रविवार, ७ मे, २०१७

वावटळ

दुपारच्या कडक उन्हाचा अंगार अचानकच गार झाला. खरं तर दुपारनं निळ्या आभाळाचं तेज टक लावून बघणं अवघड बनलं होतं. मघा ते तेज अचानकच झाकोळलं. दक्षिणेकडनं वर आलेल्या काळ्या- निळ्या ढगांच्या पुंजक्यांना पश्चिमेकडल्या, जरा थंडावलेल्या सूर्यानं केशरी कडांनी नटवलं. ते मोकळं निळं आभाळ ढगांनी कधी व्यापलं ते समजेनाच. लांब तिकडं डोंगराच्या कडेनं कुटनं तरी त्या कोरड्या ऊनवाऱ्यात फुफाटा मिसळायला सुरवात झाली. ढगांनी भरलेल्या काळ्या आभाळात अबोली- केशरी रंगाचा खेळ सुरू झाला. लांब तिकडं कुटंतरी एक वावटळ उठलेली दिसली. ढगांचे रंग सरड्यासारखे मधनंच बदलायला लागले. त्या वावटळीनं मनाच्या गाडीला स्टार्टर दिला. आपली गाडी नेहमीसारखीच त्या सोनेरी माळाकडं सुसाट सुटली बघा.    

हितं जमिनीवर वारा गार पडायला लागला. धुरुळा उडवणारा वारा अबोली काळसर आभाळकडं सरकायला लागला. लांब कुठं तरी पावसानं हजेरी लावली. ओल्या वाऱ्यानं ही बातमी हिकडं सिटीत, पहिल्या पावसाच्या दरवळासकट, पोचवली. सिटीत वारं शिरायला लागलं. उंच उंच आभाळात शिरलेल्या अपार्टमेंटच्या गच्च्यांवरनं पोरं-सोरं हात उडवायला लागली. तोपर्यंत अबोली केशरी आभाळ काळवंडायला लागलं. एक मोठ्ठी वावटळ धुळीसकट आभाळात पोचलेली दिसली. यंदाच्या मोसमात पैल्यांदाच वावटळीचं नी ढगांचं सूत जमलेलं दिसलं. काळ्या ढगांमधनं पाढरं- निळं आभाळ इश्टापल्टी खेळायला लागलं. तोवर हिकडं सिटीत घरांची दारं एकामागोमाग एक धडधडली. स्टॉपर नसलेली दारं मोकळी सुटली, नी घरातल्या फरशीवर त्या वाऱ्याच्या कृपेनंच म्हनायची, धुळीतली पावलं उमटायला लागली. गॅलऱ्यांमधनं वाळत घातलेली कापडंही वावटळीनं गुंडाळली. लायटीचे खांब नी डिप्या डुलतायेत तोवर डिपार्मेंट्नं आपलं काम केलं. आधीच अंधारलेल्या घरांमधनं एकदम कुट्ट अंधार झाला. एकसाथ नमस्ते करत घराघरातल्या लायटी विझल्या. परत कधी येणार, हा प्रश्न उभा करून.  

तोवर आपल्या मनमौजी गाडीनं कोरेगाव कधीच सोडलं होतं. उगवतीकडं जाणारा रस्ता पुढंच नेत होता. वर्धनगडाचा घाट वर चढून गेल्यावर खाल्लीकडच्या नी वरलीकडच्या भागातला फरक निसर्गच दाखवून देत होता. खाल्लीकडं लांब लांबपर्यंत पसरलेला माळ, त्याच माळावर तिकडं लांबपर्यंत पसरलेला माणदेश. वरलीकडं कृष्णेच्या पाण्यानं सुपिक केलेली ऊसाची रानं, संपन्नतेचं लक्षणच ते. त्या संपन्नतेकडं पाठ फिरवत आपण उगवतीकडं जात राहातो. उन्हाळ्यातच कशाला, वर्षाच्या कुठल्याही मोसमात तुम्ही हिकडं फिरलात, तर हव्वा तेवढा मोकळेपणा आपल्याला सोबत बांधून घेता येतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबलांबपर्यंत हा मोकळेपणा आपल्याला सोबत करतो. मधली- आधली छोटी गावं, छोट्या- मोठ्या टेकड्या नी एखाद दुसरा डोंगर सोडला, तर मोकळेपणाच तो काय या भागाचं वैशिष्ट्य बनत जातो. 

रस्त्याच्या कडेनं दोन्ही बाजूला माळ. कडेची थोरली झाडं काय ती आपला हिरवेपणा टिकवून. ओढ्या- वगळीच्या बाजूनं वाढलेली करंजं, बाभळी, आंब्याची झाडं काय ती थोडीफार सावली देणार. उरलेल्या उघड्या माळावर नांगरटीच्या खुणा. मातीला ऊन द्यायला म्हणून केलेली नांगरट उन्हाळा असो की पावसाळा, मातीला फक्त ऊनचं देणार. ढेकळात कुटं काळी, कुटं तांबडी, तर कुटं तपकीरी ढेकळं. हिकडं सिटीत तसं ढेकळामधली क्वालिटी कोण शोधायला जात नाही. माळावरली ही मोकळी-ढाकळी ढेकळं बरोब्बर तो फरक दाखवतात. अशा माळातनं, मोकळ्या पडलेल्या नांगरटीमधनंही अशाच एखाद्या तापलेल्या दुपारनंतर एखाद- दुसरी वावटळ उठते. एखाद्या घरावरचं पत्र्याचं पानच हलतं, कुनाची कौलंच पडतात, घराबाहेर वाळत घातलेलं एखाद्या म्हाताऱ्याचं धोतर लांब वावरात ढेकळात काय पडतं, चुलीच्या जळणासाठी म्हणून गोळा केलेल्या बाभळीच्या फण्या पिंजारून रस्त्यावर काय त्या येतात. आसलं सगळं सगळं वावटळीमुळं दिसतं.   

आंब्याचे पाड शोधून दमलेली पोरं माळाकडनं वस्तीकडं सरकू लागतात. जनावरांना तर
गोठ्याचा रस्ता दाखवावा लागतच नसतोय. रानातनं पाठीवर कासरा टाकून सोडलेली जनावरं गोठ्यात दावणीला न बांधताही उभारतात. आंधारलेलं आभाळ कुत्र्यांना काय ते भुकायला मजबूर करतं. घराबाहेरच्या ओसरीवर नक्षत्रांचे हिशेब मांडले जातात. औंदा मुरगाचं गणित जुळतंय गड्या, म्हणत तंबाखूचे बार लावले जातात. वाळवणाची गणितं चुकली म्हणून लेकी-सुनांना बोलणं ऐकावं लागतं थोडं फार, पन पुन्हा आपण सुकाळात नसतोय ऱ्हात, ही जाणीव सगळ्यांनाच जागेवर आणून ठेवते. तंबाखूचा चोथा होईपर्यंतच नक्षत्रांचं गणित कसं, कधी नी किती वेळा बिघडलंय, नी त्या हिशेबानी झालेल्या पेरण्यांनी कित्तींदा उलटं टांगलंय, याची गोळाबेरीज होते. लायटीचा खेळ किती का वेळ चालेनात, कोणाला काय तो फरक पडत नाय. कारण हिकडं वावटळींसोबत येत ऱ्हातात त्या फक्त अशा जाणीवा. 

सिटीतल्या वावटळीनं दिलेलं ते भारावलेपण हिकडं माळावर येऊन पोचल्यावर वस्तुस्थितीला नेऊन भिडवणारं ठरतं. कदाचित सगळ्याच वावटळी या अशाचसाठी असाव्यात. भारावलेपणातनं वस्तुस्थितीपर्यंत नेऊन भिडवण्यासाठी. नाही का.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा