बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

पुस्तकं, पेन नी पिंटो

बघायला गेलं, तर माझं पुस्तकांविषयीचं प्रेम तस जुनंच. पेनांच्या बाबतीतही जवळपास तिच परिस्थिती. वडील, मामा प्राध्यापक. त्यामुळं घरात लहानपणापासूनच पुस्तकांच्या ढिगांमध्ये वावरण्याची सवय लागलेली. मामाकडे तर साठवून ठेवलेल्या पेनचा खजानाच असे. ते त्यांची सुटकेस कधी उघडतात, याकडे माझं तसं बारीक लक्ष असायचं. सुटकेस उघडली की हमखास एखादं तरी पेन मिळे. त्यांच्या लेखी ते जुने, आमच्यासाठी मात्र नवं कोरं, रिफिल टाकली की काम झालं. वडील बाहेरगावी गेल्यावर आम्हाला तिकडचं खायची काही चीज आणतील याची खात्री नसायची. हं, प्रत्येकवळी त्यांच्या बॅगमधून खास आमच्यासाठी म्हणून नाव घालून आणलेली पुस्तकं मात्र सापडायचीच. त्यासोबतच वाढदिवसांच्या दिवशीही पुस्तक खरेदी व्हायची. त्यामुळे पुस्तकांचा लळा तसा लहानपणापासूनच लागला. खेळून खेळून थकलो नी अभ्यासाच्या पुस्तकांनाही हात लावू वाटेना, की ही पुस्तकं खूप मदत करायची त्यावेळी. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी का होईना वाचतोय, याचं त्यावेळी घरच्यांनाही समाधान असे. या दोन्ही गोष्टी एकदम आठवायचं कारण ठरले ते पिंटो. रानडेतल्या माझ्या दोस्तांना या नावाची नव्याने ओळख देण्याची तशी गरज नाही. इतरांसाठी सांगायचं तर ते आमचे रानडेतले पत्रकारितेचे मास्तर. मास्तर म्हणायचं कारण ते वर्गात तसेच असत, पण वर्गाबाहेर मात्र एक अप्रतिम माणूस.  खरं तर हा ब्लॉग मी त्यांच्याच एका असाइन्मेंटसाठी म्हणून सुरू केला होता. त्यांनीच ब्लॉगची ही भानगड वर्गात सांगितली होती नी तो सुरू करायलाही भाग पाडलं होतं. आता तो अधूनमधूनसाठी का होईना पण, अजूनही सुरू आहे.

परवा त्यांचा व्हॉट्सअपवर मेसेज होता. विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमाच्या गडबडीत असल्याने, मी तो पाहिलाही नव्हता. थोड्या वेळाने लक्षात आलं, तेव्हा त्यांच्यानंतर आलेले इतरांचे मेसेज त्यांच्या मेसेजच्या वर येऊन पडले होते. सगळ्यात वर सोनालीचा मेसेज होता, 'उद्या पिंटो सरांकडे जायचं का? ते विचारतायेत. दोन- तीन तासांचं काम आहे. त्यांना मदत हवीये. वेळ असेल तर, मला सांगा म्हणतायेत,'. मी म्हटलं, 'बोलूयात संध्याकाळी,'. तोपर्यंत परत मेसेज, 'सर माझ्याशी बोलतायेत आत्ता...' मी म्हटलं, 'जाऊयात आपण, वेळ तूच कळव त्यांना,'. असं सांगून मी आपलं पुन्हा कार्यक्रमाच्या वातावरणात शिरलो. त्यांचं नेमकं काय काम होतं ते माहिती नव्हतं, मी विचारायच्या भानगडीतही पडलो नव्हतो. संध्याकाळी समजलं, पुस्तकांच्या संदर्भाने काही तरी आहे. त्यांच्या घराचं शिफ्टिंग आहे. त्यांच्याकडे काही महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यातली जी आवडतील, ती पुस्तकं घेऊन जायला त्यांची परवानगी आहे वगैरे वगैरे. खरं तर त्यांच्याकडे जायचं प्लॅनिंग आमचं ख्रिसमसपूर्वीही एकदा ठरलं होतं. पण ते काही जुळून आलं नाही. या वेळी म्हटलं जाऊनच येऊयात.

शनिवारच्या सुट्टीदिवशीचा चांगला प्लॅन म्हणून मी त्यांच्या घराकडे गाडी वळवली. सहकारनगर भागातल्या 'आपली सोसायटी'च्या बोर्डजवळ थांबून ते तिथेच राहतात ना याची खात्री करून घेतली नी गेलो आत. घरासमोर उभं राहून बेल वाजवली. मला दारात बघताच पिंटो सर नेहमीच्याच पद्धतीने म्हणाले, 'अरे ये भाऊ. मी किती वेळ तुझी वाट बघत होतो. ये बैस. तुझ्यासाठी म्हणून काढून ठेवलेली पुस्तकं मी पुन्हा आत ठेवूनही दिली. आता तूच आण ती बाहेर आणि निवडून घे हवी ती.' आत गेल्यावर आजूबाजूला आवराआवरीसाठी म्हणून काढलेल्या सगळ्या वस्तू, पुस्तकं काढलेली दिसली. घराचं शिफ्टिंग होणार आहे. त्यामुळे मग सगळंच काढलंय. व्यवस्थित पॅकिंग करून सामान हलवायचंय असं सगळं सगळं या दरम्यानच्या काळात समजलं. थोडं निवांत झाल्यावर मग पिंटोंनी पुन्हा आत बोलवलं. 'त्या दोन पिशव्या काढ. त्यात तुझ्यासाठीची म्हणून पुस्तकं आहेत. त्यातून तुला जी हवी आहेत, ती निवडून घे,' असं सांगत त्यांनी दोन भल्या मोठ्ठ्या पिशव्यांकडे बोट दाखवलं. पिशव्यांच्या आकारावरूनच त्या मला उचलता येणार नाहीत हे लक्षात आलं होतं. मी त्या पिशव्या ढकलतंच बाहेर काढल्या. पिशव्यांमधला खजाना एकेककरून बाहेर काढायला सुरुवात केली.

'तुझ्यासाठी निवडून ठेवलेली पुस्तकं,' असं ते का म्हणाले, याचं कारण ही पुस्तकं बाहेर काढताना जाणवू लागलं. काही पुस्तकं खास विज्ञानाला वाहिलेली अशी दिसत होती. काही पुस्तकं पत्रकारितेशी संबंधित अशी होती. 'द लाइफ ऑफ पाश्चर' हे लुई पाश्चरच्या जीवनाची माहिती देणारं १९१९ साली प्रकाशित झालेलं पुस्तक, 'ग्रेट आयडियाज इन फिजिक्स' हे फिजिक्सच्या विविध तत्त्वांची रंजक पद्धतीने माहिती देणारं पुस्तक, 'द सागा ऑफ इंडियन सायन्स सिन्स इंडिपेन्डन्स' हे भारतातील विज्ञान- तंत्रज्ञानाच्या वाटचालीचा आढावा घेणारे पुस्तक, 'अब्लेझ- द स्टोरी ऑफ चर्नोबिल' हे चर्नोबिल दुर्घटनेवर आधारित पुस्तक, 'व्हाय आर थिंग्स द वे दे आर?' हे विज्ञानातील छोट्या छोट्या तत्त्वांवर प्रकाश टाकणारं पुस्तक, लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीने १९८३ मध्ये प्रकाशित केलेलं 'वॉटर' हे फक्त पाण्यावर आधारित पुस्तक अशी विज्ञानाला वाहिलेली एकसे बढकर एक पुस्तकं त्यात होती. 'रिप्रेझेंटिंग ऑर्डर' हे क्राइम आणि कोर्ट रिपोर्टिंगवर आधारित पुस्तक, 'बेटर सेड अँड क्लिअर्ली रिटन' हे बिझनेस कम्युनिकेशनवर आधारित पुस्तक, जवाहरलाल नेहरूंच 'द डिस्कव्हरी ऑफ इंडिया', सुशिला नायर आणि कमला मानकेकर यांनी संपादीत केलेलं 'विमेन पायोनिअर्स इन इंडियाज रेनिसान्स' हे पुस्तकंही याच खजिन्यात सापडलं. अशा इंग्रजी पुस्तकांसोबतच राजा मंगळवेढेकरांचं 'हिरवे सोबती' हे झाडांची माहिती देणारं पुस्तक, 'गोमंतकाची भूषणे' हे गोव्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती देणारं पुस्तक, प्रभा गणोरकर यांनी संपादित केलेलं 'बोरकरांची निवडक कविता' हे कवितेवर आधारित पुस्तक, 'हिंदू संस्कृती आणि स्त्री' हे आ. ह. साळुंखे यांचं पुस्तक, अगदी ताजं म्हणायला डॉ. पंडित विद्यासागरांनी लिहिलेलं 'ओवी गाऊ विज्ञानाची' हे पुस्तक, अशी मराठी पुस्तकही या दोन पिशव्यांमधून बाहेर आली. अर्थातच अशी सारी पुस्तकं निवडून मी माझ्यासाठी वेगळी काढली.


