मित्राच्या दुकानात उभा होतो. गप्पा- गप्पांच्या
ओघात त्याच्या ट्रिपचा विषय निघाला. तो म्हणाला,
लय
धम्माल केली आम्ही त्या ट्रिपला. सगळे मित्र मित्र मिळून गेलो होतो. तिथं गेल्यावर
तुम्हाला नवल वाटंल, पण
आम्ही अगदी लपाछिपीसुदा खेळलो. ल्हानपणी खेळायचो तशी. आता तसं काय करता येत नाय म्हणून
त्या धिंगान्याच्या आठवनींनीच ट्रिपवरनं येताना लय रडलो. पण लय मजा आली.... ल्हानपनचे
दिवस लय न्यारे व्होते. ल्हानपनी लय धमाल केली,
आता
तसं काही करता येत नाही...
त्याच्यासोबतच्या त्या गप्पांमध्ये आमच्या लहाणपणींच्या
आठवणींनाही ओझरता उजाळा मिळाला. मागे एकदा एका सरांच्या एफबी स्टेटसवर वो कागझ की कश्ती
वा बारिश का पानी... या गझलचा उल्लेख होता. त्यावेळीही असंच झालं होतं. ओझरता का होईना,
पण लहानपणी काय काय केलंय, याचा आढावा घेतला होता. मित्राच्या दुकानावरून घराकडे परत
येताना, तिच गझल डोक्यात सुरू होती. मला तशी खूप शांत अशी गाणी फारशी आवडत नाहीत. सालं
जमान्याभरचं दुःख त्या शांत चालींमध्ये भरून, सेंटी व्हायला कोण सांगतं, त्यापेक्षा
उडत्या चालीची गाणी ऐका नी मस्त मूड बनवा ही माझी त्या मागची फिलॉसॉफी. ही गझल त्याला
तशी अपवादच.
शाळेत असताना बापाच्या वा आजोबांच्या नावावरून
मित्रांना चिडवणं, मुद्दाम घरच्यांसमोर भाऊ कुटं गेला, सांगू का भाऊला असं म्हणणं,
शाळेच्या बाहेर गोळ्या विकणाऱ्या आजोबांजवळ मिळणारे ते चाराण्याचे छोटे समोसे, बोरकुटच्या
पुड्या शेअर करून खाणं, त्यावेळी अगदी नव्या नव्या आलेल्या अल्पेनलिबेच्या
अटीवर वेगवेगळ्या बेट लावणं सगळं सगळं असं डोळ्यासमोरून गेलं. दोन गोष्टी तर कायम लक्षात
असतात, एक म्हणजे ते पारलेचं चॉकलेट आणि दुसरी म्हणजे बॉबी. पारलेच्या त्या चॉकलेटची
चव आत्ताच्या कॅडबरीलाही लाजवले अशीच भासते. त्या पिवळ्या पिवळ्या बॉब्या हाताच्या
पाचही बोटात घालून, बोटं नाचवत नाचवत खाण्यातील मजाही काही वेगळीच होती. आता ते सगळं
संपलं असं म्हणता येत नाही, पण तसं करायला आता लाज वाटते.
मित्राच्या बोलण्यातून अशाच सर्व गोष्टींचा
रेफ्रन्स आला. आमचा एक कॉमन दोस्त आणि हा पठ्ठा दुकानात फावल्या वेळेत पेप्सी कांड्या
चोखत बसल्याची आठवण त्याने काढली. उन्हाळ्याच्या सुट्टीत फलटणला गेल्यावर गारेगारवाल्याकडून
ते गारेगार आइस्क्रीम, पेप्सीच्या कांड्या घेऊन भर उन्हात ते खाण्यात मिळणारा गारवा
एसीमध्ये बसून आइस्क्रीम खाण्यातही नाही जाणवत कधी. आत्ताच्या लहान पोरांना पेप्सी
म्हणजे कॅनवाली किंवा बाटलीवाली पेप्सीच आठवते. फॅन्ड्री बघायला थेटरमध्ये गेलो होतो.
पिक्चरमध्ये एक- दोन ठिकाणी तशाच पेप्सीचा उल्लेख आहे. ते पेप्सी ऐकल्यावर आमच्या समोरच्या
लाइनीत बसलेल्या एका लहान पोराना चुळबुळ सुरू केली होती. त्याच्या पप्पाला विचारत होता,
पप्पा पेप्सी म्हणतायेत, पण दिसत तर कुटं नाही. त्याचा पप्पा त्याला काहीच सांगू शकत
नव्हता. बाहेर गेल्यावर घेऊ, आता पिक्चर बघ असं सांगून त्याने आपल्या कार्यकर्त्याला
शांत केलं. ना पप्पाची चुकी ना त्याच्या कार्यकर्त्याची. जमानाच बदलतोय तर काय.
आपण आता मोठ्ठे झाल्यासारखे वागायला लागलो,
म्हणजे काय लय शाणे झालो का. आनंद मिळवायच्या ल्हानपणीच्या पद्धती लय सोप्या होत्या.
मोठं व्हायला लागलो, तशा त्या पद्धती अवघड करत चाललोय. ल्हानपणी एखाद्याची चप्पल उलटी
करून ठेवली, तरी काय आनंद व्हायचा. आता पायात वूडलँड, नायके, अदिदासचा घातला तरी आपल्याला
कम्फर्टेबल वाटत नाही. आनंदच नसतो ना, पैशाचं मोल तपासतो आपण. पैशाचं मोल तपासायला
गेलं की मग आनंद महाग होतो. आपण जेवढं मोठं होणार तेवढा महाग आनंद आपल्याला हवाहवासा
वाटायला लागतो. पळतोय आपण त्या महाग आनंदामागं. जगणं विसरून...
गप्पा- गप्पांच्या ओघात असलं काही तरी भन्नाट
चर्चेला आलं. डोक्यात ते सगळं घोळ घोळ घोळलं. बॅकग्राउंडला वो कागझ की कश्ती होतंच.
ते असंच सुरू राहणार आहे असं दिसतंय. निरागसता संपून मतलबीपणा सुरू झाला की सालं हे
असंच व्हायला लागतं. छोट्या, साध्या गोष्टींमधून मिळणारा आनंद आपल्याला नकोस वाटायला
लागतो. आपण मोठे व्हायला लागतो. छोट्या गोष्टींची जागा ब्रँड घेतात. मग ब्रँड्स नी
त्यांच्यामुळे मिळणारे एक्स्पिरिअन्स यांची तुलना करायला लागतो, पुन्हा तो आधीचा आनंद
महाग करत जातो. थोडक्यात काय तर मोठ्ठं व्हायचंय तर महाग आनंद निवडा. छ्या. नाही पटत
राव. पुढच्या वेळी दोस्ताच्या दुकानावर गेलो ना की मीही त्या पॅप्स्या चोखून खाणारच
आहे. वो मजा कुछ और ही है. वो कागझ की कश्ती, वो बारिश का पानी...
bhariii!!!
उत्तर द्याहटवा