रविवार, ९ एप्रिल, २०१७

गोंधळ... सिग्नलचा... आपला



नदीपात्रातला रस्ता सोडून राजाराम पुलाकडे वळलो, की समोर सिंहगड रोडवरचा तो चौक दिसला. सिंहगड रोडने पुण्याकडे नी पुण्याकडून सिंहगडाकडे ये- जा करणारी वाहनं दिसली. सिग्नल लाल झाल्यानं पुलाच्या मध्यावर आल्यानंतर गाडी हळू केली. चौकाच्या अलिकडे येऊन थांबलो. हेडफोनवर मंद आवाजात गाणं सुरू होतं, 'तुमने जो ना कहा मैं वो सुनता गया...'

 
सिग्नल नुकताच लाल झाला होता. त्यामुळं आजूबाजूची वाहनंही हळूहळू येऊन थांबली. गाड्या थांबलेल्या पाहून चौकात भीक मागणारी उघडी मुलं या गाड्यांकडे सरकली. एकेक करत गाडीपुढे जाऊन पैसे मागू लागली. माझ्या डाव्या बाजूला एका बाईकवर एक जोडपं होतं. मागे बसलेल्या मुलीच्या पायातल्या सँडलला हात लावत भीक मागणाऱ्या त्या मुलाने पैशांसाठी हात पसरले. माझ्या उजव्या बाजूच्या कारच्या काचा तोपर्यंत वर सरकलेल्या होत्या.

हवेत जाणवण्याइतपत उकाडा असल्यानं पाठीवरची सॅक थोडी मोकळी करायचा प्रयत्न केला. मोकळ्या हवेचा अंदाज घेत- घेत गाणं ऐकत राहिलो. कारच्या आत सुरू असलेल्या गाण्यांचा आवाज बाहेरही जाणवत होता. कारच्या डावीकडच्या सीटवर बसलेल्या मुलीच्या हातातल्या मोबाइलवर, त्या गाण्यांच्या तालावरच बोटं चॅटिंग सुरू असल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. तोपर्यंत त्या बाईकवाल्या पोरीने सँडल झटकला होता. तिच्या पुढच्या दोस्तानं दोन्ही पायांवर ती बाईक सांभाळत पाकीट काढलेलं दिसलं. पाकीटातनं सरळ दहाची नोट बाहेर आली. ती नोट त्या उघड्या पोरानं घेतली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. माझं लक्ष आहे हे जाणवताच, तो आनंद दिसू नये असा प्रयत्न करत गाडीकडे सरकला. मी आपलं गाण्याच्या ओळी गुणगुणल्या, 'तुमने जो न कहा मैं वो सुनता गया...'

या सिग्नलवरच्या वाहनांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणेच सिग्नल सुटायच्या आधीच गाड्या पुढे सरकल्या. मागचे हॉर्न ऐकून नाईलाजाने गाडीला स्टार्टर दिला. सिग्नल तसा नव्हताच. पुन्हा थांबलो. पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठीचा सिग्नल अजून सुरू होता. तो पिवळा होण्याची मी वाट बघत होतो. नेहमीच्या अनुभवानुसार, हा सिग्नल पिवळा झाला की राजाराम पुलाकडून पुण्याकडे वा सिंहगडाकडे जाणाऱ्या वाहनांचा सिग्नल काही सेकंदांमध्ये हिरवा होतो. त्या तयारीत मी होतो. माझ्या सिग्नलवर लक्ष होतं. सिंहगडाकडे जाण्यासाठीचा सिग्नल हिरवा झाला. गाडीचा गिअर टाकला. तोच सिंहगडाकडून पुण्याकडे जाण्यासाठी एक खासगी बस खूपच जोरात येताना दिसली. 

बसने त्या चौकातली पांढरी रेषाही ओलांडली होती. माझ्या समोरच्या दोन गाड्या त्या बसच्या अगदी टप्प्यात गेलेल्या होत्या. माझ्या गाडीचा गिअर बदलला असला, तरी दोन-चार फुटांपलीकडे मी सरकलो नव्हतो. बसच्या ड्रायव्हरने करकच्चून ब्रेक दाबला. नी त्या दोन गाडीवाल्यांना त्याचा सिग्नल दाखवत डोळे वटारले. त्याचाही सिग्नल हिरवाच होता. आमचा सिग्नल पिवळा होण्यापूर्वीच हिरवा झाला होता. चुकलं कोणीच नव्हतं. दोन्ही सिग्नल हिरवेच होते. दोन्ही रस्त्यांवरचे गाड्यांवाले नियम पाळून गाडी चालवत होते. मी दोन्हीकडचे सिग्नल बघितले. समोरच्या त्या दोन गाडीवाल्यांपैकी एका काकांनी बस ड्रायव्हरला आमचा हिरवा सिग्नल दाखवला, नी आता जाऊदे म्हणत त्याला थांबवून गाडी पुढे घेतली. त्यांच्यामागोमाग बाकीच्यांसोबत मीही निघालो. मनात म्हटलं सगळे तसे बरोबरच आहोत, सिग्नलच फक्त गोंधळलाय. गाणं अजून सुरूच होतं. 'तुमने जो ना कहा...'

सिंहगड रोडला लागण्यासाठी चौकाच्या मध्यापर्यंत येते तोच पुढच्या बाजूने एक काका रस्ता ओलांडायला आले. हात दाखवत, आपला सिग्नल बघत पुढे गेले. बाकीच्या गाड्या तो हात बघून हळू झाल्या होत्या, काही थांबल्या होत्या. एक मोठा ट्रकवाला मात्र ट्रक पुढे रेटतच होता. काकांना अगदी घासून पुढे आला. काका थबकले. हातवारे करत ओरडले. तोपर्यंत बाकीच्यांचा धीर सुटला होता, गाड्यांनी गिअर बदलले होते. त्यांच्या सर्वांच्याच लेखी सिग्नल सुटला होता. काका फक्त मागे सरकले होते. बाकीचे सगळे पुढे निघाले होते. मागे होता फक्त गोंधळ. सिग्नलचा. असे कितीतरी सिग्नल आपल्याला गोंधळात टाकतात ना. आपल्याला वाटतं आपण बरोबर, समोरच्याला वाटतं समोरचा बरोबर. दोघंही भिडतो एकमेकांना. त्यावेळचे असे गोंधळून टाकणारे सिग्नल कधी शोधत नाही ना. सिग्नल कळतच नसावेत, गोंधळ कधी कळायचे. गाणं थांबलं होतं. सिग्नलचा नी मनाचा असा गोंधळ करून.
  

२ टिप्पण्या: