घास घेण्यासाठी जाणारा
माझा हात जेवता जेवता अचानक थांबला. हात अचानक मोकळा मोकळा दिसतोय, असं वाटलं.
दोन्ही हाताची मनगटं तपासली. घरी जेवताना घड्याळ घालून जेवायची मला तशी सवयच नाही. त्यामुळं
डाव्या हाताचं मनगट मोकळं राहिलं तरी काही हरकत नसते. आज उजव्या हाताच्या मनगटात
काहीतरी कमी-जास्त झालंय असंच वाटलं. क्षणभर काहीच सुचलं नाही. नंतर अचानक लक्षात
आलं, हाताच्या मनगटावर माझ्या काकीनं बांधलेला करगुट्याचा छोटा गोफ कुठंतरी निसटून
पडला होता.
करगुटा. कमरेला
बांधतात तो काळा धागा. त्याला आमच्या गावाकडे 'करगुटा' म्हणतात. लहानपणापासूनच
करगुट्याशी आमची नाळ जुळलेली होती. लहानपणी कमरेच्या भोवती असणारा हा करगुटा
कालांतराने मागे पडला होता. कधी कमरेला असायचा, कधी नसायचाही. गेल्या काही
महिन्यांपूर्वी आमच्या आक्काला, माझ्या आज्जीला आमच्या कमरेला करगुटा नसल्याचा शोध
लागला होता. तिनं गावाहून रंगबेरंगी करगुटे आणले होते. ते कमरेला बांधायचा कंटाळा
आला, थोडं वेगळं काहीतरी करू वाटलं, म्हणून मग 'त्या करगुट्याचा गोफ करून देते
मनगटाला,' म्हटल्यावर मी तो करगुट्याचा गोफ काकींकडून बांधून घेतला होता. तोच गोफ आज
सकाळपर्यंत उजव्या हातात कायम होता. आज सकाळी खूप दिवसांनंतर क्रिकेट खेळायला गेलो
होतो. उजव्या हाताने फास्ट बॉलिंग करायच्या नादात तो करगुट्याचा गोफ कुठंतरी
पडलेला असणारे, असं आत्तापर्यंतच्या संशोधनातून जाणवतंय.
तसं बघायला गेलं, तो
करगुटा म्हणजे खूप काही मोठी मौल्यवान वस्तू आहे किंवा त्याला खूप काही महत्त्व
आहे, असं नाही. पण तो आपल्याला बांधताना समोरच्यानी ज्या भावनेने तो आपल्याला
बांधला आहे, ती भावना माझ्यासाठी महत्त्वाची ठरलीये, कायमच. माझ्या लेखी ते
फ्रेंडशिप बँड-बिंड असतात ना, त्याच्यापेक्षा कित्तेक पट महत्त्वाचा हा करगुटा
असावा. त्या फ्रेंडशिप बँडच्या नादी मी कधी तितका लागलो नाही. कोणी ते बांधावेत
म्हणून पुढे-पुढेही केलं नाही, पण आक्का – दादांनी 'करगुटा कुटंय,' म्हणून विचारलं, की
मी आपलं कमरेला चाचपून बघायचो, आणि नसला, तर त्यांच्याच फुडं शर्ट वा बनियन वर
करून उभा राहायचो. 'बांधा' म्हणायचो. मी मोठा झाल्यावर हे प्रकार थांबले, पण 'करगुट्याला
नाही म्हणायचं नाही,' ही भावना मात्र कायमच राहिली. त्यातूनच मग एका नव्या फॅशनने
त्या रंगबेरंगी करगुट्याचा काकीने केलेला गोफ मी उजव्या हातात बांधून घेतला होता.
एखाद्या फ्रेंडशिप बँड किंवा ते ब्रेसलेट की काय म्हणतात ना तसा.
एरवी जे करगुटे
बाजारात मिळतात ना, ते शक्यतो काळ्या रंगाच्या धाग्यातलेच असतात. आक्काही शक्यतो
आमच्यासाठी काळ्या रंगाचेच करगुटे आणते. या वेळी तिने त्या काळ्या करगुट्यांसोबत
काही लाल-केसरी-पांढऱ्या धागे एकत्र करून बनवलेले करगुटे आणले होते. त्यातलाच एक
करगुटा मी हातावर गोफासारखा बांधला होता. मी शक्यतो कोणत्या श्रद्धा-
अंधश्रद्धांच्या भानगडीत पडत नाही. आक्काने सांगितलं 'बांध', काकी म्हणाली 'बांध', म्हणून मी आपलं म्हटलं, 'हं ठिक आहे, बांधा.' असं इतकं साधं सरळ ते प्रकरण.
करगुट्याची विण मात्र एवढी साधी-सरळ नसतेय. दिसायला तो एकच जाड धागा वाटत असला,
तरी त्यात अनेक धागे एकत्र करून, ते अगदी पद्धतशीरपणे एकमेकांमध्ये गुंतवून तो
करगुटा तयार होत असतो. करगुट्याच्या या अनेक धाग्यांपैकी एखादा धागा जरी आपण ओढून
काढायचा म्हटलं ना, तर तो आख्खा करगुटा विस्कळीत होतो. आपल्या माणसा- माणसातल्या
नात्यांची विणही अशीच असते ना. नाती वरकरणी खूप सोपी वाटतात. वेगवेगळी नाती
एकमेकांमध्ये घट्ट विणली जातात आणि मग त्यातलंच एखादं नातं तोडायचं म्हटलं की
सगळीच नाती आणि त्या नात्यांची माणसं कुरबुरायला लागतात.
करगुटा का बांधतात,
त्याला करगुटाच का म्हणतात, शुद्ध भाषेमध्ये करगुट्याला काही शब्द आहे की नाही
असल्या प्रश्नांच्या भानगडीत मी पडलेलो नाही. लोकं काळा धागा म्हणूनही तो कमरेला
बांधतात, आणि काही लोकं माझ्यासारखी, कोणीतरी जवळच्या माणसानं सांगितलंय म्हणूनही
कमरेला, हाताला बांधून घेतात. माझ्या लेखी करगुटा बांधण्यापेक्षा तो बांधण्यामागची
भावना समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. कोणीही उगाचच काहीतरी कधीच करत नसतं.
त्यामागे निश्चितच काहीतरी कारण असतं. करगुटा बांधण्यामागे आणि तो बांधून
घेण्यामागे जी सहजता आपल्याकडे आली आहे, ती आता एक परंपरा म्हणून आपण पाहू शकतो. पण, ही परंपरा सुरू होण्यामागे नेमकं कारण काय, हे जर विचारात घ्यावंस वाटत असेल,
तर आपल्याला आपल्या नातेसंबंधांमध्येच शिरावं लागेल. कारण, या करगुट्याची नाळ
कदाचित या नातेसंबंधांशी जोडली गेली असावी.
आपल्या त्या आजच्या फ्रेडंशिप बँड वा
ब्रसेलेटसारखं करगुट्याचं मार्केटिंग झालं नसलं, तरी त्याचं महत्त्व त्यांच्यापेक्षा
एक तसूभरही कमी नाही. करगुट्याकडं आपली शहरी लोकं कदाचित जुनी गोष्ट, काहीतरी
फालतू बाब किंवा गावंढळपणाचं एक लक्षण म्हणून पाहतात. पण, त्यावेळी ते ही
नात्यांची नाळ विसरतात असं वाटतंय. मला ती नाळ
विसरायचीच नाहीये कधी. चांगलं असतं आपलं आपल्या माणसांमध्ये राहिलेलं. आता आक्काला
समजलं ना, की माझ्याकडे करगुटा नाहीये, तर ती नक्कीच माझ्यासाठी कुठून तरी एखादा
करगुटा काढून देईल. 'बांध' म्हणेल, 'चांगलं असतं बांधलेला,' असं तिचं तीच सांगले. मला
महत्त्वाचं काय असेल, तर मी अजूनही तिनं सांगितलेलं ऐकतोय हे पाहताना तिच्या चेहऱ्यावर
आलेलं समाधान. बास्स. असं समाधान एखादा फ्रेंडशिप बँड निश्चितच तिच्या चेहऱ्यावर
आणणार नाही ना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा