्यांची उमेद, न्यायबुद्धी, चांगल्या-वाईटाबद्दलचं वैयक्तिक विधिनिषेध यांचं दर्शन घडवायचं होतं.
आपण भाषिक कृती करायची, तर हीच, दुसरी काही नाही, असं ठाम वाटून मी माणदेशी माणसांकडे वळलो...
असा ठामपणा दाखवून माणदेशाकडे वळणारा दुसरा कोणीही मला अद्यापपर्यंत तरी दिसला नाही. अनेक जणं कदाचित असतीलही, पण ते समोर आले नसतील. त्यामुळं मला माडगूळकर हेच माणदेशाचे ब्रँड अँबेसेडर वाटतायेत.

कोणत्याही प्रांतिक, भाषिक, जातिय, धार्मिक वा भौगोलिक अस्मितांच्या चौकटीमध्ये अडकून न पडता विचार करणाऱ्यांच्या पठडीत मी बसतो, असं मला वाटतं. त्यामुळे मी एखाद्या विशिष्ट प्रदेशाविषयीचं एवढं कौतुक करणं हे ही थोडं विचित्रच वाटतंय. पण तरीही माडगूळकरांच्या लेखनामुळे मी तसं करण्यास प्रवृत्त झालोय. ब्रँड अँबेसेडरचं हेच वैशिष्ट्य असतंय की. आता हे असं कौतुक मी किती दिवस करत राहीन ते माहिती नाही, पण सध्या तरी ते तसंच आहे. सबब, माडगूळकर हेच माणदेशाचे ब्रँड अँबेसेडर आहेत. बास, इतकंच.  

३ टिप्पण्या:

  1. एखाद्या प्रदेशाची संस्कृती सर्वदूर पसरण्यासाठी किंवा पसरवण्यासाठी ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ची आवश्यकता असते, हा तुझा युक्तिवाद योग्य आहे. परंतु, तो अॅम्बेसिडर त्या विशिष्ट प्रदेशाच्या मातीतलाच असावा, अशी काही आवश्यकता नाही. तू वर कोकणासंबंधीचे उदाहरण दिले आहेस. पण कोकणमधील निसर्गरम्यता तेथील साधनसंपत्ती याचे कौतुक करणारे हे बरेचदा पर्यटकाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहताना दिसतात. दुसरे उदाहरण ‘वारली’ या कलेचे घेता येईल. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा समुहाने वर्षानुवर्षे आपल्यापुरतीच जपलेली ही कला इतरांच्या दृष्टीस पडताच त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. सो...माणदेशाविषयी असे होण्याची आशा बाळगायला हरकत नाही...
    दुसरा मुद्दा.. तू आता माडगूळकरांच्या माणदेशाविषयीच्या लेखनाने प्रभावित झाला आहेस, तर बनगरवाडी आणि सरवा ही पुस्तकेही आवर्जून वाच. कदाचित तू वाचलीही असशील, पण वर उल्लेख केलेल्या पुस्तकांमध्ये ही नसल्याने सांगितली, एवढंच.
    आता तिसरा मुद्दा... छान लिहितोस..ओघवता लिहितोस...लिहित राहा. शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. माझे जन्मगाव माडगुळे आहे. या दिग्गज मंडळींना मी जवळून पहिले आहे..अर्थातच मलाही लिखाणाची थोडीफार आवड आहे.. प्रयत्न चालू आहे...👍

    उत्तर द्याहटवा