दोन दिवस भुसावळला चक्कर मारून आलो.
पहिल्यांदाच पुण्यातून एकट्याने गाडी चालवत भुसावळला घेऊन गेलो होतो. त्यामुळं
माझ्यासाठी पुणे- भुसावळ- पुणे हा प्रवास तसा एक्सायटिंग असाच ठरला होता. तिकडं
जाण्याचं कारण म्हणजे भाऊंच्या, माझ्या
वडिलांच्या तीन कवितासंग्रहांचं प्रकाशन आणि त्या निमित्ताने आयोजित एक छोटेखानी
कार्यक्रम. 'वाट
वळणाची', 'माय
गाणं' आणि 'मानसगान'
हे ते तीन कवितासंग्रह. 'वाट
वळणाची'साठी कवी
म्हणून '
प्रा. सोपान बोराटे ' असं
लिहावं लागणारे भाऊ, 'मानसगान'
प्रकाशित होईपर्यंत,
माझ्या आईने सारखं मागे लागून पीएचडी
करायला लावल्यानं डॉ. सोपान बोराटे झालेत. सायकॉलॉजी हा त्यांचा विषय आणि त्याच
विषयात ध्यानधारणेचा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक कामगिरीवर होत असलेला परिणाम
अभ्यासून त्यांनी पीएचडी केली. कवितासंग्रहांचे विषय मात्र तसे सामाजिक. 'वाट
वळणाची' हा
एड्सविषयी, तर 'माय
गाणं' हा
स्त्री-भ्रूणहत्या, दुष्काळ,
प्रदूषण अशा वेगवेगळ्या सामाजिक
समस्यांविषयी भाष्य करणारा कवितासंग्रह. 'मानसगान'
कवितासंग्रहामध्ये मात्र तसं सगळं
मानसशास्त्रच. गद्य लेखनातून डोक्यात उतरलेलं आपलं शास्त्र विद्यार्थी-
विद्यार्थिनींनी कवितेच्या आधारे गुणगुणत राहावं, म्हणून
त्यांनी केलेले प्रयत्न या तिसऱ्या काव्यसंग्रहाचा भाग बनले आहेत. या तिन्ही
कवितासंग्रहांचं एकाचवेळी झालेलं प्रकाशन मी अनुभवलं. बातमीदार असलो,
तरी बातमी न लिहिता.
खरं तर,
त्यांचं कवितालेखन मी खूप लहानपणापासूनच
पाहात आलोय. कविता लिहिण्यासाठी, सुचल्या
सुचल्या ती कागदावर उतरवण्यासाठी ते पाठकोऱ्या कागदांचा वापर करायचे. कविता पक्की
लिहून झाली, की ती
डायरीमध्ये नोंदवून ठेवायचे. अशा कितीतरी डायऱ्या सध्या घरात आहेत. थोड्या मोठ्या,
सलग काही पानं चालणाऱ्या कविता
लिहिण्यासाठी नंतर त्यांनी फुलस्केपची कागदं वापरायला सुरुवात केली. अशा कविता
एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी मग अगदी पातळ आणि पारदर्शी अशा प्लॅस्टिकच्या ए- 4
आकाराचा कागद बसेल अशा पिशवीत ही कागदं
ठेवायला सुरुवात केली. कविता लिहिलेली ही
कागदं त्यांनी फायलिंग करून ठेवल्याने, कच्च्या
स्वरुपातील त्यांचे ते न छापलेले कवितासंग्रहच बनलेत. अक्षरशः हजारो कविता त्यांनी
अशाच पद्धतीने लिहिल्या आहेत. त्याच्या जाडजूड फाइल्स घरात कपाटात ठेवल्या आहेत.
त्यातल्याच काही कवितांचे आता संग्रह बनलेत.
या संग्रहांचं आता प्रकाशन होतंय, असे
विचार एकदम सर्रकन डोळ्यासमोरून ओझरते निघून गेले. प्रकाशनच्या ठिकाणी गेल्यावर
अशा सर्वच आठवणी आपोआपच डोळ्यासमोर येत गेल्या. समोरचे वक्ते बोलत गेले,
मी त्यांच्या बोलण्याच्या संदर्भाने भाऊंचं
वागणं पाहात गेलो. बातमी तर लिहायचीच नव्हती, त्यामुळं
मग त्यावेळचे नी आत्ताचे सगळे संदर्भ जोडत राहिलो. त्यांच्या कवितांसाठी म्हणून
एखादा ब्लॉग सुरू करावा, असं
खूप दिवस डोक्यात आहे. त्यांच्या कविता काही हजारांमध्ये असल्यानं,
हे काम करायचं म्हणजे फक्त हेच काम असंच
करावं लागणार आहे, याची
जाणीव आहे. आता त्यांचं लेखन प्रकाशित व्हायला सुरुवात झालीये म्हटल्यावर हे काम
करायलाही निश्चितच बळ मिळणार आहे.
प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी
जळगावचे प्रा. डॉ. किसन पाटील , भुसावळमध्ये
मी ज्या नाहाटा कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजचे डॉ. के. के. अहिरे हे मराठी विषय
आणि त्यातही कवितेच्या प्रांतात सहजतेने वावरणारे लोक उपस्थित होते. भाऊंचे
मानसशास्त्रामधले गुरु आणि मानसशास्त्रात ज्यांच नाव दिग्गजांपैकी एक असं म्हणून
विचारात घेतलं जातं ते डॉ. सी. जी. देशपांडे सरही खास पुण्याहून भुसावळला आले
होते. 'पहिल्या
दोन कवितासंग्रहांविषयी भाष्य करायला मराठी साहित्यातील अभ्यासक मंडळी योग्य आहेत.
मात्र, मानसशास्त्राविषयी
डॉ. बोराटेंनी लिहिलेल्या कवितांविषयी भाष्य करायला मानसशास्त्र जाणणारा नी त्याचं
कवितेत रुपांतर झाल्यावर त्याचं महत्त्व समजलेला माणूसच हवा,'
हे डॉ. देशपांडेंचं मत त्यांच्या मनोगतातून
नंतर व्यक्तही झालं आणि उपस्थितांनाही ते पटलं. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला,
त्या स्वातंत्रसैनिक नामदेवराव चौधरी
सार्वजनिक वाचनालय- ग्रंथालयाच्या कार्यकारणीचे प्रमुख आणि आमच्या नाहाटा कॉलेजचे
माजी ग्रंथपाल, कॉलेजच्या
कल्चरल कार्यक्रमांच्या टीमसाठी कायमच हवेहवेसे वाटणारे आमचे देशमुख सर,
तिथल्या लोकांसाठीचे डॉ. डी. एम. देशमुख सर
तिथं होते. महत्त्वाचं म्हणजे भाऊंचे भुसावळमध्ये गेल्यापासूनचे अगदी जवळचे मित्र
आणि सध्या जळगावला प्राचार्य असणारे लोहार काका, प्राचार्य
डॉ. अनिल लोहार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रकाशक मंडळी नी आमच्या
बोराटे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्यांचा गोतावळाही तिथं या कार्यक्रमासाठी म्हणून
हजर राहिला होता.
कार्यक्रमात बोलणाऱ्या प्रत्येकानेच
भाऊंची वैशिष्ट्ये सगळ्यांना सांगितली. भाऊंना वेगवेगळ्या निमित्ताने अनुभवलेल्या
व्यक्तींना ती नवी नव्हती, मात्र
ती अशी जाहीरपणे सगळ्यांना सांगणे, त्यांचं
कौतुक करणे हे सगळ्यांनाच काहीसं नवं होतं. भाऊंना जे जवळून ओळखतात,
त्यांना त्यांचा स्वभावही व्यवस्थित माहिती
आहे. कार्यक्रमाचे सोपस्कार, असे
कौतुक सोहळे वगैरेत ते कधी अडकून पडले नाहीत, पडणारही
नाहीत. आपलं काम आपण करत राहायचं, या
हिशेबाने त्यांनी राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्ध
निर्मूलन समितीमधून आपलं काम केलंय. महत्त्वाचं म्हणजे त्याचा कॉलेजमधल्या आपल्या
शिकवण्यावर परिणाम होऊ न देता. कॉलेजमध्ये सकाळी सकाळी पहिलं लेक्चर घेणं तसं अनेक
प्राध्यापकांना आवडत नसतं. बातमीदारीच्या निमित्तानं मी शिक्षण क्षेत्रातले
बारकावे पाहताना या क्षेत्राचे न पाहिलेले रंगही अनुभवत चाललोय. त्यातलाच तो
प्रकार, पण भाऊंनी ते पहिलं लेक्चर मुद्दाम कधीच चुकवलं नाही. घरातून अभ्यास करून
गेल्याशिवाय वर्गात शिकवायला उभं राहायचं नाही, जे
वर्गात शिकवायचंय ते किमान दोनदा वाचून मगच वर्गात शिकवायला जायचं,
हा नियम ते पाळतात. आमचा मामा प्राध्यापक
झाल्यावर त्यालाच नाही, तर
त्यांचे जे जे विद्यार्थी शिक्षक बनले त्यांनाही त्यांनी अनेकदा त्यांचा हा नियम
सांगितलेला मी स्वतः ऐकलाय. ते हा नियम स्वतः पाळतात हे मी घरात पाहिलंय. घरातले
बाकीचे सगळे उठायच्या आधीच ते त्यांचं काम करत बसलेले मी नेहमीच पाहात आलोय.
त्यांचं शिकवणं, त्यांचं
कवितालेखन, त्यांचं
सामाजिक कार्य आणि शेवटी फक्त प्राध्यापक म्हणून नाही,
तर एक चांगला माणूस म्हणून प्रत्येकाशी
जोडलेलं त्यांचं नातं या कार्यक्रमात पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. हे सगळं आम्हा
सगळ्यांसाठीच किती महत्त्वाचं होतं, ते
आईच्या डोळ्यात आलेल्या पाण्याने सगळ्यांनाच जाणवलं.
मस्तच सर
उत्तर द्याहटवामस्तच सर
उत्तर द्याहटवाVery great work.....
उत्तर द्याहटवाVery great work.....
उत्तर द्याहटवाGreat Borate Sir , I could know this from Yogesh's Blog . Any way heartiest congratulationss
उत्तर द्याहटवाSunil Pathak