रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

स्फुर्तीगीतामागच्या स्फुर्तीतून...


पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचा तो अखेरचा टप्पा होता. आभार प्रदर्शन अगदी नुकतंच झालं होतं. ललित कला केंद्राच्या विद्यार्थिनींनी त्यांच्या सुरेल स्वरामध्ये पसायदानही म्हणून झालं होतं. ते संपलं नी वंदे मातरम् साठी सगळ्यांनी उभं राहाण्याची घोषणा सभामंडपात घुमली. तिथं उपस्थित सगळेच यंत्रवत उभे राहिले. वंदे मातरम् ला सुरुवात झाली. नकळतच मीही वंदे मातरम् म्हणायला सुरुवात केली. ललित कला वाल्यांच्या सूरात सूर मिसळत होते की नाही ते कळत नसलं, तरी शब्द मात्र अचूक येत होते हे निश्चित. 
त्यावेळी आजूबाजूला किती जणांच्या बाबत असं घडत होतं ते माहिती नाही, पण मला त्यावेळी त्या वंदे मातरम्च्या सोबतीने माझे शाळेतले दिवसही आठवायला लागले होते. आणि त्याच आठवणींच्या सोबतीनं असेल कदाचित, पण मला आतून काहीतरी वेगळंच जाणवतंय, सर्वांगातून अचानक शहारे उमटतायेत असं वाटलं. हे पहिल्यांदाच घडतंय असंही काही नव्हतं. फक्त याच वेळेला नाही, तर ज्या ज्या वेळी मी वंदे मातरम् किंवा राष्ट्रगीत म्हणायला उभं राहातोय त्या त्या वेळी माझ्या सिस्टिममध्ये अशीच काहीशी गडबड होताना मी गेल्या एक-दोन वर्षांमध्ये अनुभवली आहे.

आजही थोडं तसंच होतंय असं जाणवत होतं. मी जवळपास एक तप मागे जात विचार करतोय असं भासत होतं. भुसावळमधल्या माझ्या शाळेचं, भुसावळ हायस्कूल, भुसावळचं ते गेट... गेटसमोरचा रस्ता ओलांडल्यावर सुरू होणाऱ्या ते भलं मोठ्ठं ग्राउंड... ग्राउंडवर एकीकडं रांगेनं उभी असलेली, पांढरा शर्ट आणि खाकी पँटी घातलेली पोरं... समोरच्या कट्ट्यावर उभे असलेले शिक्षक... गडद निळ्या रंगाचे फ्रॉक घातलेल्या, वेण्या बांधलेल्या पोरी... शिक्षकांमधून कुणीतरी एक साथ राष्ट्रगीत शुरू कर, म्हणत दिलेली ऑर्डर... आणि मग सुरू झालेलं ते राष्ट्रगीत... कधी वंदे मातरम् आणि कधी प्रतिज्ञा... असं सगळं सगळं आठवून अगदी काही क्षणात डोळ्यासमोरून गेलं. तोपर्यंत इकडं वंदे मातरम् संपतही आलं होतं. ते संपल्यावर अंगावरचे शहारे थांबले. यापूर्वीच्या अनुभवांनुसार यावेळीही मी विचार करत होतो, अरेच्चा सिस्टिमची गडबड झाली आणि पुन्हा थांबलीसुद्धा. पुढच्या वेळी शोधूत नेमकं काय होतंय ते. 
खरं तर, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् या दोन बाबी मला न टाळता येणाऱ्या गोष्टींमध्ये मोडतात. एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलोय आणि तिथं शेवटी यापैकी एक होणार आहे, असं लक्षात आलं की एक वेगळाच उत्साह मला जाणवतो. हा उत्साह मला का जाणवतो, याचं एक कारण या शाळेच्या आठवणी असाव्यात कदाचित या एका निष्कर्षापर्यंत मी आज येऊन पोहोचलोय. गेल्या काही वर्षांमध्ये नित्याने राष्ट्रगीत वा वंदे मातरम् म्हणायला मिळत नसलं, तरी ज्या ज्या वेळी ते मिळतं त्या त्या वेळी शाळेमध्ये ही दोन गीतं म्हणताना जो उत्साह जाणवायचा, तसाच काहीसा उत्साह आता जाणवतो. फरक फक्त एवढाच असावा, की त्यावेळी तो उत्साह रोजचाच नित्यनेमाचा एक भाग होता. त्यावेळी त्याचं काय ते नवल. आता तसं नाही.

शाळा सोडल्यानंतर रोजचं राष्ट्रगीत वा वंदे मातरम् तसं बंदच झालंय. कॉलेजमध्ये कधीतरी, अगदीच स्पेसिफिक सांगायचं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमांमध्येच ते व्हायचं. व्हायचं म्हणजे मीही ते म्हणण्यात सामील असायचोय. त्यानंतर मात्र त्यासाठीचे मुहुर्त मिळेनासे झालेत. त्यामुळेच आता जेव्हा केव्हा चान्स मिळेल, तेव्हा तो सोडायचा नाही असं कदाचित आपोआपच ठरलं असावं. त्यामुळेच ते टाळता येत नसावं. मी अगदी कट्टर देशभक्त आहे की नाही, ते मला माहिती नाही, पण खरंच ज्यावेळी मला कळत असतं की आपल्याकडून देशाच्या या प्रतिकांचा अपमान होतोयं, त्यावेळी लाज वाटते. अगदी यंदाही प्रजासत्ताक दिनी घरी बसून आपला तो 26 जानेवारीच्या संचलनाचा कार्यक्रम पाहात होतो. त्यातही एकदा बहुतेक राष्ट्रगीत वाजलं. पण ते वाजताना मी काहीतरी वेगळंच करत होतो. ते जाणवून थोडं ओशाळल्यागत झालं. लाज वाटली. पण पुन्हा नेहमीसारखंच फक्त ऐकलं आणि नंतर पुन्हा कार्यक्रम पाहाण्यात गुंतलो.

तसं बघायला गेलं, तर अगदी दोन परस्पर विरोधी बाबी आहेत. विशेष म्हणजे त्या अगदी व्यवस्थित जाणवताहेत. या बाबतीत मला चुकीचं समर्थनही करायचं नाहीये आणि बरोबर असल्याविषयी कौतुकही नकोये. कदाचित राष्ट्रगीत वा वंदे मातरम्सारख्या स्फुर्तीगीतांमधून मिळालेल्या स्फुर्तीचा हा परिणाम असावा. त्यामागे असलेल्या भावनांचा हा कल्लोळ असावा. आणि विशेष म्हणजे मला तो अजूनही हवाहवासाच वाटतोय. कारण त्या मागचं एक कारण कदाचित मला आत्ताशी सापडलंय असं जाणवतंय. त्यापेक्षाही एखादं वेगळं कारण असू शकतयंच की. ते शोधण्यासाठी पुढच्या दोन-चार वर्षांचा अनुभव लागेल कदाचित, पण शोधू नक्की.

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

सवाई अनुभूती


गेली दोन-तीन वर्षे मी एका गोष्टीची वाट पाहात होतो. यंदा सवाई महोत्सवाला जाण्याच्या निमित्ताने ती संधी मिळाली होती. शास्त्रीय संगीताच्या साम्राज्यामध्ये दिग्गज अनुभवण्याची ही संधी साधल्यानंतर घरी आल्याआल्या त्याविषयी वाटलेलं सगळं लिहिलं होतं. गेले काही दिवस लॅपटॉपमध्ये पडून असलेलं हे लिखाण आता इथं मांडतोय...

सवाई अनुभूती

गुरुवारी रात्री योगायोगाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला जायची संधी मिळाली. त्या दिवसापुरतं कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याचं रिपोर्टिंग करायचं होतं, म्हणून मी तिकडे गेलो होतो. नेहमीच्या कामाचाच एक भाग म्हणून हे जाणं झालं. योगायोग अशासाठी, की पुण्यात राहायला आल्यापासून यापूर्वी अनेकदा मी तिकडं जाऊन एखादीतरी मैफल ऐकायचा विचार केला होता आणि कोणत्या न कोणत्या कारणाने तो बारगळला होता. या वेळी मात्र तसं झालं नाही म्हणून हा योगायोग. सवाईला जाणं म्हणजे शास्त्रीय संगीताविषयी आवड असणाऱ्यांसाठी पर्वणीच. पण मला तिकडं जायचं होतं किंवा मी तिकडे गेलो, याचा अर्थ मला शास्त्रीय संगीतातलं खूप सारं कळतं असं नक्कीच नाही.

तिथून जाऊन आल्यावर बातमीपुरती माहिती दिल्यानंतर तसं माझं काम संपलं होतं. पण तरी डोकं शांत राहात नव्हतं. ऑफिसमध्ये आल्याआल्या आमच्या एका मित्राशी शास्त्रीय संगीत या विषयावर अगदी उडत उडत गप्पा झाल्या. त्याचा विचार असा, की तिथं गेल्यावर संगीताची पार्श्वभूमी नसलेल्यांना काही कळतं का, झेपतं का, आणि तसं होत नसेल तर तिथं जाऊन काही फायदा होतो का? त्यावर माझं मत होतं, की कळो न कळो, शेवटी शास्त्रीय संगीत ही एक कला आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण ज्याच्या-त्याच्या पद्धतीने कलेची अनुभूती घेत असतो. कला समजणं किंवा न समजणं ही बाब तशी त्या वेळी दुय्यम ठरते, कारण त्या अनुभूतीतून त्याला मिळणारा आनंद प्रत्येकवेळी महत्वाचा ठरत असतो... एवढं सांगून मी त्यावेळी थांबलो.  

ते विचारचक्र तसंच सुरू होतं... कदाचित कलांची निर्मितीच मनुष्याला आनंद देण्यासाठी झाली असावी. हा आनंद अधिकाधिक वाढवण्यासाठी त्या कलेचा शास्त्रोक्त अभ्यास केला जात असावा आणि त्यातून अधिकाधिक आनंदही मिळवला जात असावा. संगीतही त्यास अपवाद नसेल. पण एखादं लहान मूल जेव्हा त्याला न समजणारं संगीत, आपल्या भाषेत म्हणायचं तर गाणं, ऐकून डुलतं- नाचतं त्यावेळी त्याला ते गाणं समजतं म्हणून ते नाचतं-डुलतं असं नाही ना. त्याला आनंद मिळाला, नाचू वाटंल की ते नाचणार. त्याच्या दृष्टीने ते ऐकून नाचू वाटण्यासारखा मोठा आनंद त्या वेळी नसतो. तसं मोठ्यांचही होणारचं की. फरक एवढाच, की मोठ्यांना लहानांपेक्षा थोडी जास्त जाण असते. काय समजतं, काय समजतं नाही आणि काय न समजताही समजल्यासारखं दाखवावं याची.

अशाच काही विचारांमध्ये घरी येता येता मी परत सवाईच्या वातावरणामध्ये जाऊन बसलो होतो. मी गेलो त्यावेळी समीहन कशाळकर केदार राग सादर करत होते. त्याच रागाच्या सुरावटीने बांधलेली ऐसी का मनभावन चाली ही रचना त्यांनी सादर केली. त्यांनी गायलेल्या त्रीतालातील तरान्यानंतर त्यांचे वडिल ज्येष्ठ गायक पंडित उल्हास कशाळकर मंचावर विराजमान झाले. त्यांनी बिहागडा रागाने सुरुवात केली. त्यांनतर सोहनी नावाचा राग आणि मग आज जमुनाके तीर ही भैरवी सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. या दोघांना पंडित सुरेश तळवलकर यांनी तबल्यावर, तर डॉ. अरविंद थत्ते यांनी हार्मोनियमवर साथ दिली. दरम्यानच्या काळात मी सवाईचं रुप न्याहाळत होतो. त्यातून मला जाणवलेली एक बाब म्हणजे एवढे सारे लोक जे सवाईला येतात, ते फक्त या मोठ्या कलाकारांना ऐकायला किंवा बघायला येत नाही, तर ते त्यांना अनुभवायला इथं येतात.

कदाचित त्या वेळी तिथं उपस्थित प्रत्येकालाच पंडितजींचा प्रत्येक स्वर लोण्याचा गोळा जिभेवर ठेवल्यानंतर तो जसा हळूहळू विरघळावा, तसा भासत होता. तो तितक्याच सहजतेने त्यांच्यामधून येत होता आणि श्रोत्यांपर्यंतही तितक्याच सहजतेने पोहोचत होता. सूरांना तितक्याच प्रेमाने आपल्याकडे बोलावून ते तितक्याच सहजतेने आणि एखाद्या अधिकारवाण्या व्यक्तिच्या भूमिकेतून त्यांना परत पाठवत होते. त्यांच्या हातांच्या हालचाली म्हणजे त्यांचा प्रत्येक स्वर किती आणि कसा घोटून तयार झाला आहे, याचे प्रतिक वाटत होत्या. खर्जातल्या एखाद्या स्वरापासून थेट तार सप्तकातील एखाद्या सूरावर पोचताना त्यांनी आपल्या समोर बसलेल्या श्रोत्यांच्या मनातील भावनांच्या तारा छेडल्या नसतील तर नवलच.

रैन बिन कैसी कटेगी दैया म्हणत विरह असह्य झालेल्या एका प्रेयसीच्या मनातील भावनांचे द्वंद्व त्यांनी आपल्या सूरावटींमधून अगदी चपखल मांडले. ते मांडताना शब्दांना सूरांच्या जोडीने न्याय कसा द्यायचा, याचं प्रात्यक्षिकच जणू त्यांनी तिथं सादर केलं. शब्दांमध्ये जादू असते, पण त्याला सूरांची जोड मिळाल्यास ही जादू काय साध्य करू शकते तेच त्या रचनेमधून त्यावेळी दिसत होतं. सूरांना सूरांच्याच भाषेत विचारलेल्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे समजल्यानंतर उपस्थित श्रोत्यांमधून वाहवा मिळाली नसती तर नवलच होते. दोघांनी एकत्र सादरीकरण करायला सुरूवात केल्यानंतर उल्हासजींच्या सादरीकरणातील मुरब्बीपणा आणि सहजता स्पष्टपणे जाणवत होती. त्याचवेळी आपणही कुठे कमी नाही हे दाखवताना समीहनने आपल्या वडिलांसोबत केलेले कोऑर्डिनेशनही वाखाणण्याजोगं होतं. शेवटच्या पाच-दहा मिनिटांमध्ये सादर केलेल्या भैरवीत आपल्या सूरांमधल्या प्रवाहीपणाच्या आधारावर त्यांनी उपस्थितांना यमुनेच्या काठावर नेऊन बसवलं होतं.

संगीत समजणं किंवा त्यातले बारकावे कळणं यापेक्षा त्यातून आनंद घेता येणं मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळेच मग काही समजत असेल, त्याची जाण असेल किंवा अगदी काहीही समजत नसेल तरी अशा मैफलांना जाणं हे आनंददायीच ठरेल. एक प्रोटोकॉल असल्यासारखं वा शायनिंग मारायला तिकडं जाण्यापेक्षाही शास्त्रीय संगीतातूनही आनंद कसा मिळतो ते अनुभवायला जाणं महत्वाचं आहे. शेवटी ती एक कला आहे. आणि कलेचा आनंद जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने घेतच असतो. कुणाला वाटलं तर फक्त तो समेवरच त्याच्या पद्धतीने दाद देईल किंवा मग एखादा ऑफबिट उचलला पण तरीही ऑफबिट न झालेला सूर समजून घेत नुसतंच मान डोलावेल. आपण यातलं काही नाही केलं तरी संगीत आपल्याला त्याच्या पद्धतीने नक्कीच आनंद देईल. अवकाश आहे ती सवाई अनुभूती अनुभवण्याचा.

शनिवार, २६ जानेवारी, २०१३

तू जाने ना...

प्रजासत्ताक दिनामुळे नेहमीच्या कामातून थोडा निवांतपणा अनुभवत होतो. घरी असल्यामुळे सहजच टीव्हीसमोर आलो होतो. भावाला टीव्ही सुरू करायला सांगून आत गेलो. परत बाहेर येईपर्यंत त्याने मराठी न्यूज चॅनल सुरू केलं होतं. समोर तीन महिला एका व्यक्तीची मुलाखत घेत होत्या. मराठी चॅनल असल्यामुळे प्रश्न मराठीत विचारले जात होते, पण उत्तरं मात्र हिंदीतूनच दिली जात होती. त्या व्यक्तीचा आवाज ओळखीचा वाटल्यानं चटकन टीव्हीकडे पाहिलं. ती कैलाश खेरची मुलाखत होती. ते पाहाता पाहाताच वर्षभरापूर्वीचा त्याच्या पुणे भेटीतला पत्रकार संघातला वार्तालाप आठवला. सहजच मनात आलं, हा भन्नाट अवलियाच आहे, मराठी चॅनल असलं आणि मराठीत प्रश्न विचारणारी मंडळी समोर असली, तरी हा पठ्ठा हिंदीतूनच उत्तरं देणार आणि गाणीही हिंदीच म्हणणार. हसायला आलं. मुलाखत तशीच पाहात राहिलो. त्याची पुण्यातली मुलाखतही आठवत राहिलो. 
 
तो पत्रकार संघामध्ये येणार म्हटल्यावर काम नसतानाही, मी तो माणूस म्हणून नेमका कसा आहे हे अनुभवायला पत्रकार संघामध्ये गेलो होतो. तिकडे गेल्यावर कैलास बाबांनीही माझी निराशा नाही केली. मला त्या वेळी त्याच्याकडून एखाद दुसरं गाणं ऐकण्यापेक्षा तो नेमका कसा आहे, गाणं कसं शिकला, त्याच्या गाण्यात नेहमी असणारं गिटार आणि त्याच्या विशिष्ट पट्टीतल्या गाण्यामागची कारणं काय, त्याच्या आवाजामध्ये असणारं ते वेगळं दर्द तसंच का आहे, अशा अनेक गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटत होत्या. तसेच नानाविध प्रश्न माझ्या डोक्यात त्या वेळी होते. संधी मिळाली, की ते प्रश्न विचारायचे असं ठरवूनच मी तिकडे गेलो होतो. पण कोणाला काहीही विचारायची जास्त संधी न देता अगदी मनमोकळ्या गप्पा मारत कैलास खेर नेमका कसा, हे त्याने स्वतःच सांगितलं. ते सांगता सांगता तो कलाकार किंवा गायक असण्यापेक्षा तो मला एक फिलॉसॉफरच वाटला. म्हणूनच त्याला नुसता कैलाश खेर म्हणण्यापेक्षा कैलास बाबाचं म्हणणं जास्त योग्य वाटलं आणि ही मुलाखत पाहातानाही अजून तसंच वाटतंय. 

त्यानी सांगितल्यानुसार त्याचा जन्म मेरठमधला. तो म्हणाला की त्याला दुःख आणि परिस्थितीनेच मोठं केलं. त्यामुळे त्या दुःखाला आणि परिस्थितीलाच तो आपला पिता मानतो. त्याने संगीतासाठी तेराव्या वर्षीच घर सोडलं. कोणीतरी त्याला संगीत शिकण्यासाठी दिल्लीतल्या गंधर्व महाविद्यालयाचा पत्ता सांगितला होता. त्यानंतर घरच्यांच्या परवानगीची वाट न पाहता तो तिकडं जायचं म्हणून बाहेर पडला. नंतर मधल्या काळात नोकरी केली. तो म्हणतो, नौकरी के नौ काम, दसवा काम, हाँ जी. ते न पटल्यानं पुढे धंदा सुरू केला. पण धंद्यात खोटं बोलावं लागतं, ते आपल्या स्वभावातच नसल्याचं लक्षात आल्यावर त्यातूनही तो बाहेर आला. पुन्हा जीवनात धडपडणं नशिबी आलं. पण ती धडपड संगीतासाठी करावी लागली नाही. ते आपसूकच येत गेल्याचं तो मानतो. परिस्थितीच त्याला ते शिकवत होती. वडील पंडित होते, म्हणून त्याने ते काम शिकण्याचाही प्रयत्न करून पाहिला. त्यासाठी हृषिकेशला जाऊन राहिल्यावरही समाधान न झाल्याने शेवटी त्याने मुंबई गाठली. 

दरम्यानच्या काळात आत्महत्येचा विचार अनेकदा डोक्यात येऊन गेल्याचे त्याने कबूल केलं. पण प्रत्येकवेळी त्यातून बाहेर येण्यासाठी शिवबाबानी आपल्याला तारल्याचं तो सांगतो. त्याच्या अशा वाक्यांमधून त्याच्या भक्तीविषयी आपोआपच अप्रूप वाटायला लागलं होतं. अशा भक्तीमुळेच सुफी संगीताचाही आपल्यावरचा पगडा वाढल्याचं त्यानं सांगितलं. इंडस्ट्रीमध्ये आल्यावर जिंगल्सपासून सुरुवात केली. त्यानंतर अल्लाह के बंदे. त्यानंतर कैलासा. मुंबईतल्या परेश आणि नरेश कामथसोबत काम. असं सगळं त्याने एका झटक्यात सांगून टाकलं. गाणी लिहिण्याचं प्रशिक्षण घेण्याची गरजच पडली नाही इतकं त्याला दुःखानेच शिकवल्याचं तो सांगतो. आप्पे ही गुरू आप्पे ही चेला हे त्याचं असंच एक भन्नाट तत्वज्ञान. अनुभवामधूनच आपण शिकतो, असा त्याचा मतितार्थ. त्याचं संगीत म्हणजे एक केस स्टडी असल्याचं तो मानतो. त्याविषयीचं संशोधन सतत सुरूच असल्याचं त्यानं सांगितलं. आपण हिंदीत बोलत असलो, तरी हिंदीत लिहित नाही, हेही त्याने हसत हसत सांगितलं.

कोणाला फॉलो करण्यापेक्षा त्याचा स्वतःच्या स्टाइलवर जास्त विश्वास. त्याच्या मते संगीत म्हणजे मुक्तीकडे नेणारा मार्ग. सध्या संगीत सुना कम, देखा बहोत जाता है, असलं काहीतरी भन्नाट बोलला. त्याच अनुशंगाने, आजही भारतात संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्था तशा कमीच आहेत, पण त्यांची दुकानंच जास्त झालीत, असंही त्यानं सर्वांसमक्ष सांगितलं. आपण रिअँलिटी शोमध्ये जज म्हणून जातो, पण त्यामागे नवं टॅलेंट बघणं हाच एक भाव असल्याचं त्याचं मानणं होतं. त्याच्या या मुलाखतीमध्ये त्याच्याविषयी जेवढी जास्त माहिती मिळत गेली, तितका तो अधिकाधिक गूढ आणि काहीतरी वेगळाच माणूस असल्याचं वाटायला लागलं होतं. त्यातचं त्याने तेरी दिवानी गाण्याचा किस्सा सांगितला. त्याच्या सांगण्यानुसार, मुलांना वाटतं की तेरी दिवानी हे गाणं एखाद्या मुलीच्या मनातून आलंय आणि त्याचवेळी मुलींना त्याच्या अगदी उलट वाटत राहातं. त्यामुळे ते त्यांना अधिकाधिक आवडत जातं. पण ते गाणं आपण आपल्या शिवबाबासाठी लिहिलंय. तेरी दिवानी म्हणजे मी त्याच्या प्रेमात आहे. त्यामुळेच कदाचित ते सगळ्यांनाच आपलंस वाटत राहातं. अशा प्रकारामधूनच आपल्या फॅन क्लब वाढल्याचं त्याने सांगितलं. 

दोन्ही कानात डूल, दाट वाढलेले कुरळे केस, डार्क निळ्या रंगाचा शर्ट आणि तशीच डार्क शेडमधली त्याची ती पँट, शर्टच्या बाह्या वर करून सर्वांशी अगदी अदबीने आणि तितक्याच सहजतेने त्याचं ते बोलणं, त्यातच पत्रकार संघासारख्या ठिकाणी आपण पहिल्यांदाच आल्याचं सांगणं, पुणे म्हणजे आपल्यासाठी पुण्यनगरी असल्याचं मानणं... त्याचं हे वागणं-बोलणं त्याच्यासाठी सहज असलं, तरी माझ्यासारख्याला काहीतरी वेगळंच वाटत होतं. आपण एका वेगळ्या माणसाला, कलाकाराला अनुभवतोये हेच काय ते समाधान होतं, पण अजूनही तो कसा हे लक्षात आलं नाहीये. आत्ताच्या मुलाखतीतही त्याने विशाल-शेखर की रेहमान बेस्ट, या प्रश्नाचं उत्तर दोन्हीही बेस्ट असंच दिलं. जिंगल्स लिहिणं का गाणं म्हणणं जास्त आवडतं, असं विचारल्यावर जिंगल किंवा गाणं लिहून ते स्वतः गाणं हेच जास्त प्रिय असल्याचं त्यानं सांगितलं. त्याने मुलाखतीचा शेवट केला तो, कैसे बताये क्यूँ तुझको चाहे, यारा बता ना पाये, बातें दिलों की देखो जो बाकी आँखे तुझे समझाये, तू जाने ना... गाण्यानं. आता पुन्हा त्याच्याविषयीची गूढता, तू जाने ना असंच म्हणताना भासतेय मला.

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

एकटेपणाच्या अंतराळातून...



मी योगेश. कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ, कुणाचा नवरा, कुणाचा मित्र, अजून कुणाचा कोण, तर कुणाचा कोण. पण मी स्वतः स्वतःचा कोण? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत. मी माझा कुणीच नाही... अजब वाटतं थोडं हे. आपल्याकडे कुणाचं कुणीच नसलं, तर त्याला एकटा वा एकटी असं म्हणतात. ही बाब आता स्वतःविषयी लागू केली, तर मी एकटा, असंच आपण म्हणू शकतो. उगाच कशाला सांगायचं मग, की मी अमक्याचा अमूक अन तमक्याचा तमूक. मी एकटा ही आपली स्वतःची स्वतःला पटणारी ओळख पुरी होत नसते का आपल्याला. नसावी. म्हणूनच तर कुणी कधी लवकर तसं सांगत नाही एखाद्याला, मी एकटाच म्हणून.

तरीही का कोण जाणे, एकटेपणाची जाणीव सगळ्यांनाच छळत असावी, असं मला नेहमीच वाटत आलंय. कदाचित, मी एकटा आहे असं मला वाटतं, असं आपल्यापैकी अनेकजण अनेकदा एकमेकांना सांगत असतो म्हणून ते असेल. त्या शब्दांपाठीमागे त्या-त्या स्थळ-काळाचं बंधन असतं. त्यानंतरच्या काळामध्ये आपण समाजामध्ये सामावलेलेच असतो. त्यावेळी अगोदरच्या एकटेपणाचा संदर्भ ध्यानी घेतला, तर समाजामध्ये असतानाही आपण अनेक एकट्यांमध्ये एकेकट्याने मिसळल्यासारखेच असतो. त्यावेळीही एकटेपणाची जाणीव आपल्यासोबतच असते, फक्त ती जाणवण्याचा अवकाश असतो. त्या-त्या वेळच्या समाजानुरुप, व्यक्तिनुरुप आपलं एकटेपण कमी अथवा जास्ती जाणवतं असावं.

एकटेपणाच्या बाबतीत ते जाणवणं महत्वाचं असलं, तरी एकटेपणाचंही एक स्पेशल अंतराळ असावं. त्या अंतराळामध्ये आपण शिरलो, की एकटेपणाची ती जाणीव प्रत्येकालाच होत असावी. मग तुम्ही घरात असा की कुठे गर्दीत असा, मित्रांमध्ये बसा की मग कुटुंबियांमध्ये गप्पा मारा. एकटेपणाच्या त्या अंतराळाचा तुमच्या मन नावाच्या अशाच कुठल्यातरी अंतराळाशी संयोग झाला, की मग एकटेपणाचे योग सुरू होत असावेत. चल अकेला, चल अकेला... किंवा मग दिवस असे की, कोणी माझा नाही…’ सारखी दोन चार गाणी सुचत असावीत, उगाचच सगळे सोबत असतानाही आपल्या सोबत कोणीच नसल्याचे भास होत असावेत. इ. इ.