हे झालं की त्यांनी मला वेळ आहे का, ते विचारलं. मी म्हटलं, 'आहे सर'. मग त्यांनी आत एका कोपऱ्यात ठेवलेल्या एका बॉक्सकडे बोट दाखवत म्हणाले, 'हे बघ भाऊ, हा जो बॉक्स आहे ना, त्यात माझ्याकडची 'टेन आऊट ऑफ टेन'वाली पुस्तकं आहेत. तू निवडलेली पुस्तकं 'वन आऊट ऑफ टेन'वाली आहेत. त्या बॉक्समधली पुस्तकं सध्या तरी मी कोणालाही देणार नाहीये. कारण ती मला कधीकधी लागतात. पण तू एक काम करू शकतोस. तू ती पुस्तकं बघू शकतोस. त्यातून जी पुस्तकं तुला हवी आहेत, असं वाटेल, त्या पुस्तकांची नावं तू त्या वहीमध्ये लिहून ठेव. वर लिही 'सर, प्लिज रिझर्व्ह फॉलोइंग बूक्स फॉर मी,' आणि खाली तुझं नाव लिहून पुस्तकांची यादी नीट लिहून ठेव. मग मला ज्यावेळी वाटेल की ती पुस्तकं द्यायची आहेत, त्यावेळी मी त्यातली तुला हवी असलेली पुस्तकं तुलाच देईन.' मग काय, ते भलं मोठ्ठं खोकं मी ढकलतच बाहेर आणलं. साधारण अर्धा- पाऊण तास त्या खोक्यातून पुस्तकं काढणं, ते चाळणं आणि हवं असेल तर त्या यादीत नोंद करून ठेवण्याचा कार्यक्रम झाला. दरम्यानच्या काळात एक मस्त फक्कड कॉफीही झाली. ती पुस्तकांची यादी झाल्यावर पुस्तकं जशी काढली होती, तशीच, त्याच क्रमाने आणि त्याच ठिकाणी ती खोक्यामध्ये पुन्हा भरून ठेवली. पुस्तकांना हात लावण्याआधी पिंटोंनी तशी अटच घातली होती. ते खोकंही जागच्या जागी परत गेलं.

पुस्तकं व्यवस्थित नेण्यासाठी म्हणून त्यांनी मला एक भली मोठी पिशवी आणून दिली. त्यात ती पुस्तकं भरली नी मी निघायच्या तयारीला लागलो. दारात जाऊन चप्पल घालेपर्यंत पुन्हा त्यांनी हाक मारली. 'भाऊ, तुला पेन आवडतात का?', नाही म्हणायचा संबंधच नव्हता. 'माझ्याकडे खूप सारे पेन आहेत. त्यातले काही तर वापरलेलेही नाहीत. तुला हवे असतील, तर त्यातले घेऊन जा,' म्हणत त्यांनी मला पुन्हा आत नेलं. एक प्लॅस्टिकची पिशवी हातात दिली. त्या पिशवीत पेनचे खूप सारे बॉक्स होते. मी एकेक करून ते बॉक्स पाहू लागलो. सर्वच तशी महागडी पेन होती. घेऊ का नको, असा विचार मनात येत होता. सर म्हणाले, 'तू बिनधास्त हवं ते घेऊन जा. मी 'महाराष्ट्र हेराल्ड'मध्ये एडिटर असताना अशी खूप सारी पेन आम्हाला मिळत असत. मी त्या वेळीही वाटूत टाकत होतो. आताही तसंच करतो.' मग मी त्यातून दोन थोडे वेगळे बॉक्स निवडले. एक अगदी नाजूकसं पेन आहे. नंतर पाहिल्यावर समजलं, की ते जपानी पेन 'सन प्रिन्स' नावाच्या कोणा कंपनीचं आहे. आपल्या हातात ते खूपच लहान दिसतं, पण खूपच छान आहे. नी दुसरा बॉक्स होता तो एक फाउंटन नी एक रॉलर पेन एकत्र असलेला. असे दोन पेनचे बॉक्स मी घेतले, नी बास म्हणत त्यांचा निरोप घेतला.

पुस्तकांच्या पिशवीवरच ते पेनचे दोन बॉक्स ठेवले नी दारात आलो. ते मला सोडायला दारात आले. चप्पल घातली नी पिशवी दोन्ही हातांनी उचलतानाच त्यांनी मला निरोप देण्यासाठी जवळ घेतलं. दोन्ही हातांनी माझ्या दोन्ही गालांवरून हात फिरवत म्हणाले, 'योगेश अल्वेज बी ए गुड बॉय.' मी म्हणालो, 'डेफिनेटली सर'. लाइट गेल्याने जिन्यात अंधार होता. मी हळूहळू जिना उतरत होतो. तेवढ्यात लाईट आले. ते पुन्हा वरून म्हणाले, 'भाऊ तू एकदम लकी आहेस बघ. सोनालीलाही सांग. पुढच्या वेळी तिला घेऊन ये. तिला सांग मेहनत करावी लागते. तू इथे येण्याची मेहनत घेतलीस म्हणून तुला पुस्तकं दिली, ती आली की तिलाही देईन...' अशी प्रेम करणारी, नुसतं बोलूनच नव्हे, तर कृतीतून दातृत्व शिकवणारी, छोट्या छोट्या गोष्टीतून मेहनतीचं चीज होणं काय असतं हे दाखवून देणारी माणसं आपल्यासोबत असल्याची जाणीव झाली, तर कोणाला वाटणार नाही की आपण लकी आहोत म्हणून. है ना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा