शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

‘माणदेशा’चा ‘ब्रँड अँबेसेडर’

आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं. माण तालुक्यातलं मलवडी. खूप मोठं नाही आणि अगदी छोटंही नाही. गावाविषयी ऐकलंय तसं, तिथल्या जवळपासच्या बारा-चौदा वाड्यांची मिळून एक ग्रामपंचायत आमच्या मलवडीसाठी. आमच्या गावासोबतच माण- खटाव तालुक्यातल्या प्रत्येक घरातून एखादातरी माणूस नोकरी-चाकरीच्या शोधात मुंबई-पुण्याकडे आला. आला तो आलाच. गावाकडच्या यात्रांच्या निमित्ताने, नातेवाईकांच्या लग्नांच्या निमित्ताने कधीतरी गावाकडे येणं-जाणं.  तेवढं सोडलं, तर गावांचा आणि त्यांचा तसा संबंध हळूहळू संपलाच. हा संबंध संपल्यानं माणदेश किंवा माणदेशातल्या गावांचा परिचय बाकीच्या जगाला तसा झालाच नाही. जगाला हा भाग माहितीये तो केवळ एक दुष्काळी प्रदेश म्हणूनच. ही एवढी ओळख सोडली, तर माणदेशाचं फारसं कौतुक करावं, असं कोणालाच वाटत नसावं. अपवाद फक्त व्यंकटेश माडगूळकरांचा.

माडगूळकरांच्या माणदेशी माणसंसारख्या वेगवेगळ्या कथासंग्रहांमधून जगाला माणदेशातल्या माणसांच्या वेगवेगळ्या छटा समजल्या. माझ्यासारख्या खुद्द माण नदीच्या काठावर कधीकाळी घर असणाऱ्या, पण सगळी वाढ तिकडे दूर खान्देशामध्ये झालेल्यालाही ती ओळख या पुस्तकांनीच करून दिली. त्यामुळंच मला माडगूळकर म्हणजे माणदेशाचे ब्रँड अँबेसेडर वाटतात. त्यांच्या कथांचा आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा मी फॅन झालोय, हे आता प्रांजळपणे कबूल करावंस वाटतं. कदाचित त्याचंच कारण असेल, की मी आता माणदेशी माणसं, सत्तांतर, अशी माणसं अशी साहसं, प्रवास : एका लेखकाचा अशी पुस्तकं हातोहात वेगळी करायला लागलोय. दिवाळी-उन्हाळ्याच्या सुट्टीत माणदेशाच्या एखाद्या भेटीदरम्यान अनुभवलेल्या काही बाबी या पुस्तकांच्या माध्यमातून पुन्हा कुठंतरी अनुभवायला लागलोय.

मी समीक्षक वगैरे नाही. साहित्याचा खूप मोठा अभ्यासकही नाही. पण माडगूळकरांची पुस्तकं वाचताना मिळणारी ही अनुभूतीच कदाचित त्यांच्या साहित्यकृतींची ताकद ठरली असावी असं वाटतंय. त्यांची वाक्यं, वाक्यांची रचना, त्यातलं साधेपण अशा सगळ्या बाबींमधून त्यांनी त्या –त्या ठिकाणाविषयीची, त्या त्या पात्राविषयीची एक ओढ माझ्यासारख्याच्या मनात निर्माण केली असावी. त्यामुळंच ती पात्र आपल्या आजूबाजूलाच आहेत, आपल्यातलीच आहेत, आपणही त्यांना कुठेतरी पाहिलं आहे, भेटलो-बोललो आहोत अशी रिलेट होतात असं वाटायला लागतं. यापूर्वी कोणत्याच लेखकाच्या बाबतीत असं जाणवलं नव्हतं. दुर्दैव एवढंच वाटतं, की माणदेशाविषयी आणि तिथल्या माणसांविषयी अशी ओढ निर्माण करण्यात यशस्वी झालेले माझ्या माहितीतले ते एकटेच.  

मला ना राव या बाबतीत कोकणाविषयी फार अप्रूप वाटतंय. कोकणी माणसं सहसा कोकणाविषयी वाईट बोलताना मी ऐकलीच नाहीयेत. कोकणाविषयी बोलायचं, तर ते भरभरून बोलायचं आणि बोलायचं ते चांगलंच बोलायचं, असंच कोकणी माणसांचं गणित दिसतंय. त्यामुळं कोकणी माणसांशी बोलताना आपल्यालाही कोकणाबद्दल आत्मियता वाटायला सुरुवात होते. त्यामुळं फणस म्हणून एखाद्याला चिडवत जरी असले, तरी फणसाच्या झाडांविषयीचं कुतुहल आपोआपच जागृत होतं. कोकणातला प्रत्येक माणूस कोकणासाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून वागायला लागतो. आमच्या माणदेशाबाबत मला हे गणित कधी जुळलेलं दिसलंच नाही. माणदेशातली खूपसारी माणसं माणदेशाबाहेर वावरत असतील, पण माडगूळकरांसारखा एखादाच आणि त्यांच्या निमित्तानं का होईना माझ्यासारखा एखादा आत्ता त्या माणदेशाविषयी काहीतरी बोलत असावा.

तसं आत्ता लिहिताना ब्रँड अँबेसेडर ही खूप आधुनिक संकल्पना त्यांच्यासाठी वापरली आहे. पण मला त्यांनी केलेलं लेखनच एवढं आवडायला लागलंय, की मी तसा विचार करतोय. आमच्या माणदेशात आता माणदेशी फेस्टिव्हलवगैरे आयोजित केले जातात, असं ऐकायला मिळालं. त्या ठिकाणी अशा माणसांची दखल घेतली जाते की नाही, या विषयी शंकाच आहे. आपल्याकडे ब्रँड अँबेसेडर म्हणजे एखादी मोठी सेलेब्रिटी व्यक्तीअशी सर्वसाधारण भावना आहे. आमच्या माणदेशातून अनेक मोठ्ठे अधिकारी पुढे आलेत. आपापल्या क्षेत्रामध्ये अनेकांनी आपलं नाव मोठ्ठं केलं आहे, पण जाहीरपणे माणदेशाचा पुरस्कार करणारी फार थोडी लोकं आजपर्यंत आढळून आली. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतील, पण आपापल्या मर्यादेत राहून माणदेशाचं कौतुक केलेलं दिसलं. माडगुळकरांनी केलेलं कौतुक मात्र कुठे दुसरीकडे अद्यापपर्यंत दिसलं नाही.

त्यांनी माणदेशी माणसं या त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या निर्मितीविषयी प्रवास : एका लेखकाचामध्ये लिहिलेली काही वाक्ये इथे संदर्भासाठी देतोय –
मला जीवनाशी संबद्ध असं लिहायचं होतं. माणदेश ह्या प्रदेशातले लोक कसे जगतात, काय विचार करतात, काय भोगतात, काय उपभोगतात- हे मला अनुभवाशी प्रामाणिक राहून सांगायचं होतं.
ह्या माणसांची जगण्याची दुर्दम्य इच्छा, कुठल्याही परिस्थितीत पाय रोवून आला दिवस सुख-दुःखासह स्वीकारण्याची त्यांची उमेद, न्यायबुद्धी, चांगल्या-वाईटाबद्दलचं वैयक्तिक विधिनिषेध यांचं दर्शन घडवायचं होतं.
आपण भाषिक कृती करायची, तर हीच, दुसरी काही नाही, असं ठाम वाटून मी माणदेशी माणसांकडे वळलो...
असा ठामपणा दाखवून माणदेशाकडे वळणारा दुसरा कोणीही मला अद्यापपर्यंत तरी दिसला नाही. अनेक जणं कदाचित असतीलही, पण ते समोर आले नसतील. त्यामुळं मला माडगूळकर हेच माणदेशाचे ब्रँड अँबेसेडर वाटतायेत.

कोणत्याही प्रांतिक, भाषिक, जातिय, धार्मिक वा भौगोलिक अस्मितांच्या चौकटीमध्ये अडकून न पडता विचार करणाऱ्यांच्या पठडीत मी बसतो, असं मला वाटतं. त्यामुळे मी एखाद्या विशिष्ट प्रदेशाविषयीचं एवढं कौतुक करणं हे ही थोडं विचित्रच वाटतंय. पण तरीही माडगूळकरांच्या लेखनामुळे मी तसं करण्यास प्रवृत्त झालोय. ब्रँड अँबेसेडरचं हेच वैशिष्ट्य असतंय की. आता हे असं कौतुक मी किती दिवस करत राहीन ते माहिती नाही, पण सध्या तरी ते तसंच आहे. सबब, माडगूळकर हेच माणदेशाचे ब्रँड अँबेसेडर आहेत. बास, इतकंच.  

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

अशी माणसं...

काही माणसांचं मोठेपण आपल्याला हळूहळू विरघळणाऱ्या एखाद्या चॉकलेटच्या स्वादासारखं समजत जातं. चॉकलेटं जस जसं जास्त विरघळत जातं, तस तसं ते जास्त चवदार वाटायला लागतं. ते जिभेवर रेंगाळायला लागतं आणि अचानक ते पूर्ण विरघळलयं, संपलंय असं जाणवतं. ते पुन्हा हवंस वाटतं, पण मिळत नाही. ‘त्यांच्या’ बाबतीतही माझी अशीच परिस्थिती आहे. आहे म्हणायला कारण असं, की ‘ते’ असूनही मला आता तितकेसे अनुभवायला मिळत नाहीत. कधीतरी चुकून भेट झालीच, तरी एखादं चॉकलेट कसं तोंडात जाण्याआधीच कुठेतरी पडतं, तसंच ‘ते’ गायब होतात. कधी पाहून हसतात, बोलतात; तर कधी काहीही न बोलताच. आत्ताही व्यंकटेश माडगूळकरांचं ‘अशी माणसं, अशी साहसं’ वाचायला घेतलं होतं. शेवटून दुसरी गोष्ट वाचून थांबलो. पुस्तक मिटायच्या आधी शेवटचं पान, मग ब्लर्ब आणि मग पुन्हा प्रस्तावना चाळली. त्यात पुन्हा मला ‘त्यांचं’ नाव दिसलं. ‘त्यांच्या’ नावाभोवतीच्या वलयात आणि मग आपसूकच ‘त्यांच्या’विषयीच्या आठवणींमध्ये रमणं आलंच. तसं आता ‘त्यांचं’ नाव असं कुठल्या कुठल्या पुस्तकांच्या प्रस्तावनांमध्ये किंवा त्या त्या लेखकाने आभार मानलेल्या लोकांच्या यादीत किंवा मग स्वतः लेखक म्हणून ‘ते’, असं वाचणं माझ्यासाठी नवं नाही. पण तरीही, माझ्यासाठी ‘त्यांचं’ नाव आणि ‘ते’ ही खूपच विलक्षण गोष्ट आहे. ‘ते’ म्हणजे खूप भारदार आणि लौकीकाची गोष्ट वाटतात मला. ‘त्यांचं’ व्यक्तिमत्त्व तसं नसलं तरी.


तशी ‘त्यांची’ नी माझी पहिली भेट ‘रानडे’च्या मुलाखतीमध्येच झालेली. मुलाखतीच्या वेळचं इतर काहीही आठवत नसलं, तरी ‘त्यांनी’ विचारलेला प्रश्न मी कधीही विसरू शकलो नव्हतो. ‘त्यांनी’ थेट खान्देशातल्या राजकारणावरचा प्रश्न त्यावेळी मला विचारला होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या त्या वेळच्या कुलगुरूंचं नावही ‘त्यांनी’च विचारलं होतं. राजकारणावर त्यांना समाधानकारक उत्तर दिलेलं जाणवलं असलं, तरी कुलगुरूंचं नाव आठवेना म्हटल्यावर ‘त्यांनी’ मला छळलं होतं. कुलगुरू कुठले आहेत, कोणत्या विषयाचे आहेत हा तपशील सांगून, मला फक्त नावचं आठवत नाही, म्हटल्यावर ‘त्यांना’ मला छळायची लहर आली होती. मुलाखतीतून उठता उठता ते नाव सांगितल्यावर ‘ते’ हसलेलंही मला चांगलं आठवतंय. 

त्यानंतरची ‘त्यांची’ भेट झाली, तीच मुळी ‘रानडे’च्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच वर्गात. त्यावेळी ‘त्यांचं’ नाव समजलं. मग रोजच्या रोज भेटणं, बोलणं स्वाभाविकच होतं. त्यातूनच मग ‘त्यांची’ आणखी ओळख होत गेली. व्यवस्थित इन केलेलं शर्ट, नीटनेटका ड्रेस, कधीतरी काखेला अडकवलेली पिशवी, पायात सँडेल आणि सॉक्स अशाच युनिफॉर्ममध्ये ते ‘रानडे’ला येत. त्यांनी कधी खूप डार्क, भडक रंगाचा शर्ट घातलेलं मी अजूनही पाहिलेलं नाही. ‘त्यांच्या’ शांत स्वभावाचं प्रतिबिंब कदाचित ‘त्यांच्या’ कपड्यांमध्येही जाणवत असावं ते असं. लांब सडक नाक, उभट चेहेरा आणि या सगळ्यांना साजेशी शिडशिडीत देहयष्टी असा ‘त्यांचा’ एकंदर रुबाब. रुबाबच म्हणेन मी, कारण भारदार व्यक्तिमत्त्व वाटावं असं काहीही जवळ नसताना माणसं कसं रुबाबदार राहू शकतात, याचं ते एक मुर्तीमंत उदाहरण ठरू शकतात. 

‘त्यांच्या’ वर्गात शिकवण्याच्या पद्धतीविषयी आम्हाला सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटायचं. वर्गात येतानाच पाच-दहा पेपरांचा गठ्ठा आणायचे. वर्गात बसल्या बसल्या मग चिरफाड चालायची. संपादन नावाची भानगड नेमकी काय असते, न्यूजरूमचा फील काय असतो, डेस्कची मीटिंग कशी होत असावी, याचा सगळा वृत्तान्त ‘त्यांनी’ अशाच चिरफाडीमधून आम्हाला समजून दिला होता. या
सगळ्या भानगडी सुरू असताना, वर्गात कोण कसं आहे, कोणाला काय आवडत असावं-नसावं, कोण कुठल्या बाजूला झुकलेला आहे, याचा त्यांनी आढावा घेतलेला असे. त्यातूनच मग त्यांच्या कोपरखळ्या, त्यातून कधी आम्हाला समजणारे, कधी उशीरा समजणारे, तर कधी कधीच न समजणारे विनोदही घडत. त्यांच्या चर्चा मग वर्गाबाहेर त्यांच्या मागेमागे त्यांच्या केबिनपर्यंत, कधी केबिनच्या बाहेर कँटिनमध्ये चालत. कधी कधी या चर्चा इतक्या कुत्सितपणे संपत, की ‘त्यांनी’ त्या विषयावर दिलेली प्रतिक्रिया किंवा त्या विषयावरची ‘त्यांची’ ती नजर, तो विषय त्यांच्या दृष्टीने किती क्षूद्र आहे, याची जाणीव करून देई. मग तो विषय पुन्हा न काढता, इतर
विषयांवरच्या गप्पा रंगत.

तिकडे जळगावच्या विद्यापीठात मध्यंतरी गेलो, तेव्हा तिथंही ‘त्यांच्या’विषयी विचारणा झाली. ‘ते आहेत ना अजून, ते म्हणजे त्या वास्तूची जान, त्यांचीच पुस्तकं आहेत इथं अभ्यासाला,’ म्हणत ‘त्यांची’ पुस्तकं समोर करून दाखवत झालेली ‘त्यांची’ स्तुतीही ऐकली. मी आपलं, ‘आहेत,’ म्हणून सांगितलं, ‘त्यांनी’च शिकवलंय म्हणून सांगितलं. समोरच्यानंही, ‘मग तुला पुस्तकं दाखवायची गरजच नाही,’ म्हणत पुस्तक मागे घेतलेलं पाहिलं. दोन-चार आठवणी सांगून ‘भाग्य आहे तुमचं,’ म्हटलेलंही आठवतंय. ‘रानडे’मध्ये असण्याच्या काळात ते असं का म्हटले असावेत, याचा प्रत्यक्ष प्रत्ययच घेतला. अनेक मोठ्या लोकांपासून ते आमच्यासारख्या, म्हटलं तर अगदी फालतू, किस पेड की पत्ती, गटातल्या पोरा-सोरांपर्यंत सगळ्यांचाच राबता त्यांच्याकडे असायचा. मात्र प्रत्येकासोबत ते एकाच न्यायाने बोलतात-बसतात-चहा घेतात, शिव्या घालायच्या तर यथेच्छ घालतात आणि जिथं कौतुक करायचं तिथं मनापासून आणि हातचं काहीही न ठेवता कौतुक करतात हे अनेकदा पाहिलं होतं. कदाचित त्यामुळंच ‘ते’ म्हणजे त्या वास्तूची एक वेगळी ओळख बनले होते.

संगीताविषयीची ‘त्यांची’ आवड, शास्त्रीय संगीताविषयी ‘त्यांना’ असणारी जाण, त्या विषयीचा अभ्यास आणि ‘त्यांनी’ त्या विषयी केलेलं लेखन आमच्यासाठी कौतुकाचा विषय होता. आमच्या वर्गात माझ्यासकट काही जण ‘त्यांच्या’कडे असलेल्या त्या विषयीच्या ज्ञानभांडाराचा लाभ घेण्यासाठी सदैव आसुसलेलो असायचो. ते संगीत आणि इतर कलांविषयी बोलायला लागले, की शक्यतो फक्त ऐकण्याचंच काम करायचं. विचारू वाटलं, तर काही विचारायचं. नाहीतर एक शब्दही बोलायचा नाही, ही माझी त्या दरम्यानच्या काळातली स्ट्रटर्जी होती. त्यातूनच ‘त्यांनी’ आम्हाला समीक्षण शिकवावं, असं आम्हा सगळ्यांनाच वाटायचं. पण ते तशी संधी कधी देत नसत. वर्गाबाहेरच त्यांनी आम्हाला समीक्षणाचे धडे दिले होते. वर्गात ते मिळण्यासाठी आम्ही धडपडायचो, हे त्यांनाही तसं माहिती होतं. ते फक्त कधीही जाणवू देत नव्हते एवढंच.

याचाच परिणाम की काय, पण त्यांनी आम्ही दुसऱ्या वर्षाला असताना त्यांच्या वर्गातच समीक्षण या विषयावर बोलायला सुरुवात केली. तासाचा तो विषय नव्हता, पण बोलण्याच्या ओघात तो विषय निघाला आणि मग त्यापुढचा सर्व तास, म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन तास, आणि त्यांनतर कँटिनचा चहा घेतानाचा वेळ, हा सगळा त्या समीक्षणाच्या चर्चेमध्येच गेला. त्या वर्गात तसं खूप कमी संख्येने हजेरी होती, पण जी मोजकी टाळकी वर्गात होती, त्यांनी समीक्षणाविषयीची अमृतवाणीच ऐकल्याचे अनुभवले. वर्गात उभं राहून ते शिकवतात, हे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. आमच्या सर्व सीनिअर्सला त्या विषयी सांगितल्यावर, ‘त्यांनी उभं राहून शिकवलं,’ म्हणून आश्चर्य व्यक्त केलं होतं. कला, कलांचे प्रकार, कलांच्या प्रकारांनुसार समीक्षणाची बदलणारी पद्धत, सिनेमाचे-नाटकांचे समीक्षण, एखाद्या मैफलीचे समीक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिनेमे आणि त्यांचे समीक्षण, नवख्या समीक्षकाने लिहिता- बोलताना घ्यायची काळजी, काय वाचावे- काय वाचू नये अशा अनेक गोष्टींची माहिती ‘त्यांनी’ त्या वर्गात दिली. खरं तर ‘ते’ समीक्षणाविषयी बोलणारेत हे जर माहिती असतं, तर त्या विषयाचं रेकॉर्डिंगच करून ठेवलं असतं, पण ‘त्यांनी’ ती संधीही दिली नाही. त्या वर्गात अनुभवलेले ‘ते’ खूप वेगळे आहेत हे पदोपदी जाणवत होतं. आवडीच्या विषयावर माणूस किती भरभरून बोलतो, ते त्या वर्गात मी पाहिलं होतं. ‘त्यांनी’ आपलं बोलणं थांबवूच नये, असं वाटत होतं. ‘त्यांचं’ तसं बोलणं, ते शिकवणं पुन्हा कधीही अनुभवायला मिळणार नाही, याची मला वर्ग सुरू असतानाही खात्री होती. ती खात्री आता इतिहासामध्येच बदलली आहे. त्या तासानंतर ‘त्यांनी’ केबिनमध्ये भेटायला गेल्यावर आम्हाला भेट म्हणून दिलेला ‘छंद’चा एक विशेषांक मी जपून ठेवलाय. त्यावर आमच्या वर्गातल्या दोस्तांची नावं घालून सरांनी तो दिलाय. तो चाळायला लागलं, की पुन्हा ‘त्यांच्या’ अशा साऱ्या आठवणी समोर येतात.

माझं ‘रानडे’तलं पहिलं वर्ष संपल्यावर ‘ते’ निवृत्त होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. आमच्या नंतरच्या बॅचमध्ये ‘त्यांच्या’विषयी बोलताना अनेकदा आमच्या बॅचमधले सगळे ती पुढची बॅच ‘अनलकी’ म्हणायचो. तिच नाही त्या पुढच्या सगळ्या. कारण त्यांना या सगळ्या बाबी कधीच अनुभवायला मिळणार नव्हत्या. असाच एक भन्नाट अनुभव या काळात अनुभवला. ‘त्यांचं’ रानडेमधलं येणं जवळपास बंद झालं होतं. कधीतरी रस्त्यानं येता – जाता फक्त दिसायचे. बोलणं होत नव्हतं. एकदा ‘ते’ डेक्कनच्या चौकात रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेले दिसले. आम्ही दोघंही काहीतरी कामाने तिकडे निघालो होतो. ‘ते’ दिसले की एकदम थांबलो. ‘त्यांनी’ आपली सँडल समोरच्या चांभाराकडे दिली होती. हातात एक आख्खा पेरू होता. आम्ही दिसताच हसले. ‘सर किती दिवसांनी दिसलात,’ म्हणेपर्यंत त्यांनीच आम्हाला प्रतीप्रश्न केला, ‘इकडे कुठे फिरायला,’ उत्तर सांगेपर्यंतच्या काळात ‘त्यांनी’ त्यांच्या हातातल्या पेरूच्या दोन फोडी आमच्या समोर केल्या. ‘दोघंही वाटून घ्या बरं नीट. भांडू नका,’ म्हणत दोघांनाही ‘त्यांच्या’ नेहमीच्या स्टाइलमध्ये एक टोला हाणला. मग हसत हसतच गप्पा झाल्या. ‘रानडे’मध्ये आल्यावर चहाला भेटू असं ठरलं आणि निरोपानिरोपी झाली. 

आम्ही दिल्ली दौऱ्याला गेलो होतो, त्यावेळी मी विचारलेल्या एकदोन प्रश्नांचं सगळ्यांनीच कौतुक केलं होतं. त्यातला एक प्रश्न सध्या देशाचे ‘युवराज’ म्हणवल्या जाणाऱ्या एका व्यक्तीला विचारलेला होता. तो प्रश्न ‘यांना’ही खूप आवडला असावा. पुण्यात परत आल्यावर मध्येच असंच कधीतरी ‘त्यांनी’ मला वर्गाबाहेर थांबून सांगितलं, ‘ते तू युवराजांना विचारलेला प्रश्न आणि त्याच्यावर त्याने दिलेलं उत्तर, जसं आठवेल तसं लिहून मला दे.’ मी ते लिहून घेऊन ‘त्यांच्या’कडे गेलो. त्यांनी ते का मागितलंय ते माहिती नव्हतं. ते कळावं म्हणून विचारलं, ‘सर कशासाठी हवं होतं हो हे.’ ते म्हणाले, ‘एवढ्या वर्षाच्या दिल्लीच्या वाऱ्यांवर एक कादंबरी लिहायचीये. त्याची सुरुवात सापडलीये असं वाटतंय. बघू.’ त्यानंतर परत मी त्यांच्या या कादंबरीचं आणि एकूणच त्यांच्या त्या लिखाणाचं काय झालं, ते विचारायचं डेरिंग केलं नाही. कदाचित पुढच्या वेळी चान्स मिळाला तर विचारून घेईन. त्या निमित्ताने त्यांच्याशी भरपूर वेळ गप्पा मारता येतील. त्यांच्याविषयीच्या नानाविध चर्चा मी ऐकल्या आहेत, पण अनुभव मात्र त्यांच्या  चांगुलपणाच, मोठेपणाचाच घेतला आहे. त्यांचं ते मोठेपण पुन्हा अनुभवता येईल. चॉकलेटचा स्वाद... पेरूच्या त्या दोन फोडींनी दिलेली गोडी... छंदचा तो विशेषांक... एका तासात वर्गात उभं राहून शिकवलेलं त्यांचं ते शिकवणं असा सगळ्यांचाच जुना हिशेब कदाचित पुन्हा मांडता येईल.

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

स्वये कार्य जोमे मनाने करोनी...


एरवी सकाळपासूनच काही ना काही निमित्ताने फोन वाजतच असतो, पण परवा सकाळचा फोन थोडा वेगळाच होता. पूर्णपणे अनपेक्षित आणि तितकाच धक्कादायक. इतका, की त्या पुढचा काही काळ आपण नेमकं काय ऐकलंय त्यांच खरं-खोटेपण तपासण्यात, त्याची खातरजमा करण्यातच गेला. डॉ. दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या झाल्याचा तो फोन होता. नेहमीसारखीच थोडी फोनाफोनी झाली. या वेळी ती बातमीसाठी झाली नाही, आणि मी ठरवून केली नाही इतकंच. ती आपोआपचं होत होती. शक्यतो मी सकाळी सकाळी कधीच टीव्ही लावायच्या फंदात पडत नाही. फोन ठेवता ठेवता ते ही आपोआपच केलं गेलं. मला आठवतंय तसं कसाबला फाशी दिल्याच्या घटनेनंतर, थेट या वेळीच इतक्या तातडीनं मी टीव्ही सुरू केला होता.

मराठी बातम्या देणाऱ्या सगळ्या चॅनेल्सवर ती बातमी दाखवत होते. मी ऑफिसला जाण्यासाठी आवरा-आवरी करत होतो. बातमी ऐकत होतो-बघत होतो. घरातून निघताना एकदा स्पॉटला भेट देऊनच ऑफिसला जाण्याचा विचार आला. घटना घडून गेल्यानंतर नेहमी जसं वातावरण असतं, तसंच वातावारण तिथंही होतं. पोलिस बघून माणसं एकमेकांना काय झालं म्हणून विचारत होती, वेळ असलेली थांबत होती नी माझ्यासारखी घाई असलेली पुढे निघून जात होती. मला जास्त वेळ तिथं थांबता येणारच नव्हतं त्यामुळं तिकडून निघून पुन्हा ऑफिसला आलो.


तिथला अस्वस्थपणा मला जाणवला होता. सुरुवातीला वाटलं की, कदाचित या प्रकारामुळे मी अस्वस्थ झालो असेल म्हणून मला तिथले लोकंही अस्वस्थच जाणवले असावेत, पण नाही. नंतर अगदी एक अर्ध्याकश्या तासातच जाणवलं, नाही, माझ्यासारखे सगळेच अस्वस्थ झालेत. कारणे वेगवेगळी असली, तरी सगळे अस्वस्थ आहेत एवढं खरं. काम सुरूच होतं. त्या जोडीला डॉक्टरांच्या आठवणींचा विचारही सुरू होता. एफबी- जीचॅट- ट्विटर सगळ्या अकाउंटवरची माझे स्टेटस मी तोपर्यंत बदललं होतं. अस्वस्थ वर्तमान, दुसरं काय..., धक्कादायक आणि तितकीच अस्वस्थ करून जाणारी सकाळ वगैरे वगैरे त्यात लिहिलं होतं. इतरांचे अपडेट्स चेक केले, तर त्यातही तसाच मॅटर सापडला. या ही बाबतीत आपण जगाबरोबरच चाललोय हे बघून थोडं बरं वाटलं आणि आपण जे विचार करतोये, तश्या विचाराची, आपल्याच वयाची आणखी बरीच लोकं आहेत, हे बघून चांगलं वाटलं.

डॉक्टरांना तसं मी माझ्या लहानपणापासून ऐकीव माहितीच्या आधारावर ओळखत होतो. राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, साधना ही नावं आणि त्यांच्याशी संबंधित खानदेशातल्या कार्यकर्त्यांचं आमच्या घरी असलेलं येणं-जाणं यामुळं मला ही ओळख झाली होती. या कार्यकर्त्यांपैकी मला अगदी जवळची असणारी अविनाशकाका, गोपाळकाका, चंदुकाका ही त्यातली मंडळी डॉक्टरांच्याही तितकीच जवळ होती. वडिलांसोबत या सगळ्यांच्या होणाऱ्या गप्पांमधून मिळालेल्या ऐकिव माहितीच्या आधारावर मी सुरुवातीला डॉक्टरांविषयीची एक प्रतिमा माझ्या डोक्यात तयार केली होती. डॉक्टर म्हटले की मस्त अगदी सुट-बुट, तब्येतीला थोडे सुटलेले, राज्य पातळीवरचा मोठा माणूस म्हणजे मग आजूबाजूला त्यांचा लवाजमा वगैरे वगैरे. पण जळगावात त्यांना एका भाषणाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच त्यांना पाहिलं, तेव्हा त्यांच्याविषयीचं हे सगळं मत आपोआपचं बदललं. मनात राहिला तो त्यांचा साधेपणा आणि त्यांचा करडा आवाज, जो मी पुण्यात आल्यानंतरच्या त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये, बैठकांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये पुन्हा अनुभवला. त्यांच्या जाण्याने मी अस्वस्थ होण्यामागे त्यांचा हा साधेपणा आणि डाऊन टू अर्थ राहाण्याचा स्वभावच जास्त कारणीभूत असावा, असंच या सगळ्या विचारांमधून वाटायला लागलं.

गेल्या महिन्या- दोन महिन्याच्या काळात त्यांना एक- दोनदा खूप जवळून अनुभवण्याचे प्रसंग आले. पुण्यात घरी साधना साप्ताहिक सुरू करायचं होतं. त्यासाठीची वर्गणी भरायला मी साधनेच्या सदाशिव पेठेतल्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथं डॉक्टर असतात हे माहितीच होतं. मी घराचा पत्ता एका कागदावर लिहित असताना ते तिथं आले. माझं लिहिणं सुरूच होतं, तोपर्यंत ते तिथल्या मॅडमशी बोलत होते. बोलण्याचा आशय हा होता, की माझी वर्गणी संपली आहे, त्यासाठीचे पैसे भरायचे आहेत. मी चेक देतो. तो घ्या. डॉक्टर साधनेचे संपादक होते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्वेसर्वाही तेच होते. तरीही ते या दोन्ही साप्ताहिक-मासिकांच्या वर्गणीच्या पैश्यांचा हिशेब ठेवत होते आणि ते या दोन्हींची वर्गणीही भरतात हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला.

मी लिहिता लिहिताच वर बघितलं. बोलणं संपलं की मी त्यांच्याकडे बघतोय, हे त्यांच्या लक्षात आलं. हसत हसत त्यांच्या त्याच करड्या आवाजात मला विचारलं, काय रे, काय म्हणतोस,’ मी आपलं सांगितलं, साधनेची वर्गणी भरायला आलोय. बाकी सगळं ठिक ना, म्हटल्यावर मी ही हो म्हटलं आणि ते त्यांच्या कामाला निघून गेले. स्वतःच्या मासिक- साप्ताहिकांची वर्गणीही ते स्वतः भरतात, ते अंक फुकट घेत नाहीत, चळवळीला सुरुवात स्वतःपासून करतात, असे विचार त्यांच्या या वागण्यातून मला तिथल्या तिथे पटले. मागे एकदा सज्जनगडावर गेलो असताना, तिथला एक श्लोक मी माझ्या एका डायरीत लिहून ठेवला होता. तो आठवला- 
स्वये कार्य जोमे मनाने करोनी,
पुढे ठेव आदर्श आधि रचोनी।
पहा लोक येती न बोलावताही,
कृतीनेच शब्दा प्रति मोल येई।। 
।जय जय रघुवीर समर्थ।   
अशा लोकांना आपल्याकडे वेडे म्हणण्याचा प्रघात आहे. डॉक्टरांचं हे वेडेपण मला भावलं होतं. मनातल्या मनात अशा माणसाला आपण ओळखतो, त्यांना खूप जवळून अनुभवतो याचं समाधानही होतं.

मागे एकदा असाच एका असाइनमेंटच्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी स्वीकारली होती. रानडेमध्ये पहिल्याच वर्षाला होता. मुलाखतीचं तंत्र-फिंत्र वर्गात शिकलो असलो, तरी ते प्रत्यक्ष वापरलं नव्हतं. ते कसं वापरायचं, याची प्रात्यक्षिकं करेपर्यंत ही असाइनमेंट मिळाली होती. आधी फोन करून वेळ घ्यायचं सौजन्य दाखवावं असं सुचलं, तेच काय ते नशीब. वेळ मिळाली, की गेलो तसाच त्यांच्याकडे. मुलाखतीसाठीचे प्रश्न कुठयंत, असं विचारल्यावर मी आपलं वहीत ते शोधण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसलाय हे त्यांच्या लक्षात आलं, की त्यांनी आपलं सांगितलं, तिथं बाहेर बैस, प्रश्न काढ आणि मग आपण बोलूयात,’ पुन्हा प्रश्न काढले आणि मग डॉक्टरही बोलले. कोणतेच आढेवेढे न घेता. चळवळी संपत चालल्या आहेत का वगैरै विषयावर त्यांची ती मुलाखत होती. एनजीओंच्या चळवळींमुळे सामाजिक चळवळींना काय फटका बसला, याच्यावर त्यांनी अगदी सविस्तर माहिती दिली. असाइनमेंट झाली, पण त्याहीपेक्षा डॉक्टरांची भेट झाली हे माझ्यासाठी त्या वेळी महत्त्वाचं होतं आणि त्याचं महत्त्व मला आत्ताही जाणवतंय.

साधनेच्या पासष्टीचा कार्यक्रमही पाहायला गेलो होतो. पत्रकार म्हणून नाही आणि रिपोर्टिंग होतं म्हणूनही नाही. काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल या अपेक्षेने. पळशीकरांची मुलाखतही त्याच कार्यक्रमात झाली. तिथेही साधनेला समाजवाद्यांचा असलेला चेहरा बदलून, तो तरुणांचा चेहरा करण्यात डॉक्टरांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक झालं. विशेष म्हणजे, त्या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड फौज उपस्थित होती. त्याच तरुणांच्या साक्षीने साधनेला आणखी तरुण, पण तितकंच जबाबदार साप्ताहिक म्हणून समाजासमोर मांडण्याचा पुनरुच्चार डॉक्टरांनी केला. तोच साधेपणा आणि तोच करडा आवाज मला तिथेही ऐकायला मिळाला. ते गेल्याचं कळल्यापासून मला त्यांचा तो साधेपणा आणि त्यांचा तोच करडा आवाज पुन्हा ऐकायला-अनुभवायला मिळणार नाही, याचं जास्त वाईट वाटतंय. त्यांनी केलेलं काम पुढे सुरू ठेवणारे कार्यकर्ते त्यांनी जोडले आहेत. त्यामुळं ते सुरूच राहाणार आहे, याची खात्री वाटते. पण त्याचवेळी त्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठीचा बापमाणूस आता नाही, याचं वाईट वाटतंय. दोन दिवसांपासून त्यांच्या त्या इंटर्व्ह्यूचं रेकॉर्डिंग शोधतोये. सापडलंच नाही. माणसाप्रमाणे तेही हरवलं याचंही आता खूप वाईट वाटतंय. म्हणून कदाचित मी गेले दोन दिवस अस्वस्थ झालो, हे उत्तर आता सापडतंय.

रविवार, ७ जुलै, २०१३

'सर' नावाच्या सरींमधून...


काल एका कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमात एका ज्येष्ठ प्राध्यापकाच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्याच माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला होता. कार्यक्रमावरून परत आल्यावर नेहमीप्रमाणे बातमी लिहिली. बातमी लिहिताना जाणवत होतं, की तिथं ऐकलं-पाहिलेलं मी कुठेतरी माझ्या शिक्षकांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय, तिथली वर्णनं कुठेतरी जुळवून पाहण्याचा प्रयत्न करतोय. बातमी पूर्ण करून ती पुढे सोडली, तरी ते विचार काही जाईनात. थोड्या वेळाने दुसऱ्या कामाच्या नादात ते विचार थांबले, पण पुन्हा घरी येताना आणि अगदी आजच्या दिवसभरातही ते विचार अनेकदा येत-जात राहिले, वेगवेगळ्या निमित्ताने. त्यातूनच अगदी सुरुवातीपासून मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो त्या सर्व सरांचे चेहरे, त्यांचं शिकवणं, शिकवण्याव्यतिरीक्तच्या काळातलं त्यांचं वागणं सगळं-सगळं असं समोर उभं राहिलं. सर नावाची सरच ती. सरीमागून सर बरसावी तशी एकामागोमाग एक आठवण समोर येत राहिली.

तु. स. झोपे शाळेतल्या आठवणी तश्या ताज्या नाहीत, पण भुसावळ हायस्कूलमध्ये डमिशन घेतल्यानंतरचे दिवस निश्चित आठवतात. पाचवीपासून ते दहावीपर्यंत कायम वर्गावर राहिलेले बी. पी. चौधरी सर अर्थात 'बीप्पीसी', डाव्या हाताने अगदी पल्लेदार अक्षरात फळा लिहिणारे पी. डब्ल्यू. चौधरी सर, प्रचंड कडक खडके सर, पी. के. पाटील सर ही त्या वेळची आवडती नावं. प्रत्येक नावामागचं कारण वेगवेगळं. दिसायला गोरेपान, कायम टापटिपीत वर्गात येणारे, भरपूर गप्पा मारणारे बीप्पीसी पाचवीपासूनच वर्गावर होते. शिकवता शिकवता ते भरपूर गोष्टीही सांगायचे. महत्त्वाचं म्हणजे वर्गात किती गृहपाठ झालेत हे मलाच विचारायचे. त्यामुळं मी सांगेल तो आकडा फायनल. त्यांच्या कॉलेज लाइफच्या गमतीजमती अगदी रंगवून सांगायचे. 'बळिराम फकिरा चौधरीचं बीपीसी असं का,' विचारल्यावर, 'खरं तर ते बीएफसी असं व्हायला हवं होतं, पण जाऊ दे बेटा,' असंही त्यांनी एकदा सांगितलं होतं. चौथीपर्यंत लंगडी खेळायचा फायदा पाचवीपासून पुढे खो-खो खेळायला झाला. पाचवीत असताना वार्षिक स्पर्धांमध्ये शेवटच्या मॅचला पहिल्या फळीतले दोघं पहिल्याच मिनिटात उडल्यावर एकट्याने खिंड लढवून सहावीच्या वर्गाला हरवलं होतं. त्यावेळी गेम संपल्याची शिट्टी मारल्या मारल्या याच बीप्पीसींनी मला कडेवर उचलून घेतलं होतं. नंतर कोणत्याच सरांनी तसं उचललेलं मला आठवत नाही. त्यांना फार कौतुक होतं माझं. शाळा सुटेपर्यंत कायम पहिल्या एक-दोन नंबरात राहिल्यानं ते कायम होतं. पुढे परत भेट नाही झाली. मी कॉलेजला गेल्यानंतर काही वर्षांनी ते अकालीच गेल्याचं कळलं. त्यावेळी हळहळलो होतो आणि आताही.

आमचे पी. के. पाटील म्हणजे भन्नाट रसायन. त्यांना सगळे त्यावेळी 'गुंडाप्पा' म्हणायचे. का ते माहिती नाही, पण म्हणायचे. त्यांच्या एक फेव्हरेट डायलॉग होता, 'बाळा, तुला कोण मारणार,' आणि हा डायलॉग ते ज्याच्या जवळ म्हणत असत, पुढच्या क्षणी तो आणि त्याच्या शेजारी बसणारा, अशा दोघांची पाठ ते मऊ करत असत. त्यांच्या वर्गात भरपूर धिंगाणा चालायचा. आमच्या वर्गातला पंकज आणि राजेश हे त्यांची आवडती गिऱ्हाइकं होती. या दोघांनी त्यांना अनेकदा वर्गभर मागेमागे फेऱ्या मारायला लावल्या होत्या आणि त्याचा नंतर होणारा परिणामही भोगला होता. त्यामुळे आम्ही शक्यतो सावधच असायचो. त्यांच्या वर्गात मीही एक-दोनदा धपाटे खाल्लेत, पण हसण्याच्या नादात ते किती लागले ते समजलंच नाही.

दहावीनंतर अकरावी सायन्सला नाहाटा कॉलेजला अडमिशन घेतलं. तिथं पी. डी. चौधरी नावाचे सर केमिस्ट्री शिकवायचे. ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्यही तेच होते. त्यावेळी इतर कोणापेक्षा या सरांची पर्सनॅलिटी एकदम भन्नाट होती. उंचपुरं व्यक्तिमत्त्व. चष्मा, मिशी, शक्यतो हसून बोलण्याचा कायमचा प्रयत्न, पण वर्गात तसे खूप कडक. अकरावी आणि बारावी दोन्ही वर्षांना त्यांनी आम्हाला केमिस्ट्री शिकवलं. उंची कमी असल्यानं मी वर्गात शक्यतो पहिल्या बेंचवर बसायचो. या सरांचं पोरांच्या वहीतही बारीक लक्ष असायचं. बारावीच्या कोचिंगला एकदा त्यांनी अल्केन, अल्किन आणि अल्काइनचे वेगवेगळे फॉर्म्युले लिहायला सांगितले होते. त्यावेळी फॉर्म्युला तयार कसा होतो, हे शिकण्यापेक्षा तो पाठ करण्याची सवय लागली होती. त्यातच नवा फॉर्म्युला कोणी सांगितला तर सिंगल बाँड - डबल बाँड - ट्रिपल बाँड वाटेल तसे द्यायची सवय. अशाच एका फॉर्म्युल्यात डबल बाँडच्या जागी ट्रिपल बाँड लिहिलेला त्यांनी पाहिला. ते पाहिल्या –पाहिल्या त्यांनी माझी लायकीच काढली. 'तू सायन्सच्या लायकीचाच नाहीस,' हे तिथंच सांगितलं. आख्या वर्गासमोर लायकी काढली म्हटल्यावर वाइट वाटणं साहाजिकचं होतं. रागही आला. पुढे बी. एस्सीला केमिस्ट्री विषय ठेवण्यामागे हा रागही काही प्रमाणात कारणीभूत होता. पण आता बरेचदा वाटतं, की सरांनी त्यावेळी ओळखलेली माझी लायकी अत्यंत बरोबर होती. 

सीनिअर कॉलेजचा काळ म्हणजे जे. जे. वारकेंचाच. काळेशार आणि उंचपूरे. पुण्यातून एम. एस्सी झालेले. ते फिजिकल केमिस्ट्री शिकवायचे. गिब्स फ्री एनर्जी, हेल्महोल्ट्स फ्री एनर्जी आणि एन्थाल्पी या किचकट बाबी त्यांनी पिक्चरच्या तिकिटाच्या रकमेच्या माध्यमातून समजावून दिल्या होत्या. किचकट आणि अवघड विषय सोपा करून शिकवणं हे त्यांचं वैशिष्ट. त्यामुळंच पुढं पुढं मला फिजिकल केमिस्ट्री विषयच जास्त आवडायला लागला होता. त्यांना सवय होती ती बेटा म्हणायची. 'बेटा, तुम्हाले सांगू...', 'बेटा हे...', 'बेटा ते...', 'बेटा मी आलाच...', 'बेटा मी उद्या येनार नी..', प्रत्येक गोष्टीसाठी 'बेटा' ठरलेलंच. त्यांच्या वर्गात शक्यतो कधी बोअर व्हायचं नाही. पण ज्या दिवशी बोअर होतंय असं लक्षात यायचं, त्या दिवशी एकच काम. ते किती वेळा 'बेटा' म्हणतायेत ते मोजायचं. जाम मज्जा यायची. नंतर एकदा त्यांनीच वर्गात सांगितलं, की तुमचं सगळ्यांच लक्ष माझ्याकडे राहावं म्हणून मी निरनिराळे प्रयोग करतो. एखाद्या शब्दावर मुद्दाम जोर देतो, एखादा शब्द मुद्दाम पुन्हा पुन्हा म्हणतो, मी एक शब्द खूप वेळा म्हणतो आणि तुमच्यापैकी काही जण तो शब्द मी किती वेळा म्हणतोय हेही मोजतात. हे ऐकल्यावर वर्गात कोणालाच आपण नेमकं काय बोलावं, सरांना काय सांगावं हे सुचलं नव्हतं.  

याच दरम्यानच्या काळात केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल लॅबपेक्षा माझा वावर कल्चरलच्या प्रॅक्टिस सेशन्स आणि एनएसएसच्या कार्यक्रमांमधून वाढायला लागला होता. इतरांपेक्षा तुलनेत माझं अक्षर चांगलं होतं आणि फळ्यावर शक्यतो एका ओळीमध्ये सरळ अक्षर लिहिता यायला लागलं होतं. त्यामुळं कॉलेजच्या नोटिस बोर्डवर सूचना लिहायची संधी मिळायला सुरुवात झाली होती. वारके सरांचं या बाबीकडे बारीक लक्ष होतं. त्यातच कल्चरलच्या वाऱ्यांमधून परीक्षांच्या वाऱ्या करून करून टी.वाय.बीस्सीचं थर्ड इयर सुरू झालं होतं. तरीही वर्गावर वारके सर आणि त्यांच्या लेक्चरला हजर असणारा मी कॉमन होतो. शेवटी तिसऱ्या वर्षात त्यांच्या पहिल्या लेक्चरला इतर नव्या विद्यार्थ्यांची ओळख करून घेतल्यावर मी ओळख करून देणार, तेवढ्यात त्यांनीच सांगितलं, 'बेटा याह्यांची ओळख असू द्या बरं. लय कामाले येतीन. बेटा हे आपल्या वर्गातले थोर समाजसेवक. आण्णा हजारेंच्या नंतर याह्यचाच नंबर येनारे. बेटा कधी तरी आपल्याभी वर्गातले फळे लिहित जाय ना. बेटा, सांग बेटा तुह्य नाव...,' ही स्तुतिसुमनं ऐकल्यावर मला पुढं काय बोलावं हेच समजत नव्हतं. नशिबानी साथ दिल्याने थर्ड इअरचं चौथं वर्ष करावं लागलं नाही. त्यामुळे सुटलो.

आता हे सारं आठवलं की अजूनही हसायला येतं. ही सारी मंडळी आपल्याला गुरू म्हणून लाभली म्हणून इथपर्यंत आलोय हे जाणवतं. भुसावळला गेल्यावर या साऱ्यांना भेटावसं वाटतं, पण अजूनही हिम्मत होत नाही पुढे जायची. बघू, आता पुढच्या वेळी गेलो, तर नक्की जाऊन एकदा भेट घेण्याचा विचार करतोय. कदाचित त्यांनाही आनंद वाटेल आणि मलाही.