अंतराळावरून आठवलं, आपली पृथ्वी अंतराळामध्ये एकटीच आहे. तो एकटेपणा घालवण्यासाठी आपण नव्या जीवसृष्टीचा शोध घेतोय. तो शोध कधी संपेल ते माहिती नाही. आता ही बाब खूप मोठ्या पातळीवर होती. तिच अतीसूक्ष्म पातळीवर आणायची म्हटली, की ती एखाद्या माणसासाठी आपण लागू करू शकतो. माणसंही आपला एकटेपणा घालवण्यासाठी असंच करतात. कोणी तरी दुसरं एकटं शोधतात, ज्याच्याशी त्यांचं थोडं जुळून येईल. आपल्या पृथ्वीच्या बाबतीत आपण दुसरा एखादा सजीव ग्रह शोधायच्या मागे लागलोय. माणसांच्या बाबतीत विचार केला, तर आपण त्या एकट्यासारखाच दुसरा वा दुसरी एकटी शोधतो. त्या दोघांना एकमेकांच्या एकटेपणाची जाणीव झाली तर ठिक. नाहीतर पुन्हा ते एकत्र असूनही एकटेच ठरतात. 
 
गम्मतचं आहे राव या एकटेपणाची. एकटेपणामध्ये आपण इतके एकटे असतो, याचा साक्षात्कार मला आजपर्यंत कधीही झाला नव्हता. आज झाला याला कारण झोप लागत नसल्याने आलेला एकटेपणा. आता तसं पाहिलं, तर मी एकटा नाहीये. भाऊ, बायको, अजून म्हणायंच, तर आमचं कुत्रं माझ्या सभोवतालच्या अंतराळामध्ये आहे. पण कदाचित वर म्हटलंय तसं माझ्या मनातल्या अंतराळात ते एकटेपणाचं अंतराळ गुरफटलं असावं कुठतरी. म्हणूनच ते जाणवलं.  
 
आपल्या या असल्या एकटेपणाचा माणूस नावाच्या, समाजप्रिय म्हणवल्या जाणाऱ्या प्राण्याला तिटकारा वाटत असावा. आपल्यापैकी प्रत्येकजण त्याच समाजप्रिय प्राण्यांच्या गटात मोडणारा. त्यामुळे जरी प्रत्येकजण ती एकटेपणाची ओळख स्वतः सोबत कायमच घेऊन फिरत असला, तरी ती तशी ओळख कुणी सांगत नसावं. त्या ऐवजी आपण आपली थोडी सोपेस्टिकेटेड ओळख एकमेकांना दाखवत बसतो. आपलं स्टेटस वाढवणारी ओळख एकमेकांना करून देत असतो. अमक्याचा अमूक, तमक्याचा तमूक, त्यामुळे मग तुमचा अमूक-तमूक. या अमूक-तमूकच्या भानगडीत आपली खरी ओळख राहाते बाजूला, आणि त्यांना वेगळीच ओळख होते. पुढे हिच ओळख इतरांपर्यंतही पोचते. त्यातूनच मग पुन्हा दोन वेगवेगळ्या ओळख्यांच्या म्हणा किंवा आजकालच्या भाषेत सांगायचं तर आयडेंटिटी म्हणा, त्यात आपण अडकतो. या दोन आयडेंटिटीच्या दरम्यान पुन्हा एक अंतराळ आपल्याला सापडतं. त्यात राहाणं आपल्याला त्रासदायक वाटतं. तरीही त्या तसल्या आयडेंटिटीपेक्षा तेच बरं वाटत असावं. तेच असावं हे एकटेपणाचं अंतराळ.